टॉरिडनियन संघ : स्कॉटलंडच्या वायव्येच्या डोंगराळ प्रदेशातील कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील गाळांच्या खडकांच्या गटाचे नाव. याच्यात मुख्यतः भरडकणी तांबडे वालुकाश्म व अर्कोज असून पिंडाश्म, कोणाश्म व शेल हे खडक तसेच वाऱ्‍याने गुळगुळीत झालेले गोटेही आढळतात. मात्र यात जीवाश्म (जीवांचे अश्मीभूत अवशेष) आढळले नाहीत. डायाबैग, ॲपलक्रोस व औल्टबिया असे याचे तीन विभाग पाडले आहेत. हा संघ लुइझिअन सुभाजा व पट्टिताश्म या रूपांतरित खडकांवर विसंगतपणे वसलेला असून कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील गाळ याच्यावर विसंगतपणे साचलेले आहेत. हे खडक कोणत्या परिस्थितीत निक्षेपित झाले (साचून तयार झाले) हे निश्चित समजलेले नाही परंतु टेकड्यांनी वेढलेल्या द्रोणीत बहुधा थंड व वाळवंटी परिस्थितीमध्ये ते निक्षेपित झाले असावेत. स्कॉटलंडच्या वायव्य किनाऱ्‍यावरील टॉरिडन खाडीवरून या संघाचे नाव पडले असून खाडीभोवतीचे पुष्कळ डोंगर या खडकांचेच आहेत.

ठाकूर, अ. ना