जोंधळा, रान : (मक्कई हिं. सांक्रू, गुर्लू गु. कसाई सं. गोजिव्हा इं. ॲडले, जॉब्स टीयर्स लॅ. कॉइक्स लॅक्रिमा-जोबी कुल-ग्रॅमिनी). सु. ९०–१५० सेंमी. उंचीचे हे गवत मूळचे आग्नेय आशियातील असून उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. विशेषतः फिलिपीन्समध्ये व उष्ण कटिबंधातील इतर देशांत त्याची पूरक अन्नधान्य म्हणून लागवड केली जाते. भारतात निसर्गतः प्रवाहांच्या काठाने अथवा ओलसर जागी आढळते मैदानी प्रदेशात व सु. १,५०० मी. उंच डोंगराळ भागात उतरणीवर लागवडीत आहे. त्याचे अनेक प्रकार व वाण असून त्यांत बरीच विविधता आढळते. अनेक खोडांचा एकत्र झुबका करून ते वाढते. याची कांडी आणि रुंदट साधी पाने गुळगुळीत असतात. याला एकलिंगी फुले एकाच झाडावरच्या मंजिऱ्यावर ऑक्टोबरात येतात. याचे शुष्क एकबीजी कृत्स्नफल[सस्यफल → फळ] गोलसर, निळसर करडे, बारीक, ६·५–१० मिमी. लांब, गुळगुळीत, चकचकीत (अश्रुप्रमाणे आणि त्यामुळे त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे) असते बी पांढरट किंवा फिकट तपकिरी असते. फळे आकार, आकारमान, रंग बाहेरील आवरण (फळावरण) या बाबतींत विविधता दर्शवितात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे तृण कुलात [→ ग्रॅमिनी] वर्णिल्याप्रमाणे असतात.
सयाम, इंडोचायना, ब्रह्मदेश, श्रीलंका, फिलिपीन्स इ. प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच उंचीवर याची लागवड आढळते. दर हेक्टरी सु. ८–१२ किग्रॅ. बी पेरतात त्या वेळी (पावसाळ्यात) भरपूर पाणी व दाणा येण्याच्या वेळी कोरडी हवा आवश्यक असते सेंद्रिय खत चांगले मानवते. बी पेरल्यापासून चार ते पाच महिन्यांत पीक तयार होते. ताटे मुळांच्या वरपासून छाटून आणि नंतर बुडवून बी अलग करतात. यावर रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही क्वचित काणी पडते परंतु उंदीर आणि पोपट यांचा उपद्रव होतो. भिन्न देशांत दर हेक्टरी पिकाचे प्रमाण (तुसांसह) पुढीलप्रमाणे आढळते : फिलिपीन्स ३,७५० किग्रॅ. श्रीलंका १,७५०–२,१९० किग्रॅ. भरडल्यावर फिलिपीन्समध्ये ३०–४०% आणि श्रीलंकेत ७०% तूट येते त्याचे कारण तुसांच्या प्रकारातील बियांच्या जातीतील फरक असावा. कठीण फलावरणाचे ३०–७०% वजन भरते बी (दाणा) पांढरे, पिवळे किंवा जांभळे असते. श्रीलंकेतील दाण्यांच्या विश्लेषणात घटकांचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : जलांश १०·१-११·३, प्रथिने १०·३-१२·१, कार्बोहायड्रेटे ७२·७-७४·३, ईथरमधला अर्क ३·१-३·८, तंतू ०·२९-०·३२, खनिजे ०·७०-०·९९, कॅल्शियम ०·००५-०·००६, फॉस्फरस ०·३-०·५ इतर धान्यांशी तुलना केल्यास यात खनिजे कमी असतात, पण प्रथिने व मेद तुल्य असतात फॉस्फरस जास्त पण कॅल्शियम आणि तंतू कमी (तांदळाप्रमाणे) असते. फिलिपीन्समध्ये केलेल्या प्रयोगांत असे आढळले की, रानजोंधळ्याच्या पिठात गव्हाचे पीठ मिसळल्यास ते बेकरीला उपयुक्त असते. तांदळाऐवजी रानजोंधळ्याचे दाणे वापरल्यास अधिक फायद्याचे (पथ्यकर) असते कारण प्रथिने व मेद त्यात अधिक असतात इतकेच नव्हे, तर तांदळापासून बनविला जाणारा कोणताही पदार्थ ह्या धान्यापासून तितकाच चवदार बनविता येतो. जपानात भाजक्या रानजोंधळ्यापासून उत्तम पेये बनवितात नागा लोक यापासून सौम्य बीर (मद्य) करतात. ह्याचे दाणे कोंबड्यांना चारतात. घसा व श्वासनलिका यांचे विकार आणि मूत्रमार्गाचा दाह यांवर दाण्यांचा काढा किंवा टिंक्चर या स्वरूपात औषधी उपयोग करतात. बी मूत्रल (लघवी साफ करणारे) आणि मूळ मासिक पाळीच्या विकारांवर गुणकारी असते. जंगली जातींची फळे माळा, कंठी, पडदे यांकरिता आणि आदिवासी दागिन्यांकरिता वापरतात. हत्ती, घोडे व गुरे यांना चारा म्हणून याची पाने वापरली जातात तसेच सुक्या गवताचा छपराकरिता वापर होतो.
ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ.
“