जोन्स, हेन्री आर्थर : (२० सप्टेंबर १८५१–७ जानेवारी १९२९). इंग्रज नाटककार. ग्रँडबरो, बकिंगहॅमशर येथे जन्मला. वयाच्या बाराव्या वर्षीच शालेय शिक्षण सोडून देऊन त्याला नोकरी पतकरावी लागली. पुढे १८७८–७९ पासून तो नाट्यलेखनाकडे वळला. मूळ ‘हार्मनी’ या एकांकिकेवरून वाढविलेले इट्स ओन्ली राउंड द कॉर्नर (१८७९) हे त्याचे पहिले नाटक. साठांहून अधिक नाटके त्याने लिहिली.
जोन्सची आरंभीची नाटके अतिरंजित वाटणारी व भडक परिणाम घडविणाऱ्या नाट्यतंत्राने लिहिलेली आहेत. रंगभूमीवर बरेच यशस्वी ठरलेले द सिल्व्हर किंग (१८८२, हेन्री हर्मन याच्या अल्पशा सहकार्याने) हे अशा प्रकारचे एक नाटक. हळूहळू तो वास्तववादी, समस्यात्मक नाट्यलेखनाकडे प्रवृत्त झाला. इब्सेनच्या ए डॉल्स हाऊस ह्या नाटकाच्या आधाराने ब्रेकिंग अ बटरफ्लाय हे रूपांतर त्याने हर्मनच्या साहाय्यानेच केले.
(१८४४).सेंट्स अँड सिनर्स (१८८४), द क्रूसेडर्स (१८९१), द केस ऑफ द रिबेल्यस स्यूसन (१८९४), मायकेल अँड हिज लॉस्ट एंजल (१८९६), मिसेस डेन्स डिफेन्स (१९००) ही त्याची अन्य विशेष प्रभावीपणे लिहिली गेलेली समस्यात्मक नाटके. मध्यम वर्गीय जीवनातील, विशेषेकरून धर्मगुरूंच्या आचरणातील आणि विचारसरणीतील, काही नैतिक प्रश्न त्यांत मांडले आहेत. तथापि भडक नाट्याच्या प्रवृत्तीतून जोन्स सर्वस्वी कधीच बाहेर पडू शकला नाही. व्यावसायिक यशासाठीही त्याला आपल्या नाट्यलेखनात वेळोवेळी तडजोडी कराव्या लागल्या कारण रूढ कल्पनांना धक्के देणारे प्रसंग त्याच्या नाटकात आल्यामुळे नाट्यप्रयोग प्रेक्षकांनी बंद पाडले, असेही घडले. मात्र बंडखोर विचारसरणी प्रकट करण्याचा त्याचा प्रयत्न फारसा क्रांतिकारक ठरला नाही, याचे कारण तो मर्यादित बंडखोरपणाचाच होता. नाट्यलेखनाच्या अनुषंगाने त्याने मांडलेला नाट्यविचार अधिक पुरोगामी दृष्टिकोण व्यक्त करणारा आहे, असे म्हणता येईल. द रेनेसान्स ऑफ द इंग्लिश ड्रामा (१८९५) हा त्याचा नाट्यविषयक ग्रंथ उल्लेखनीय आहे. हॅम्पस्टेड येथे तो निधन पावला.
देशपांडे, मु. गो.