कालिंदी : गंगेच्या मुखाजवळील अनेक फाट्यांपैकी यमुना फाट्याचा काही भाग. लांबी सु. ३२० किमी. ह्या नदीचे सर्व खोरे गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात असून मुखाकडील ½ प्रवाह भारत व बांगला देश यांच्या सीमेवरून वाहतो. या द्दष्टीने कालिंदी नदीस महत्त्व आहे. ह्या नदीचा प्रदेश गाळाने बनलेला असून तो अगदी सपाट, सखल व अत्यंत सुपीक आहे. येथे अनेक प्रवाहांचे जाळे बनलेले आहे. नदीच्या पात्रात सरोवरे निर्माण होतात आणि ती जलमार्गास व मत्स्योद्योगास उपयुक्त ठरतात. येथे सर्वत्र गाळ, चिखल आणि दलदल असल्यामुळे जलमार्ग हा दळणवळणाचा एकमेव मार्ग असतो. या परिसरातील वनश्रीयुक्त खेडी पाण्यावर तरंगत आहेत असे वाटते. समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशात सुंदरबन आहे.
यार्दी, ह. व्यं.