झोमरफेल्ड, आर्नोल्ट : (५ डिसेंबर १८६८–२६ एप्रिल १९५१). जर्मन भौतिकीविज्ञ. अणुविषयक पुंज (क्वांटम) सिद्धांत व वर्णपटविज्ञान या विषयांतील संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म केनिग्झबर्ग येथे झाला व शिक्षण तेथील विद्यापीठातच झाले. गटिंगेन, क्लाऊसथाल (१८९७) व आखेन (१९००) येथील संस्थांमध्ये अध्यापन केल्यानंतर १९०६–३१ या काळात ते म्यूनिक येथे भौतिकीचे प्राध्यापक होते.
त्यांचे प्रारंभीचे संशोधन इलेक्ट्रॉनांची गतिकी (गतिविज्ञान), तरंगांचे निरनिराळ्या परिस्थितींत होणारे संक्रमण, क्ष-किरण व विद्युत् चुंबकीय सिद्धांत या विषयांसंबंधी होते. १९११ नंतर त्यांनी श्टार्क व झीमान परिणाम (तीव्र चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या प्रकाश उद्गमाच्या वर्णपटातील रेषांवर होणारे परिणाम), बोर सिद्धांत, पुंज सिद्धांत इ. आणवीय सिद्धांतांतील प्रश्नांविषयी महत्त्वाचे कार्य केले. आणवीय वर्णपटासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे त्यांनी बोर अणूतील वर्तुळाकार कक्षांच्या ऐवजी विवृत्ताकार (लंबवर्तृळाकार) कक्षा विचारात घेणे आवश्यक असल्याचे सुचविले. यावरूनच त्यांनी वलन पुंजांक व चुंबकीय परिभ्रमण पुंजांक या कल्पना मांडल्या [⟶ अणु व आणवीय संरचना]. त्यांनी तरंगयामिकीसंबंधीही [⟶ पुंजयामिकी] महत्त्वाचे संशोधन केले. तसेच धातूमधील इलेक्टॉनांसंबंधी त्यांनी मांडलेला सिद्धांत तापविद्युत् (विशिष्ट परिस्थितीत उष्णतेपासून निर्माण होणारी विद्युत्) व धातूतील विद्युत् संवहन यांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांनी केलेल्या सैद्धांतिक कार्यामुळेच वर्णपटविज्ञानातील प्रायोगिक संशोधनास त्या काळी पद्धतशीर स्वरूप आले. Atombau und Spektrallinien (१९१९) हा त्यांचा ग्रंथ सैद्धांतिक वर्णपटविज्ञानात प्रमाणभूत मानला जातो. फेलिक्स क्लाइन यांच्याबरोबर लिहिलेल्या ⇨घूर्णीच्या (जायरोस्कोपच्या) सिद्धांतावरील त्यांचा ग्रंथ (१८९७–१९१६) विख्यात आहे. त्यांनी स्वतः व इतर शास्त्रज्ञांबरोबर सु. ३०० निबंध व कित्येक ग्रंथ लिहिले.
ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..