जुळणी व मापसूट : यंत्रांची जुळवणी करताना एका भागाऐवजी तसलाच दुसरा भाग सहज बसवता यावा म्हणून तयार मिळणाऱ्या सर्व भागांची मापे मूळ आराखड्याच्या रेखाचित्रात दाखविल्याप्रमाणे असावी लागतात. हे तयार भाग हजारोंच्या संख्येने बनविण्यात येत असल्याने कारखान्यातील यंत्रसामग्री कितीही उत्तम दर्जाची असली, तरी कर्तकाच्या झिजेमुळे भागांच्या मापांत सूक्ष्म फरक पडत जातो. मूळ मापापेक्षा थोडे कमीजास्त माप असले, तरी सुटा भाग उपयोगात आणता यावा म्हणून मापामधील फरकाच्या सीमा ठरविलेल्या असतात. अदलाबदल करता येण्यासारखे भाग बसविण्याच्या पद्धतीला मापसूट ठेवलेली जुळवणी पद्धत म्हणतात.

रेखाचित्रात दाखविण्याच्या मापाला मूलभूत किंवा मोघम माप म्हणतात. वस्तूच्या मापाला मान्यता दिलेल्या ज्या दोन सीमा असतात त्यांना मापाच्या अंतिम सीमा म्हणतात. त्यामध्ये एक वरची सीमा असते व दुसरी खालची असते. वरच्या व खालच्या सीमांमध्ये असलेल्या मापामधील फरकाला मापसूट (किंवा मापातील सह्यता) म्हणतात. ही सूट मूळ मापाच्या एकाच बाजूकडे दिली, तर त्या पद्धतीला एकेरी सूट पद्धत व दोन्ही बाजूंकडे समान किंवा असमान वाटून दिली, तर तिला दुहेरी सूट म्हणतात. समजा एका भोकाच्या मूलभत व्यास २·००० सेंमी. आहे. त्यात बसणाऱ्या दांड्याचा व्यास जर

असा दिला, तर ती एकेरी सूट पद्धत होय व

दुहेरी पद्धत होय. बहुतेक कारखान्यांतून एकेरी सूट पद्धत वापरतात. कोणत्याही प्रकारच्या जुळणीमध्ये भोकाच्या व्यासात व दांड्याच्या व्यासात असणाऱ्या अंतराला सूट म्हणतात. जुळणी करण्याच्या प्रकाराप्रमाणे ही सूट धन किंवा ऋण असू शकते. भोकापेक्षा दांड्याचा व्यास कमी असेल, तर त्या सुटीला धन म्हणतात व जास्त असेल, तर तिला ऋण समजतात.

जुळण्यांचे प्रकार : जुळण्यांचे पुढील प्रकार प्रचारात आहेत.

(अ) धावती जुळणी : धारव्यामध्ये (बेअरिंगमध्ये) फिरणारा दांडा व धारव्याचे भोक अशा जोडीमधील जुळणीला धावती जुळणी म्हणतात. या जुळणीत वंगणाची गरज असते व त्याकरिता दांड्याभोवती वंगणाचे वेष्टन राहण्याकरिता भोकाचा व्यास आणि दांड्याचा व्यास यांमध्ये धन सूट ठेवावी लागते.

(आ) ढकल जुळणी : हीत भोकामध्ये दांडा किंवा खीळ हाताने थोडासा जोर देऊन कायमची एका जागी बसवावी लागतात. येथेही भोकाचा व दांड्यांचा व्यास यांमध्ये सूक्ष्म धन सूट असावी लागते.

(इ) दाब जुळणी : ज्या भोकामध्ये दांडा बसविण्याकरिता फार मोठा दाब द्यावा लागतो, त्या जुळणीला दाब जुळणी म्हणतात. या प्रकारात भोकाचा व्यास व दांड्याचा व्यास अगदी सारखे असतात.

(ई) आकुंचन जुळणी : हीत भोकाचा व्यास दांड्याच्या व्यासापेक्षा किंचित कमी असतो. वस्तू चांगली गरम करून भोकाचा व्यास तात्पुरता मोठा करतात किंवा दांड्याचा व्यास थंड करून आकुंचित करतात.

मापसुटीच्या पद्धती : सूटसीमा ठरविण्याकरिता भोकावर आधारलेली आणि दांड्यावर आधारलेली अशा दोन पद्धती आहेत, त्या आकृतीमध्ये दाखविल्या आहेत. भोकावर आधारलेल्या पद्धतीत भोकाचा व्यास कायम आहे असे धरतात व फक्त दांड्याच्या व्यासामध्ये सूट देतात. दांड्यावर आधारलेल्या पद्धतीत दांड्याचा व्यास कायम आहे असे धरतात व भोकाच्या व्यसात सूट देतात. आकृतीमध्ये मापांत सूक्ष्म फरक असलेले दांडे ( मध्ये) व भोके ( मध्ये) १, २, ३, ४ अशी दाखविली आहेत. या चारांपैकी ४ ही उघडच अशक्य वापराची आहेत, ३ चालण्यासारखी आहेत आणि १ व २ ही दिलेल्या मापसुटीत बसणारी आहेत. सर्व आधुनिक सीमापद्धती भोकावर आधारित असतात कारण भोकापेक्षा दांड्याच्या व्यासात फेरफार करणे सोपे असते.

सूटसीमा निश्चित करण्याच्या दोन पद्धती : (अ) भोकावर आधारलेली, (आ) दांड्यावर आधारलेली.

भारतीय मानक पद्धतीमध्ये संबंधित मानकात (आय. एस. ९१९–१९५९) सूटसीमा व जुळणी यांसंबंधी मूलभूत मापांचे २१ प्रकार दिलेले आहेत व त्यांमध्ये १ मिमी. पासून ५०० मिमी. व्यासापर्यंतची मापे अंतर्भूत असून त्यात सूटसीमांचे १६ प्रकार दिले आहेत. भोकावर आधारलेली पद्धत वापरावी अशीही शिफारस केलेली आहे.

संदर्भ : Hajra Choudhury, S. K. Bose, S. K. Bhattacharya, S. C. Elements of Workshop Technology, Vol. I,  Bombay, 1965.

ओक, वा. रा.