जोधपूर विद्यापीठ : राजस्थान राज्यातील एक विद्यापीठ. त्याची स्थापना जोधपूर येथे १९६२ मध्ये झाली. त्याचे स्वरूप एकात्म व संलग्नक असून त्याच्या क्षेत्रात जोधपूर नगरपालिकेच्या कक्षेत अंतर्भूत होणारी सर्व माहविद्यालये समाविष्ट होतात. यांतील पूर्वीच्या काही महाविद्यालयांचे रूपांतर विद्याशाखांत केले असून वाणिज्य, अभियांत्रिकी, विधी, समाजशास्त्रे, मानव्यविद्या आणि विज्ञान अशा विद्याशाखा होत. त्यांत एकूण २५ अध्यापन विभाग आहेत. यांशिवाय दोन महाविद्यालये विद्यापीठास संलग्न केली आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून कुलगुरू व कुलसचिव हे सर्वोच्च सवेतन प्रशासकीय अधिकारी आहेत.
विद्यापीठाने त्रिवर्षीय समाकालीन अभ्यासक्रम अवलंबिला असून अभियंत्रिकी विद्याशाखेत वर्षार्ध परीक्षापद्धती आचरणात आणली आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असून विद्यापीठाचे सर्व अध्यापकीय विभाग जोधपूर येथेच आहेत. विद्यापीठाच्या कक्षेत राहणाऱ्या स्त्रिया, ग्रंथपाल, शिक्षिक, लिपिक तसेच अपंग वगैरेंना खासगी उमेदवार म्हणून परीक्षांना बाहेरून बसण्याची परवानगी आहे. याशिवाय पूर्णवेळ काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व परीक्षांपर्यंतचे अध्ययन सायंकाळी अध्यापन करणाऱ्या संस्थेत करता येते.
येथील विद्यार्थी सल्लागार मंडळ भारतातील आणि भारताबाहेरच्या भिन्न भिन्न उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांची माहिती गोळा करते आणि विद्यार्थ्यांना पुरवते.
विद्यापीठाचे एक आरोग्य केंद्र असून एक पूर्ण वेळ काम करणारा वैद्यक तिथे काम करतो. विद्यापीठाची एकूण १८ वसतिगृहे असून त्यांत ८३४ विद्यार्थी व विद्यार्थिनी राहतात. विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात सु. ९१,७९४ ग्रंथ व ६७४ नियतकालिके होती (१९७२). विद्यापीठाचा अर्थसंकल्प सु. १२५ लाख रुपयांचा होता (१९७२). सु. ७५ टक्के अनुदान राज्य सरकार देते. विद्यापीठात १९७२ मध्ये ८,४२५ विद्यार्थी शिकत होते.
घाणेकर, मु. मा.