झेबू : शास्त्रीय नाव बॉस इंडिकस. वशिंड असलेल्या भारतीय बैलाला यूरोपीय शास्त्रीय वाङ्मयात झेबू या नावने संबोधिलेले आहे. ठळक वशिंड आणि गळ्याखाली असलेली मोठी पोळी ही यांची लक्षणे होत. झेबू हल्ली रानटी अवस्थेत आढळत नाहीत. अनादि काळापासून भारतात बैलाचा उपयोग निरनिराळ्या कामांकरिता व त्याच्या मांसाचा उपयोग खाण्याकरिता करतात. ब्रह्मदेशातील बँटेंगपासून झेबूची उत्पत्ती झाली असावी, असे एक मत आहे. दुसऱ्या एका मताप्रमाणे भारतीय वशिंडधारी व यूरोपीय सरळ पाठीची गुरे यूरोपातील रानटी बैलापासून उत्पन्न झाली असावीत. दोन्ही मतांना बळकट पुराव्याचा आधार नाही. भारतात मात्र वशिंडधारी आणि वशिंडरहित (सपाट पाठीची) दोन्ही जातींची गुरे फार प्राचीन काळापासून माहीत आहेत. मोहें-जो-दडो उत्खननात दोन्ही जातींचे बैल असलेल्या मुद्रा आढळल्या आहेत (काळ इ. स. पू. ३०००).
कानिटकर, बा. मो.