कर्वे, रघुनाथधोंडो : (१४ जाने. १८८२ — १४ ऑक्टो. १९५३). समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत. जन्म मुरुड या गावी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र. मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम (१८९७). फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. ए. (१९०३). १९०६ मध्ये अध्यापनाची पदविका. गणित विषयात एम्.ए. पॅरिस येथील फ्रेंच अकादमीची ‘दिप्लोम् दे सुदस्युपेरिअर’ ही पदवी (१९२०). एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई (१९०८–१७), कर्नाटक कॉलेज, धारवाड (१९१७–१९) डेक्कन कॉलेज, पुणे (१९२१) गुजरात कॉलेज, अहमदाबाद (१९२१–२२) व विल्सन कॉलेज, मुंबई (१९२२) या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक. त्यांचे क्रांतीकारक विचार व बाणेदार स्वभाव यांमुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली. याशिवाय त्यांना इतरही काही व्यवसाय करावे लागले. संततिनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) ते १९२१ पासून आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने चालवत होते. लैंगिक शिक्षण, संततिनियमन या महत्त्वाच्या विषयांबरोबर इतरही सामाजिक व सांस्कृतिक विषयांकडे वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टीने पाहून समाजाला ती दृष्टी प्राप्त व्हावी, यांसाठी कर्वे आमरण प्रयत्नशील राहिले. त्यांच्या मते संततिनियमनाचे व्यापक उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्याचे असून, ते निकोप स्त्रीपुरुषसंबंधांवर अधिष्ठित असते. आधुनिक दृष्टीने व बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर योग्य ठरणार्या लोकशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. या हेतूने त्यांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले (१५ जुलै १९२७ — १५ नोव्हेंबर १९५३). ज्या गोष्टींची माहिती होणे समाजाच्या व व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, ती माहिती निर्धारपूर्वक पुढे आलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (आवृ. २, १९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली. पॅरिसच्या परी (१९४६) व तेरा गोष्टी (१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाजी (१९३७, तार्त्युफ नाटकाचे रूपांतर) व न्यायाचा शोध (१९४६) हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
आगरकरांनंतर प्रखर बुद्धिवादाचा निर्भयपणे व कोणतीही तडजोड न करता पुरस्कार करणारा मराठी विचारवंत म्हणून र. धों. कर्व्यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्या आचरणात जी नेकी होती, ती त्यांच्या विचारातही होती आणि तिचेच प्रतिबिंब त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक, अनलंकृत शैलीत पडलेले आढळते. एक उत्कृष्ट गद्यलेखक म्हणूनही त्यांची आठवण राहील.
जाधव, रा.ग.