कविसूर्य बलदेव रथ:कविसूर्य बलदेव रथ : (१७८९-१८४५). एक ओडिया कवी. जन्म ओरिसात अठगढ (जि. गंजाम) येथे. संस्कृत, फार्सी व इतर पाच भारतीय भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. तो उत्तम गायकही होता. राजकवी म्हणून ओरिसातील अनेक राजांकडे तो राहिला. इंग्रजी अमदानीत त्याची दिवाण म्हणूनही नेमणूक झाली.
उपेंद्र भंजाच्या शैलीस अनुसरून त्याने चंद्रकला नावाचे काव्य रचले पण ते अपूर्णच राहिले. संगीत कल्पलता या त्याच्या गीतसंग्रहात शेकडो शृंगारिक गीते असून, प्रणयाच्या सर्व छटांचा त्यांत आविष्कार आढळतो. किशोर चंद्रानंद हे त्याचे उत्कृष्ट चंपूकाव्य असून ते कृष्ण, राधा व त्यांची दूती ललिता यांच्या संवादरूपाने रचलेले आहे. या काव्याची शैली पारंपारिक ‘चौतिसा’ काव्यप्रकाराची आहे. ओडिया वर्णमालेतील ‘क’ ते ‘क्ष’ पर्यंतच्या चौतीस व्यंजनांची प्रतीके म्हणून चौतीस गीते यात गुंफलेली आहेत. त्याने काही उपहासात्मक रचनाही केली आहे. पंडित कुलमणी दास यांनी त्याच्या समग्र काव्याचे उत्तम प्रकारे संकलन-संपादन केले आहे.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) कापडी, सुलभा (म.)