ज्वरशामके : (अँटिपायरेटिक्स). जी औषधे दिली असता शरीराचे वाढलेले तापमान पुन्हा प्राकृत (नेहमीच्या) पातळीवर येते, अशा औषधिद्रव्यांस ज्वरशामके म्हणतात. जीवोत्पन्न जंतुनाशके वा आधुनिक रासायनिक कल्प (औषधिमिश्रण) हे जंतुप्रादुर्भाव कमी करून त्यामुळे वाढलेला ज्वर कमी करतात. परंतु यांचे मुख्य कार्य जंतूंची वाढ थांबविणे हे असल्यामुळे त्यांना ज्वरशामक ही संज्ञा दिली जात नाही.
प्रमुख ज्वरशामके पुढीलप्रमाणे आहेत : (१) सॅलिसिलेट सिंकोफेन गट, (२) पॅरा ॲमिनो फिनॉलापासून निर्मित–ॲसिटानिलाइड व फेनॅसिटीन गट, (३) पायराझोलॉनापासून निर्मित–अँटिपायरीन व ॲमिनो पायरीन आणि (४) ब्युटाझोलिडीन.
सॅलिसिलिक अम्लापासून बनलेले सोडियम सॅलिसिलेट व ⇨ॲस्पिरीन (ॲसिटिल सॅलिसिलिक अम्ल) हे दोन कल्प मुख्यतः ज्वरशामक म्हणून वापरले जातात.
शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात बाहेर टाकली जाण्यास ही द्रव्ये मदत करतात. शरीराच्या पृष्ठभागाजवळील रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन त्यांतून जास्त प्रमाणात उष्णता बाहेर टाकली जाते. त्याचप्रमाणे स्वेद ग्रंथींना (ज्यांमुळे घाम येण्याची क्रिया होते अशा ग्रंथींना) चालना दिली जाऊन त्यांचा स्राव वाढविला जातो. हे कार्य नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील अधोथॅलॅमस (मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागाच्या मध्य भागातील थॅलॅमस नावाच्या भागाचा खालील भाग) या स्थानावर या द्रव्याचे कार्य होते. मात्र घाम येऊन ताप कमी होणे हे फक्त ज्यांचे तापमान वाढले असेल, त्या रुग्णांच्या बाबतीतच आढळून येते. या ज्वरशामकांची मात्रा ३०० मिग्रॅ. ते १ ग्रॅ. देतात.
ॲसिटानिलाइड कल्प : फेनॅसिटीन व पॅरॅसिटॅमॉल हे कल्प ॲस्पिरिनाप्रमाणेच कार्य करतात व त्यांच्याबरोबर दिले जातात. ए. पी. सी. या लोकप्रिय गोळ्यांमध्ये ॲस्पिरीन, फेनॅसिटीन आणि कॅफीन ही द्रव्ये असतात. पॅरॅसिटॅमॉल लहान मुलांनाही देता येते.
ॲमिनो पायरीन व फिनिलब्युटाझोन यांचा उपयोग संधिवातजन्य ज्वरामध्ये होतो.
क्विनीन : मलेरिया, तसेच अन्य ज्वरांमध्येही क्विनिनाचा उपयोग ज्वरशामक म्हणून होऊ शकतो [⟶ क्विनीन].
अभ्यंकर, श. ज.