किंग्स्टन – २ : कॅनडाच्या आँटॅरिओ राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ६१,८७० (१९७१). हे आँटॅरिओ सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर, कॅटाराकी नदीमुखाशी, टोराँटोच्या २६४ किमी. ईशान्येस आहे. हे वेलंड कालव्यावरील जहाजबदलीचे महत्त्वाचे ठाणे असून ओटावा नदीवरील १६ मी. चा शोड्येर धबधबा टाळून किंग्स्टन – ओटावा वाहतूक करणाऱ्या रीडो कालव्यावरील महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार आहे. डीझेल एंजिने, खाणकामाची यंत्रे, बॅटऱ्या, ॲल्युमिनियमचे पदार्थ, चिनी मातीची भांडी, कातडी, कापड, बिस्किटे, रसायने असे विविध साहित्याचे उत्पादन येथील कारखान्यांत होते. जहाजबांधणी, आगगाडीची एंजिने, धान्यउद्वाहक यांचे व्यवसायही मोठे आहेत. १६७३ मध्ये फ्रेंचांनी येथे ‘फ्राँतेनाक’ किल्ला बांधला. सप्तवार्षिक युद्धात ब्रिटिशांनी तो जाळून टाकला. १७८३ मध्ये तो पुन्हा बांधला गेला व तिसऱ्या जॉर्जच्या स्मरणार्थ त्याला किंग्स्टन नाव देण्यात आले. काही काळ आँटॅरिओ व क्वीबेक प्रांतांची राजधानी येथे होती. क्वीन्स विद्यापीठ व रॉयल मिलिटरी कॉलेज इ. महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था येथे आहेत.

ओक, द. ह.