जैमिनि : एक गोत्रप्रवर्तक ऋषी आणि कृष्णद्वैपायन व्यासाचा एक शिष्य. आश्वलायन श्रौतसूत्राच्या प्रवराध्यायात यस्कनामक ऋषींच्या गोत्रगणात जैमिनी या गोत्रप्रवर्तक ऋषीचे एक नाव आहे. पाराशर्य व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन भारतकार व्यास याने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या वेगवेगळ्या संहिता बांधून त्या क्रमाने पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू या चार शिष्यांना वाटून दिल्या (वायुपुराण, अध्याय ६१) सामवेद संहिता जैमिनीला दिली. जैमिनीपासून सुमंतू, सुत्वन्, सुकर्णन् इ. शिष्यपरंपरेने सामवेदाची पृथक् शिष्यपरंपरा निर्माण झाली व नंतरसामवेदाच्या अनेक शाखा प्रसृत झाल्या जैमिनी सामवेदाचा ब्राह्मणकार आहे जैमिनीय ब्राह्मण तसेच जैमिनीयोपनिषद ब्राह्मण असे सामवेदाचे दोन ब्राह्मणग्रंथ आज उपलब्ध आहेत.
आस्तिक षड्दर्शनांपैकी एक सूत्रग्रंथ पूर्वमीमांसा हा जैमिनिप्रणीत आहे. अशी सर्वसाधारण धारणा आहे. या मीमांसेस जैमिनीय मीमांसाही म्हणतात. यात वेदांची मीमांसा कशी करावी, हे सांगितले आहे म्हणजे पूर्वमीमांसा सूत्रांमध्ये वेदवाक्यांचे अर्थ सुसंगत रीतीने कसे ठरवावे, यासंबंधी नियम तपशीलवार सांगितले आहेत. उपनिषदे म्हणजे वेदान्त अर्थात वेदांचा अखेरचा भाग हा सोडल्यास सर्व वेद हे मुख्यतः यज्ञकर्म सांगतात. अशा वेदवाक्यांचीच मीमांसा यात असल्यामुळे यास कर्ममीमांसाही म्हणतात. पूर्वमीमांसेच्या सूत्रांचा जैमिनी हा कर्ता आहे, असे मानतात परंतु त्यात जैमिनीचा नामनिर्देश अनेकदा आलेला आहे. उत्तरमीमांसेचा किंवा ब्रह्मसूत्राचा कर्ता बादरायण होय, असे शंकराचार्यांचे मत आहे व तसेच हल्ली मानण्यात येते. त्याबरोबर बादरायण व जैमिनी यांची मते अनेकदा नामनिर्देशपूर्वक या दोन्ही मीमांसांमध्ये सांगितलेली आहेत. तात्पर्य असे, की जैमिनी व बादरायण हे दोघेही पूर्वमीमांसेच्या आणि उत्तरमीमांसेच्या विषयांवर लिहिणारे प्राचीन मीमांसाकार होऊन गेले. त्यांनी वेदान्तासह सर्व वेदांची संपूर्ण मीमांसा करून अर्थनिर्णय केले व अर्थनिर्णयाचे नियम सांगितले, असे या दोन्ही मीमांसांवरून लक्षात येते.
या दोन्ही मीमांसांचा परामर्श घेतला असताना जैमिनीचे वेदवाक्यमीमांसेचे सिद्धांत जसे लक्षात येतात, त्याचप्रमाणे त्याचे एक विशिष्ट धार्मिक तत्त्वज्ञानही लक्षात येते ते असे : मानवी बुद्धीला स्वतंत्रपणे जे गोचर होत नाही किंवा आकलन करता येत नाही, तोच मुख्य वेदांचा विषय. वेद हे स्वतःप्रमाण आहेत. मनु इ. स्मृती या वेदमूलक आहेत म्हणूनच प्रमाण होत त्यांना स्वतंत्र प्रामाण्य नाही. धर्म व अधर्म किंवा कर्तव्य व अकर्तव्य काय, हेच वेदांचे मुख्य प्रतिपाद्य आहे (पूर्वमीमांसा १·१·५ १·११·२५ १·२·१). आरण्यके व उपनिषदे ही वेदच असल्यामुळे त्यांचाही प्रतिपाद्य विषय धर्म, कर्तव्य किंवा कर्म हाच आहे. आरण्यके व उपनिषदे यांत आत्मा, ईश्वर किंवा ब्रह्म, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय इ. वस्तुविषयक तत्त्वज्ञान सांगितलेले असले, तरी ते तत्त्वज्ञान कर्तव्यकर्माचे अंग आहे कर्माचे सहकारी आहे. ईश्वरच कर्मफलदाता असे बादरायणाचे मत आहे उलट धर्म वा अधर्म म्हणजे पुण्य वा पाप हे कर्मान्ती आत्म्याचे ठायी उत्पन्न होते आणि भौतिक विश्व, देह, सुखदुःखे ही पापपुण्यांचीच फले होत. कर्मफलदाता ईश्वर नव्हे तर कर्मच होय असे जैमिनीचे मत आहे (ब्रह्मसूत्र ३·२·४०). ज्ञान व कर्म या मानवी जीवनाच्या दोन्ही कक्षा तुल्यबल असल्या पाहिजेत या दोन्ही मिळूनच परमश्रेयाची, निःश्रेयसाची, मोक्षाची प्राप्ती होते केवळ ज्ञानाने नव्हे किंवा केवळ कर्माने नव्हे, असा ज्ञानकर्मसमुच्चयवाद जैमिनी मुनीने उपदेशिला होता, असे ब्रह्मसूत्रावरून व त्यावरील शांकरभाष्यावरून लक्षात येते (ब्रह्मसूत्र ३·४·१ ते १७). जीवन्मुक्तदशा असते, मुक्तालाही देहेंद्रियादी असतात, ती मोक्षाबरोबर लुप्त होत नाहीत, असे जैमिनीचे मत ब्रह्मसूत्रात (४·४·११) निर्दिष्ट केले आहे.
जैमिनीच्या नावाने जैमिनि- गृह्यसूत्र, जैमिनि-महाभारत, जैमिनि-भागवत, जैमिनि-स्मृति इ. ग्रंथांचे निर्देश आढळतात. त्यांपैकी जैमिनि-गृह्यसूत्रे व जैमिनि-अश्वमेध हे दोन ग्रंथ आज उपलब्ध आहेत.जैमिनि-महाभारताचे इतर भाग व्यासांच्याच आज्ञेने जैमिनीने नष्ट केले व जैमिनि-अश्वमेध हे प्रकरण तेवढे ठेवले, अशी आख्यायिका आहे. जेमिनी हे गोत्रनाम असल्यामुळे मूळचा गोत्राकार जैमिनी, ब्राह्मणकार अथवा व्यासशिष्य जैमिनी व पूर्वमीमांसाकार जैमिनी हे एकच की अनेक, याबद्दल काहीही ऐतिहासिक प्रमाण उपलब्ध नाही.
जोशी, लक्ष्मणशास्त्री