कथाकोश : अपभ्रंश भाषेतील धार्मिक उपदेशपर कथासंग्रह. ग्रंथकार ⇨श्रीचंद्र. ग्रंथरचना अकराव्या शतकात अनहिलपुर (गुजरात) येथे झाली. यात त्रेपन्न संधी (अध्याय) असून प्रत्येक संधीत जैन धर्मातील तत्त्वांचे विवेचन करणारी कथा आहे. प्रत्येक संधीच्या अखेरीस कवीने स्वतःच्या नावाचा निर्देश केला आहे. राजा श्रेणिकासारख्या प्राचीन जैन वाङ्मयात उल्लेखिलेल्या व्यक्ती, राजगृह आणि पाटलीपुत्र यांच्याशी संबद्ध असलेल्या अनेक कथा आहेत. पशुपक्षीसुद्धा या कथांतून पात्रे म्हणून येतात. श्रोत्यांच्या मनावर संसाराचे असारत्व आणि जीविताची क्षणभंगुरता ठसवून त्यांचे ठायी वैराग्य निर्माण करणे व त्यांना धर्माचरणाकडे प्रवृत्त करणे, हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथावर श्रीचंद्राच्या संस्कृत-प्राकृत वाङ्मयाच्या सखोल अभ्यासाची छाप आहे. वंशस्थ, मालिनी, पद्धडिया, समानिका इ. संस्कृत-प्राकृत छंदांचा त्याने सफाईदार उपयोग केला आहे. काही ठिकाणी त्याने संस्कृत छंदांना नवीन रूपही दिले आहे. मध्ययुगीन जैन कथावाङ्मयातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे.
तगारे, ग. वा.