झीट : क्षणमात्र भान नाहीसे होणाऱ्या शरीराच्या अवस्थेला झीट म्हणतात. रक्तपरिवहनात एकाएकी खंड पडल्यास मेंदूला रक्तपुरवठा कमी पडून ही अवस्था निर्माण होते. अवसाद (भावनिक किंवा शारीरिक आघातामुळे शरीराच्या कार्याचे होणारे दमन) ही अवस्थाही याच कारणाने होत असली, तरी त्या अवस्थेत रक्तपरिवहन अधिक काळ खंडित होते [⟶ अवसाद]. त्यामुळे जीवनकार्य नियंत्रक केंद्रांचे कार्य खंडित होऊन विशिष्ट लक्षणे दिसतात. या दोन्ही अवस्थांमध्ये रक्तदाब कमी होणे, ही विकृती सामन्य असते.
रक्तदाब दोन गोष्टींवर अवलंबून असतो. हृदयाच्या स्पंदनाचा जोर आणि परिधीय (शरीरातील कातडीच्या खालील) रोहिणिकांमधील रक्तपरिवहनाला होणारा रोध या दोन गोष्टींच्या समतोलामुळे रक्तदाब योग्य प्रमाणात टिकून राहतो. शरीरात हा समतोल स्वायत्त तंत्रिका तंत्रामार्फत (इच्छानुवर्ती नसणाऱ्या, स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या मज्जायंत्रणेमार्फत) ठेवला जातो. या यंत्रणेत बिघाड झाल्यास रक्तदाब एकदम कमी होऊन झीट येते, म्हणून या अस्वथेला ‘प्राथमिक अवसाद’ किंवा ‘तंत्रिकाजन्य अवसाद’ असेही म्हणतात.
कारणे : झीट अनेक कारणांनी येऊ शकते. (१) निजलेल्या वा बसलेल्या अवस्थेतून एकदम उठून उभे राहिले असता. (२) रक्तवाहिन्यांच्या प्रेरक तंत्रिका (रक्तवाहिन्यांचे वेज लहान मोठे करणाऱ्या तंत्रिका) कमजोर झाल्यास. यामुळे उत्पन्न होणाऱ्या अवस्थेस ‘वाहिनीप्राणेशाजन्य’ (व्हासोव्हेगल) झीट असेही म्हणतात. हा प्रकार फार अशक्तपणा आलेल्या व्यक्तींमध्ये आढळतो. (३) अतिउष्ण हवा अथवा योग्य वायुवीजन (खेळती हवा) नसल्यास. (४) रक्त पाहणे, एखादे किळसवाणे दृश्य दिसणे वगैरे गोष्टींनी मानसिक क्षोभ झाल्यास. (५) हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचनात अनियमितता आल्यास. (६) पृष्ठवंशात (पाठीच्या कण्यात) काही विशिष्ट संवेदनाहारके काही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) टोचतात. कधीकधी ती दिल्यानंतर अनुकंपी तंत्रिका तंत्र (स्वायत्त तंत्रिका तंत्राचा एक मोठा विभाग) एकाएकी अकार्यक्षम बनून झीट येते. (७) ⇨ ग्रीवा पिंडावर दाब पडल्यामुळे प्रतिक्षेपी क्रियेने (शरीराच्या एका भागामध्ये उत्पन्न झालेल्या आवेगामुळे इतरत्र झालेल्या प्रतिक्रियेने) एकदम रक्तदाब कमी झाल्यास.
लक्षणे : डोक्यात गरगरू लागून घेरी येते. क्षणमात्र बेशुद्धी येऊन घाम सुटतो. अंग थंड पडते. चेहरा पांढरा फटक पडून अतिशय थकवा येतो. क्वचित ओकारी येते.
चिकित्सा : रोग्याला एकदम आडवे निजवल्याबरोबर मेंदूकडे पुरेसे रक्त जाऊन झीट थांबते, म्हणून त्याला त्वरेने आडवे करावे. ठेचलेला कांदा किंवा अमोनिया हुंगावयास द्यावा, गरम कॉफी किंवा स्पिरिट अमोनिया ॲरोमॅटिक्ससारखी उत्तेजक औषधे दिल्यास रोग्यास त्वरित बरे वाटते.
झीट वारंवार येत असल्यास तिचे कारण शोधून काढून इलाज करतात. एफेड्रिनासारखी रक्तदाब वाढविणारी औषधेही उपयोगी पडतात.
ढमढेरे, वा. रा.