काप्यिट्स, पीटर ल्येआँन्यीदव्ह्यिच : (२६ जून १८९४ — ). रशियन भौतिकविज्ञ. नीच तपमान व चुंबकत्व यांविषयीच्या संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म क्रोनस्टॅट येथे झाला. पेट्रोग्राड पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तेथेच १९२०–२१मध्ये ते प्राध्यापक होते. त्यांनतर केंब्रिज, इंग्लंड येथे रदरफर्ड यांच्याबरोबर त्यांनी संशोधन केले. (१९२१—३४). त्याचबरोबर ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील चुंबकीय संशोधनाचे उपसंचालक (१९२४—३२) व ट्रिनिटी कॉलेजचे फेलो (१९२५—३४) होते. रॉयल सोसायटीने त्यांच्याकरिता खास माँड नावाची प्रयोगशाळा निर्माण केली. या प्रयोगशाळेचे ते १९३०–३४मध्ये संचालक होते. १९३४मध्ये ते रशियास परत गेले व तेथे रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या भौतिकी विभागाचे संचालक झाले (१९३६—४६ व १९५५ आजतागायत).
त्यांनी इलेक्ट्रॉनाची निरूढी (जडत्व), किरणोत्सर्ग (कण वा किरण बाहेर टाकण्याचा काही मूलद्रव्यांचा गुणधर्म) व अणुकेंद्रीय भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे, तथापि चुंबकत्व व नीच तपमान यांविषयीचे त्यांचे संशोधन व निबंध अधिक प्रसिद्ध आहेत. प्रचंड शक्तिमानाचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या पद्धतीत त्यांनी सुधारणा केली. अक्रमी (उष्णतेची प्राप्ती वा व्यय न होता करण्यात येणार्या) प्रसरणाने हीलियमाचे द्रवीभवन करण्याच्या तंत्राचा त्यांनी शोध लावला. यापूर्वीच्या तंत्रात हीलियमाच्या द्रवीभवनात द्रवरूप हायड्रोजनाचाही उद्भव होत असे, तो या नवीन तंत्राने टाळता येऊ लागला. द्रवरूप हवा कमी किंमतीत मोठ्या प्रमाणावर मिळविण्यासाठी एका टरबाइनाचा त्यांनी शोध लावला. द्रवरूप ऑक्सिजनाची निर्मिती व त्याचे औद्योगिक उपयोग यांसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाचा रशियन पोलाद उद्योगात फार महत्त्वाचा उपयोग झाला.
त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनकार्याबद्दल त्यांना स्टालिन पारितोषिक (१९४१ व १९४३), ऑर्डर व लेनिन (१९४४ व १९४५), लेमोनोसोव्ह सुवर्णपदक (१९६०), फॅराडे पदक व इतर अनेक बहुमान मिळाले. रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी, अमेरिकन नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इ. अनेक शास्त्रीय संस्थाचे ते सदस्य आहेत.
रशियाच्या अणुबाँब व हायड्रोजन बाँब तयार करण्याच्या योजनेत त्यांनी महत्त्वाचा भाग घेतलेला होता असे म्हटले जाते. १९५५ च्या सुमारास स्थापन झालेल्या सोव्हिएट इंटरप्लॅनेटरी कमिटीचे ते अध्वर्यू होते. १९५७मध्ये रशियाने क्षेपित केलेल्या पहिल्या दोन उपग्रहांचे बरचसे श्रेय त्यांना देण्यात येते.
भदे, द. ग.