झेर्निके, फ्रिट्स : (१६ जुलै १८८८–१० मार्च १९६६). डच भौतिकीविज्ञ. १९५३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म ॲम्स्टरडॅम (नेदर्लंड्स) येथे झाला. त्यांनी १९१३ साली ॲम्स्टरडॅम विद्यापीठातून बी, एस्. पदवी संपादन केली. त्याच वर्षी ते ग्रोनिंगेन विद्यापीठात ज्योतिषशास्त्रीय प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून काम करू लागले. तेथे १९१५ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली आणि त्याच वर्षी ते सैद्धांतिक भौतिकीचे व्याख्याते झाले. १९२० सालापासून निवृत्तीपर्यत (१९५८) त्यांनी ग्रोनिंगेन विद्यापीठात सैद्धांतिक व गणितीय भौतिकी आणि सैद्धांतिक यामिकीचे (प्रेरणांची वस्तूवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे) प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी १९४८ साली बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.
प्रकाशकी व भौतिकीच्या इतर शाखांत त्यांनी विशेष संशोधन केले. प्रकाशकीतील ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शकासंबंधीच्या प्रश्नांवर संशोधन करीत असताना १९३४ मध्ये त्यांनी दूरदर्शकाच्या आरशातील प्रतिमांकरिता फूको यांनी योजिलेल्या सुरीधारा कसोटीचे (आरशाच्या पृष्ठभागावरील स्थानिक अनियमितपणा शोधून काढण्याकरिता सुरीच्या धारदार कडेचा उपयोग करणाऱ्या कसोटीचे) स्पष्टीकरण देणारा सिद्धांत प्रसिद्ध केला. या सिद्धांताचा उपयोग सूक्ष्मदर्शकामध्ये वापरण्यात येणाऱ्या कला विपर्यास पद्धतीतील (गणितीय) बहुपदीच्या शोधात झाला [⟶ सूक्ष्मदर्शक]. साध्या सूक्ष्मदर्शकातून संपूर्णपणे पारदर्शक वस्तू दिसू शकत नाहीत त्या दिसण्यासाठी त्यांचे अभिरंजन (विशिष्ट रंगाने रंगविण्याची क्रिया) करावी लागते. परंतु या क्रियेमुळे सजीव कोशिका (पेशी) मरतात म्हणून सजीव कोशिकांचा सूक्ष्मदर्शकातून अभ्यास करता येत नसे. पारदर्शक कोशिकेतून पलीकडे जाणाऱ्या प्रकाशाचा वेग काहीसा मंदावतो व त्यामुळे त्याचे तरंगशीर्ष मूळ प्रकाशाच्या तुलनेने काहीसे मागे पडते म्हणजेच त्याचे कलांतर होते. एक खास साधन वापरून हे कलांतर जवळजवळ १८०º करता येते. मग मूळ प्रकाश व कोशिकेतून येणारा प्रकाश यांचे तरंग परस्परांचे अंशतः किंवा पूर्णपणे निराकरण करू शकतात त्यामुळे ती कोशिका दिसू शकते. हीच कला विपर्यास सूक्ष्मदर्शिकीय पद्धती झेर्निके यांनी शोधून काढली. त्यांनी अतिक्षीण विद्युत् प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हानोमीटरमध्ये सुधारणा केली. तोच झेर्निक गॅल्व्हानोमीटर प्रमाणभूत उपकरण म्हणून प्रमुख प्रयोगशाळांत वापरतात. १९५२ साली त्यांना रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक मिळाले. ते ग्रोनिंगेन येथे मृत्यू पावले.
फरांदे, र. कृ.