जोसेफसन, ब्रायन डेव्हिड : (४ जाने. १९४० – ). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. १९७३ सालचे भौतिकीतील नोबेल पारितोषिक जोसेफसन याना अर्धे आणि लिओ एसाकी व ईव्हार गाइएव्हार यांना मिळून अर्धे असे विभागून मिळाले. ⇨अर्धसंवाहक आणि अतिसंवाहक पदार्थांमधील [→ अतिसंवाहक] इलेक्ट्रॉन सुरंग परिणाम या आविष्कारासंबंधीच्या विविध शोधांबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले.
जोसेफसन यांच्या जन्म वेल्समधील कार्डिफ येथे झाला. ते केंब्रिज विद्यापीठामधून बी.ए. (१९६०) एम्.ए. पीएच्.डी. (१९६४) झाले. १९७२ पासून ते केंब्रिज विद्यापीठाच्या भौतिकी विभागात प्रपाठक व कॅव्हँडिश प्रयोगशाळेत संशोधनाचे उपसंचालक आहेत.
दोन अतिसंवाहक माध्यमांच्या दरम्यान विद्युत् निरोधकाचा पातळ पडदा असल्यास त्या पडद्यातून सुरंग परिणामामुळे इलेक्ट्रॉनांच्या जोड्या (यांना कपूर जोड्या असे नाव आहे) अरपार जाऊ शकतील म्हणजेच विद्युत् प्रवाह जाऊ शकेल, असा सिद्धांत ⇨ पुंजयामिकीवरून जोसेफसन यांनी मांडला. या आविष्काराला जोसेफसन परिणाम असे म्हणतात.
जोसेफसन परिणामाचे दोन वेगळे आविष्कार सांगता येतील. विद्युत निरोधकाच्या दोन बाजूंच्या अतिसंवाहकांमधील विद्युत् वर्चोभेद (विद्युत् स्थितींमधील फरक) शून्य असला, तरीही सुरंग परिणामामुळे त्यांतून विद्युत् प्रवाह जाऊ शकतो. यालाच एकदिश जोसेफसन परिणाम म्हणतात. तसेच दोन बाजूंमध्ये काही वर्चोभेद ठेवल्यास त्यांमधून विशिष्ट कंप्रतेचा (दर सेकंदास होणाऱ्या कंपनसंख्येचा) प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह जातो. याला प्रत्यावर्ती जोसेफसन परिणाम असे म्हणतात. बाह्य चुंबकीय क्षेत्र लावल्यास एकदिश विद्युत् प्रवाहात बदल होतो.
या परिणामाचा उपयोग करून १०-९ गौस तीव्रतेचे चुंबकीय क्षेत्र आणि १०-१३ व्होल्टपेक्षा कमी विद्युत् वर्चोभेद अचूकपणे मोजता येतात संगणकात (गणित कृत्ये करणाऱ्या यंत्रात) उपयुक्त असे जलद कार्य करणारे स्विच तयार करता येतात. त्याचप्रमाणे अतिनीच तापमानाचे अचूक मापन करण्यासाठीही या परिणामाचा उपयोग होऊ शकतो.
जोसेफसन हे लंडनची रॉयल सोसायटी (१९७०) आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (१९६३ पासून) या संस्थांचे फेलो आहेत. १९६९ साली त्यांना न्यू सायंटिस्ट या साप्ताहिकाचे १,००० पौंडांचे पारितोषिक मिळाले. तसेच १९६९ साली रिसर्च कॉर्पोरेशनचे पारितोषिक आणि १९६९ साली फ्रिट्स लंडन पारितोषिक त्यांना मिळाले. जोसेफसन यांना गथरी (१९७२), व्हॅन डर पॉल (१९७२), एलिअट क्रिसन (१९७२), ह्यूझ (१९७२) आणि हॉल्वेक (१९७३) ही सन्माननीय पदके मिळाली.
अतिसंवाहकता या विषयावरील त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
सूर्यवंशी, वि. ल.