टर्नर, जोझेफ मॅलर्ड विल्यम : (२३ एप्रिल १७७५—१९ डिसेंबर १८५१). प्रख्यात आंग्ल स्वच्छंदतावादी निसर्गचित्रकार. लंडन येथे जन्म. बालवयापासूनच तो चित्रे रंगवीत असे. टॉमस मॅल्टन याच्या हाताखाली काही काळ उमेदवारी केल्यानंतर त्याने १७८९–९३ या काळात ‘रॉयल अकॅडमी’मध्ये कलाध्ययन केले. तेथे १७९० मध्ये त्याने पहिले जलरंगचित्र आणि १७९६ मध्ये पहिले तैलरंगचित्र (फिशरमेन ॲट सी) प्रदर्शित केले. १८०२ मध्ये त्याला अकॅडमीचे पूर्ण सदस्यत्व लाभले. १८०८–३८ या काळात तो अकॅडमीमध्ये यथादर्शन या विषयाचा प्राध्यापक होता. त्याने सुरुवातीच्या काळात काही स्थलवर्णनात्मक चित्रेही काढली. जे. आर्. कझन्झ, रिचर्ड विल्सन, टॉमस गर्टिन इ. चित्रकारांच्या प्रभावातून तंत्रकौशल्य आणि कल्पकता अशा दोन्ही अंगांनी त्याच्या चित्रकलेचा विकास झाला. १८०२ मध्ये त्याने स्वित्झर्लंड व पॅरिस येथे प्रवास केला. स्वित्झर्लंडच्या वास्तव्यात त्याने सु. ४०० रेखने केली. पॅरिसच्या लूव्ह्‌र संग्रहालयातील डच व व्हेनिशियन चित्रकारांचा त्याच्यावर प्रभाव पडला. १८०२ नंतर त्याने हॅनिबल क्रॉसिंग द आल्प्ससारखी (१८१२) अनेक ऐतिहासिक चित्रे काढली. डिडो बिल्डिंग कार्थेजसारख्या (१८१५) त्याच्या निसर्गचित्रांवर क्लॉड लॉरेनचा प्रभाव दिसतो. १८१०–३५ या कालावधीत त्याने आश्रयदात्या अमीर-उमरावांसाठी मोठ्या प्रमाणावरील विपुल चित्रे काढली. Liber Studiorum (१८०७–१९) या निसर्गचित्रमालिकेच्या ग्रंथासाठी त्याने उत्कीर्णने केली. १८१९ मध्ये इटलीला जाऊन आल्यावर त्याने रंगविलेल्या चित्रांमध्ये इटलीतील, विशेषतः व्हेनिसमधील, दृश्यांचा आविष्कार आढळतो. त्याच्या १८३० नंतरच्या चित्रांमध्ये चित्रविषयापेक्षा प्रकाशाच्या चित्रणासच अधिक प्राधान्य दिलेले दिसून येते. द फाइटिंग टेमेरेअर (१८३९), अ फायर ॲट सी, इंटेरियर ॲट पेटवर्थ (१८३७), रेन, स्टीम ॲंड स्पीड  (१८४४) व रॉकेट्स ॲड ब्लू लाइट्स (१८४०) ही त्याची काही प्रमुख उत्तरकालीन चित्रे होत. टर्नरच्या प्रारंभीच्या चित्रांतील ऐतिहासिक व कल्पित सृष्टीतील नाट्यमय घटनांविषयीची आस्था पुढेपुढे कमी होऊन निसर्गातील नाट्यमय घटनांवर केंद्रित झालेली दिसून येते. निसर्गातील चैतन्य, गोडवा व नाट्यमयता तसेच निसर्गाचे शांत रमणीय रूप वा प्रक्षुब्ध वादळीपणा हे उत्कटपणे व्यक्त करणारे कलात्मक आकार टर्नरला नेमकेपणाने गवसले व स्वतःच्या दृश्य आणि भावनात्मक अनुभूतीतून त्याने हे निसर्गाकार गोचर केले. त्याच्या निसर्गदृश्यांमध्ये आणि समुद्रदृश्यांमध्ये प्रकाश हाच अत्यंत प्रभावी दृक्‌घटक असल्याची जाणीव प्रखरपणे प्रत्ययास येते. प्रकाशाच्या विविध छटांमध्ये पालटणारी वातावरणाची नानाविध रूपे त्याने चित्रांतून प्रकट केली. त्याचप्रमाणे रंगांची झळाळी व विशुद्धताही जतन केली. टर्नरला १८०१ च्या दरम्यान यशस्वी चित्रकार म्हणून मान्यता मिळाली होती, तरी जॉन रस्किनने मॉडर्न पेंटर्स (खंड १, १८४३) या ग्रंथात त्याची खास शिफारस केल्यानेच त्याची उत्तरकालीन चित्रे रसिकांच्या प्रशंसेस उतरली. त्याच्या प्रकाशचित्रणाचा प्रभाव मॉने, पीसारो यांसारख्या दृक्‌प्रत्ययवाद्यांवर पडला. व्हेनिसच्या द्वैवार्षिक प्रदर्शनातील (१९४८) त्याच्या चित्रांमुळे अप्रतिरूप प्रणालीचे कलावंत प्रभावित झाले. लंडन येथे त्याचे निधन झाले.

‘सेल्फ-पोर्ट्रेट’, १७९८.

संदर्भ : Finberg, A. J. The Life of J. M. W. Turner, Oxford, 1961.

इनामदार, श्री. दे.


 १ ‘यंग हेअर’ (१५०२)—आल्ब्रेक्त ड्यूरर. २ ‘व्हेनिस, बिल्डिंग्ज’ (१८३९)—टर्नर. ३ ‘स्टोनहेंज’–जॉन कॉन्स्टेबल (१७७६—१८३७). 

४ ‘बीआट्रिस ॲड्रेसिंग दान्ते’–विल्यम ब्लेक (१७५७–१८२७). ५ ‘नॉरविच मार्केट प्लेस’–जॉन सेल कॉट्मन (१७८२–१८४२). ६ ‘ऑस्प्रेज नेस्ट’ (१९०२)–विन्स्लो होमर.