कामाकुरा : जपानच्या होन्शू प्रांतातील कानागावा जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या १,३९,२४९ (१९७०). हे सागामी उपसागरावर योकोहामाच्या दक्षिणेस १९ किमी. आहे. जपानच्या प्रसिद्ध सांस्कृतिक शहरात कामाकुराची गणना असून येथे केंचोजी, एन्याकुजी इ. देवतांची सु. शंभर देवालये दैबुरसू हा तेराव्या शतकातील १३ ‌मी. उंचीचा गौतम बुद्धाचा ब्राँझचा पुतळा सोनेरी वर्खाने मढविलेल्या कापराच्या लाकडाचा ९ मी. उंचीचा कॉनॉन ह्या दयेच्या देवतेचा पुतळा व दुर्मिळ कलावस्तूंची राष्ट्रीय पदार्थसंग्रहालये प्रसिद्ध आहेत. आरोग्यधाम म्हणूनही कामाकुरा विख्यात असून, उन्हाळ्यात येथील पुळण समुद्रस्नानेच्छूंनी गजबजलेली असते. १९२३ सालच्या भूकंपात याची खूप हानी झाली होती.

ओक, द. ह.