किचेनर, फील्ड मार्शल अर्ल होरेशिओ हर्बर्ट : (२४ जून १८५० – ५ जून १९१६). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी. जन्म दक्षिण आयर्लंडमधील लिस्टोएल गावाजवळ. वयाच्या अठराव्या वर्षी वुलिचच्या रॉयल मिलिटरी अकादमीत प्रवेश व वयाच्या एकविसाव्या वर्षी शाही आभियांत्रिकी दलात कमिशन. १८८३ मध्ये ईजिप्शिअन सैन्याच्या पुनर्घटनेसाठी याची कर्नलच्या हुद्द्यावर व पुढे तीन वर्षांनी पूर्व सूदानचा गव्हर्नर-जनरल म्हणून नेमणूक झाली. १८९२ साली तो ईजिप्तमधील ब्रिटिश सैन्याचा प्रमुख झाला.

फील्ड मार्शल किचेनर

महादींचे बंड मोडून काढण्याच्या कामगिरीबद्दल त्याला उमरावपद देण्यात आले. १९०० मध्ये जनरलच्या हुद्द्यावर दक्षिण आफ्रिकेत लॉर्ड रॉबर्टस्‌चा चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि नंतर आफ्रिकेतील ब्रिटिश सेनेचा सरसेनापती म्हणून त्याची नेमणूक झाली. १९०२ नंतर तो भारताचा सरसेनापती झाला व त्याच वेळी त्याचा व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनशी सरसेनापतीच्या अधिकारव्याप्तीबद्दल खटका उडाला. त्याने भारतीय सैन्याचे पुनर्संघटन केले व संस्थानी सैन्यात सुधारणा घडवून आणल्या. १९११ मध्ये ईजिप्तमध्ये ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्याची नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस युद्धमंत्रिपदावर त्याची नियुक्ती झाली. ५ जून १९१६ रोजी रशियास जात असताना त्याच्या आगबोटीस पाणसुरुंगाचा धक्का लागून किचेनरला बोटीसह जलसमाधी मिळाली. जगातील नामांकित सेनापतींत किचेनरची गणना केली जाते.

 

 

 

 

चाफेकर, शं. गं.