ज्वालामुखी नळ : ज्वालामुखी क्रिया थांबल्यानंतर दीर्घकाल क्षरण (झीज) होऊन केंद्रीय ज्वालामुखींचे पाये उघडे पडले म्हणजे ज्यांच्यावाटे त्यांना शिलारसाचा पुरवठा होत असे त्या नळांत चोंदून राहिलेल्या खडकाच्या वरवंट्यासाख्या उभ्या राशी दृष्टीस पडतात. त्यांना ज्वालामुखी नळ (किंवा ग्रीवा) म्हणतात. त्यांची बाह्यरेखा जवळजवळ वर्तुळाकार व व्यास कित्येकशे मीटरांइतका असतो. ते अग्निज खडकाचे, ॲग्लोमरेटाचे वा ॲग्लोमरेटात अंतर्विष्ट (घुसलेले) अग्निज खडक यांचे बनलेले असतात. केवळ अग्निज खडकाच्या नळाला ज्वालामुखी गुडदी (प्लग) म्हणतात. नळापासून निघून शेजारच्या खडकात शिरलेल्या भित्ती किंवा शिलापट्ट क्वचित पहावयास मिळतात. भोवतालच्या खडकापेक्षा नळाचा खडक टिकाऊ असला म्हणजे क्षरण झाल्यावर नळापासून सुळक्यासारख्या टेकड्या व तो नरम असला म्हणजे खळगे तयार होतात.
ज्वालामुखी नळांपैकी महत्त्वाचे पण विरळाच आढळणारे नळ म्हणजे ज्यांच्यात हिरे असतात असे नळ होत [→ किंबर्लाइट]. भारताच्या द्वीपकल्पात फारच थोडे ज्वालामुखी नळ आहेत. त्यांपैकी अधिक परिचित म्हणजे गुंटकलच्या जवळील वज्रकरूर खेड्याशेजारचा कडप्पा कालीन नळ होय.
ठाकूर, अ. ना.