टिनबर्जेन, नीकोलास : (१५ एप्रिल १९०७– ). इग्रंज प्राणिवैज्ञानिक. नैसर्गिक स्थितीमध्ये प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये म्हणजे वर्तनशास्त्रात त्यांनी संशोधन करून सुधारणा केल्या व वर्तनशास्त्राची प्रगती घडवून आणली. व्यक्तिगत व सामाजिक वर्तनाच्या तऱ्हांचे संघटन व त्या शोधून काढल्याबद्दल त्यांना ⇨कार्ल फ्रिश आणि ⇨कॉनरॅड लोरेन्ट्स यांच्याबरोबर १९७३ चे वैद्यकाचे किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. टिनबर्जेन व लोरेन्ट्स यांच्या पक्षिवर्तनाच्या आणि फ्रिश यांच्या मधमाश्या व इतर कीटकांच्या संदेशवहनाच्या अभ्यासामुळे प्राणिवर्तनाच्या शास्त्राचा पाया घातला गेला.
टिनबर्जेन यांचा जन्म हेग आणि शिक्षण व्हिएन्ना व येल विद्यापीठांत झाले. १९३२ साली त्यांनी लायडन विद्यापीठाची पदवी मिळविली. एक वर्ष आर्टिक प्रदेशात राहून नंतर ते लायडन विद्यापीठात व्याखाते म्हणून लागले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते तेथेच होते व तेव्हा वर्षभर (१९३८) त्यांनी फ्रिश यांच्याबरोबर कार्य केले. महायुद्धाच्या काळात ते जर्मनांचे कैदी होते. त्यानंतर १९४७ पर्यंत ते लायडन विद्यापीठात प्रायोगीक प्राणिविज्ञानाचे प्राघ्यापक व प्राणिविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून होते. १९४९ साली प्राणिवर्तनविषयक विभाग उभारण्यासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व १९६६ पासून तेथे प्राध्यापक आहेत. ते लंडनची रॉयल सोसायटी (१९६२) व नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६४) या संस्थांचे सदस्य आहेत. गॉडमन-सॉल्व्हिन पदक व इटालिया पारितोषिक (१९६९) स्वामरडाम पदक व एडिंबरो विद्यापीठाची सन्माननीय डी. एस्सी. पदवी (१९७३) इ. बहुमान त्यांना मिळाले असून ते टांझानियातील सेरेंगेटी इन्स्टिट्यूटचे शास्त्रीय सल्लागारही आहेत.
गांधील माश्या घराकडे परतताना मार्ग कसा शोधतात, याचा विस्तृत अभ्यास त्यांनी प्रथम केला. नंतर माश्यांच्या सामाजिक एकात्मीकरणावर व कुरवांचे (सी गल्स) संशोधन केले. त्यामुळे कुरवांचे प्रणयाराधन व मैथुनाच्या वेळचे वर्तन यासंबंधीचे महत्त्वाचे निष्कर्ष त्यांना काढता आले व परिणामी लोरेन्ट्स यांच्या सहजप्रवृत्त वर्तनाच्या सिद्धांताचा बराच भाग सिद्ध झाला. टिनबर्जेन यांनी असेही दाखविले की, शिकून आलेले वर्तन हे सहजप्रवृत्त वर्तनाइतकेच महत्त्वाचे आहे. उदा., ऑयस्टर पकडणारा पक्षी हा पक्षी सहजप्रवृत्तीमुळे कोणतीही वस्तू पकडतो, परंतु ऑयस्टर (वा शेलफिश) पकडण्याचे मात्र तो आईचे पाहूनच शिकतो. परभक्षी व भक्ष्य यांच्यातील आंतरक्रियांचा त्यांनी विशेष अभ्यास केला असून त्यावरून त्यांनी पुढील निष्कर्ष काढला आहे : प्राण्यांना आपल्याच जातीचे प्राणी मारणे पसंत नसते विशेषतः जेव्हा भक्ष्याच्या चेहऱ्यावरील भाव केविलवाणा व शरणागतीचा असतो तेव्हा भक्षी भक्ष्याला मारण्यापासून परावृत्त होतो. त्यांनी आपले असे वर्तनशास्त्रीय सिद्धांत मानवी वर्तनाला लावण्याचाही प्रयन्त केला आहे. उदा., लांब पल्ल्याच्या हत्यारांमुळे माणसांना एकमेकांचे चेहरे दिसू शकत नाहीत व भावनाशून्यपणे मानवी हत्या होते तसेच मानवी युद्धतृष्णा वाढते.
इतरांच्या व स्वतःच्या कल्पना तपासून पाहण्यासाठी त्यांनी नवीन सुटसुटीत पद्धती शोधून काढल्या, हेही त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. या पद्धतींद्वारे त्यांनी स्वतःचे आणि लोरेन्ट्स व फ्रिश यांचे काही सिद्धांत पडताळून सिद्ध केले. टिनबर्जेन यांनी प्राण्यांचा अभ्यास नैसर्गिक अवस्थेत व प्रत्यक्ष निरीक्षणांद्वारे केलेला आहे.
त्यांनी अनेक जर्मन, डच, ब्रिटिश व अमेरिकन नियतकालिकांतून शास्त्रीय लेख लिहिले असून त्यांची पुढील पुस्तके महत्त्वाची आहेत : एस्किमो लँड (१९३५), द स्टडी ऑफ इन्स्टिक्ट (१९५१), द हेरिंग गल्स वर्ल्ड (१९५३), सोशल बिहेव्हियर इन ॲनिमल्स (१९५३), क्यूरियस नॅचरॅलिस्ट्स (१९५९), ॲनिमल बिहेव्हियर (१९६५), सिग्नल्स फॉर सर्व्हायव्हल (१९७०), द ॲनिमल इन इट्स वर्ल्ड (खंड १, १९७२ खंड २, १९७३).
ठाकूर, अ. ना.