झेबेक,टोमास योहान : (९ एप्रिल १७७०–१० डिसेंबर १८३१). जर्मन भौतिकीविज्ञ. तापविद्युत् (विशिष्ट परिस्थितीत उष्णतेपासून निर्माण होणारी विद्युत्) या शोधाचे जनक. त्यांचा जन्म रेव्हाल (एस्टोनिया) रशिया येथे झाला. वयाच्या सतराव्या वर्षी आपला देश सोडून ते जर्मनीत स्थायिक झाले. त्यांनी बर्लिन येथे वैद्यकीय अभ्यास केला. येना येथील वास्तव्यात (१८०२–१०) त्यांचा शिलिंग, हेगेल, रिटर व गटे या प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी घनिष्ट संबंध आला. १८१८ मध्ये त्यांची बर्लिन येथील सायन्स ॲकॅडेमीचे सदस्य म्हणून निवड झाली.
फक्त चुंबकत्वामुळेच विद्युत् प्रवाह निर्माण होतो, असा प्रथम त्यांचा (चुकीचा) समज होता. या संदर्भात प्रयोग करताना त्यांनी दोन निरनिराळ्या धातूंच्या तारांचे (तपयुग्माचे) संधी वेगवेगळ्या तापमानाला ठेवले असता त्यात विद्युत् चालक प्रेरणा (विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत असणारी प्रेरणा) निर्माण होते, हा महत्त्वाचा शोध लावला. ह्या परिणामाला ‘झेबेक परिणाम’ म्हणतात. या परिणामाचा उपयोग तापमानाच्या मापनासाठी करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी साखरेच्या विद्रावामुळे होणाऱ्या ध्रुवण प्रतलाच्या (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या प्रतलाच्या) घूर्णनाची (प्रतल ज्या कोनातून वळते त्या कोनाची) मापने केली. त्यांनी गटे यांच्या सहकार्याने प्रकाशाच्या रंगाबद्दल उपपत्ती देण्याचा प्रयत्न केला परंतु ती उपपत्ती मान्यता पावली नाही. छायाचित्रण पायसावर (प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या द्रव्यावर) प्रथम वस्तूची अंधुक प्रतिमा पाडून नंतर त्याच ठिकाणी रंगीत प्रकाश पाडल्यास पायस त्या प्रकाशाचा रंग धारण करते हा शोध त्यांनी लावला परंतु हा रंग अत्यंत अंधुक असून करड्या रंगाशी मिसळलेला असल्यामुळे या शोधाचा उपयोग रंगीत छायाचित्रणासाठी करणे शक्य झाले नसले, तरी त्यांना रंगीत छायाचित्रणाचे एक आद्यसंशोधक म्हणून मानण्यात येते. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.
पुरोहित, वा. ल.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..