कर्णफुली नदी : बांगला देशमधील महत्त्वाची नदी. लांबी सु. २३७ किमी. बांगला देश आणि ब्रह्मदेश ह्यांच्यामधील भारताच्या मिझोराम राज्याच्या जिल्ह्यातील, बांगला देश सरहद्दीजवळील पश्चिम लुशाई टेकड्यांत हिचा उगम होतो. येथून ती दक्षिणेकडे वाहते. बरकल येथील प्रपातानंतर ती नैऋत्यवाहिनी होते, सु. १९५ किमी. नंतर ती चितगाँगच्या दक्षिणेस १३ किमी. वर बंगालच्या उपसागरास मिळते. उगमाजवळ हिला किन्साख्यौंग असे नाव आहे. कासालांग, चिनगी, कापतई, रनखिआंग या कर्णफुलीच्या टेकड्यांच्या प्रदेशातील प्रमुख उपनद्या असून चितगाँग जिल्ह्यात तिला हलदा नदी मिळते. चितगाँगच्या ४८ किमी. ईशान्येकडील रांगामाती हे कर्णफुलीवरील महत्त्वाचे शहर असून चंद्रघोणा व रंगोनिया ही कमी महत्त्वाची ठाणी आहेत. उष्ण व दमट हवा, २५० सेंमी. पाऊस, घनदाट अरण्ये व कणफुलीच्या खालच्या टप्प्यातील सुपीक कापसाची जमीन यांमुळे कर्णफुलीवर मोठी वाहतूक चालते. रांगामातीपर्यंत मोठ्या बोटी जाऊ शकतात. पाकिस्तानने पूर्वी कर्णफुलीच्या वरच्या टप्प्यात ४७ मी. उंचीचा बंधारा बांधून मोठे धरण बनविले आणि कापतईजवळील विद्युत्केंद्रातून ८०,००० किवॉ. वीजनिर्मिती करून, ती चितगाँग परिसरातील उद्योगसमूहास पुरविली त्यामुळे कर्णफुलीचे महत्त्व खूपच वाढले.
यार्दी, ह. व्यं.