कव्हल्येव्हस्कइ, सॉन्या: (१५ जानेवारी १८५०-१० फेब्रुवारी १८९१). रशियन गणितज्ञ व लेखिका. त्यांचा जन्म मॉस्को येथे झाला. १८६८ मध्ये व्ल्हॅडिमिर कव्हल्येव्हस्कइ या पुराजीववैज्ञानिकांशी विवाह झाल्यानंतर दोघेही जर्मनीमध्ये शिक्षणासाठी गेले. त्याकाळी स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश नसल्यामुळे त्यांनी हायड्लबर्ग येथे प्रसिद्ध गणिती व्हायरश्ट्रास यांच्या मार्गदर्शनाखाली १८७१-७४ या काळात खाजगी रीत्या गणिताचा अभ्यास केला. १८७४ मध्ये गॉटिंगेन विद्यापीठाने त्यांच्या आंशिक अवकल समीकरणांसंबंधीच्या [→ अवकल समीकरणे] प्रबंधाबद्दल त्यांना पदवी दिली. १८८४ मध्ये त्यांची स्टॉकहोम विद्यापीठात उच्च गणिताच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच काम केले.

‘स्थिर बिंदूभोवती घन पदार्थाचे परिभ्रमण’ या विषयावरील त्यांच्या उत्कृष्ट निबंधास फ्रेंच ॲकॅडेमीचे प्री. बॉरदीन हे पारितोषिक मिळाले. त्यांनी फलन (गणितीय संबंधदर्शक राशी) सिद्धांताविषयीही संशोधन केले होते. त्यांनी जर्मन विद्यापीठातील जीवनाचे वर्णन करणारी Der Privatdozent (१८७७) नावाची कादंबरी तसेच Die Nihilisten, Vera Vorontzoff इ. कादंबऱ्याही लिहिल्या होत्या. स्टॉकहोम येथे त्या मृत्यू पावल्या.

वाड, श. स.