कपिलवस्तु : बौद्धकालीन शाक्य जनपदाची राजधानी आणि गौतम बुद्धाचे जन्मस्थान. तिलौरकोट हे याचे आधुनिक नाव असावे. हे नेपाळ तराईतील तौलिहवा ठाण्यापासून ३⋅२ किमी. वर आहे. हे कपिलऋषींच्या आश्रमाजवळ असल्यामुळे याला कपिलवस्तु नाव प्राप्त झाल्याचे वर्णन बौद्ध साहित्यात असून याची कपिलवस्तु, कपिलाह्वयपुर, कपिलवथ्थु, कपिलास्यवस्तु व कि-पिलो-फ-स-तु इ. नामांतरे आढळतात. बौद्धकाली या नगराचा विस्तार चित्रदेइ, रामघाट, संदवा व तिलौर या गावांपर्यंत झालेला असला, तरी शाक्य राजा शुद्धोदनाचा राजवाडा व किल्ला मात्र तिलौरकोट येथेच होता असे मानले जाते. कपिलवस्तूच्या परिसरातच बुद्धजन्मस्थान लुंबिनीवन, कनकमुनिआश्रम, पिप्रावा व सगर्वा ही प्राचीन स्थळे आणि अनोमा नदी होती. त्याकाळी कपिलवस्तूला धार्मिक व राजकीय महत्त्व तर होतेच, परंतु ते राजगृह-प्रतिष्ठान या व्यापारी राजमार्गाशी जोडल्यामुळे त्याला व्यापारी महत्त्वही प्राप्त झाले होते. नगराभोवती सात तट उभे असून त्याला चार प्रवेशद्वारे होती. नगराच्या आतील भागात आखीव रस्ते, प्रशस्त उद्याने व उत्तम प्रकारची वैभवशाली बाजारपेठ होती. नगरात जागोजागी असलेले उंच मनोरे व सुशोभित कमानी यांमुळे ते शोभिवंत दिसत असे. हल्ली अवशेषरूपाने तेथील काही वस्तू अस्तित्वात असून त्या बहुतेक बौद्धजीवनाशी संबंधित अशाच आहेत. अर्थात या सर्व बुद्धाच्या उत्तर कालातीलच आहेत.

जोशी,चंद्रहास