टोगो : पश्चिमी आफ्रिकेच्या गिनीच्या आखातावरील एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ५६,७८५ चौ. किमी. लोकसंख्या १९,५५,९१६ (१९७०). विस्तार ६° १०’ ते ११° ५’ उ. आणि १° ७५’ पू. ते ०° २५’ प. यांदरम्यान आहे. ह्याची उत्तर दक्षिण लांबी ५१२ किमी. असून जास्तीत जास्त रुंदी मध्यभागी १४४ किमी. आहे. ह्याच्या उत्तरेस अपर व्होल्टा, पूर्वेस दाहोमी व पश्चिमेस घाना हे देश असून दक्षिणेस गिनीचे आखात आहे. समुद्रकिनारा फक्त १४४ किमी. आहे.
भूवर्णन : टोगाच्या मध्यभागी घानातील आक्वापीम टेकड्यांपासून दाहोमीतील आटाकोरा डोंगरापर्यंत गेलेली शेन डू टोगो ही सरासरी ७०० मी. उंचीची डोंगररांग नैर्ऋत्य ईशान्य गेलेली आहे. तिचे सर्वोच्च शिखर पिक बौमान ९८६ मी. उंचीचे आहे. ह्या टेकड्यांच्या उत्तरेला आणि पश्चिमेला व्होल्टाची ओटी ही उपनदी वाहते. ती काही अंतरापर्यंत टोगो व घाना यांमधील सीमा आहे. तिला पूर्वेकडून कारा, मो इ. उपनद्या मिळतात.
ओटी नदीच्या उत्तरेस ओटी वालुकाश्म पठार हा सॅव्हाना गवताळ प्रदेश आहे. अगदी वायव्येस ग्रॅनाइट आणि नीस यांचा अधिक उंच प्रदेश असून तेथेच दापांगो क्लिफ्स हा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे. मध्यवर्ती टेकड्यांच्या दक्षिणेस सु. ४३० मी. उंचीचा पठारी प्रदेश असून त्यावरून मोनो व तिच्या उपनद्या-आनीए व ओगू आणि हाहो, सीओ–वाहतात. या पठाराच्या नैर्ऋत्येस सु. ३० किमी. रुंदीचा व सरासरी ६० ते ९० मी. उंचीचा वाच्ची पठार हा जांभ्या दगडाचा प्रदेश आहे. त्याला लागून चिंचोळी किनारपट्टी असून ती पुळणी व खारकच्छयुक्त आहे. या अंतर्गत खारकच्छांपैकी लेक टोगो हे सर्वांत मोठे आहे. ही खारकच्छे पूर्वीच्या नद्यांच्या खाड्या असाव्यात.
हवामान : टोगो हा देश उष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात येतो. तेथे दक्षिणेकडे एप्रिल ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर असा दोन वेळा पाऊस पडतो. किनारी प्रदेशात सर्वांत कमी ६० ते ९० सेंमी. पाऊस पडतो. किनाऱ्यापासून सु. १०५ किमी. आत पालीमे विभागात सर्वांत जास्त ११२ सेंमी पाऊस पडतो. उत्तरेकडे पाऊस एकदाच एप्रिल ते जुलै सु. ७२ सेंमी. पडतो. बाकीच्या काळात उष्ण, कोरडे, धूलियुक्त हरमॅटन वारे प्रभावी असतात. येथील सरासरी तपमान २६° से. असते. ऑगस्टमध्ये डोंगराळ भागात सर्वांत कमी २०° सें. तपमान असते, तर उत्तरेकडे मार्च-एप्रिलमध्ये सर्वांत जास्त ३३° से. तपमान असते. सापेक्ष आर्द्रतेचे सरासरी प्रमाण उत्तरेस ४९% पर्यंत असते, तर दक्षिणेस ते ९५ % पर्यंत वाढत जाते.
वनस्पती : पूर्वी ह्या प्रदेशात घनदाट उष्ण कटिबंधीय अरण्ये होती. आता नद्यांच्या खोऱ्यांत व नैर्ऋत्येकडील जास्त पावसाच्या भागात ही अरण्ये आढळतात. दाट अरण्यांचे काही प्रदेश मध्यवर्ती डोंगराळ भागातही आहेत. इतर ठिकाणी येथील नैसर्गिक वनस्पती सॅव्हाना प्रकारची आहेत. पावसाळ्यात प्रदेश हिरवागार होतो, तर उन्हाळ्यात लहानलहान झुडपे व गवताशिवाय काही दिसत नाही. दक्षिणेकडील पठारी प्रदेशात गोरखचिंचेसारखे मोठे वृक्ष आढळतात. अरण्यांतून कठीण लाकूड, डिंक व पामची उत्पन्ने मिळतात. बहुतेक जमीन शेतीच्या दृष्टीने निकृष्ट आहे. समुद्रकिनाऱ्याकडे जाड गवताचा पट्टा आढळतो. खारकच्छांच्या दलदलींच्या भागात लव्हाळे व खारफुटी (मॅनग्रोव्ह-कच्छ वनस्पती) यांची दाटी झालेली दिसते.
अरण्यांबरोबर वन्य श्वापदांची संख्याही कमी झाली आहे. उत्तरेकडे अजूनही हत्ती, सिंह, चित्ते दृष्टीस पडतात. तसेच हिप्पोपोटॅमस व मगरी ह्या नद्यांजवळ बऱ्याच आढळतात. सर्वसामान्यपणे सर्व भागात सर्व प्रकारची माकडे आढळतात. किनाऱ्याजवळील दलदलीच्या प्रदेशामध्ये विविध प्रकारच्या सापांची व सरड्यांची संख्या भरपूर आहे. सान्साने-मांग्गोजवळच्या चानागा अभयारण्यात रानरेडे, गाढवे, चार सुळ्यांचे रानडुक्कर, हरिण, मृग इत्यादींचे कळप आढळतात. पक्षी व कीटक विपुल आहेत. किनाऱ्याजवळ मॅकेरल, बास, सीब्रीम, रेडस्नॅपर, ट्रिगरफिश, डोरॅडो, रे, सोल इ. मासे सापडतात. शेवंडे व कोळंबी हे कवचधारी आढळतात.
इतिहास: बाराव्या ते चौदाव्या शतकांमध्ये नायजरच्या खोऱ्यातून इव लोक टोगोलँडमध्ये आले असावेत. सध्या टोगोत व जवळच्या घाना प्रदेशात ह्या लोकांची संख्या जास्त आहे. पंधराव्या ते सोळाव्या शतकांत पोर्तुगीज लोक आले व त्यांनी येथे गुलामांचा व्यापार सुरू केला. गुलामांच्या साहाय्याने त्यांनी किनऱ्याजवळच्या प्रदेशात नारळ, मका इत्यादींचे पीक काढण्यास सुरुवात केली. ते ह्या पिकांचा उपयोग आपल्या बोटीवरील खलाशांसाठी करीत असत. त्यानंतर १६२६ मध्ये फ्रेंच आले व त्यांनी ग्रँड पोपो व पेटिट पोपो येथे ठाणे मांडले पण त्यांना तीव्र विरोध झाला. १७८७ मध्ये याची पुनरावृत्ती झाली. मग त्यांनी पॉर्टो सेगूरो येथे १८६५ ते १८८३ पर्यंत व्यापार केला. १८५६ मध्ये जर्मन लोकही ग्रँड पोपो येथे आले. १८८० नंतर त्यांनी बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. ५ जुलै १८८९ रोजी टोगोगावच्या प्रमुखाशी डॉ. गुस्टाव्ह नाख्टिगल याने तह करून समुद्र किनाऱ्यावरील भाग घेतला. जर्मनांनी आपली राजधानी बागुदा येथे, नंतर झेबे येथे व १८९७ मध्ये लॉमे येथे केली. १८९७ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्याशी त्यांचा सीमेबद्दल वाद व नंतर वाटाघाटी होऊन व्होल्टा नदीच्या उजवीकडील प्रदेश गोल्ड कोस्टच्या ताब्यात आला. यामुळे अडजा, वात्यी इ. लोक तीन देशांत विखुरले गेले. जर्मनांनी उत्तर भागातील देशही आपल्या ताब्यात घेतला व तेथे त्यांनी रस्ते व लोहमार्ग बांधले. आर्थिक व सामाजिक प्रगतीला सुरुवात झाली पण लवकरच पाहिले महायुद्ध पेटले. फ्रेंचांनी व इंग्रजांनी टोगोचा ताबा घेतला. १९२२ मध्ये राष्ट्रसंघाचा महादिष्ट प्रदेश म्हणून हा भाग फ्रेंच व इंग्रज यांजकडे दिला गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज व फ्रेंच यांचेकडे टोगोलँड संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून आला. ह्या दोघांनीही टोगोलँडचा भाग आपल्याकडे असावा, अशी संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केली, तर १९४७ मध्ये एव्ही लोकांना एकाच राज्यात ठेवावे अशी त्यांनी मागणी केली. तसेच टोगोलँड हे एक राष्ट्र करावे अशीही मागणी पुढे आली. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत ९ वर्षेपर्यंत खितपत पडला. याला तद्देशीय लोकांतील दुही हेही एक कारण होते. ९ मे १९५६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली ब्रिटिश टोगोलँडमध्ये मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये ब्रिटिश टोगोलँडचा प्रदेश स्वतंत्र गोल्ड कोस्टमध्ये समाविष्ट असावा असे ठरले. २८ ऑक्टोबर १९५६ रोजी फ्रेंच टोगोलँडमध्ये लोकमत अजमावण्यात आले. त्यानुसार टोगोलँड प्रदेश विश्वस्त म्हणून फ्रेंचांकडे जावा असा जनतेने कौल दिला पण हा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी मान्य केला नाही. २८ एप्रिल १९५८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली नवीन निवडणुका घेण्यात आल्या. ह्यात राष्ट्रीय संयुक्त संघाचा विजय झाला आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. टोगो विधिमंडळातील ४८ जागा त्यांनी जिंकल्या आणि त्यांचा नेता सिल्व्हॅनस ऑलिंपो हा पंतप्रधान झाला. १३ ऑक्टोबर १९५८ मध्ये फ्रेंच सरकारने टोगोच्या नेत्याशी वाटाघाटी करून टोगोला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे असे ठरविले व २७ एप्रिल १९६० रोजी टोगो हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक अस्तित्वात आले. १३ जानेवारी १९६३ रोजी ऑलिंपोची हत्या झाली आणि निकोलास गृनिट्झ्की सत्तेवर येऊन मेमधील निवडणुकीने तो राष्ट्राध्यक्ष झाला. ३ जानेवारी १९६७ रोजी ले. क. एटिएन्ने इयाडेमा याच्या नेतृत्वाखाली लष्करी क्रांती होऊन संविधान स्थागित आणि विधिसभा बरखास्त झाली. तीन महिन्यांनी इयाडेमा राष्ट्रध्यक्ष झाला. त्याने मुलकी संविधान तयार करण्यासाठी एक समिती केली परंतु १९६८ मध्ये तिने दिलेला मसुदा पुढे आला नाही. नंतर जनरल इयाडेमाने मुलकी कारभार अनिश्चित काळापर्यंत स्थागित केल्याचे जाहीर केले.
राजव्यवस्था : इयाडेमासह सैनिकी व मुलकी बाराजणांचे कारभारी मंडळ असून हुकूमनामे व वटहुकूम यांनी राज्य चालिवले जाते. कारभारासाठी टोगोचे मॅरिटाइम (सागरी), प्लॅटो (पठारी), सेंट्रल (मध्य) व सॅव्हानेज असे चार विभाग केलेले असून त्यांवर राष्ट्राध्यक्षाने नेमलेले तपासनीस असतात. प्रत्येक विभागाचे अनेक जिल्हे असून त्यांवर राष्ट्राध्यक्षाने नेमलेले जिल्हाधिकारी असतात. त्यांच्या मदतीला खास मंडळे राष्ट्राध्यक्षाने नेमलेली असतात. आनेचो, आटाक्पामे, लॉमे, पालीमे, सोकोडे व त्सेव्ह्ये येथे लोकांनी निवडलेली म्युनिसिपल कौन्सिले व त्यांनी निवडलेले महापौर आहेत. बासारी येथे लोकांनी निवडलेले म्युनिसिपल कौन्सिल व शासनाने नेमलेला महापौर असतो. १९७५ मध्ये कारभाराची पूनर्रचना होऊन देशाचे एकूण एकोणीस जिल्हे करण्यात आले.
न्याय : स्थानिक व उच्च न्यायालयांकडे न्यायव्यवस्था सोपविलेली आहे. आनेको, लॉमे, आटाक्पामे व सोकोडे येथे प्रमुख न्यायालये व लॉमे येथे उच्च न्यायालय आहे. त्यांशिवाय कारभारी, औद्योगिक व सर्वोच्च न्यायालये लॉमे येथे आहेत.
संरक्षण : १,००० सैनिकांचे एक बटालियन असून २५० नौसैनिक, एक नदीवरील गनबोट व तीन पहारा नौकांवर काम करतात. वायुदलात सहा विमाने व एक हेलिकॉप्टर आहे. टोगो व फ्रान्स यांचा संरक्षण व मदत करार आहे.
आर्थिक स्थिती : शेती हा टोगोच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. शेतीखाली ३८·६% जमीन असून पडीक परंतु लागवडीयोग्य जमीन २३·२ % आहे. जंगले ९·५% व कुरणे ३·६%जमीन व्यापतात. शेतजमीन फारशी सुपीक नसल्यामुळे टोगोंना आपल्या शेतीला गुरे पाळणे, कोंबड्या पाळणे, मासेमारी इ. व्यवसायांची जोड द्यावी लागते. तथापि येथील मुख्य व्यवसाय शेतीच आहे. कोको व कॉफी ही येथील महत्त्वाची नगदी पिके आहेत. तसेच ताडतेल, ताडगर, खोबरे, भुईमूग, कापूस, मॅनिऑक ही व्यापारी पिके आहेत. तेलताड, नारळ, कॉफी, कोको, कोला, कसाव्वा, कापूस यांचे मोठे मळे आहेत.
येथील बहुतेक शेती निर्वाह शेती असून शेतीची पद्धतही जुनीच आहे. हवामानातील विविधतेप्रमाणे शेतीच्या उत्पादनातही विविधता आढळते. उत्तरेकडे तपमान जास्त व कोरडा ऋतू मोठा आहे आणि एकाच विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे ह्या ठिकाणी भरडधान्ये, मका, भुईमूग, द्विदलधान्ये, एरंडी इ. पिके होतात. जेथे कालव्याचे पाणी देण्याची व्यवस्था आहे तेथे तांदूळ होतो. ज्या ठिकाणी त्से त्से माश्यांचा संपूर्णपणे बीमोड करता आला, तेथे पशुपालनाचा व्यवसायही चालतो. मध्यभागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रताळी व सुरण, सोनमका इ. पिके होतात. दक्षिणेस डोंगराळ भागांत उंच व दाट जंगले आहेत. ह्या ठिकाणी कोको, कॉफी ही महत्त्वाची पिके होतात. तसेच किनारपट्टीत नारळ, सुपारी, केळी व तांदूळ ही पिके होतात. खतपुरवठा, पाणीपुरवठा, पडजमीन लागवड, हेक्टरी उत्पादन वाढ, नवनवीन पिके इ. उद्दिष्टांसाठी सरकारने अनेक योजना काढल्या आहेत.
सॅव्हानामधील त्से त्से माश्यांचा नाश केल्यापासून टोगो टेकड्यांच्या उत्तरेकडे लहान प्रमाणात गुरे पाळण्याचा व्यवसाय चालतो. बहुतेक गुरे बिनवशिंडाची आहेत. देशातच त्यांचे मांस खपते निर्यात होत नाही. काही गुरे बाहेर पाठविण्यात येतात. गुराढोरांबरोबरच मेंढ्या, बकऱ्या, डुकरे, घोडे व गाढवे पाळतात. १९७३ मध्ये २,२०,००० गुरे ६,७१,००० मेंढ्या ६,२०,००० शेळ्या २,३५,००० डुकरे १,००० घोडे २,००० गाढवे व २०,७६,००० कोंबड्या होत्या.
मासेमारी : १९७१ मध्ये १०,६०० मे. टन मासे पकडण्यात आले. त्यांपैकी ७,६०० मे. टन अटलांटिकमध्ये व ३,००० मे. टन अंतर्गत नद्यासरोवरांतून मिळाले. या व्यवसायात पुष्कळ सुधारणा होण्याजोगी आहे. लॉमे बंदराच्या विकासात यासाठी स्वंतत्र धक्का बांधला जात आहे.
जंगले : टोगोचा ९·५% प्रदेश जंगलांनी व्यापला आहे. ह्या जंगलांतील लाकडांचा उपयोग जळणासाठी करतात. पूर्वी लोहमार्गासाठी जळण म्हणून लाकूड वापरीत असत पण १९५८ पर्यंत बहुतेक सर्व लोहमार्ग ह्या खनिज तेलावर चालू लागले व लाकूड-कटाई थांबली. १९७० मध्ये ११,२०,००० घ. मी. एवढे लाकूड जळणासाठी वापरले गेले व १,०२,००० घ. मी. लाकूड इमारती आणि इतर कामासाठी वापरण्यात आले.
खनिजे : ह्या देशात भरपूर खनिजे असावीत असा अंदाज आहे. किनाऱ्याजवळ फॉस्फेट आहे, तर ओहिटोजवळ क्रोमियमच्या, बांगोलीजवळ लोखंडाच्या खाणी आहेत. तसेच बॉक्साइट, तेल, युरेनियम, क्रोमाइट, सोने, हिरे, रूटाइल, मँगॅनीज, चिनी माती ही मिळण्याजोगी आहेत. १९५३ मध्ये फॉस्फेट व बॉक्साइटच्या समृद्ध साठ्यांचा शोध लागल्यानंतर खाणींचे शासकीय खाते सुरू झाले व १९६१ पासून खाणी सुरू झाल्या. १९६४ पेक्षा १९६८ मध्ये फॉस्फेटचे उत्पादन दीडपटीहून अधिक झाले. ४०% ते ५५% लोहांश असलेल्या लोहधातुकाचा साठा सु. ५५ कोटी टन आहे. चुनखडीचा साठा २·८ कोटी टन आहे. संगमरवराच्या खाणी चालू आहेत. टोगोमधील नद्या वीजउत्पादनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. मोनो नदीवर चार धरणे बांधण्यात येत आहेत. देशातील वीजउत्पादनक्षमता २०,७०० किवॉ. असून उत्पादन ५,२६,००,००० किवॉ. ता. होते. व्होल्टा नदीप्रकल्पाची वीज मिळण्याबाबत घानाशी करार झालेला आहे.
उद्योग : टॅपिओका, स्टार्च व ताडतेल गिरण्यांत १९६० पासून कापडगिरणी व आसवनी यांची भर पडली. तथापि टोगोत मोठे उद्योगधंदे अद्याप वाढलेले नाहीत. एक पादत्राणांचा, एक धातूच्या फर्निचरचा व एक संगमरवराचा कारखाना निघाला आहे. स्थानिक लघुउद्योग शेतकी उत्पानावर आधारलेले आहेत. सूतकताई, कातणे, विणणे टोपल्या तयार करणे, चटया तयार करणे व मातीची भांडी, काही प्रमाणात लोखंडाच्या वस्तू तयार करणे हे व्यवसाय चालतात. १९६७ साली स्थापन झालेल्या आर्थिक व सामाजिक मंडळावर कामगार संघटनांचे ५, उद्योग व व्यापार प्रतिनिधी ५, शेतीप्रतिनिधी ५, अर्थतज्ञ व समाजशास्त्र ५ आणि तंत्रज्ञ ५ असे एकूण २५ प्रतिनिधी असतात.
अर्थ : सीएफ्ए फ्रँक हे येथील चलन असून या १ फ्रँकचे १०० सेंटिम होतात. एप्रिल १९७४ मध्ये १,००० सीएफ्ए फ्रँक = ४·०७१ अमे. डॉलर किंवा १ डॉलर=२४५·६२५ सीएफ्ए फ्रँक होते. १, २, ५, १० व २५ सीएफ्ए फ्रँकची नाणी असून ५, १०, ५०, १००, ५००, १,००० व ५,००० सीएफ्ए फ्रँकच्या नोटा असतात. वजनेमापे मेट्रिक पद्धतीची आहेत. बँक टोगोलेज डी डेव्हलपमेंट १९६६ अखेर सुरू झाली. तिचे ६०% भांडवल सरकारी आहे. १९५३ मध्ये बचत बँक सुरू झाली असून १९६५ अखेर तिच्यात २०·३५ कोटी सीएफ्ए फ्रँकच्या ठेवी होत्या. टोगोत मध्यवर्ती बँकेशिवाय ५ राष्ट्रीय बँका व ४ परदेशी बँका काम करतात. लॉमे येथे सु. ३० फ्रेंच व ब्रिटिश विमा कंपन्यांच्या शाखा आहेत.
१९७० चा संतुलित अर्थसंकल्प ७,९८,०२,००,००० सीएफ्ए फ्रँकचा होता. जमेच्या बाजूस आयात कर २३·२%, उत्पान्नावरील कर १८·६% व निर्यात कर ६·६% होता. खर्चाच्या बाजूस शिक्षण १४%, संरक्षण १०·६%, आरोग्य ८·८%, उद्योगांस उत्तेजन २·७%, सार्वजनिक कर्जावरील व्याज २·४%, सामाजिक सेवा १·९% अशी विभागणी होती. १९७० मध्ये एकूण राष्ट्रीय कर्ज ३,३५,००,००० अमे. डॉलर होते. १९७२ चा संतुलित अर्थसंकल्प १,२३० कोटी सीएफ्ए फ्रँकचा होता. त्यात शिक्षणावर १९२·१७ कोटी, आरोग्य ७९·९५ कोटी, सामाजिक सेवा १४·७६ कोटी आणि संरक्षण ११०·४४ कोटी सीएफ्ए फ्रँक खर्च होता.
परदेशी व्यापार : १९७० ची एकूण आयात १७,९२,७९,७७,००० सीएफ्ए फ्रँकची होती. त्यात सुती कापड १३·३%, छापील माल ९·६%, यंत्रे ८%, तंबाखू ६·७%, मद्ये ५·१%, लोखंडी सामान ४·७%, खनिज तेल वस्तू ४% मोटारी ३·६%, विजेची उपकरणे ३·५%, मालमोटारी ३·६% अशी विभागणी होती. ही आयात फ्रान्सकडून २९·५%, ब्रिटन १३·५%, प. जर्मनी ८·१%, नेदर्लंड्स ७·२%, जपान ६%, अमेरिका ५·७%, इटली ३·६%, धाना ३·६% अशी झाली.
१९७० मध्ये एकूण निर्यात १५,१७,६०,१६,००० सीएफ्ए फ्रँकची झाली. त्यात कोकोबिया ४१·७%, फॉस्फेट २४·५%, कॉफी १७·५%, ताडगर ४·३%, पिंजलेला कापूस २·१%, भुईमूग १·४% अशी विभागणी होती. ही निर्यात फ्रान्सकडे २८·२%, नेदर्लंड्स २५·९%, प. जर्मनी २०%, बेल्जियम-लक्सेंबर्ग ६·९%, रशिया ५·८%, इटली ४%, जपान २·६% व ब्रिटन २·४% अशी झाली. १९७१, ७२, ७३ मधील आयात अनुक्रमे १,९४५·५ २,१३८·४ व २,१३९·८ कोटींची व निर्यात अनुक्रमे १,३६२·६ १,२६५·९ आणि १,२६४·८ कोटी सीएफ्ए फ्रँकची होती.
लॉमे हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून बहुतेक आयात-निर्यात कंपन्या तेथेच आहेत.
कर व जकात : आयकर उत्पन्नाच्या २·५% पासून पुढे वाढत जातो. १४,००० डॉलर करपात्र उत्पन्नावर तो ५०% आहे. दरमहा ४२० डॉलर मिळविणाऱ्या व दोन मुले असलेल्या माणसाला दरमहा १४ डॉलर कर द्यावा लागतो. कंपन्यांवर २५% कर असतो मात्र फायद्याची पहिली ५ वर्षे करमुक्त असतात. काही व्यवहारांवर १४% कर असतो. आयात जकात सामान्यतः १०% असते. कॉफी, कोको, ताडगर, खोबरे व इतर काही पदार्थ यांवर बाजारभावानुसार निर्यातजकात आकारली जाते. ती सरासरी १०% होते. सिगारेट व मद्ये यांवर ४०%, छापील कापडावर १०% आणि इतर मालावर १५% जकात पडते.
परदेशी गुंतवणूक : फ्रान्सच्या मदतीखेरीज पूर्वी फारशी परदेशी गुंतवणूक नसे. आता विशेषतः खाणीधंद्यात गुंतवणूक होऊ लागली आहे. फ्रॉस्फेटच्या खाणीत ७५% भांडवल फ्रेंच आहे. संगमरवराच्या खाणीला इटालियन भांडवलाचा पाठिंबा आहे. तेल शोधण्यासाठी अमेरिकेची मदत होत आहे. लॉमेजवळच्या नवीन बंदरासाठी प. जर्मनीने४७ लक्ष सीएफ्ए फ्रँकची मदत दिली आहे. अमेरिका व्यवसाय शिक्षणास, रस्तेबांधणीस आणि आरोग्य सेवांसाठी मदत देत आहे. १९७० मध्ये फ्रेंच सरकारची मदत १५२·७ कोटी सीएफ्ए फ्रँकची झाली व यूरोपियन डेव्हलपमेंट फंडाकडून १९६४ ते १९६९ मध्ये ७६४ कोटी सीएफ्ए फ्रँक मिळाले. एफ्. ए. ओ. मासेमारी बोटींसाठी व यू. एन्. डी. पी. मोनो नदीवरील धरणासाठी साहाय्य देत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खास निधीतून शिक्षक प्रक्षिणासाठी ३२ कोटी सीएफ्ए फ्रँक मिळाले आहेत. टोगो सरकार परदेशी भांडवलगुंतवणूकीस उत्तेजन देत असून त्यासाठी अनुकूल वातावरण व संरक्षण उपलब्ध करून देत आहे.
योजना : पहिली १९६६–७० पंचवार्षिक योजना सु. ७५% यशस्वी झाली. दुसऱ्या १९७१–७५ योजनेचे लक्ष्य आर्थिक स्वावलंबन हे होते.
वाहतूक व दळणवळण : १९६८ मध्ये ४९९ किमी. मीटरमापी लोहमार्ग होते. लॉमेहून पालीमेपर्यंत कोकोसाठी, आनेचोपर्यंत खोबऱ्यासाठी आणि ब्लीटापर्यंत कापसासाठी असे प्रमुख मार्ग आहेत. आव्हेटा येथे होणाऱ्या सिमेंट कारखान्यासाठी सु. २० किमी.चा मार्ग होत असून क्पेमेपर्यंतचा २६ किमी.चा खाजगी लोहमार्ग फॉस्फेटसाठी आहे. १९७१ मध्ये देशात ७,२०५ किमी.च्या सडका असून घाना व दाहोमी यांमधील आंतरराष्ट्रीय किनारीमार्ग, लॉमे ते अपर व्होल्टामार्ग व पालीमे, आटाक्पामे, बाडू इ. कॉफी व कोको प्रदेशातील मार्ग हे प्रमुख आहेत. सु. १,६६२ किमी. राष्ट्रीय महामार्ग असून त्यापैकी ७०० किमी. डांबरी आहेत. ५,३५७ किमी. विभागीय मार्ग आहेत. ३७८ किमी. सडका पक्क्या आहेत. ३,५४३ किमी. कच्च्या व वर्गीकृत असून ३,२८४ किमी. खराब आहेत. १९७१ मध्ये देशात ९,६०० प्रवासी मोटारी व ३,००० मालमोटारी होत्या. लॉमे हे टोगेचे मुख्य बंदर असून त्याचे नवीन कृत्रिम बंदर १९६८ पासून सुरू झाले. लॉमेच्या ईशान्येस सु. ३५ किमी.वरील क्पेमे हे बंदर खास फॉस्फेटच्या निर्यातीसाठी आहे. लॉमे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून आटाक्पामे, सोकोडे, सान्साने-मांग्गो व डापांगो येथे स्थानिक विमानतळ आहेत. लॉमे येथे मुख्य डाकघर असून देशात २४ प्रमुख डाकघरे व इतर अर्धवेळ डाकघरे किंवा डाकवाटप व्यवस्था आहे. १९७० मध्ये देशात ४,५६७ दूरध्वनी असून देशातील प्रमुख शहरी ही सोय आहे. ॲक्राशी व जगातील प्रमुख ठिकाणांशी तारेने किंवा दूरध्वनीने संपर्क साधता येतो. देशात १९७३ मध्ये ४५,००० रेडिओ होते. प्रक्षेपण केंद्रे तीन असून देशात व पश्चिम आफ्रिकेत फ्रेंचमधून आणी काही स्थानिक भाषांतून कार्यक्रम ऐकता येतात. १९७३ मध्ये देशात २ दैनिके व ९ नियतकालिके निघत होती. १९७३ मध्ये दूरचित्रवाणी सुरू झाली असून फ्रेंच आणि देशी भाषांतून संध्याकाळी ७·३० ते ११ पर्यंत कार्यक्रम असतात.
लोक व समाजजीवन : १९७० च्या १९,५५,९१६ लोकसंख्येची दर चौ. किमी. घनता ३४·४६, नागरी लोकसंख्या १३·३% आणि ग्रामीण ६६·७% होती. पुरुष ४८·१% व स्त्रिया ५१·९% होत्या. १९६५ ते १९७० जननप्रमाण हजारी ५०·९, मृत्युप्रमाण २५·५, लोकसंख्यावाढ हजारी २५·४ होती. सरासरी आयुर्मर्यादा ३८·५ वर्षे होती. १९७० मध्ये साक्षरता १०·५% होती. दक्षिणेत लोकसंख्या दाट असून उत्तरेस सर्वांत विरळ आहे. लॉमे [लोकसंख्या २,००,१०० (१९७१)] राजधानी असून इतर शहरे म्हणजे आनेचो, आटाक्पामे, सान्याने-मांग्गो, डापांगो, सोकोडे, पालीमे, त्सेव्हये, बासारी ही होत. १९७३ चा लोकसंख्येचा अंदाज २१,११,००० आहे.
टोगोमध्ये एकाच विशिष्ट जमातीचे लोक नाहीत, तसेच एकच अशी भाषाही नाही. येथे सु. तीस वांशिक गटांचे लोक आहेत. १९५८ ते १९६० मध्ये त्यांपैकी एव्ही लोकसंख्येच्या २०·८%, काब्रे १३·९%, वात्यी ११·९%, नाउडेबा ६%, मिना ५·८%, कोटोकोली ५·१%, मोबा ५·१% व इतर ३१·७% होते. बरेच लोक पश्चिम आफ्रिकेच्या इतर भागांतून आलेले आहेत. टोगोतील मूळचे लोक उत्तर व नैर्ऋत्य भागांत राहतात. एव्ही हे बहुसंख्य असून ते चौदाव्या ते सोळाव्या शतकांत नायजेरियातून आले. आक्पोसो, आडेले, आहलो मध्य टोगोत राहतात. डागोंबा, चाकोसी, आन्याना, केपेले हे घाना व आयव्हरी कोस्टमधून आलेले आहेत. टेम, मुर्मा, मॉसी हे अपर व्होल्टातून आले. या बहुतेक जमाती निग्रोवंशीय असून टोगोच्या मध्य व दक्षिण भागात आहेत. उत्तरेकडे हेमेटिक वंशाचे सुदानकडून आलेले लोक आहेत. किनारी भागातील लोकांची घरे चौकोनी, दुपाखी, गवती छपराची आणि माती, लाकूड, नारळी किंवा ताड यांच्या झावळ्या वापरून केलेली असतात. जवळच कोळ्यांच्या एका लाकडातून कोरलेल्या होड्या असतात. अंतर्भागात मातीची घरे मोठ्या वृक्षाभोवती वसलेली असून त्यांचेभोवती मातीचे किंवा फांद्यांचे कुंपण असते. अशा वस्त्या अरुंद बोळांनी जोडलेल्या असून ते बोळ मग मोठ्या रस्त्याला मिळतात. उत्तरेकडे मातीच्या किंवा दगडाच्या वाटोळ्या घरांवर शंकूसारखे छप्परे असते. कुटुंबाकुटुंबाच्या घरांभोवती मातीचा गडगा असतो. शहरात नव्या व जुन्या पद्धतीच्या घरांची सरमिसळ आढळते. लॉमेत नवीन बंगलेवजा वस्ती वेगळी आहे. व्यापारी व कारभाराच्या इमारतींतही नव्याजुन्यांचे मिश्रण आढळते. टोगोत सु. ४,००० परदेशी लोक आहेत. ते बहुतेक फ्रेंच असून लॉमेत राहतात. काही ब्राझीलियन पोर्तुगीज मिश्रवंशीय आहेत.
धर्म : सु. ५६·१% लोक पारंपरिक धर्म आणि समजुती पाळणारे आहेत. १७·७% रोमन कॅथलिक, ८·८% मुस्लिम व ६·५% प्रॉटेस्टंट आहेत. १०·९% इतर धर्मांचे आहेत.
एके काळी टोगो हा संपूर्णपणे निरनिराळ्या जमातींच्या हाती होता, पण आता त्यात झपाट्याने बदल होत आहे. मागासलेपणा, बेकारी, जातीयता, मोठ्या उद्योगधंद्यांचा अभाव यांमुळे एकसंध समाजजीवन आढळत नाही. कायद्याने स्त्रीला पुरुषाइतकेच हक्क आहेत परंतु रुढींच्या बंधनांमुळे स्त्रीला योग्य दर्जा मिळत नाही. तथापि कुटुंब व जमात यांबाबतच्या कर्तव्यांची पारंपरिक जाणीव पुष्कळच उपयोगी पडते. किमान वेतन, भत्ते इ. विषयी प्रयत्न केले जात आहेत.
भाषा : येथील अधिकृत सरकारी भाषा फ्रेंच आहे. येथील बहुतेक वर्तमानपत्रेही फ्रेंचमध्ये छापली जातात. तसेच आनेचो आणि लॉमे येथील व्यापारही फ्रेंचमध्येच चालतो. येथे निरनिराळ्या जमातींच्या लोकांच्या निरनिराळ्या भाषा आहेत. दक्षिणेकडे एव्ही लोकांची भाषा प्रामुख्याने वापरतात, पण ही बोलीभाषा आहे. मात्र व्यापार व इतर कामासाठी फ्रेंच व इंग्रजीचा वापर करतात. ट्वी, हाउसा, गुर, मोरे, तेम, काब्रे, क्वा या काही बोली आहेत. टोगोमध्ये ४४ पेक्षाही जास्त बोलीभाषा बोलल्या जातात.
टोगोचे साहित्य सर्व तोंडी असून त्याचा प्रभाव दृढ आहे. देशी भाषांतील साहित्याच्या विकासाचे प्रयत्न फारसे झालेले नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी काही टोगोलीज फ्रेंचमधून लिहीत असत. स्वातंत्र्यानंतर बरेच कादंबरीकार व नाटककार देशी भाषांतून रचना करू लागले आहे. निरनिराळ्या वांशिक गटांची श्रेष्ठ पारंपरिक नृत्ये लोकप्रिय करण्यासाठी १९६७ मध्ये संस्था निघाली आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी संस्था आहे.
आरोग्य : आरोग्याच्या सोयी अद्याप फारशा वाढलेल्या नाहीत. १९६७ मध्ये देशात १७ रुग्णालये व ८७ डॉक्टर, ५ दंतवैद्य, ७८ दाया व ३०७ परिचारिका होत्या. रोग प्रतिबंधासाठी फिरती पथके आहेत. १५० दवाखाने व १६ प्रसूतिगृहे आहेत. कुष्ठरोग, निद्रारोग व मनोविकृती यांसाठी खास उपचारकेंद्रे आहेत. देवी, पीतज्वरव निद्रारोग आटोक्यात येत असून कुष्ठरोग, हिवताप व यॉज हे अद्याप दुर्धर आहेत.
शिक्षण : टोगोची शिक्षणपद्धती फ्रेंच धर्तीवर आहे. ती स्थानिक परिस्थितीशी जुळती करून घेतली जात आहे. ६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण फुकट दिले जाते. १९७१-७२ मध्ये ९३४ प्राथमिक शाळांतून ४,४०३ शिक्षक व २,५७,८७७ विद्यार्थी होते. ७१ माध्यमिक शाळांतून ७७८ शिक्षक व २४,५२१ विद्यार्थी तसेच १९ व्यावसायिक शाळांतून २१४ शिक्षक व २,५०६ विद्यार्थी होते. १९७० मध्ये लॉमे येथे टोगोचे स्वतःचे विद्यापीठ स्थापन झाले. तेथे ९३ शिक्षक व १,३६९ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणासाठी ६८९ विद्यार्थी परदेशी शिकत होते. लॉमे येथील भारी साधनसामग्री केंद्रात इंग्रजी व फ्रेंच दोन्ही भाषा असल्यामुळे सु. वीस आफ्रिकी देशांतून तेथे तांत्रिक शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भूभौतिकी, समाजशास्त्र इत्यादींविषयक संशोधनाची खास संस्था आहे.
ग्रंथालये : माहिती व वृत्तपत्र मंत्रालयातर्फे राष्ट्रीय ग्रंथालय चालविले जाते. इतर ग्रंथालये त्याला जोडलेली असून अमेरिकेतर्फे माहिती केंद्र चालविले जाते.
पर्यटन : देशात अद्याप पर्यटन व्यवसाय विकसित झालेला नाही. प्रमुख शहरे, मळे, जंगले, अभयारण्ये इ. प्रेक्षणीय आहेत. शिकार व मासेमारी ही आकर्षणेही आहेत.
कुऱ्हेकर, द. वि.
“