ट्यूट्‌चेव्ह, फ्यॉडर इव्हानव्ह्यिच : (५ डिसेंबर १८०३—२७ जुलै १८७३). रशियन कवी. ओव्हस्टग येथे एका सरदार घराण्यात जन्म. मॉस्को विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. राजनैतिक सेवेच्या निमित्ताने जर्मनी व इटली या देशांत त्याने बावीस वर्षे वास्तव्य केले व तदनंतर तो रशियास परतला. तो लहानपणापासूनच कविता लिहू लागला होता. १८५४ साली व १८६८ मध्ये त्याचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्याची बरीचशी कविता निसर्गपर आहे. तिच्यात दोन जगे आहेत. एका जगात त्याला सर्वत्र नियमन आणि सौंदर्य आढळते. दुसरे जग म्हणजे आत्यंतिक विघटनाचे गोंधळाचे. माणूस या दुसऱ्या एकाकी दुरावलेल्या जगात राहतो. तिथून त्याला दुसऱ्या माणसांशी संवाद साधणे शक्य होत नाही. त्याच्या ‘सायलेन्शियम’ किंवा ‘द स्पोकन थॉट बिकम्स अ लाय’ (१८३०) या कवितेत ह्या संवादलोपाचे भान दिसून येते. त्याच्या प्रणयपर कविताही उल्लेखनीय आहेत. त्याची शैली आर्ष व प्रतिमाप्रचुर असून तो एक श्रेष्ठ भावकवी मानला जातो. सेंट पीटर्झबर्ग येथे त्याचे निधन झाले. 

मेहता, कुमुद