झ्व्हॉऱ्यक्यिन,व्ह्लड्यीम्यिरकझ्यमा : (३० जुलै १८८९– ). रशियात जन्मलेले अमेरिकन भौतिकीविज्ञ व इलेक्ट्रॉनिकी अभियंते. रेडिओ, दूरचित्रवाणी व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यांतील अनेक तांत्रिक सुधारणा व शोध यांबद्दल प्रसिद्ध.
त्यांचा जन्म मूरम (रशिया) येथे झाला व शिक्षण पेट्रोग्राड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रशिया) आणि पिट्सबर्ग विद्यापीठ (अमेरिका) येथे झाले. १९१२ साली विद्युत् अभियांत्रिकीतील पदवी घेतल्यावर त्यांनी फ्रान्समध्ये पॉल लांझव्हँ यांच्या मागदर्शनाखाली क्ष-किरणांसंबंधी संशोधन केले. पहिल्या महायुद्धात ते रशियाला परतले. १९१४–१७ पर्यंत ते लष्करात रेडिओ अधिकारी होते. १९१९ मध्ये ते अमेरिकेस गेले आणि तेथे इंग्रजी भाषा शिकून त्यांनी वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कॉपोरेशनमध्ये नोकरी स्वीकारली. नोकरी करीत असतानाच त्यांनी पीएच्.डी. ही पदवी मिळविली. १९२९ मध्ये ते रेडिओ कॉपोरेशन ऑफ अमेरिका या उद्योगसंस्थेत गेले. १९४७ साली ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले व तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम पाहात होते. १९५४ साली या दोन्ही पदांवरून निवृत्त झाल्यावर ते या कंपनीचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि तांत्रिक सल्लागार झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिकीच्या वैद्यकशास्त्रातील उपयोगासंबंधी संशोधन केले.
वेस्टिंगहाऊस झ्व्हॉऱ्यक्यिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९२३ साली ‘आयकॉनोस्कोप’ या दूरचित्र कॅमेरा नलिकेचा शोध लावला व त्याचे एकस्व (पेटंट) १९३८ साली देण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी दूरचित्रग्राही नलिकेचाही (कायनेस्कोपचाही) शोध लावला. सर्व जगात व्यापारी पद्धतीने दूरचित्रवाणी प्रक्षेपण करण्यास हे दोन शोध आधारभूत ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेम्स हीलियर व त्यांचे सहकारी यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे प्रभावी साधन निर्माण केले. स्नायपरस्कोप आणि स्नूपरस्कोप ही दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेली उपकरणे, तसेच किरणोत्सर्जनाच्या (विशिष्ट पदार्थांतून बाहेर पडणाऱ्या भेदक कणांच्या व किरणांच्या) मापनासाठी वापरण्यात येणारे चमक गणित्र [⟶ कण अभिज्ञातक] यांच्या विकासामध्ये झ्व्हॉऱ्यक्यिन यांच्या संशोधनाचा उपयोग झाला आहे. १९५७ मध्ये त्यांनी जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचा उपयोग करणाऱ्या दूरचित्र सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. हे उपकरण विवेचक शोषणाच्या तत्त्वावर चालते व त्याच्या साहाय्याने परीक्षण करावयाचा नमुना नैसर्गिक रंगांत तात्काळ पाहता येतो.
झ्व्हॉऱ्यक्यिन यांनी इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने बरेच ग्रंथ लिहिलेले असून त्यांपैकी पुढील सुप्रसिद्ध आहेत. टेलिव्हिजन : द इलेक्ट्रॉनिक्स ऑफ ट्रॅन्समिशन (१९४०, दुसरी आवृत्ती-१९५४), इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स अँड द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (१९४५), फोटो इलेक्ट्रिसिटी अँड इट्स ॲप्लिकेशन्स (१९४९) व टेलिव्हिजन इन सायन्स अँड इंडस्ट्री (१९५८). त्यांना अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे रम्फर्ड पदक (१९४१), अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे एडिसन पदक (१९५३), ब्रिटिश इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे फॅराडे पदक (१९६५) इ. बहुमान मिळाले. १९४३ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व १९६५ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.
पहा : दूरचित्रवाणी.
शिरोडकर, सु. स.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..