पेरँ, झांबातीस्त : (३० सप्टेंबर १८७० — १७ एप्रिल १९४२). फ्रेंच भौतिकीविज्ञ. १९२६ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांनी मुख्यत्वे ð कलिले ðब्राउनीय गती या विषयांत महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म लील येथे झाला. पॅरिस येथील एकोल नॉर्मेल सुपिरियर या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर १८९४-९७ या काळात त्यांनी तेथेच भौतिकी विषयाचे साहाय्यक म्हणून काम केले. त्याच वेळी ð ऋण किरण व क्ष-किरण यांसंबंधी संशोधन करून त्यांनी १८९७ मध्ये याच विषयांवरील प्रबंधाबद्दल पीएच्. डी. पदवी मिळविली. त्याच वर्षी पॅरिस विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राच्या प्रपाठक पदावर व पुढे १९१० मध्ये प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली आणि १९४० पर्यंत त्यांनी त्याच पदावर काम केले. पहिल्या महायुद्धात त्यांनी अभियांत्रिकी विभागात अधिकारी म्हणून काम केले. १९४० मध्ये जर्मनीने फ्रान्सवर चढाई केल्यावर त्यांनी अमेरिकेला प्रयाण केले.

पेरँ यांनी ऋण किरण हे ऋण विद्युत् भारित कणांचे बनलेले आहेत, असे १८९५ मध्ये सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी वायूंच्या संवाहकतेवर क्ष-किरणांचा होणारा परिणाम, अनुस्फुरण (विशिष्ट पदार्थांवर प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-पडल्यामुळे वा इलेक्ट्रॉनांचा आघात झाल्यामुळे होणारे प्रकाशाचे, सामान्यत: दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन), रेडियमाचे विघटन तसेच ध्वनीचे उत्सर्जन व प्रेषण यांसंबंधी संशोधन केले. द्रवामध्ये संधारित (लोंबकळत्या) स्थितीत असलेल्या कणांच्या ब्राउनीय गतीविषयी त्यांनी अभ्यास केला व त्यावरून द्रव्याच्या आणवीय स्वरूपाची सत्यता प्रस्थापित केली. द्रव्याचे विविक्त स्वरूप अशा प्रकारे त्यांनी सिद्ध केले. १९०८ च्या सुमारास त्यांनी कलिलीय कण गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरुद्ध द्रवामध्ये संधारित कसे राहतात याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. या कणांच्या अवसादनाच्या (तळाशी गाळाच्या स्वरूपात स्थिरावण्याच्या) पद्धतीचे निरीक्षण करून त्यांनी आइन्स्टाइन यांचा संधारण आविष्कारासंबंधीचा नियम (कलिलीय कण वायूसंबंधीच्या नियमांचेच पालन करतात) प्रायोगिक रीत्या प्रस्थापित केला. या निरीक्षणांवरून अणूंच्या व रेणूंच्या आकारमानाचा अंदाज करणे आणि ग्रॅम-रेणूतील (जिचे ग्रॅममधील वस्तुमान पदार्थांच्या रेणुभाराबरोबर आहे अशा त्या पदार्थांच्या राशीतील) रेणूंची संख्या (ॲव्होगाड्रो संख्या) काढणे त्यांना शक्य झाले. या पद्धतीने काढलेले ॲव्होगाड्रो संख्येचे मूल्य इतर अगदी निराळ्या पद्धतींनी व निराळ्या घटनांच्या संदर्भात काढलेल्या मूल्यांशी जुळते होते. पेरँ यांनी गँबोज नावाच्या डिंकाच्या एकसारख्या आकारमानाच्या कणांच्या संधारणांचा व त्यांच्या अवसादन समतोलाचा अभ्यास करून अँव्होगाड्रो संख्येने मूल्य काढले. द्रव्याच्या विविक्त स्वरूपासंबंधीचे कार्य व अवसादन समतोलाचा शोध यांबद्दल पेर यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

त्यांनी अनेक शास्त्रीय लेख व ग्रंथ लिहिले. त्यांपैकी Les Atomes (१९१३) हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. १९१३ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली व १९३८ मध्ये ते ॲकॅडेमी चे अध्यक्षही होते. लंडनची रॉयल सोसायटी, तसेच बेल्जियम, स्वीडन, चीन इ. देशांतील शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज रॉयल सोसायटीचे जूल पारितोषिक, पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ला काझ पारितोषिक तसेच न्यूयॉर्क, ऑक्सफर्ड कलकत्ता इ. विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान त्यांना मिळाले. खगोलीय भौतिकी व भौतिकीय रसायनशास्त्र या विषयांच्या संशोधनार्थ, तसेच होतकरू शास्त्रज्ञांना अधिक वाव मिळण्यासाठी फ्रान्समध्ये विविध संस्था स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.