कर्तव्यच्युति: कायद्याने, संकेताने अगर कराराने निर्माण झालेल्या जबाबदारीत कसूर म्हणजे कर्तव्यच्युती. यामुळे दोषी ठरलेल्या इसमास ⇨नुकसान-भरपाई द्यावी लागते. प्रसंगी फौजदारी कायद्यान्वये तो शिक्षेस पात्र ठरतो.

⇨मालक-नोकर-संबंधात नोकराने कर्तव्यच्युती केली, तर तो बडतर्फी अथवा इतर शिक्षांना पात्र आहे पण तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी मालकाने दिली पाहिजे. मालकाने हा अधिकार सद्‌भावपूर्वक वापरला, तर न्यायालय त्या ढवळाढवळ करणार नाही. नपेक्षा त्यास नोकराला नुकसान-भरपाई द्यावी लागेल अगर परत नोकरीवर ठेवावे लागेल. गिरण्या, कारखाने, दुकाने वगैरेंमध्ये काम करणाऱ्‍या नोकरांचे हक्क व जबाबदाऱ्‍या ⇨औद्योगिक कायदे, ⇨गुमास्ता अधिनियम वगैरेंमध्ये नमूद केल्या आहेत. सरकारी नोकरांच्या बाबतीत कर्तव्यच्युती सिद्ध झाल्यावरही शिक्षेबद्दल त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. मालकांनी पगार अगर इतर फायदे दिले नाहीत, तर नोकरांना औद्योगिक अगर दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागता येते. औद्योगिक कायद्यांत संप कायदेशीर आहे.

निष्काळीपणे अथवा सहेतुकपणे कर्तव्यच्युती केली, तर तो गुन्हा होऊ शकतो. कैद्यास कैद न करणे अथवा निसटू देणे, लाच घेणे अगर खोट्या नोंदी करणे यांसारखे लोकसेवकाचे कर्तव्यच्युतीचे प्रकार शिक्षेस पात्र आहेत. लोकसेवकास मदत देणे हे कर्तव्य असता ते न करणे, हा गुन्हा आहे. वाहन अगर जहाज चालविताना दोषी निष्काळजीपणा, दारुगोळा व तत्सम धोकादायक वस्तू हाताळताना कर्तव्यच्युती, हे सर्व गुन्हे होत. कंपनीमध्ये डायरेक्टर अगर अधिकारी व्यक्तींनी काही प्रसंगी कर्तव्यच्युती केली, तर ते दंडास पात्र आहेत.

पहा : अपकृत्य हयगय.

कवळेकर, सुशील