टिटो, मार्शल : (२५ मे १८९२–    ). प्रसिद्ध यूगोस्लाव्ह नेता व यूगोस्लाव्हियाच्या प्रजासत्ताक संघराज्याचा पहिला अध्यक्ष. मूळ नाव योसिप ब्रोझ किंवा ब्रोझोव्हिच. क्रोएशियामधील कुमरोव्हाट्स खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही. सीसाक येथे कुलपे तयार करण्याच्या एका कारखान्यात तो काही दिवस उमेदवार म्हणून राहिला (१९०७). पुढे त्याने ट्रीएस्ट येथे धातुकामगार म्हणून काम केले. या वेळी त्याने भूगोल, इतिहास, भाषा वगैरे विषयांचा अभ्यास केला. त्यास शास्त्रीय ग्रंथ, कादंबऱ्‍या, धाडसी वीरांच्या कथा, इतिहास इ. वाचण्याचा नाद लागला. हळूहळू तो कामगार संघटनांत भाग घेऊ लागला आणि पुढे तर तो सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचा सभासद झाला. १९१०–१३ च्या दरम्यान स्लोव्हीनीया, बोहीमिया, म्यूनिक, मॅनहाइम, व्हिएन्ना, वगैरे ठिकाणी त्यास नोकरीनिमित्त हिंडावे लागले. जर्मन व चेक भाषाही तो शिकला. एकविसाव्या वर्षी त्यास झाग्रेब येथील सैन्यात भरती व्हावे लागले. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रोहंगेरीच्या बाजूने लढत असता रशियन सैनिकांनी त्यास अटक केली. या काळात त्याने रशियन भाषेचा अभ्यास केला. येथे त्याचा रशियन कामगारांशी घनिष्ठ संबंध आला. १९१७ च्या मे महिन्यात सुटका झाल्यानंतर पेट्रग्राड येथे त्याने केरेंस्की सरकारविरुद्ध बोल्शेव्हिकांनी केलेल्या निदर्शनात भाग घेतल्यामुळे त्यास फिनलंडला पळून जावे लागले पण पेट्रग्राड येथे आल्यानंतर पुन्हा त्यास पकडण्यात आले. तो कैदेतून पळूत ऑम्स्क येथे गेला. आंतरराष्ट्रीय लाल पथकाचा तो सभासद झाला. १९१८ मध्ये चेक तुकडीने हे शहर घेतले. त्यामुळे त्यास एका खेड्यात पळून जावे लागले. झारशाही नष्ट झाल्यावर पुन्हा तो ऑम्स्कला आला. तेथे त्याने पोल्का नावाच्या एका रशियन मुलीशी लग्न केले. तो आपल्या पत्नीसह १९२० मध्ये मायदेशी आला आणि झाग्रेब येथे त्याने एका कारखान्यात नोकरी धरली. याच वेळी तो कम्युनिस्ट पक्षाचा सभासद झाला. पक्षावर बंदी घातल्यामुळे व त्याच्या कार्यकर्त्यांना पकडल्यामुळे त्यास झाग्रेब सोडून जावे लागले. काही वर्षे त्याने अभियंता म्हणून जहाज बांधणीच्या कारखान्यात काम केले. तेथे त्याने गोदी कामगारांचा यशस्वी संप घडवून आणला. मात्र त्यास यामुळे नोकरीस मुकावे लागले. झाग्रेबला येऊन त्याने मजुरांची संघटना स्थापन केली. त्याच्या कार्यक्षमतेमुळे पक्षाने त्याची क्रोएशियाच्या मेटल वर्कर्स युनियनच्या चिटणीसपदी नेमणूक केली. काही दिवसांनी तो झाग्रेब येथील पक्षाच्या शाखेचा चिटणीस झाला. १९२८ साली त्यास पोलिसांनी खूप मारले व खटला चालवून ५ वर्षे कारागृहात डांबले. १९३४ साली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यास युगोस्लाव्ह कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीवर निवडण्यात आले. १९३४ च्या डिसेंबरमध्ये तो मॉस्कोस गेला. पक्षाच्या कार्याव्यतिरिक्त इतर वेळा त्याने पुस्तके वाचण्यात घालविला आणि बोल्शेव्हिक पक्षाच्या इतिहासाचे भाषांतर केले. १९३७ साली तो यूगोस्लाव्ह कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला. प्रथम त्याने व्हिएन्ना येथील पक्षाचे कार्यालय यूगोस्लाव्हियात आणले व स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना मजबूत केली.

मार्शल टिटो

नाझी सैन्याने १९४१ मध्ये यूगोस्लाव्हिया घेतले आणि रशियावर चढाई केली. त्यावेळी त्याने टिटो हे नाव धारण करून गनिमी पथक संघटित केले आणि भिन्न वंशीय व भिन्न धर्मीय लोकांना संघटित करून ॲन्टी फॅसिस्ट नॅशनल लिबरेशन समिती स्थापन केली. या सुमारास त्याच्या कर्तृत्वाबद्दल त्यास मार्शल हा किताब मिळाला (१९४३). सतत ३-४ वर्षे लढा दिल्यानंतर शेवटी २० ऑक्टोबर १९४४ रोजी यूगोस्लाव्हिया परकीय जोखडातून मुक्त करण्यात त्याला यश मिळाले व तो यूगोस्लाव्हियाचा पंतप्रधान झाला. १९४५ साली यूगोस्लाव्हिया संघीय राज्याचा तो अध्यक्ष निवडला गेल्यानंतर त्याने दुसऱ्‍या पीटरला पदच्युत करून यूगोस्लाव्हियाचे प्रजासत्ताक घोषित केले. १९४६ मध्ये नवीन संविधान तयार करण्यात आले. ते रशियाच्या धर्तीवर बनविले होते. राष्ट्रीयत्वाच्या प्रखर भावनेने त्याने अंतर्गत व परराष्ट्रीय धोरणात बदल केले.

सत्तेवर येताच त्याने खाजगी उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण व नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेस सुरुवात केली. छोट्या जमिनीचे राष्ट्रीयीकरण न करता तिच्या धारकांना मोठ्या प्रमाणात शासनाला उत्पन्न देण्यास भाग पाडले. १९४६ व १९४७ साली वॉर्सा, प्राग, सोफिया, बूडापेस्ट, बूकारेस्ट इ. ठिकाणी जाऊन त्याने उभयपक्षी मैत्रीचा व परस्परांना साह्य करण्याचा करार केला. टिटो स्वतंत्र धोरणाने वागतो, म्हणून जून १९४८ मध्ये स्टालिन व इतर कम्युनिस्ट नेत्यांनी त्याच्याविरुद्ध काहूर उठविले आणि यूगोस्लाव्हियाची कॉमिनफॉर्ममधून हकालपट्टी केली. टिटोला त्याच्या पक्षाचा आणि जनतेचा संपूर्णपणे पाठिंबा होता. त्यामुळे ऱशियाच्या दडपणाला त्याने यशस्वीपणे तोंड दिले. एवढेच नव्हे, तर रशियाने चेकोस्लोव्हाकियावर केलेल्या आक्रमणाचा कडक शब्दांत त्याने निषेध केला. रशिया किंवा त्याच्या अंकित असलेल्या एखाद्या देशाच्या संभाव्य आक्रमणास तोंड देण्याकरिता त्याने अत्यंत समर्थ लष्कर तयार केले. अमेरिकेच्या साह्याने त्याने १९५०-५१ चे अन्नसंकट दूर केले. १९५३ मध्ये त्याने ग्रेट ब्रिटन, ब्रह्मदेश, भारत, ईजिप्त या देशांना भेटी दिल्या व जवाहरलाल नेहरू आणि नासर यांच्या सहकार्याने तटस्थ राष्ट्रांचा एक गट करून अलिप्ततावादी परराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार केला. ७ एप्रिल १९५३ रोजी नवीन संविधान तयार करण्यात आले. टिटो तत्पूर्वी पहिला अध्यक्ष म्हणून निवडला गेला. १९५४ मध्ये ट्रीएस्ट प्रश्नावर त्याने तडजोड केली. १९६३ मध्ये त्याने अमेरिकेस भेट दिली. साम्राज्यवादास विरोध व विकसनशील राष्ट्रांना मदत करण्याचे त्याचे धोरण होते. रशिया व यूगोस्लाव्हिया यांचे संबंध सुधारल्यानंतर १९५५ साली खुश्चॉव्हने बेलग्रेडला व टिटोने मॉस्कोस भेट दिली.

  

त्याने कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्याकरिता मोठ्या उद्योगधंद्यांत कामगार समित्या नेमल्या. १९५० साली स्थानिक शासनातील व लोकसमित्यांचे कार्यक्षेत्र विस्तृत करण्यात आले. १९६३ साली त्यांचे रूपांतर कम्युनल असेंब्लीत झाले.

  

मर्यादित साधने, मागासलेली शेतकी व अर्थव्यवस्था, दारिद्र्य, फुटीर वृत्ती इ. अडचणी असतानाही यूगोस्लाव्हियाने गेल्या काही वर्षांत विलक्षण प्रगती केली याचे श्रेय टिटोच्या कर्तृत्वासच द्यावे लागेल. निवत्त हेण्याची इच्छा असूनही १९७१ मध्ये त्यांची सहाव्यांदा अध्यक्षपदी पाच वर्षांकरिता निवड झाली. भारताने त्यास जवाहरलाल नेहरू हा आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा पुरस्कार देऊन बहुमान केला (१९७१). अनन्यसाधारण शारीरिक निकोपता, काटकपणा, नैतिक कणखरपणा, आणीबाणीच्या प्रसंगी निर्णय घेण्याचे सामर्थ्य व प्रसंगावधान, मुत्सद्दीपणा व विलक्षण आकलनशक्ती यांमुळे तो यूगोलाव्हियावर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे जवळजवळ गेली तीन तपे सत्ता गाजवीत आहे.

संदर्भ : 

1. Auty, Phyllis, Tito, London, 1970.

2. Campbell, J. C. Tito’s Separate Road, New York, 1967.

३. ब्लादिमिर देदियर अनु. सात्त्विक, अ. ना. यूगोस्लाव्हियाचे निर्माते मार्शल टिटो यांचे आत्मनिवेदन, पुणे, १९५४.

खोडवे, अच्युत