कॅन्स्कोरा डिफूजा : (कुल-जेन्शिएनेसी). सु. १५—६० सेंमी. क्वचित अधिक उंच, अनेक फांद्यांची, लहान, सरळ वाढणारी ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ ओषधि] भारतात सर्वत्र जंगलात आढळते शिवाय श्रीलंका, मलाया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इ. प्रदेशांतही तिचा प्रसार आहे. खोड बारीक, चौकोनी पाने पातळ, लहान, बिनदेठाची, समोरासमोर, तीन मुख्य शिरांची वरची लहान, रुंदट, अंडाकृती पण खालची त्यापेक्षा मोठी, दीर्घवृत्ताकृती व देठाची फुले सच्छद, अनेक व विरळ वल्लरीत ऑक्टोबर – जानेवारीत येतात. संवर्त नळीसारखा, पुष्पमुकुट तळाकडे नळीसारखा आणि हिरवट, वर गुलाबी व पसरट, केसरदले चार, त्यांपैकी एक अधिक लांब बोंड पातळ, अरुंद आणि ०⋅५ सेंमी. लांब [→ फूल] बीजे बारीक व अनेक [→ जेन्शिएनेलीझ]. ही ओषधी सारक, तंत्रिका (मज्जातंतू) पौष्टिक आणि आरोग्य पुनःस्थापक असून तिचा ताजा रस वेडेपणा, मनोदौर्बल्य व अपस्मार यांवर देतात. कॅ. डेकसेटा ही संबंधित जाती भारतात सर्वत्र ओलसर ठिकाणी आढळते. हिला पांढरी फुले येतात आणि ही शंखपुष्पी, शंखवेल इ. मराठी नावांनी ओळखली जाते. उन्माद रोगात (हिस्टेरियात) ताज्या वनस्पतीचा रस देतात तो सारकही असतो.
परांडेकर, शं. आ.
“