टॉमसन, सर जोझेफ जॉन:(१८ डिसेंबर १८५६–३० ऑगस्ट १९४०). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. इलेक्ट्रॉनाचे शोधक व १९०६ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म मँचेस्टरजवळील चीटम हील येथे झाला. त्यांचे शिक्षण ओवेन्स कॉलेज (मँचेस्टर) व ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. ते केंब्रिज विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक (१८८४–१९१९) व ट्रिनिटी कॉलेजाचे ‘मास्टर’ (१९१८–४०) होते. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटचेही ते भौतिकीचे सन्माननीय प्राध्यापक होते.
चक्राकार फिरणाऱ्या कड्यांसंबंधी १८८३ मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल त्यांना ॲडॅम्स पारितोषिकाचा बहुमान मिळाला. प्रारंभी त्यांनी वायूंमधील विद्युत् संवहनासंबंधी संशोधन केले. १८९५ साली क्ष-किरणांचा शोध लागल्यावर टॉमसन यांनी अर्नेस्ट रदरफर्ड यांच्याबरोबर क्ष-किरणांच्या सान्निध्यामुळे वायूंच्या संवाहकतेत होणाऱ्या बदलासंबंधी संशोधन केले. त्यानंतर ⇨ ऋण किरणांसंबंधी प्रयोग करून हे किरण ऋण विद्युत् भारित कणांचे बनलेले आहेत, असे त्यांनी सिद्ध केले. १८९७ मध्ये त्यांनी या कणांचा विद्युत् भार (e) व त्याचे द्रव्यमान (m) यांचे गुणोत्तर मोजले. विल्सन बाष्प कोठीचा [⟶कण अभिज्ञातक] उपयोग करून या कणाचा विद्युत् भारही त्यांनी मोजला. यावरून अणूपेक्षाही लहान कण अस्तित्वात आहेत, हा महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी काढला. या त्यांच्या कार्यामुळे उप-आणवीय (अणूतील घटकांसंबंधीच्या) भौतिकीचे विस्तीर्ण क्षेत्र संशोधनास खुले झाले. ⇨ धन किरणांच्या साहाय्याने निरनिराळ्या मूलद्रव्यांचे समस्थानिक (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच्या मूलद्रव्याचे प्रकार) ओळखण्याची एक पद्धत त्यांनी शोधून काढली व तीमुळे ⇨ द्रव्यमान वर्णपटविज्ञान ही भौतिकीची नवीनच शाखा निर्माण झाली. या पद्धतीचा उपयोग करून किरणोत्सर्गी (भेदक कण अथवा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म) नसलेल्या समस्थानिकाचे (निऑनाच्या समस्थानिकाचे) अस्तित्व टॉमसन यांनीच प्रथम सिद्ध केले.
टॉमसन हे १८८४–१९१८ या काळात कॅव्हेंडिश प्रयोगशाळेचे प्रमुख होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रयोगशाळा भौतिकीच्या संशोधनाचे एक जागतिक केंद्र म्हणून नावारूपास आली. वायूंच्या विद्युत् संवहनासंबंधी केलेल्या महत्त्वाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. रॉयल सोसायटीने १८८४ साली त्यांची सदस्य म्हणून निवड केली व रॉयल (१८८४), ह्यूज (१९०२) व कॉप्ली (१९१४) या पदकांचा त्यांना सन्मान दिला. ते रॉयल सोसायटीचे १९१५–२० या काळात अध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइट’ (१९०८) व ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्युत् चुंबकत्व व इतर विषयांसंबंधीचे त्यांचे २३० निबंध व १३ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी नोट्स ऑन रिसेंट रिसर्चेस इन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम(१८९३),ए टेक्स्टबुक ऑफ फिजिक्स(जे. एच्. पॉयटिंग यांच्याबरोबर, ४ खंड),एलेमेंट्स ऑफ द मॅथेमॅटिकल थिअरी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम(१८९५ पाचवी आवृत्ती, १९२१) आणिकंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू गॅसेस (१९०३ जी. पी. टॉमसन या आपल्या मुलाच्या मदतीने दोन खंडांत काढलेली सुधारित आवृत्ती, १९२८–३३) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.