कथा : कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे. आधुनिक काळात, म्हणजे गेल्या शतकातच कथेची लघुकथा झाली व आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. एक कथात्मक साहित्याचा प्रकार म्हणून कादंबरी आणि कादंबरिका यांच्याशी लघुकथेचे जवळचे नाते आहे. 

अनेकत्वातून एकत्व व्यक्त करणे, हा जीवनाप्रमाणे सर्वच कलांचा धर्म आहे. तोच कादंबरी व लघुकथा ह्यांतही गोचर होतो. फरक आहे तो केवळ दोहोंतून व्यक्त होणाऱ्या अनेकत्वाच्या प्रमाणात. लघुकथा ज्या अनेकत्वातील एकत्व प्रगट करीत असते, त्याचे प्रमाण कादंबरीमधून व्यक्त होणाऱ्या अनेकत्वापेक्षा स्वाभाविकच कमी असते. हा फरक म्हणजे बिंदू आणि सिंधू ह्यांतील फरकासारखा आहे. कथात्मक साहित्याचे असे अनेक घटक आहेत, की ते ह्या सर्वांना समान आहेत. कादंबरीप्रमाणे कथेला विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांचे बनलेले कथानक असते, ज्यांच्या संदर्भात ह्या घटना घडल्या ती पात्रे असतात, ज्या स्थळी व काळी त्या घडल्या तो स्थळकाळ असतो, त्या घटनांशी संबद्ध अशा भाववृत्तीने निर्माण केलेले एक वातावरण असते, निवेदक कोण, घटनांशी संबंधित असलेली एक व्यक्ती की एक तिऱ्हाईत व्यक्ती, ह्यामुळे अगदी स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदनशैली असते, पात्रांच्या व घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्माण झालेले ताण, संघर्ष, गुंतागुंत ही असतात, त्यांचा उत्कर्षबिंदू असतो आणि कथेच्या शेवटी एका अर्थाने त्यांचा उपशमही होत असतो. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधांतून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोणातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा, अशी लघुकथेची चालचलाऊ व्याख्या करता येते.

प्रत्येक लघुकथेत हे घटक असले, तरी त्यांचे प्रमाण सारखेच नसते. प्रत्येक लघुकथालेखकाची प्रकृती वेगळी व प्रत्येक लघुकथेची प्रकृती वेगळी. एखाद्या कथेत घटनांमधून आकारलेल्या कथानकापेक्षा पात्रांकडेच आपले लक्ष अधिक जाते, तर दुसरीत पात्रांपेक्षा घटनात्मक कथानकच आपल्या डोळ्यांत अधिक भरते. एखादी कथा अशीही असू शकते, की तिच्यात ज्या दृष्टिकोणातून एका घटनावलीचे चित्रण झालेले असते, तो दृष्टिकोणच आपले लक्ष विशेष वेधून घेत असतो. लघुकथा अशी विविध रूपांमधून अवतरत असल्यामुळे वाङ्‌मयाचे जे इतर काही प्रकार आहेत,त्यांच्यापासून ती वेगळी करणे अनेकदा जड जाते. लेखक ज्या दृष्टिकोणातून लेखन करीत असतो, त्यालाच वाचकाच्या दृष्टीने एखाद्या लघुकथेत जेव्हा खूप महत्त्व येत असते, तेव्हा ती अनेकदा निबंध वा ललितनिबंध ह्यांच्याजवळ सरकलेली असते परंतु जोपर्यंत ती एका विशिष्ट कालखंडात एका किंवा अनेक व्यक्तींच्या संबंधात घडलेल्या घटनांचे चित्रण करीत असते, तोपर्यंत तिचे कथात्व अभंगच राहते. लघुकथा म्हणजे केवळ एक प्रसंगचित्र वा घटनाचित्र नव्हे लघुकथा म्हणजे केवळ एक व्यक्तिचित्रही नव्हे आणि लघुकथा म्हणजे केवळ एका घटनावलीचे कालानुक्रमाने केलेले निवेदनही नव्हे. लघुकथेत व्यक्तिचित्रण हे व्यक्तिचित्रणासाठी नसते तसेच प्रसंगचित्रण हेही प्रसंगचित्रणासाठी नसते, तर ह्या सर्व गोष्टी एका जीवनानुभवाला अर्थ देण्यासाठी अवतरत असतात म्हणूनच लघुकथा ही ह्या सर्वांची मिळून बनलेली एक संघटना असते, एक अर्थपूर्ण सुव्यवस्था असते व हे तिचे सुसंघटित, एकात्म, सेंद्रिय, चैतन्यपूर्ण रूप आपणास जाणवत असते. सगळेच वाङ्‌मयप्रकार हे सुसंघटितता व्यक्त करतात,परंतु लघुकथेची सुसंघटना आपल्या डोळ्यांत विशेष भरते याचे कारण हे सर्व तिला अत्यल्प अवकाशात साधावयाचे असते. कथात्म साहित्याला अत्यावश्यक ठरणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण घटकांची अल्पावकाशात साधलेली अर्थपूर्ण संघटना म्हणजे लघुकथा, असे तिच्या संबंधात म्हणावेसे वाटते. कादंबरी किंवा कादंबरिका हिच्यापेक्षा ती वेगळी कशी, ह्या प्रश्नाचा विचार अशाच प्रकारे करावा लागतो. 

अतिप्राचीन साहित्यात आजच्या अर्थाने लघुकथा सापडत नसली, तरी जिची प्रकृती लघुकथेला जवळ आहे, अशी कथा निश्चित आढळते. ऋग्वेदातील यम-यमीसारख्या कथा याचे उत्तम उदाहरण होत. महाभारताच्या कर्णपर्वातील हंसकाकीय आख्यानाची प्रकृती ही लघुकथेची आठवण करून देणारी आहे. हंसकाकीय आख्यानासारख्या कितीतरी कथा महाभारतात आढळण्याजोग्या आहेत. बौद्ध वाङ्‌मयातील अनेक जातककथा ह्या दृष्टीने लक्षात घेण्याजोग्या आहेत. प्राचीन साहित्यातील बृहत्कथासार, कथाकल्पद्रुम, वेतालपंचविंशति यांसारख्या कथासंग्रहांमधील अनेक कथा लघुकथासदृश आहेत. तेराव्या शतकातील महानुभाव साहित्यात दृष्टान्तपाठ ह्या चक्रधरांनी सांगितलेल्या दृष्टान्तांच्या संग्रहाला महत्त्वाचे स्थान आहे. ह्या संग्रहातील अनेक दृष्टान्त म्हणजे लघुत्तम कथाच होत. 

वेदसाहित्याइतकेच ईजिप्तमधील वेस्टकार पपायरीवरील साहित्य प्राचीन होय. ह्या प्राचीन ईजिप्ती साहित्यातही कथाकथनाची अत्यंत लक्षणीय परंपरा आढळते, असे तज्ञांचे मत आहे. त्यातील ‘द टेल्स ऑफ द मॅजिशियन्स’चा उल्लेख वरचेवर येतो. ह्या कथांचा काळ इ. स. पू. ४००० ते ३००० वर्षांचा आहे. ईजिप्ती वाङ्‌मयाप्रमाणे प्राचीन ग्रीक साहित्यातही कथा आहेत आणि ख्रिस्ती धर्मीयांच्या धर्मग्रंथांपैकी ओल्ड टेस्टामेंटमधील रूथ आणि जोन्ससारख्या नाट्यात्म कथा तर सर्वपरिचित आहेत. तेराव्या व चौदाव्या शतकांतील महानुभाव गद्य साहित्याचे समकालीन जे आंग्‍ल साहित्य आहे, त्यांतील चॉसरने (१३४०—१४००) लिहिलेल्या ‘कँटरबरी ’ कथा व त्याच काळात बोकाचीओ (१३१३—१३७५) या इटालियन लेखकाने लिहिलेल्या व देकामेरॉन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संग्रहात उपलब्ध होणाऱ्या कथा ह्या संदर्भात लक्षात घेण्याजोग्या ठरतात.

हे आणि ह्यासारखे इतर भाषांमध्ये आढळणारे साहित्य कथात्म खरे परंतु आपण लघुकथा लिहीत आहोत ह्या जाणिवेने लिहिलेले नव्हे. कथात्म साहित्याच्या महाप्रवाहातून लघुकथा वेगळी होऊ लागली, त्या दिशेने तिची निश्चित पावले पडू लागली, ती एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात. कथात्म साहित्याच्या महासागरातून प्रथम वेगळी निघाली ती कादंबरी आणि तीही अगदी अलीकडे, म्हणजे अठराव्या शतकात. अठराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस तिला तिचे पृथगात्म रूप प्राप्त झाले व तिचा स्वंतत्र संसार थाटला गेला. लघुकथा ही तर त्या मानाने अगदीच अलीकडची. एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये व इंग्‍लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणात नियतकालिकांचा उदय झाला. नियतकालिकांच्या ह्या उदयाबरोबर आणि त्यांच्या वाढत्या खपाबरोबर कमी लांबीच्या कथात्म साहित्याची मागणीही वाढली. नियतकालिकांना कमीत कमी पाने व्यापणाऱ्या कथांची आवश्यकता भासू लागली व त्यांचे संपादक ह्या कथांवर वाचकांच्या उड्या पडत आहेत, हे लक्षात आल्यावर लेखकांना त्यांचा योग्य  मोबदलाही देऊ लागले. ह्यातून अनेक कथा तर जन्माला आल्याच परंतु त्याबरोबरच ह्या लघुकथालेखनाचा गंभीरपणे विचार होण्यास चालना  मिळाली.

लघुकथालेखनाची एकोणिसाव्या शतकात ही जी लाट उसळली, ती जवळजवळ एकाच वेळी चार देशांत. जर्मनीत ई. टी. डब्ल्यू. होफमान या  लेखकाचे लघुकथासंग्रह १८१४ आणि १८२१ च्या दरम्यान प्रसिद्ध झाले. याकोप आणि व्हिल्‌हेल्म ह्या ग्रिम बंधूंच्या परिकथांचे व कहाण्यांचे संग्रह  १८१२ व १८१५ च्या दरम्यान प्रकाशात आले. वॉशिंग्टन अर्व्हिंग (१७८३—१८५९) ह्या अमेरिकन लेखकाचे कथालेखन १८१९-२० ते १८३२ पर्यंत  प्रसिद्ध होत गेले. ह्या काळापर्यंत त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या नथॅन्यल हॉथॉर्न (१८०४—१८६४) आणि एडगर ॲलन पो (१८०९—१८४९) ह्या दोन प्रख्यात अमेरिकन लेखकांनी कथावाङ्मयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेलेच होते. रशियात अलेक्झांडर पुश्किन आणि निकोलाय गोगोल ह्या  दोन महत्त्वाच्या लेखकांनी १८३०-३१ मध्येच लघुकथालेखनाकडे आपली दृष्टी वळवली होती. फ्रान्समध्ये प्रॉस्पेअर मेरीमे (१८०३—१८७०) ह्याने  लघुकथालेखनाचे तंत्र १८२९ मध्येच हस्तगत केले होते व त्याचे समकालीन बाल्झॅक आणि तेऑफील गोत्ये यांनीही त्याच सुमारास लघुकथालेखनात  खूप प्रगती केली होती. अशा प्रकारे जर्मनी, अमेरिका, फ्रान्स व रशिया ह्या चारही देशांमध्ये अगदी एकाएकी एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या  काही दशकांतच लक्षणीय प्रमाणात लघुकथालेखन होऊ लागले व त्यामुळे लघुकथा ह्या वाङ्‌मयप्रकाराच्या स्वतंत्र विकासाची दिशा निश्चित झाली.

ह्या काळातील लघुकथालेखकांमध्ये एडगर ॲलन पो ह्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे याचे कारण पोने केवळ कथालेखन केले नाही,तर लघुकथा ह्या वाङ्‌मयप्रकाराच्या स्वरूपाचे सोपपत्तिक विवेचन करून तिची लक्षणे स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न केला : (१) लघुकथा ही एका  पूर्वनियोजित परिणामाकडे लक्ष देऊन जन्माला आली पाहिजे, (२) ह्या परिणामाच्या दृष्टीने जे जे अनावश्यक, ते ते तिने कटाक्षाने टाळले पाहिजे आणि परिणामाची संपूर्ण एकात्मता साधली पाहिजे आणि (३) ती लघू पाहिजे मात्र इतकी लघू नको, की ज्यामुळे तो पूर्वनियोजित परिणामच साधला जाणार नाही. पोने लघुकथेची ही लक्षणे १८४२ मध्ये म्हणजे लघुकथेच्या उदयकालीच स्पष्ट केली. ह्यानंतरच्या काळात पोने प्रतिपादिलेल्या ह्या लक्षणांवर बरीच टीका झालेली असली व सदर टीकेचा रोख  मुख्यत्वे ही लक्षणे लघुकथेच्या प्रकृतीला व विकासाला जाचक ठरणारी आहेत ह्या मुद्यावर असला, तरी पोच्या विवेचनाचे महत्त्व कमी होत नाही.  लघुकथेची सेंद्रिय एकात्मता, तिची संपूर्णता व स्वयंपूर्णता, तद्वारा व्यक्त होणारा एक अनुभवाकृतिबंध ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे पोच्या विवेचनाने  हळूहळू वाङ्‌मयाभ्यासकांचे व लेखकांचे लक्ष गेले, हे मान्य करावेच लागते.


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लघुकथालेखनाला नवे धुमारे फुटले व लघुकथेचा फार झपाट्याने विकास झाला. फ्रान्समध्ये मेरीमे ह्या  कुशल लेखकाने लघुकथालेखनाच्या संदर्भात ज्या काटेकोर वस्तुनिष्ठतेचा अवलंब व पुरस्कार केला होता, त्याला गी द मोपासां (१८५० — १८९३)  याच्या कथालेखनात दृश्य फळ आले. अल्फाँस दोदे आणि मोपासां यांच्या कथालेखनाने फ्रेंच लघुकथा एकदम वयात आली. ह्याच सुमारास  रशियामध्ये गोगोल (१८०९ — १८५२) आणि टुर्ग्येन्येव्ह (१८१८ — १८८३) ह्या दोन श्रेष्ठ कथाकारांचा उदय झाला. गोगोल आणि टुर्ग्येन्येव्ह यांनी  आपल्या कथालेखनात महत्त्व दिले ते मुख्यतः व्यक्तिदर्शनाला. कथेला जन्म देतात त्या व्यक्ती घटनात्मक कथानक नव्हे, ह्या गोष्टीकडे त्यांनी  जगातील समीक्षकांचे व लेखकांचे प्रथमतः लक्ष वेधले.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लघुकथालेखनाच्या क्षेत्रात एका प्रभावी लेखकाचा अवतार झाला. तो म्हणजे सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतॉन  चेकॉव्ह (१८६० — १९०४). चेकॉव्हने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी जे कथालेखन केले, त्यामुळे गोगोल आणि टुर्ग्येन्येव्ह यांनी निर्माण केलेल्या लघुकथालेखनाच्या परंपरेला नवा अर्थ आला आणि लघुकथेला नवी परिमाणे लाभली. अगदी स्वाभाविकपणे लघुकथालेखनाच्या क्षेत्रात दोन परंपरा किंवा घराणी निर्माण झाली. एक घराणे मोपासांचे नाव सांगू लागले व दुसरे अपरिहार्यपणे चेकॉव्हचे नाव सांगू लागले. पहिल्याचा पदर एडगर ॲलन पो याच्या कथालेखनाशी व त्यातून जन्मलेल्या त्याच्या कथास्वरूपाविषयीच्या उपपत्तीशी लागत होता तर दुसऱ्याचा गोगोल टुर्ग्येन्येव्ह यांनी निर्माण केलेल्या कथालेखनाच्या परंपरेशी लागत होता. आजतागायत लघुकथेच्या प्रांतात ही दोन्ही घराणी नांदताना दिसत असली, तरी त्यांपैकी आज ज्या घराण्याचा विशेष प्रभाव जाणवत आहे, ते घराणे म्हणजे चेकॉव्हचे आहे.

मोपासां-परंपरेतील लघुकथालेखकांचे चेकॉव्ह-परंपरेतील लेखकांपेक्षा असणारे वेगळेपण त्यांच्या वेगळ्या भूमिकेत आहे. ही भूमिका, एक पूर्वनियोजित परिणाम आपणास लघुकथेमधून साधावयाचा आहे, हे प्रथम मनात बाळगून मग लघुकथालेखनास प्रवृत्त होते. त्यामुळे त्या परिणामाच्या दृष्टीने इष्ट काय व अनिष्ट काय, आवश्यक काय व अनावश्यक काय, हे प्रथम ठरवून मग कामाला लागणे ती आपले कर्तव्य समजते. स्वाभाविकच ती ह्या दृष्टीने मग पात्रांची योजना करते व त्यांच्या उक्तिकृतींचा विचार करते. तिच्यात अगदी अपरिहार्यपणे पात्रांपेक्षा त्यांच्या संबंधात घडणाऱ्या ‘कथानका ’ ला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. सारांश, ह्या भूमिकेचा कमीजास्त प्रमाणात अवलंब करणारे कथालेखक आधी साधावयाच्या परिणामाची निश्चिती व मग प्रत्यक्ष कथालेखन अशा क्रमाने आपली निर्मिती साधीत असतात. सदर भूमिकेचे हे स्थूलमानाने रेखाटलेले चित्र होय. ह्यात लेखकपरत्वे थोडाबहुत फरक हा आढळणारच. मोपासां-परंपरेमध्येदेखील, तिच्यात अभिप्रेत असलेल्या रचनात्मक कृत्रिमतेची पुसटशी आठवणही होणार नाही, असे अत्यंत लक्षणीय लघुकथालेखन आढळते. खुद्द मोपासांच्या कित्येक कथा ह्याची साक्ष देतील. ह्या परंपरेला ज्याने अलीकडच्या काळात अधिक लोकप्रिय वळण लावण्याचा प्रयत्‍न केला तो लेखक म्हणजे ओ. हेन्‍री (विल्यम सिडनी पोर्टर, १८६२ — १९१०). आपल्या कथालेखनाने ह्या अमेरिकन लेखकाने विसाव्या शतकातील तिसरे व चौथे दशक अक्षरशः गाजवले आणि लोकप्रियतेचे शिखर गाठले. ओ. हेन्‍रीची कथा ही ‘धक्कांतिका ’ ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. कथेच्या शेवटी, ज्यातील ताण भरपूर प्रमाणात जाणवत असतो अशा कथानकाला, अत्यंत अनपेक्षित अशी कलाटणी देऊन वाचकांना स्तिमित करायचे, हे ओ. हेन्‍रीच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य. ह्या वैशिष्ट्यामुळे व कुशल निवेदनशैलीमुळे ओ. हेन्‍रीच्या कथेवर वाचकांच्या उड्या पडू लागल्या एवढेच नव्हे, तर फार मोठ्या प्रमाणात समकालीनांकडून त्याचे अनुकरण होऊ लागले आणि ह्या अनुकरणात्मक लेखनानेच ओ. हेन्‍रीच्या कथालेखनपद्धतीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. विशिष्ट परिणाम साधू पाहण्याच्या हव्यासापायी कथा किती निर्जीव व यंत्रवत बनते, ह्याचे प्रात्यक्षिकच ओ. हेन्‍री आणि त्याचे अनुकारक यांनी आपल्या कथालेखनातून प्रगट केले.

चेकॉव्ह-परंपरेतील लघुकथेचे स्वरूप ह्याच्या नेमके उलट आहे कारण त्या परंपरेतील लेखकांची भूमिका मोपासां-परंपरेतील लेखकांच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. ह्या परंपरेतील लेखक असे मानतात, की लघुकथेमधून शेवटी वाचकांच्या मनावर जे अनुभवचित्र उमटते ते विलक्षण एकात्म असते हे खरे असले, लेखकाने तो कथात्मक अनुभव वाचकांपुढे उभा करताना आपली दृष्टी वस्तुनिष्ठ व त्रयस्थाची ठेवलेली असणे अगत्याचे असले, आपल्या अभिव्यक्तीत कोठेही मतप्रदर्शन वा नीत्युपदेश डोकावू न देणे हेही त्याचे कर्तव्य ठरत असले, तरी आणखी एक गोष्ट त्याने नेहमीलक्षात बाळगावी लागते, ती म्हणजे हीच की, असे अनेक कथात्म जीवनानुभव असतात, की ते तथाकथित कथानकाच्या चौकटीत बसत नाहीतअनेक अनुभवांचे स्वरूप आपणास गोंधळात टाकणारे असते. तेव्हा रेखीव कथानकाच्या प्रेक्षणीय चौकटीत त्यांना बसविणे, म्हणजे त्यांचे अंगभूत चैतन्य नष्ट करणे होय. जीवन हे एक कधीही न उलगडणारे कोडे आहे हे जर खरे असेल, तर त्याचे रेखीव, काटेकोर व ज्याचे कंगोरे घासून पुसून नीटस केलेले आहेत, असे चित्र कसे रेखाटले जाणार? चेकॉव्ह-परंपरेतील लेखकांचे म्हणणे असे आहे.

आज तरी जागतिक लघुकथालेखनावर चेकॉव्ह-परंपरेचा प्रभाव विशेष पडलेला दिसतो. जेम्स जॉइस, ए. ई. कॉपर्ड, शेरवुड अँडरसन, कॅथरिन मॅन्सफील्ड, यूडोरा वेल्टी इ. लेखकांचे लघुकथालेखन ह्याला जबाबदार आहे. मधल्या काळात मोपासां – ओ. हेन्‍रीप्रणीत लघुकथालेखनाची जी अत्यंत लोकप्रिय परंपरा निर्माण झाली होती, तिच्याविरुद्ध एका दृष्टीने निर्माण झालेली ही प्रतिक्रिया आहे. ह्या प्रतिक्रियेमुळे लघुकथेला नवी परिमाणे प्राप्त झाली आहेत. ‘कथानक ’ ह्या संकल्पनेला नवा अर्थ प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे मोपासांप्रणीत परंपरा आणि चेकॉव्हप्रणीत परंपरा ह्या परस्परांना पूरक आहेत. लघुकथेची सर्वच प्रमुख लक्षणे उभय परंपरांना मान्य आहेत. जागतिक कथासाहित्यात असे अनेक नामवंत लघुकथालेखक आहेत, की त्यांच्या कथालेखनात ह्या दोन्ही परंपरांचा लक्षणीय समन्वय झालेला आढळतो. लघुकथेच्या विकासाला ह्या दोन्ही परंपरांनी सारखाच हातभार लावलेला आहे.

पाश्चात्त्य लघुकथेप्रमाणे मराठी लघुकथा हीदेखील एकोणिसाव्या शतकात नियतकालिकांच्या उदयाबरोबरच जन्माला आली व ह्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांत आकाराला आली. मराठी ज्ञानप्रसारक सभेच्या मराठी ज्ञानप्रसारकातून (१८५०), हरिभाऊंच्या करमणुकीतून (१८९०) आणि का. र. मित्र यांच्या मासिक मनोरंजनातून (१८९५) तिला हळूहळू आपले रूप लाभले. प्रारंभी ती केवळ ‘स्फुट’ गोष्ट होती. कथात्मक साहित्याच्या मोठ्या एकत्र कुटुंबात ती नांदत होती. तिला स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नव्हते. १९२० नंतर ती हळूहळू वयात आली व तिला स्वतःचे स्वत्व गवसले. कादंबरीच्या सावटातून ती मुक्त झाली व एक स्वतंत्र, स्वायत्त वाङ्‌मयप्रकार ह्या दृष्टीने तिचा विचार होऊ लागला. तिच्या स्थिति गतीची चर्चा होऊ लागली. दिवाकर कृष्णांसारख्या लेखकांचे कथालेखन ह्याला मुख्यत्वे कारण झाले. ह्याच दशकात ‘गोष्टी’ ची नकळत ‘लघुकथा ’ बनली. चालू शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत मराठी लघुकथा ही प्राधान्याने मोपासां-परंपरेतील लघुकथा होती. विशिष्ट परिणाम साधण्याकडे तिचा विशेष कल होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तिच्या प्रकृतीत बदल होत गेला. ह्याला यशवंत गोपाळ जोशी, वामन चोरघडे इत्यादींचे कथालेखन थोडेबहुत कारण झाले असले, तरी युद्धोत्तरकाळात गंगाधर गाडगीळ व त्यांचे सहकारी यांचे कथालेखनच मुख्यत्वेकरून कारण झाले. ह्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत मराठी कथेने आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेले आदर्श आणि पाचव्या व सहाव्या दशकांत तिने निर्माण केलेले लेखनादर्श ह्यांत खूपच अंतर आहे. आज मराठी लघुकथा चेकॉव्हप्रणीत मार्गाने प्रवास करीत करीत खूपच प्रगत झाली आहे. तिच्या कक्षा विस्तारल्या आहेत. जीवनदर्शनाचे तिच्यातील सुप्त सामर्थ्य वाढीला लागले आहे. मराठी लघुकथा पाश्चात्त्य लघुकथेपेक्षा वयाने लहान असली, तरी तिने आपल्या अल्पवयात स्वतःचा घडवून आणलेला विकास निःसंशय उल्लेखनीय आहे. आज ती पाश्चात्त्य कथेच्या पुढे गेलेली नसली, तरी फारशी मागेही पडलेली नाही.

पहा: कहाण्या, मराठी परीकथा बोधकथा मिथ्यकथा रूपककथा लोकसाहित्य(लोककथा) हेरकथा.

संदर्भ : 1. Bates, H. E. The Modern Short-Story A Critical Survey, New York, 1941.

     2. Matthews, Brander, The Philosophy of the Short Story,1901.

     3. O’Faolain, Sean, The Short Story, New York, 1948.

कुळकर्णी, वा. ल.