टॉड, सर आलेक्झांडररॉबर्ट्स : ( २ ऑक्टोबर १९०७ – ). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. न्यूक्लिओसाइडे, न्यूक्लिओटाइडे व न्यूक्लिओटाइड को-एंझाइमे [⟶न्यूक्लिइक अम्ले] यांची संरचना आणि संश्लेषण (कृत्रिम रीत्या तयार करण्याची प्रक्रिया), तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले फॉस्फोरिलीकरणाविषयीचे (कार्बनी संयुगाच्या रेणूत फॉस्फोरिल गटाचा ≡ P = O समावेश करण्याच्या प्रक्रियेविषयीचे) प्रश्न यांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल १९५७ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. या कार्यावरूनच पुढे त्यांनी न्यूक्लिइक अम्लांची सर्वसाधारण रासायनिक संरचना प्रस्थापित केली व ही संरचना न्यूक्लिइक अम्लांचे जैव कार्य व भौतिक संरचना समजण्यास नंतर आधारभूत ठरली.
त्यांचा जन्म ग्लासगो येथे झाला. ग्लासगो विद्यापीठातून बी.एस्सी.पदवी मिळविल्यानंतर त्यांनी जर्मनीतील फ्रँकफुर्ट विद्यापीठातून १९३१ मध्ये पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्ययन करून १९३४ साली ते एडिंबरो विद्यापीठात गेले व तेथे दोन वर्षे रसायनशास्त्राचे व्याख्याते होते. १९३६–३८ या काळात त्यांनी लंडन येथील लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या संस्थेत संशोधन केले. त्यानंतर ते १९३८–४४ मध्ये मँचेस्टर विद्यापीठात व १९४४–६३ मध्ये केंब्रिज विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १९६३ मध्ये ते ख्राइस्ट महाविद्यालयाचे मास्टर झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अनेक सरकारी प्रकल्पांत सहकार्य केले व १९५२–६४ मध्ये ते ब्रिटिश सरकारच्या वैज्ञानिक धोरणासंबंधीच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते.
टॉड यांच्या संशोधनापूर्वी न्यूक्लिओटाइडांच्या रेणवीय संरचनेसंबंधी पुरावा केवळ अप्रत्यक्षपणेच मिळालेला होता. कार्बनी रसायनशास्त्रात उपयोगात असणाऱ्या तंत्राचा उपयोग करून नैसर्गिक न्यूक्लिइक अम्लांच्या घटक न्यूक्लाइडांचे संश्लेषण करण्यात टॉड यांनी यश मिळविले व त्यांच्या रेणवीय संरचनेचा प्रत्यक्ष पुरावा सादर केला. याच्या पुढील पायरी म्हणून त्यांनी प्रत्यक्ष न्यूक्लिइक अम्लांच्या संरचनेसंबंधी विचार करून त्यांतील फॉस्फेट बंधाची जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. नंतर ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) मुक्तपणे आढळणाऱ्या आणि फॉस्फेटांचे प्रदान करणाऱ्या व को-एंझाइमांचे कार्य करणाऱ्या न्यूक्लाइडांच्या संरचनेकडे त्यांनी लक्ष वळविले व ॲडिनोसीन डायफॉस्फेट (एडीपी) व ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) या न्यूक्लिओटाइडांची संरचना सिद्ध केली. १९४९ मध्ये त्यांनी एटीपीचे संश्लेषण केले. त्यानंतर फ्लाविन ॲडेनीन डायन्यूक्लिओटाइड (एफएडी) या ऑक्सिजनचा उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या को-एंझाइमाची संरचना (१९५४) व युरिडीन डायफॉस्फेट ग्लुकोज (युडीपीजी) या सर्व पेशींत आढळणाऱ्या को-एंझाइमाची संरचना (१९५६) त्यांनी शोधून काढली व त्यांचे संश्लेषणही केले. १९५५ साली त्यांनी ब१२जीवनसत्त्वाची संरचना निश्चित केली व याकरिता त्यांनी क्ष-किरण स्फटिकविज्ञानाचाही उपयोग केला.
ब१जीवनसत्त्व (थायामीन) व ई जीवनसत्त्व (टोकोफेरॉल) यांची संरचना व संश्लेषण, तसेच हशिशमधील क्रियाशील घटक यांसंबंधीचे त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. याशिवाय त्यांनी एरिथ्रोफ्लियम वडॅफनँड्रा या वंशांतील वनस्पतींपासून मिळणारी अल्कलॉइडे, वनस्पतींतील रंजक द्रव्ये (अँथोसायनिने), कीटकांतील रंगद्रव्ये व पेनिसिलीन, क्विनोने, प्युबेरुलिक अम्ल इ. बुरशीजन्य पदार्थ यांचा अभ्यास केला होता.
ब्रिटिश सरकारने १९५४ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब आणि १९६२ मध्ये ट्रंपिंग्टनची आजीव सरदारकी दिली. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९४२ मध्ये आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य म्हणून १९५५ मध्ये त्यांची निवड झाली.
जमदाडे, ज. वि.