टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी : (टेनेसी खोरे प्राधिकरण–टीव्हीए). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या शासनाने १९३३ च्या कायद्याने टेनेसी व तिच्या उपनद्या यांच्या जलनिःसारण क्षेत्राचा बहुउद्देशीय विकास साधण्यासाठी स्थापिलेली संस्था. तिच्या अधिकारक्षेत्रात पुढील सात राज्यांतील एकूण सु. १,०६,१९० चौ.किमी.चा टापू येतो : ॲलाबॅमा, जॉर्जिया, केंटकी, मिसिसिपी, नॉर्थ कॅरोलायना, टेनेसी व व्हर्जिनिया. या टापूतील लोकवस्ती १९६५ मध्ये सु. ३५ लाख होती.

टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी

टेनेसी ही अमेरिकेतील पाचवी मोठी नदी असून (लांबी १,०४९ किमी.) तिचा १८०० पासून जलमार्ग म्हणून वापर होत असे परंतु त्यात बरेच अडथळे येत असत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी प्रथमच अमेरिकन सरकारचे या नदीकडे लक्ष वेधले गेले. दारूगोळा कारखान्यांना लागणारे नायट्रेट तयार करण्याचे दोन कारखाने सरकारने या नदीवरील मसल शोल्स येथे काढण्याचे ठरविले. त्यांच्यासाठी लागणारी वीजही त्या नदीवर धरणे बांधून उत्पन्न करण्याचे ठरले. त्याप्रमाणे कामाला सुरुवातही झाली परंतु हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या आतच महायुद्ध संपुष्टात आले. पुढील पंधरा वर्षांत सरकारने हे प्रकल्प खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना विकून टाकावे असे काही प्रयत्न झाले परंतु त्यांना यश आले नाही. १९३३ मधील महामंदीच्या तडाख्यामुळे बेकार झालेल्यांना काही रोजगार मिळवून देऊन या क्षेत्राची आर्थिक घडी बसवावी, म्हणून राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी हे प्रकल्प पूर्णावस्थेस नेण्याचे मनावर घेतले. तत्ससंबंधीचा कायदा अमेरिकन काँग्रेसने संमत केला व त्यावर १८ मे १९३३ रोजी राष्ट्राध्यक्षांची सही होऊन टीव्हीए अस्तित्वात आली. कायद्यानुसार टीव्हीए ही एक सार्वजनिक निगमाच्या स्वरूपातील संस्था आहे. अमेरिकन सीनेटच्या सल्ल्यावरून राष्ट्राध्यक्ष तिच्या तीन संचालकांची नेमणूक करतात. संस्थेचे प्रशासकीय कार्यालय टेनेसी राज्यात नॉक्सव्हिल येथे आहे. अमेरिकेच्या सर्व संघराज्यीय संस्थांची प्रशासकीय कार्यालये वॉशिंग्टनमध्ये असली, तरी टीव्हीएचे प्रशासकीय कार्यालय मात्र टेनेसी क्षेत्रातच आहे, ही गोष्ट टीव्हीएचे वैशिष्ट्य प्रकर्षाने पटवून देते.

टीव्हीएला १९३३ च्या कायद्याने टेनेसी जलनिःसारण क्षेत्राचा विकास करण्याचे अधिकार दिले गेले व तिच्यावर काही विवक्षित जबाबदाऱ्‍याही सोपविण्यात आल्या. आपल्या अधिकारक्षेत्रात टीव्हीए ही संघीय सरकारची एजंट म्हणूनच कार्य करते व त्या संबध क्षेत्रातील साधनसंपत्तीचा विकास साधणाऱ्‍या योजना पार पाडते. नद्यांच्या पाण्यासंबंधी तीन विशिष्ट जबाबदाऱ्‍या कायद्याने टीव्हीएकडे सोपविण्यात आल्या : (१) त्या क्षेत्रात वारंवार येणाऱ्‍या महापुरांचे नियंत्रण करणे, (२) टेनेसी नदीचा जलमार्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर विकास करणे व (३) त्यासाठी वीजनिर्मिती करून तिचे वाटप करणे.


महापूर नियंत्रणाची जबाबदारी टीव्हीएने एकूण २१ बंधारे बांधून व अन्य ११ बंधारे विकत घेऊन त्यांचे संचालन आपल्या ताब्याखाली आणून पार पाडली आहे. यांपैकी ९ धरणे टेनेसी नदीवर आणि २३ धरणे टेनेसीच्या उपनद्यांवर बांधण्यात आली आहेत. पुराची आपत्ती सर्वस्वी टळली नसली, तरी महापूर येण्याचे बंद झाले असून त्यामुळे होणारे नुकसान टळले आहे. टीव्हीएने आपले पहिले नॉरिस धरण १९३६ मध्ये बांधल्यापासून अनेक पूर-धोके टाळता येणे सुलभ झाले. १९६० पर्यंत अशा तऱ्‍हेने सु. १४·५ कोटी डॉ.चे पुरांपासून होणारे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान टाळण्यात टीव्हीएला यश आले आहे. टीव्हीएने टेनेसी नदीचा जलमार्गासाठी भरपूर उपयोग व्हावा, म्हणून आवश्यक ती कारवाई केल्यामुळे जलवाहतूक कितीतरी वाढली आहे. १९३३ मध्ये वाहतुकीचे प्रमाण ३३ दशलक्ष टन-किमी. इतके होते ते १९५० मध्ये ६०० दशलक्षांवर व १९६० नंतर २,००० दशलक्ष टन-किमी.पर्यंत वाढले आहे. या वाहतुकीमध्ये मुख्यतः मोटरगाड्या, धान्ये, पेट्रोलियम, रासायनिक व जंगलजन्य पदार्थ यांचा समावेश होतो. प्राधिकरणाने स्थानिक संस्था व खाजगी क्षेत्रातील कंपन्या यांना नदीकाठी आवश्यक त्या बंदरांच्या सोयी पुरविण्यास उद्युक्त केले व जलमार्ग सुकर व्हावा, म्हणून जरूर त्या सुविधा स्वतःही पुरविल्या. वीजनिर्मिती व तिचे वाटप ही तिसरी जबाबदारी हाताळताना प्राधिकरणाला खाजगी क्षेत्राकडून प्रखर विरोध झाला. १९६० पर्यंत बंधाऱ्‍यांची एकूण संख्या ४८ झाली. बंधाऱ्‍यांच्या साहाय्याने जलविद्युत्‌केंद्रे उभारून व नंतर औष्णिक वीजकेंद्रांची भर टाकून प्राधिकरणाने विजेचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर वाढविले. १९६० च्या पुढील काळात ६८ टक्क्यांहून अधिक वीजउत्पादन औष्णिक विद्युत्‌केंद्रांपासून होऊ लागले. १९६१ मध्ये प्राधिकरणाच्या केंद्रांची वीजउत्पादनक्षमता सु. १८० लक्ष किवॉ. इतकी झाली. त्यांपैकी निम्मी अणुशक्ती आयोग, वायुसेनेची प्रायोगिक केंद्रे व अग्निबाण आणि क्षेपणास्त्रे यांची संशोधनकेंद्रे यांसारख्या शासकीय संरक्षण संस्थांसाठी वापरतात व बाकीची वीज स्वस्त दराने मोठमोठे खाजगी उद्योगधंदे, नगरपालिका व सहकारी वीज वितरणसंस्था यांच्याशी करार करून लाखो नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. टेनेसी खोऱ्‍यामधील विजेच्या दरांची अमेरिकेतील अतिशय स्वस्त दरांमध्ये गणना होते. प्राधिकरणावर नफा मिळविण्याची जबाबदारी नसल्यामुळे व त्याला करमाफी मिळत असल्यामुळेच ते इतक्या स्वस्त दराने वीज पुरवू शकते, असे टीकाकार म्हणू लागले. म्हणूनच पुढील काही वर्षांत वीजनिर्मितीसाठी सरकारने खर्च केलेली सर्व रक्कम हप्त्याहप्त्याने फेडण्याचे बंधन टेनेसी खोरे प्राधिकरणावर घालण्यात आले आहे.

मसल शोल्स येथील कारखान्यात तयार होणाऱ्‍या नायट्रेटचा वापर दारूगोळ्यासाठीच नव्हे, तर खत उत्पादनासाठीदेखील करता येतो. प्राधिकरण या कारखान्यांचा खतांच्या उत्पादनाची प्रयोगशाळा म्हणून वापर करते परंतु व्यापारी खतांचे उत्पादन करीत नाही. शिवाय १९३३ च्या कायद्याने जमिनीची धूप थांबविणे, जंगलांची जोपासना व पुनर्लागवण करणे, ही जबाबदारीही प्राधिकरणाकडेच सोपविली आहे. ती पार पाडून वनसंपत्तीचा विकास घडविण्याचे तसेच मत्स्य, वन्यजीव आणि खनिजे यांच्या संवर्धनाचे कार्यही त्याने केले आहे.

प्राधिकरणाने आणखी दोन क्षेत्रांत महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टेनेसीच्या खोऱ्‍यात धरणे बांधून उत्पन्न केलेल्या मोठमोठ्या तलावांमुळे त्यांच्या आसपास पर्यटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे नौकाविहार, मासेमारी, शिबिरनिवास यांसारख्या करमणुकींचा उपभोग नागरिकांना घेता येणे शक्य झाले. दुसरे महत्त्वाचे कार्य आरोग्यसंरक्षणाचे. या भागातील डासांचा उपद्रव नाहीसा करून तेथील लोकांना मलेरियापासून मुक्त करण्याचे श्रेयही टीव्हीएकडेच जाते.

एखादा बहु-उद्देशीय प्रकल्प विवक्षित क्षेत्राचा बहुविध विकास कसा घडवून आणतो, याचे उत्कृष्ट उदाहरण टीव्हीएने जगापुढे मांडले आहे. साहजिकच या संस्थेने अखिल जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले. त्यामुळेच प्रतिवर्षी सु. तीन हजारांहून अधिक लोक (मुख्यतः परराष्ट्रातील अधिकारी) टेनेसी खोऱ्‍याला भेट देतात आणि तेथून जरूर  ती माहिती व स्फूर्ती घेऊन जातात. टीव्हीएच्या धर्तीवर अनेक राष्ट्रांनी नदीखोरे प्रकल्प पार पाडले आहेत. त्यांतच भारताचा दामोदर खोरे निगम, कोलंबियाचा कोका खोरे निगम आणि इराणचा खुझिस्तान जल व विद्युत् प्राधिकरण यांच्या प्रकल्पांची गणना होते.

टीव्हीएच्या कार्यपद्धतीची दोन वैशिष्ट्ये आहेत : एक तर, नदीच्या पाण्याचा केवळ एकच विशिष्ट उपयोग करण्याऐवजी त्याचा बहुविध उपयोग करून, आसपासच्या क्षेत्राचा विकास कसा साधता येतो, हे टीव्हीएने दाखवून दिले. दुसरे म्हणजे, प्रकल्पाच्या सिद्धीसाठी भले मोठे प्रशासकीय साम्राज्य न उभारता स्थानिक संस्था, नगरपालिका व राज्यसरकारे यांच्याशी सहकार्य साधून टीव्हीएने सहकारी प्रशासनाचा एक उत्तम पायंडा पाडला आहे. या दोन्ही कारणांमुळे टीव्हीएला जगात सर्वत्र बहुमानाचे स्थान मिळाले आहे.

धोंगडे, ए. रा.