ठाणे शहर : महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्याचे व साष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह १,७०,६७५ (१९७१). हे उल्हास नदीच्या खाडीवर पश्चिमेकडे वसले असून आग्र्याकडे व हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गांवर आहे. पूर्वी हे एक प्रसिद्ध बंदर होते. मुंबई–ठाणे हा सु. ३२ किमी.चा भारतातील पहिला लोहमार्ग १८५३ मध्ये सुरू झाला. पूर्वी ते शिलाहार, बिंब, यादव यांच्या सत्तेखाली होते.

ठाणे शहराचे दृश्य

बिंबांचा सैनिकी तळ येथे होता. त्याला ‘स्थानक’ म्हणत. स्थानक हे अपरांत प्रदेशाची राजधानी होते. स्थानकवरून ठाणे हे नाव पडले. १३१८ मध्ये मुबारक खल्‌जीने हे ठिकाण जिंकून घेतले. १५३२ मध्ये ते पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. त्यांनी तेथे भुईकोट किल्ला बांधला. १७३७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला सर केला. तो इंग्रजांनी १७७४ मध्ये जिंकून घेतला. त्रिंबकजी डेंगळे यास याच किल्ल्यात कैदेत ठेवले होते. तेथून तो मोठ्या शिताफीने पळून गेला. सध्या या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जातो. ठाण्यापासून १·६ किमी. वरील नौपाडा येथे मनोरुग्णालय आहे. ठाणे येथे उत्तम सुती कापड, कागद, रंग, वस्तऱ्याची पाती, विद्युत् व धातूची उपकरणे, औषधे, लाकडी खेळणी, गरम कपडे, लोखंडी सामान व यंत्रे, रेडिओ, तारा व जाळ्या इ. तयार करण्याचे कारखाने आहेत. येथे मराठी ग्रंथ संग्रहालय, जुने तळे, कौपीनेश्वराचे देऊळ, दोन रुग्णालये, चार माध्यमिक शाळा, एक तांत्रिक विद्यालय, महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे विभागीय कार्यालय आहे. येथील उत्खननात मध्ययुगीन मूर्ती, मंदिरे व ताम्रपटही सापडले आहेत. येथून तीन साप्ताहिके व एक त्रैमासिक प्रसिद्ध होतात.

क्षीरसागर, सुधा