कार्नोटाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी आणि (001) ला समांतर पातळ टिकलीसारखे [→स्फटिकविज्ञान] . सामान्यपणे बारीक भुकटीच्या किंवा सूक्ष्म स्फटिकमय भुसभुशीत डिखळांच्या, कधीकधी संहत, क्वचित पुटांच्या किंवा विकीर्ण (विखुरलेल्या) स्वरूपात आढळते. पाटन : (001) स्पष्ट [→पाटन]. कठिनता सु.२. वि.गु. ४–५. रंग भडक ते हिरवट पिवळा. चमक मातीसारखी मंद. अगलनीय (वितळण्यास कठीण). अम्लात विद्राव्य. रा.सं.स्थूलमानाने K2(UO2)2(VO4)2.3H2O. वातावरणातील आर्द्रतेनुसार पाण्याचे एक ते तीन रेणू असतात. कॅल्शियम, बेरियम, मॅग्नेशियम, लोह आणि सोडियम हे अल्प प्रमाणात असतात. हे द्वितीयक खनिज युरेनियम किंवा व्हॅनेडियम यांनी युक्त खनिजांवर भूमिजलाची विक्रिया होऊन तयार झालेले असते. हे खडकात अल्प प्रमाणात असले, तरी खडकाला पिवळा रंग येतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील नेर्ऋत्य कोलोरॅडोमध्ये व त्याच्या लगतच्या उटातील जिल्ह्यांमध्ये याचे मोठे साठे आहेत. त्यांच्यापासून युरेनियम, व्हॅनेडियम व अल्पसे रेडियमही काढतात. रेडियम टेकडी (द.ऑस्ट्रेलिया), कटांगा (झाईरे) व पेनसिल्व्हेनिया येथेही कार्नोटाइट आढळते. त्याचा व्हॅनेडियम आणि युरेनियम यांचे धातुक (ज्यापासून धातू मिळवितात तो खडक) म्हणून उपयोग होतो. फ्रेंच खाणकाम अभियंते व रसायनशास्त्रज्ञ मारी रूडॉल्फ कार्नो यांच्या नावावरून कार्नोटाइट हे नाव पडले आहे.
ठाकूर, अ.ना.