कामगारवर्ग:आपले श्रम विकून त्याच्या मोबदल्यात वेतन घेणार्या लोकांचा कामगारवर्गात समावेश होतो. या दृष्टीने दैनंदिन किंवा साप्ताहिक मजुरी घेणारे सर्व क्षेत्रातील मजूर, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील पांढरपेशे नोकरदार यांचा समावेश सर्वसमावेशक अर्थाने या वर्गात व्हावयास पाहिजे. मात्र अनेकदा कामगारवर्ग असा ज्यावेळी निर्देश केला जातो, त्यावेळी भूहीन मजूर ज्याप्रमाणे आपल्या नजरेसमोर सामान्यपणे येत नाहीत, त्याप्रमाणे वरिष्ठ श्रेणीचा पांढरपेशा नोकरदारवर्गही आपल्या डोळ्यापुढे उभा रहात नाही. ‘कामगारवर्ग’ या संबोधनाने आपल्यासमोर मुख्यत्वे उभा राहतो तो, भांडवलदारवर्गाने चालविलेल्या छोट्या मोठ्या कारखान्यांतून श्रम करून आपली उपजीविका चालविणारा मजूरवर्ग. कामगारवर्गाची उत्पत्ती, स्थिती व गती यांविषयीचे विवेचन, हे याच वर्गाच्या संदर्भात मुख्यत्वेकरून केले जात असते.
स्वत:चे भांडवल नसलेला आणि अन्य भांडवलदारांनी काढलेल्या कारखान्यांतून उपजीविकेसाठी काम करणे आवश्यक असलेला कामगारवर्ग अर्थातच भांडवलशाहीच्या उदयानंतर अस्तित्वात आला. उत्तरोत्तर नवीन नवीन यंत्रांचा शोध लागू लागला व त्या तंत्रांच्या दृष्टीने उपयोगी म्हणून कारखान्यांचाही आकार वाढू लागला. ज्यावेळी उत्पादनाचे तंत्र विशेष प्रगत झाले नव्हते, त्यावेळी गावठी पद्धतीच्या यंत्रांनी उत्पादकाला आपापल्या घरी किंवा आपापल्या गावात स्वत:च्या मालकीचे यंत्र व स्वत:चे श्रम यांचा वापर करून उत्पादन करणे सुलभ होते. नव्या यंत्रांच्या व तंत्रांच्या शोधानंतर मोठमोठे कारखाने निघू लागल्यावर हा छोटा स्वतंत्र उत्पादक-श्रमिक अडचणीत आला. मोठा कारखाना काढण्याइतके भांडवल त्याच्याजवळ असणे शक्य नव्हते व आपला व्यवसाय चालू ठेवून स्वतंत्रपणे पूर्वीसारखे जीवन कंठणेही त्याला शक्य राहिले नाही. कारण त्याने निर्माण केलेल्या मालापेक्षा कारखान्यांतून तयार होणारा माल हा अधिक सुबक आणि स्वस्तही होता. साहजिकच, यांत्रिक कारखाने निघाल्यानंतर छोट्या स्वतंत्र व्यावसायिकांचे धंदे मोडकळीस आले व त्या लोकांना उपजीविकेसाठी एकतर शेतीकडे वळावे किंवा शहरात कारखान्यांतून कामाला जावे, असे दोनच पर्याय राहिले. वाढत्या लोकसंख्येमुळे व शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे या लोकांची उपजीविका शेतीवर होऊ शकण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. जमिनीचा आधार तुटलेला व उपजीविकेसाठी कारखान्यात काम करणे अटळ असलेला हा कामगारवर्ग नव्याने अस्तित्वात आला.
कामगारवर्गाच्या अशा असहाय्य अवस्थेत भांडवलदारवर्गाने त्याचे शोषण करावयाचा प्रयत्न केला असल्यास नवल नाही. काही उदारवृत्तीचे अपवादात्मक मालक सोडल्यास भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अधिकात अधिक खाजगी नफा मिळविण्याच्या प्रयत्नात अशी परिस्थिती निर्माण होणे अटळ होते. भांडवलशाहीच्या प्रारंभीच्या काळात शासनाचे निर्हस्तक्षेपी धोरण असल्यामुळे शासनाकडून कामगारवर्गास कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळू शकले नाही. उलटपक्षी शासनाचे धोरण या काळात कामगार संघटनांच्या उभारणीला विरोधी असल्यामुळे नव्याने उदयास येऊ पाहणार्या कामगार संघटनांना मूळ धरावयासदेखील वाव मिळणे कठीण झाले.
संघटनेचे सामर्थ्य नाही, शासनाचे संरक्षण नाही, भांडवलदारांच्या लोभाला मर्यादा नाही, अशा अवस्थेत कामगारवर्ग या प्रारंभीच्या काळात कुचंबत होता. यातूनच केव्हा केव्हा स्फोटक उद्रेक होत होते. परिस्थितीच्या भयानकतेची जाणीव अशा स्फोटामुळे व सभोवतालच्या समाजजीवनाच्या प्रत्यक्ष दर्शनामुळे अनेक विचारवंतांना व समाजधुरीणांना होऊ लागली.
एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कामगारवर्गाला एक अनन्यसाधारण महत्त्व होते. मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक उत्पादनात या वर्गाचा महत्त्वाचा भाग, हे तर एक कारण होतेच, परंतु मार्क्सने मांडलेल्या व सर्व क्रियाशील साम्यवाद्यांना मान्य असलेल्या साम्यवादी क्रांतीच्या प्रक्रियेत या वर्गाची शोषणापासून मुक्तता, हे साम्यवादी क्रांतीचे साध्य होते आणि या वर्गाची क्रांतिकारक वर्गविग्रहावर अधिष्ठित लढाऊ संघटना, हे त्या क्रांतीचे साधनतंत्र होते. कामगारवर्गाला साम्यवादी क्रांतीच्या प्रक्रियेत मार्क्सने आघाडीवरील तुकडीचे स्थान दिले होते. हे बिनीच्या तुकडीचे महत्त्व गेल्या काही दशकांत कृषकवर्गाला मिळू लागले असून त्यामुळे कामगारवर्गाचे महत्त्व कमी होत आहे आणि त्याबराबेरच त्याचे अनन्यसाधारणत्व नाहीसे झाले आहे.
मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदारवर्ग विरुद्ध कामगारवर्ग असा वर्गविग्रह अटळ आहे. बहुसंख्य कामगारवर्ग प्रत्यक्ष उत्पादनाचे कार्य करीत असल्यामुळे या युद्धात कामगारवर्गाचा जय हाही अटळ आहे. कामगारवर्ग संघटित होऊन जागृत होण्याचाच अवकाश की, साम्यवादी क्रांती झाल्याखेरीज राहणार नाही. आपले वेतनविषयक व अन्य प्रश्न सोडवून घेण्यासाठी कामगार संघटना स्थापिणे हा कामगारवर्गाच्या जागृतीचा अगदी प्राथमिक भाग होय, असे मानता येईल. आपले व भांडवलदारवर्गाचे हितसंबंध हे मूलतःच विरोधी आहेत व साम्यवादी क्रांती करून भांडवलदारवर्गाला दूर करणे, हाच आपल्या हिताचा एकमेव अंतिम मार्ग आहे याची जाणीव होणे, ही मार्क्सच्या दृष्टीने खरी वर्गीय जागृती आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे, अशा रीतीने जागृत झालेला कामगारवर्ग साम्यवादी क्रांती यशस्वी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. साम्यवादी क्रांती झाल्यानंतर भांडवलशाहीच्या अवशेषांचा पूर्ण निरास होऊन साम्यवाद सुप्रतिष्ठित होईपर्यंत मध्यंतरीच्या काळात कामगारवर्गाची हुकूमशाही अस्तित्वात ठेवावी लागेल, असेही मार्क्सचे सांगणे होते.
या विवेचनानंतरच्या कालखंडांत कामगारवर्गाच्या संदर्भात जगाच्या आर्थिक व राजकीय इतिहासात पुढीलप्रमाणे काही विशेष अनुभव आले : (१) प्रगत औद्योगिक भांडवलशाही राष्ट्रांत कामगारवर्गाचे जीवनमान उत्तरोत्तर वर जात आहे, असे आढळून आले. वेतनाचे प्रमाण व नफ्याचे प्रमाण यांच्यातील अंतर्विरोध, वेतनाच्या वाढीच्या प्रमाणात उत्पादनाची कार्यक्षमता वाढविता आल्यास भासमान होत नाही, असाही अनुभव आला. (२) कामगार हा नेहमी पराकोटीचा शोषितच राहणार या सिद्धांताचा प्रगत देशांतून अनुभव येईनासा झाला. त्याचे वेतनमान, जीवनमान चढते राहिले. विविध आपत्तींच्या वेळी त्याला मदत देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती उत्तरोत्तर वाढू लागली अपघात, आजार, वार्धक्य, स्त्री-कामगारांच्या बाबतीत मातृत्व यांसारख्या विशेष अडचणींच्या वेळी त्याला मदत मिळण्याची तरतूद सामाजिक सुरक्षा योजनांतून होऊ लागली बेकारीच्या काळात बेकारभत्ता मिळू लागला. असे साहाय्य आजही प्रगत समृद्ध राष्ट्रे आपल्या आर्थिक समृद्धीच्या प्रमाणातच देऊ शकतात, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्या देशांतील कामगारवर्ग यामुळेच साम्यवादाविषयी किंवा साम्यवादी क्रांतीविषयी उत्सुक दिसत नाही. या राष्ट्रांतून आर्थिक विषमता अस्तित्वात असली, तरी अविकसित देशांप्रमाणेतीविरुद्ध सहज निर्माण केले जाऊ शकणारे स्फोटक द्वेषाचे वातावरण प्रगत राष्ट्रांतील कामगारवर्गात निर्माण करता येत नाही. (३) जगातील आर्थिक विषमतेचा व दारिद्र्याचा केंद्रबिंदू आज जादा लोकसंख्या असलेल्या कृषिप्रधान, अप्रगत राष्ट्रांकडे सरकत आहे. साहजिकच, साम्यवादी क्रांतीच्या प्रक्रियेत कामगारवर्गाला मिळालेल्या अग्रेसर स्थानालाही धक्का पोहोचला आहे. (४) कामगारवर्गाच्या हुकूमशाहीची मार्क्सची कल्पना ही सर्व कामगारवर्गाला सत्तेच्या स्थानावर कल्पिणारी होती. प्रत्यक्षात साम्यवादी क्रांतीनंतर रशियात जी हुकूमशाही अस्तित्वात आली, ती कामगारवर्गाची असण्याऐवजी साम्यवादी पक्षाची होती व त्यातही सर्वंकषपणे स्टालिन ह्या एका व्यक्तीची होती. गेल्या पंचवीस वर्षांत इतर राष्ट्रांतून झालेल्या साम्यवादी क्रांत्यांचा इतिहास पाहिल्यास तेथील अनुभव फारसा वेगळा नाही. (५) गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक प्रगती झपाट्याने होत आहे. वाढत्या प्रमाणावर होणारे यांत्रिकीकरण व संयोजनीकरण यांमुळे अकुशल श्रमिकांच्या संख्येत वेगाने घट होत असून व्यवस्थापन व वितरण विभागांत काम करणार्यांची संख्या वाढत आहे. हा बदल म्हणजे लोकसंख्येत कामगारवर्ग बहुसंख्य राहणार या गृहीततत्त्वाला एक आव्हानच आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.
आज प्रगत भांडवलशाही राष्ट्रांत कामगार संघटना प्रबल व आपल्या मागण्यांविषयी दक्ष आहेत. आपल्या राजकीय प्रभावाची त्यांना जाणीव आहे. गालब्रेथ यांच्या शब्दांत सांगावयाचे, तर भांडवलदारांच्या सामर्थ्याला हा एक प्रतिशहच निर्माण झालेला आहे. त्या मानाने साम्यवादी राष्ट्रांत, तात्त्विक दृष्ट्या कामगारवर्गाच्याच हातात सत्ता असली, तरी अनियंत्रित पक्षीय किंवा व्यक्तिगत हुकूमशाहीच्या वातावरणात, कामगार संघटनांना कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे कार्य, लढाऊ पवित्रा घेऊन करणे दुष्कर असते.
अप्रगत राष्ट्रांतील उद्योगधंद्यांचा विकास झालेला नाही त्या राष्ट्रांचे एकूण उत्पन्न कमी आहे आणि सरासरी दरडोई उत्पन्न निकृष्ट आहे. एकूण श्रमिकांच्या संख्येपैकी फारच अल्पसंख्य श्रमिक मोठ्या किंवा मध्यम उद्योगधंद्यांतून कामगार म्हणून काम करीत आहेत. भांडवलशाही राष्ट्रांतून सुरुवातीच्या काळात कामगारवर्ग ज्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत होता, त्याच प्रकारच्या परिस्थितीत सामान्यत: अप्रगत राष्ट्रांतील कामगारवर्ग आज आहे. मात्र इतर राष्ट्रांच्या अनुभवाने व चालू युगाच्या सर्वसामान्य प्रेरणेने राजकीय दृष्ट्या मात्र तो अधिक जागरूक व आक्रमक बनला आहे.
दाभोलकर, देवदत्त