काल : आपल्याला घटनांचा अनुभव येतो, तेव्हा कित्येक घटना इतर काही घटनांच्या पूर्वी किंवा नंतर घडलेल्या असतात, असाही अनुभव येतो. उदा., एखादी संबंध तान आपण ऐकतो, तेव्हा तिच्यातील काही सूर आपण अगोदर आणि काही नंतर ऐकलेले असतात, असा आपला अनुभव असतो. तसेच ज्या घटनांचा अनुभव आपल्याला येतो त्या क्षणिक, केवळ एका क्षणी घडणाऱ्या, घटना नसतात. काही कालावधीत घडणाऱ्या, कमीअधिक कालावधी व्यापणाऱ्या अशा त्या घटना असतात. अशा घटनांचा साक्षात अनुभव आणि त्यांच्यातील पूर्वी आणि नंतर ह्या संबंधाचा साक्षात अनुभव हा मानसिक दृष्ट्या कालाचा प्राथमिक अनुभव होय. क्षण हे कालाचे अंतिम घटक आहेत, पूर्वी–नंतर ह्या संबंधाने हे सर्व क्षण कालाच्या एकाच मालिकेत परस्परांशी संबंधित असतात, ही जी कालाविषयीची अधिक विकसित संकल्पना आहे, ती कालाविषयीच्या ह्या प्राथमिक अनुभवापासून विश्लेषणाने व तार्किक रचनेने प्राप्त होते. काही कालावधीत घडणाऱ्या घटना आणि त्यांच्यातील पूर्वी–नंतर हा संबंध ह्या आपल्या अनुभवाचे साक्षात विषय असलेल्या गोष्टींपासून कालाची आपण वर उल्लेखिलेली संकल्पना कशी घडविता येते, हे वीनर आणि ए.एन्. व्हाइटहेड (१८६१—१९४७) ह्यांनी दाखवून दिले आहे.
अवकाश आणि काल ह्यांच्या घडणीत (स्ट्रक्चर) काही बाबतींत साम्य आहे आणि काही बाबतींत भेद आहे. साम्ये अशी : आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या अनेक वस्तूंच्या ठिकाणी विस्तार हा धर्म असतो. अशा वस्तूंच्या परस्पंराशी असलेल्या संबंधाचा – उदा., डावीकडे असणे इ. – आपल्याला साक्षात अनुभव येऊ शकतो. हे संबंध जसे वस्तुवस्तूंमध्ये असतात, त्याचप्रमाणे जिच्या अंगी विस्तार आहे, अशा वस्तूच्या वेगवेगळ्या भागांमध्येही असू शकतात. उदा., टेबल खुर्चीच्या डाव्या बाजूला असते त्याचप्रमाणे टेबलाचा एक भाग दुसऱ्या भागाच्या डाव्या बाजूला असतो. तसेच हे संबंध कमीअधिक असतात म्हणजे त्यांना मात्रा असते. उदा., ‘ब’ ‘अ’ च्या जितका डाव्या बाजूला आहे, त्याहून ‘क’ अधिक डाव्या बाजूला आहे. आणखी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी, की वस्तूंच्या ठिकाणी असलेला विस्तार हा धर्म आणि वस्तुवस्तूंमधील अतंर हा संबंध ह्यांमध्ये साम्य असते. ह्यामुळे ‘हे टेबल आणि खुर्ची ह्यांतील अंतर, ह्या टेबलाच्या लांबीएवढे आहे’ असे आपण म्हणू शकतो. घटनांचा कालावधी हा धर्म आणि दोन घटनांमध्ये असलेले कालांतर (इंटरव्हल) हा संबंध, ह्यांना ह्या सर्व गोष्टी लागू पडतात. एक घटना दुसरीच्या पूर्वी घडली असा आपल्याला साक्षात अनुभव येऊ शकतो. ‘अ’ आणि ‘ब’ ह्यांमध्ये जे कालांतर आहे, त्यापेक्षा ‘अ’ आणि ‘क’ ह्यांमध्ये अधिक कालांतर आहे, असे आपण म्हणू शकतो. तसेच ‘अ’ ही घटना ज्या कालावधीत घडून आली – उदा., एक तास – त्याच्या एवढेच ‘ब’ आणि ‘क’ ह्या घटंनातील कालांतर आहे, असे आपण म्हणू शकतो. अखेरीस, विस्तार अंगी असले ल्या वस्तू आणि त्यांमधील अंतर हा संबंध ह्याचे विश्लेषण करून जेव्हा आपण बिंदूशी पोहोचतो, तेव्हा ह्या सर्व बिंदूना एकाच त्रिमितीय मालिकेत सामावून घेता येते असे आपण मानतो. त्याचप्रमाणे कालावधी हा धर्म अंगी असलेल्या घटना आणि त्यांतील कालांतर हा संबंध, ह्यांचे विश्लेषण करुन जेव्हा आपण क्षणांशी पोहोचतो, तेव्हा ह्या सर्व क्षणांना एकाच मालिकेतून सामावून घेता येते, असे आपण मानतो. मात्र क्षणांची ही मालिका त्रिमितीय नसते, तर ती एकमितीयच असते.
अवकाश आणि काल ह्यांच्या घडणीत असलेला मुख्य भेद असा, की काल प्रवाही आहे, असे आपण अनेकदा मानतो. काल भविष्याकडून वाहत येतो, क्षणभर वर्तमान म्हणून नांदतो आणि मग भूताला जाऊन मिळतो असे भासते. किंवा भावी घटनांचे वर्तमान घटनांत रूपातंर होते आणि वर्तमान घटनांचे भूत घटनात रूपांतर होते असे भासते. हीच गोष्ट वेगळ्या रीतीने मांडायची, तर असे म्हणता येईल, की अवकाशाचे वेगवेगळे भाग एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्यांना सहास्तित्व असते पण कालाचा कोणताही विभाग आपण घेतला, तर त्याच्या घटकांना सहास्तित्व नसते, त्याचे काही घटक भूत असतात व काही भविष्य असतात. ह्यामुळे भविष्य, वर्तमान आणि भूत असे कालाचे आवश्यकतेने भेद पडतात. अवकाशाचे असे भेद पडत नाहीत.
काल ही संकल्पनाच अंतर्विरोधी आहे. कालाचे वर्णन आपण करू गेलो, तर परस्परविरोधी विधाने करावी लागतात. म्हणून काल हा केवळ आभास आहे. काल हा वास्तव विश्वांचा धर्म किंवा अंग नाही, असे अनेक तत्ववेत्त्यांनी, उदा., इमॅन्युएल कांट (१७२४—१८०४), जॉन मॅक्टॅगर्ट (१८६६—१९२५), म्हटले आहे. ह्याविषयी दोन गोष्टी नमूद करता येतील : (१) ज्याला आपण कालाचा प्राथमिक अनुभव असे म्हटले आहे, त्यामध्ये काही कालावधीत घडणाऱ्या घटना आणि त्यांच्यामधील किंवा त्यांच्या विभागांमधील पूर्वी–नतंर हे कालिक संबंध, ह्यांचा आपल्याला साक्षात प्रत्यय येतो. तेव्हा कालावधी, कालिक संबंध ह्या गोष्टीच आत्मव्याघाती असल्यामुळे, त्या असणे शक्य आहे, असे म्हणता येणार नाही. जे आत्मव्याघाती आहे, ते असू शकत नाही व म्हणून भासूही शकत नाही. त्यामुळे फारतर आपली कालाची जी संकल्पना आहे, त्या कालिक विशेषणांचे आपण जे वर्णन करतो, ते आत्मव्याघाती आहे असे म्हणता येईल. पण असे असेल, तर ही संकल्पना, हे वर्णन बदलावे लागेल. (२) कालाविषयी ज्या अडचणी उपस्थित करण्यात आल्या आहेत, त्या प्रामुख्याने कालाचे प्रवाहित्व, कालाची अनंतता व सातत्य ह्यांतून उद्भवल्या आहेत.उदा., प्रत्येक घटना भविष्य, वर्तमान व भूत असते आणि हे परस्परविरोधी गुणधर्म आहेत ह्या विरोधाचे निरसन करायचे, तर कालाच्या वेगवेगळ्या क्षणांच्या दृष्टीने तीच घटना भविष्य,वर्तमान व भूत असते असे म्हणावे लागते. पण कालाचा प्रत्येक क्षणही भविष्य, वर्तमान व भूत असतो. ह्यात अनुस्यूत असलेल्या व्याघाताचे निरसन करण्यासाठी दुसरा काल कल्पावा लागतो व त्यातील वेगळ्या क्षणांच्या दृष्टीने पहिल्या कालातील प्रत्येक क्षण भविष्य, वर्तमान व भूत असतो असे मानावे लागते. पण दुसऱ्या कालाविषयी हाच प्रश्न उपस्थित होतो व अनवस्था प्रसंग ओढवतो. पण या युक्तिवादाने एवढेच सिद्ध होते, की काल प्रवाही आहे आणि भविष्य, वर्तमान व भूत हे कालाचे आवश्यक असे धर्म आहेत, असे मानणे गैर आहे. वाहण्यासारखी कोणतीही प्रक्रिया कालात घडून येते पण कालच जर वाहत असेल, तर त्याचे हे वाहणे ज्याच्यात घडून येते, असा दुसरा काल कल्पावा लागतो व ह्या मार्गाने अनवस्था प्रसंग अटळ ठरतो. तेव्हा काल वाहत नाही, भविष्यकालाचे भूतकालात परिवर्तन होत नाही, काल बदलत नाही, वस्तू कालात बदलतात, ‘भविष्य’, ‘भूत’, ‘वर्तमान’ ‘आता’ इ. शब्द आत्मलक्षी (टोकन रिफ्लेक्सिव्ह) आहेत म्हणजे ज्या वाक्यात ते वापरलेले असतात, ती वाक्ये स्वतःचा निर्देश करीत असतात. उदा.,‘क्ष ही भविष्यकालीन घटना आहे’, ह्याचा अर्थ “ज्या क्षणी ‘क्ष’ ही भविष्यकालीन घटना आहे ’, हे वाक्य उच्चारले आहे, त्या क्षणानंतरच्या कोणत्यातरी क्षणी ‘क्ष’ही घटना घडते”, असा आहे. तेव्हा क्षण आणि त्यांच्यातील पूर्वी–नंतर हे संबंध कालाचे आवश्यक घटक आहेत पण भविष्य -वर्तमान-भूत हे संबंध कालाला आवश्यक नाहीत.
कालाविषयीच्या इतर काही अडचणी कालचे अनंतत्व (इन्फिनिटी) व सातत्य (कन्स्टिन्यूइटी) ह्यांच्याशी संबंधित आहेत. उदा., झीनोने (इ.स.पू.सु.४९०—४३० ) व काटंने उपस्थित केलेल्या काही अडचणींचे स्वरूप असे आहे. कांटचा एक युक्तिवाद असा : कालाला सुरुवात झाली असली पाहिजे कारण कालाला सुरुवात झालेली नसेल, तर आतापर्यंत अनंत काल लोटून गेला असला पाहिजे. पण अनंत काल लोटून जाणे अशक्य आहे. तेव्हा कालाला सुरुवात झाली असली पाहिजे. ह्या युक्तिवादात अर्थात काल वाहतो, असे अभिप्रेत आहे आणि अनंत अंतर असे वाहत येऊन प्रत्यक्षात क्रमिले जाणे अशक्य आहे, असा मुद्दा माडंला आहे. कालाच्या प्रवाहित्वाचा मुद्दा गैर म्हणून सोडून दिला, तर आतापर्यंतचा काल अनंत आहे, ही अडचण उरते. पण आपण एक तास किंवा एक मिनिट एवढा कालावधी घेतला, तर त्याच्यातही अनंत क्षण असतात. कालाच्या सातत्यामुळे हे निष्पन्न होते. सातत्य आणि अनंतत्व ह्या व्यापक गणिती संकल्पना आहेत आणि कालाप्रमाणे अवकाश, संख्या इत्यादिकांनाही त्या लागू पडतात. ह्या संकल्पना मूलतःच आत्मव्याघाती आहेत, असे एके काळी मानले जात असे पण डेडेकिंट (१८३१—१९१६) व गेओर्क कॅंटर (१८४५—१९१८) ह्यांनी त्यांचे जे स्पष्टीकरण व विश्लेषण केले आहे, त्यामुळे त्यांत भासत असलेल्या व्याघातांचे निराकरण झाले आहे. हयामुळे कालाचीही ह्या शंकित व्याघातापासून मुक्तता झाली आहे.
त्रिमितीय अवकाश आणि त्याहून भिन्न व स्वतंत्र अशी काल ही मिती ह्यांची मिळून भौतिक विश्वाची चौकट होते, असे आपण व्यवहारात मानतो आणि सापेक्षता सिद्धांतापूर्वी भौतिकीतही असेच मानले जात होते. पण सापेक्षता सिद्धांताप्रमाणे अवकाश-काल अशी भौतिक विश्वाची चतुर्मितीय चौकट आहे, असे मानायला कारणे कोणती व असे मानण्यापासून कोणते परिणाम निष्पन्न होतात, ह्यांविषयीचे विवेचन सापेक्षता सिध्दांतात केले जाते [→ सापेक्षता सिध्दांत].
ऐतिहासिक समालोचन: पाश्चात्त्य विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांच्या इतिहासाकडे पाहिले, तर प्राचीन ग्रीक तत्ववेत्त्यांनी कालासंबंधी फारसा विचार केलेला दिसत नाही. असा विचार आधुनिक काळात गतिकी ह्या विज्ञानशाखेचा उदय होताना आणि घडून आल्यानंतरच झाला आहे. झीनो यांच्या प्रसिद्ध विरोधापत्तीमुळे परिवर्तन आणि सातत्य ह्या संकल्पनांवर प्रकाश पडतो. प्लेटोच्या (इ.स.पू.सु.४२८—३४७) मताप्रमाणे सत्-सामान्ये (आयडियाज) बुध्दिग्राह्य व नित्य असतात. दृश्य जगत सत्-सामान्यांच्या स्वरूपाचे अनुकरण करते पण ते नित्य असू शकत नसल्याने, ईश्वराने दृश्य जगतासाठी चिरंतनाची ‘चलत प्रतिमा’ निर्माण केली आणि ती म्हणजे काल. आधुनिक काळात गतिकीचा विकास होऊ लागल्यावर, कालाचे स्वरूप स्पष्ट करणे भाग झाले. न्यूटनने निरपेक्ष, ‘खराखुरा गणिती काल’ स्वतः होऊन व स्वतःच्या प्रकृतीनुसार इतर वस्तूंच्या संबंधात पाहता समगतीने वाहत असतो, असा सिध्दांत कालाविषयी मांडला. पण निरपेक्ष काल असे काही नसून, घटनांमधील परस्परसंबंधाचे वर्णन करण्यासाठी कालिक संकल्पना वापराव्या लागतात, असे प्रतिपादन केले. काल सापेक्ष आहे, ही भूमिका लायप्निट्सने स्वीकारली. आधुनिक सापेक्षता सिद्धातांने ह्या दोन भूमिकांमधील वाद संपुष्टात आणला.
कांट ह्या तत्त्ववेत्त्यानेही कालाविषयी विशेष विचार केला आहे. कांटच्या म्हणण्याप्रमाणे अवकाशाप्रमाणे काल हाही मानव संवेदनशीलतेचा (सेन्सिबिलिटी ) एक पूर्वप्राप्त आकार आहे. म्हणजे आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदना, अपरिहार्यपणे कालाच्या चौकटीत प्राप्त होतात. आपण कालाचे विश्लेषण करतो, तेव्हा अवकाशाप्रमाणेच कालासंबंधीही परस्परविरोधी विधाने सिद्ध होतात असे दिसून येते आणि यावरूनही काल अशी वस्तू नाही किंवा तो वस्तूंचा स्वतःचा धर्म नाही, हे सिद्ध होते. डेडेकिंट व कॅंटर ह्यांच्या संशोधनामुळे ह्या व्याघातांचे निराकरण झाले हे आपण पाहिले. सापेक्षता सिद्धांताने कालाविषयीच्या विचाराला जी क्रांतीकारक कलाटणी मिळाली, तिचे अध्वर्यू म्हणजे ⇨ॲल्बर्ट आइन्स्टाइन (१८७९—१९५५), हेरमान मिंकोव्हस्की (१८६४—१९०९), ⇨ए.एन्.व्हाइटहेड इ. व्यक्ती होत. अलीकडच्या काळात आपल्या तत्त्वज्ञानात कालाला विशेष महत्त्व दिलेला तत्त्ववेत्ता म्हणजे ⇨आंरी बेर्गसाँ (१८५९—१९४१) होय. बेर्गसाँच्या मताप्रमाणे काल ही पूर्वी–नंतर ह्या संबंधाने संबंधित झालेल्या क्षणांची मालिका आहे, असे मानणे म्हणजे, कालाचे स्वरूप,अवकाशाच्या धर्तीवर कल्पिणे, त्याचे ‘अवकाशीकरण’करणे होय. तर्काने कालाचे स्वरूप आपण समजून घ्यायला गेलो, तर असे घडणे अपरिहार्य असते पण कालाचे सार त्याच्या ‘टिकण्यात’, भूतकालातील सारे अस्तित्व एकवटून नवनिर्मिती करण्यात असते. तेव्हा काल म्हणजेच निर्मितीशील असलेले सत्तत्त्व, तर्काने जाणता येत नाही ते त्याच्याशी एकरूप होऊन प्रातिभज्ञानानेच जाणता येते. पण बेर्गसाँचे हे मत कालापेक्षाही वास्तवतेच्या स्वरूपाविषयीचे आहे.
रेगे,मे.पुं
भारतीय तत्त्वज्ञानातील काल संकल्पना: काल म्हणजे काय, यासंबंधी तात्त्विक विचार कणाद महर्षींच्या वैशेषिक दर्शनातच प्रथम व मुख्यतः झाला आहे. कालत्रयाचा विचार न्यायदर्शनात मांडला आहे. यांशिवाय पूर्वमीमांसा दर्शन व जैन दर्शन यांतही कालविषयक विचार आलेला आहे. पंरतु वैशेषिक दर्शनातील काल विचाराचा मागोवा घेतच इतर दर्शने कालसमर्थन किंवा कालखंडन करतात. न्याय–वैशेषिक दर्शनांतील कालचर्चा पुढीलप्रमाणे आहे :
एकाच काली असलेले यज्ञदत्त व देवदत्त यांच्यापैकी यज्ञदत्त हा वयाने लहान (अपर) आणि देवदत्त हा वयाने मोठा ( पर) असे आपण म्हणतो किंवा सगळे बगळे एकदम (युगपत् ) उडतात असे आपण म्हणतो घर बांधावयास उशीर (चिर ) लागतो घट शीघ्र (क्षिप्र) तयार होतो इ. उदाहरणातील परत्व व अपरत्व (वृद्धत्व व तारुण्य, यौगपद्य, चिरत्व-शीघ्रत्व इ. धर्म ) ही कालाची लिंगे म्हणजे ज्ञापक आहेत. म्हणजे या धर्मांवरून कालद्रव्याचे अस्तित्व सिद्ध होते. माणसाला काल दिसतच नाही. घड्याळातील काटे दिसतात, खुणा दिसतात, काट्यांची गती दिसते. म्हणजे दृश्य द्रव्ये, गुण व क्रिया दिसतात पण काल म्हणून वेगळा दिसतच नाही. परंतु तो अनुमानाने सर्वच माणसांना गवसतो सर्वच जण काल मोजतात.
वैशेषिक दर्शनाप्रमाणे काल हे नऊ द्रव्यांपैकी एक पृथक् द्रव्य आहे. प्रत्येक अनित्य किंवा जन्य पदार्थाला वय असते. वय हा अशा पदार्थांचा गुण आहे. या वयाचे दोन प्रकार : ज्येष्ठत्व व कनिष्ठत्व म्हणजेच परत्व आणि अपरत्व हे दोन गुण होत. हे गुण आपण एकाच काळी असलेल्या पदार्थांमध्ये तुलना केल्यांनतर पाहतो. माणसे, पशू, वनस्पती,खडक इत्यादिंकाचे परत्व व अपरत्व किंवा ज्येष्ठ-कनिष्ठभाव आपण तुलनेने ठरवितो. तुलना न करता ज्येष्ठ-कनिष्ठभाव ठरविता येत नाही. वस्तूचा रंग, आकार, शीतोष्ण स्पर्श, गंध हे आपणास लगेच प्रत्यक्ष प्रत्ययास येतात. तसे पाहिल्याबरोबर वय दिसत नाही. तुलना करावी लागते. ही तुलना म्हणजेच ‘अपेक्षाबुध्दी’. हा पारिभाषिक शब्द आहे. मराठीत याला ‘सापेक्षतेने केलेला विचार’ असे म्हणतात. अपेक्षाबुध्दीस स्मृतीचे साहाय्य लागते. ज्येष्ठत्व-कनिष्ठत्व ठरविताना आपण तीन पदार्थांची तुलना करतो. पहिला पदार्थ दिवस. म्हणजे सूर्याचा परिस्पंद किंवा अहोरात्र होणारी पृथ्वीभोवतालची फेरी. ऋग्वेदकाली दिवसादी कालगणना सूर्यगतीवरुन करीत व वर्षातील ऋतुचक्र सूर्याधीन आहे, हे वैदिक लोकांना समजले होते. म्हणून सूर्य हा काल म्हणजे ऋतुचक्र अथवा संवत्सर आहे, असे ते मानीत. मैत्रायणी उपनिषदात, सूर्यावाचून काल नाही. कालाची योनी म्हणजे कारण सूर्य आहे, असे म्हटले आहे. दुसरा पदार्थ देवदत्त व तिसरा पदार्थ यज्ञदत्त. सूर्याचे पृथ्वीभेवतालचे फेरे मोजावे लागतात मोजण्यास स्मरण कारण होय. यज्ञदत्तहा देवदत्तापेक्षा कनिष्ठ आहे म्हणजे देवदत्ताच्या जन्मापासून आतापर्यंत सूर्याचे जितके फेरे झाले, त्याच्यापेक्षा यज्ञदत्ताच्या जन्मापासून सूर्याचे फेरे कमी झाले. फेऱ्यांची अल्पतर व बहुतर संख्या ठरविण्यास प्रत्येक फेरी लक्षात ठेवावी लागते. सूर्याचे परिस्पंद आणि यज्ञदत्त किंवा देवदत्त यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध आहे.‘यज्ञदत्त २५ वर्षांचा व देवदत्त ४० वर्षांचा’ या ज्ञानात २५ वर्षे अल्पतर संख्येचे सूर्य परिस्पंद व ४० वर्षांचा म्हणजे बहुतर संख्येचे सूर्यपरिस्पंद यांची यज्ञदत्त व देवदत्त यांच्या पिंडाशी सांगड स्मरणद्वारा घातलेली दिसते ही सांगड घालणारा हा संबंध होय. हा संबंध असल्यामुळे आपण सुर्याच्या फेऱ्यावरुन पिंडांचे ज्येष्ठत्व किंवा कनिष्ठत्व ठरवितो. हा संबंध म्हणजे संयोग नव्हे. कारण परिस्पंद हा सूर्यात समवायाने राहतो. परिस्पंद ही क्रिया आहे. क्रिया ही द्रव्यात समवाय संबंधाने राहते. यज्ञदत्त व देवदत्त यांचा सूर्याशीही संयोग नाही. किरणांच्या द्वारे यज्ञदत्त-देवदत्ताशी सूर्याचा संयोग रात्री नसतो. रात्र धरूनच आपण २४ तासांचा दिवस ठरवितो व ज्येष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवितो. आकाशतील नक्षत्रे किंवा नक्षत्राच्या राशी यांचाही, सूर्यगतीशी तुलना करून कालमान ठरवीत असताना, ज्योतिषशास्त्रज्ञ विचार करतात पंरतु त्यांचाही सूर्याशी संयोग नसतो. तेव्हा सूर्य आणि पिंड यांच्यामध्ये समवाय किंवा संयोग हे संबंध सोडून दुसरा कोणता तरी संबंध कल्पिला पाहिजे. सूर्यपरिस्पंद हा सूर्यामध्ये आहे. सूर्याशी यज्ञदत्त आणि देवदत्त यांना संबद्ध करणारे काहीतरी तत्त्व असले पाहिजे. ते तत्त्व म्हणजेच काल होय. सूर्याशी संयुक्त असलेल्या कालाचा यज्ञदत्त किंवा देवदत्त यांच्या पिंडाशी संयोग आहे म्हणूनच पंरपरेने सूर्यपरिस्पंद हा या पिंडाशी संबंद्ध होतो. या पंरपरासंबंधामुळे ज्येष्ठत्व-कनिष्ठत्व म्हणजेच परत्व व अपरत्व हे गुण अनित्य किंवा जन्य द्रव्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. हा संयोग परत्वापरत्वाचे असमवायी कारण, पिंड समवायी कारण व अपेक्षाबुद्धी हे निमित्त कारण होय. परिस्पंद ही क्रिया आहे. या क्रियेला यज्ञदत्त-देवदत्त यांच्या पिंडांशी जुळवणारे म्हणजे उपनायक कालद्रव्य आहे म्हणजे कालद्रव्य हे क्रियोपनायक आहे.
सूर्यपरिस्पंद म्हणजे सूर्याची पृथ्वीभोवतालची एक फेरी पूर्ण झाली, म्हणजे एक दिवस होतो असे तीस दिवस म्हणजे एक मास असे बारा मास म्हणजे एक वर्ष. दिवस-मास-वर्ष इ. कालगणनेत क्रम हा गृहीत धरलेला असतो. सर्वच प्रकारच्या कालगणनेत क्रम हा अपरिहार्यपणे गृहीत धरलेला असतो. या क्रमामध्ये क्रियेचा क्रम हा सर्वांत महत्त्वाचा असतो. वस्तूला एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पोहोचविणारा क्रिया हा वस्तूचा धर्म होय. प्रदेश म्हणजे देश. क्रियाभेदाने कालाचे भेद पडतात. अत्यंत सूक्ष्म असे कालाचे क्रमिक तुकडे एकेका क्रियेने ठरतात. एका क्रियेने सर्वांत लहान एक कालखंड पुरा होतो. त्यास क्षण म्हणतात. सर्वांत सूक्ष्मद्रव्य परमाणू होय एका परमाणूमध्ये क्रिया उत्पन्न होऊन तो परमाणू जेवढा देश व्यापतो, तेवढ्या देशातून तेवढ्याच अत्यंत लगतच्या दुसऱ्या देशाकडे क्रियेमुळे प्रवास करतो. अगदी लगतच्या देशाकडे जाताना परमाणूला पहिल्या अवरुद्ध नभोदेशाचा म्हणजे आकाश प्रदेशाचा त्याग करण्यास जेवढा काल लागतो, तो सर्वात लहान काल होय. यास क्षण म्हणतात. क्षण,लव, निमेष, काष्ठा, कला, मुहूर्त, प्रहर, दिवस, मास, वर्ष, युग इ. दीर्घ, दीर्घतर अशा वाढत्या परिमाणात प्राचीन भारतीयांनी कालगणना केली आहे. दोन क्षण म्हणजे लव, दोन लव म्हणजे निमेष, १५ निमेष म्हणजे काष्ठा, ३० काष्ठा म्हणजे कला, ३० कला म्हणजे मुहूर्त, ३० मुहूर्त म्हणजे दिवस अशा रीतीने वाढते कालखंड प्राचीनांनी म्हणजे (वैशेषिक दर्शन, व्योमशिवाचार्य) मोजले आहेत. सगळे कालखंड म्हणजे लहानमोठे क्रमिक क्षणसमुदायच होत. क्षणादी कालगणना ही मुख्यतः क्रिया ह्या एककावर आधारलेली आहे. एका क्रियेचा अवधी क्षण होय. अणुक्रिया हा सर्वांत लहान एकक होय. त्याचेही चार भाग काही वैशेषिकांनी पाडलेले आहेत. कालाचे विभाग ज्याच्या योगाने पडतात त्यास उपाधी म्हणतात. क्रिया हा कालाचे विभाग पाडणारा सुप्रसिद्ध उपाधी होय.
भूत, भविष्य व वर्तमान हे तीन काल क्रियापदाने दर्शविलेले असतात. वर्तमान म्हणजे कोणतीही वस्तू अस्तित्वात जेवढ्या कालखंडात असते, तो त्या वस्तूचा वर्तमानकाल होय. म्हणजे अस्तित्वात आलेल्या वस्तूमुळे उत्पत्तीपासून तिचा विनाश होईपर्यंत जी कालाला मर्यादा पडते, त्या मर्यादित कालाला वर्तमानकाल म्हणतात. वर्तमानकाल प्रथम कळतो. त्यावरून भूत व भविष्य यांचे अनुमान होते.‘घटः भविष्यति’। (घट होईल) या वाक्यात घटाचा भविष्यकाल दर्शविला आहे. घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी घटाचा जो अभाव ‘प्रागभाव’ असतो, तो कालाचा अपाधी होय. त्याच्या अपेक्षेने घटकाल हा भविष्यकाल होय. ‘घटः आसीत्’। (घट होता) घटाच्या नाशाचा हा काल असतो त्याच्या अपेक्षेने घटकाल हा भूतकाळ आहे. हे ठरविण्यास घटाच्या वर्तमानकालाचे स्मरण लागते. सर्वच उत्पन्न होऊन नष्ट होणारी किंवा उत्पन्न होणारी वा नष्ट होणारी कार्ये वा पदार्थ हे कालाचे म्हणजे भूत,भविष्य व वर्तमान असे कालभेद किंवा कालखंड दर्शित करतात.‘घटः अस्ति् ,भविष्यति वा आसीत्’ असा निर्देश एकाच घटकालाबद्दल होतो. म्हणजे एकच घटकाल हा वर्तमान,भविष्य आणि भूत म्हटला जातो त्यामुळे विसंगती प्राप्त होते. पंरतु घटाच्या अपेक्षेने घटकाल वर्तमान होय प्रागभावाच्या अपेक्षेने घटकाल भविष्य होय व नाशाच्या अपेक्षेने भूत होय म्हणून विसंगतीचा दोष येत नाही.
काल दोन प्रकारचा : महाकाल व खंडकाल. क्षण, लव,निमेष, काष्ठा, मुहूर्त, दिवस, मास इ. खंडकाल होत. काल हा सर्वच जन्य पदार्थांना व्यापणारा आहे वैशेषिकांच्या परिभाषेत सर्व जन्य द्रव्यांशी तो संयुक्त आहे. या दृष्टीने काल हा ‘विभु’ आहे. या विभू कालालाच महाकाल म्हणतात. ‘महावर्तमान’ असेही यास म्हणता येईल. प्रत्येक जन्य पदार्थ हा कालोपाधी आहे. त्याने खंडकाल ठरतो.
सर्व जन्य पदार्थांचे काल एक साधारण कारण आहे. उदा., मोगरा हा वसंत व ग्रीष्म या ऋतूंमध्ये संध्याकाळी फुलतो आंब्याला मोहोर वसंत ऋतूत येतो नऊ महिन्यांनी मानवी बालक जन्म घेते फुले, फळे, धान्य, अनेक प्रकारचे प्राणी वा सर्व जन्य पदार्थ विशिष्ट काळीच उत्पन्न होतात म्हणून काल हा जन्यांचा जनक होय असे सिद्ध होते.
सर्व जन्य पदार्थ विशेषतः सूर्यादिकांच्या क्रिया हे कालोपाधी होत असे न मानता, सर्व जन्य पदार्थ किंवा क्रिया, विशेषतः सूर्यादी आकाशस्थ गोलांच्या क्रिया, यांनाच काल असे का म्हणू नये ? या आक्षेपावर उदयनाचार्यांनी किरणावलि या प्रशस्तपादभाष्यावरील टीकेत असे उत्तर दिले आहे, की ‘जेव्हा भारतवर्षात मध्यान्ह असतो तेव्हा उत्तर कुरूत मध्यरा़त्र असते’ असे आपण म्हणतो, त्यास मध्यान्ह व मध्यरात्र या उपाधींशिवाय निराळा ‘जेव्हा’ ‘तेव्हा’ हा निर्देश करतो त्यावरुन ‘काल’ हा उपाधीहून भिन्न आहे असे सिद्ध होते.
काल म्हणून निराळे तत्त्व वा द्रव्य मानण्याची जरूरी नाही, असा विचार सांख्य तत्त्वज्ञानात मानला आहे. मूळ प्रकृती हे सर्व जन्य पदार्थांचे तत्त्व आहे, त्याच्यात क्रमाने विकार किंवा परिणाम उत्पन्न होतात हे विकार किंवा परिणामच कालभेद होत, असे सांख्यांचे मत वाचस्पती मिश्रांनी सांख्यकारिकेच्या टीकेत (कारिका ३३ ) मांडले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान सांगते, की क्षण वा क्षणपंरपरा हाच काल होय आणि क्षण म्हणजे प्रत्येक उत्पन्न होणारी भाववस्तू. प्रत्येक वस्तू ही क्षणिकच असते. जैनांनी काल हे एकमितियुक्त स्वंतत्र द्रव्य मानले आहे. कारण ते घटादिकांप्रमाणे प्रदेश व्यापत नाही. द्रव्यांमध्ये जे क्रमाने बदल होतात म्हणजे पर्याय उत्पन्न होतात, त्यांचे नियामक म्हणून काल हे द्रव्य जैनांनी मानले आहे. नव्यनैयायिक रघुनाथ शिरोमणीने क्षण म्हणून स्वतंत्रच द्रव्य व महाकाल ईश्वरच होय असे मानले आहे. महाकाल म्हणून निराळे द्रव्य मानू नये, असे त्याने पदार्थतत्त्वनिरूपण या ग्रंथात म्हटले आहे.
जगात जे जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांचा काल हा एक आधार आहे, असे वैशेषिक मानतात. कालाचा व जगताचा जो आधारधेयभावनियामक संबंध आहे, तो स्वरूपसंबंध आहे. संयोगसमवाय यांच्यासारखा तो अतिरिक्त संबंध नाही.
वैशेषिकांच्या मते काल हा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. परत्वापरत्व या गुणांवरून त्याचे अनुमान होते. पंरतु वैशेषिक दर्शनाचे काही पंडित व न्यायसूत्रभाष्यकार वात्सायन यांनी त्याचप्रमाणे पूर्वमीमांसकानी काल हा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे असे म्हटले आहे. वर्तमान दृश्य द्रव्यांचे सहांपैकी कोणत्याही इंद्रियाने प्रत्यक्ष ज्ञान होत असतानाच कालाचे भान होते. घट ही वस्तू विद्यमान असताना तिच्या प्रत्यक्ष ज्ञानातच कालाचा प्रत्यय येतो. त्याचाच ‘आता घट आहे’, ‘आता यज्ञदत्त आहे’ इ. निर्देश आपण करतो. भूत आणि भविष्य यांचे अनुमान वर्तमानावरूनच होते. काल हा दृश्य पदार्थ विशेषतः दृश्य क्रियासंतान यांनी व्यक्त होतो. क्रियासंतान ह्या उपाधीमुळे काल हा एक प्रवाह आहे किंवा काल प्रवाही आहे, असे लक्षात येते. ‘देवदत्त तांदूळ शिजवत आहेत’, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा जळण पेटविणे, तांदुळाचे आधण ठेवणे आणि तांदुळामध्ये बदल होऊन त्याचा खाद्य असा भात होणे, हा सर्व क्रियासंतान वर्तमानकालाचा सूचक असतो. वैशेषिक दर्शनकार काल केवळ अनुमेय आहे असे मानीत असले, तरी या अनुमानाची नित्य सवय झाल्यामुळे ‘आता घट आहे’ या प्रत्यक्षामध्येही कालाचे भान होते. यास उपनीतभान किंवा ज्ञानलक्षणासंनिकर्षजन्य अलौकिक प्रत्यक्ष म्हणतात.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
संदर्भ : 1. Bergson, Henri, Time and Free Will, New York, 1910.
2.Bhaduri, Sadananda, Studies in Nyaya-Vaisesika Metaphysics, Poona, 1947.
3.Cleugh, M.F. Time and its Importance for Modern Thought, London, 1937.
4.Dasgupta, S.N. History of Indian Philosophy, Vol. I, Cambridge, 1922.
5.Eddington, A.S. Space, Time and Gravitation, Cambridge, 1920.
6.Grunbaum, Adolf, Philosophical Problems of Space and TIme, New York, 1963.
7.Mc-Taggart, John, The Nature of Existence, 2 Vols., Cambridge, 1921, 1927.
8. Reichenbach, Hans, The Direction of Time, Berkeley, 1957.
9. Reichenbach, Hans, The Philosophy of Space and Time, New York, 1958.
10.Smart, J.J.C., Ed., Problems of Space and Time, New York, 1964.
११. उदयनाचार्य, किरणावलि, एशियाटिक सोसायटी प्रत, कलकत्ता, १९५६.
१२.पार्थसारथीमिश्र, शास्त्रदीपिका, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९१५.
१३.वाचस्पतिमिश्र, सांख्यतत्त्वकौमुदी, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९४०.
१४.वात्सायन, न्यायभाष्यम्, गुजरात प्रिटिंग प्रेस, मुंबई.
१५.व्योमशिवाचार्य, वैशेषिकदर्शने प्रशस्तपादभाष्यं व्योमवतीसमन्वितम्, चौखंबा, प्रत वाराणसी, १९२४.
“