कंपॉझिटी : फुलझाडांमध्ये (द्विदलिकितांत) सर्वांत मोठ्या (सु. १,००० वंश व २०,००० जाती) व अत्यंत प्रगत अशा या कुलाचा समावेश ॲस्टरेलीझ या गणात केला असून त्यातील ⇨ ओषधी व लहान झुडुपे (क्वचित वेली व वृक्ष) सर्व जगभर आढळतात. पाने साधी अथवा कमीजास्त विभागलेली, एकाआड एक (क्वचित समोरासमोर) पण अनुपपर्ण (उपपर्ण नसलेली) फुलोरा स्तबक [→ पुष्पबंध] प्रशस्त पुष्पासनाच्या परिघावर अनेक, बहुधा सच्छद, वंध्य, जिव्हिकाकृती किरण-पुष्पके व मध्ये नलिकाकृती, सच्छद, बिंब-पुष्पके (द्विलिंगी अथवा एकलिंगी) क्वचित सर्वच पूर्ण व सारखी संवर्त रूपांतरित, ऱ्हसित किंवा केसाळ झुबक्यासारखा (पिच्छसंदले) अथवा लांबट शुष्क खवल्याप्रमाणे पुष्पमुकुट पाच पाकळ्या जुळून फितीसारखा किंवा नळीसारखा व विविधरंगी पाच केसरदलांचा उगम पाकळ्यावरून व परागकोश परस्परांस चिकटलेले (युक्त परागकोश) जुळलेली किंजदले दोन, अधःस्थ किंजपुट व द्विभागलेला किंजल्क एकच बीजक तळातून वर आलेले [→ फूल] फळ शुष्क, संकृत्स्न, हलके व आतील एकाच बीजासकट वाऱ्याने दूरवर पसरविले जाते [→ फळ]. ह्या कुलाला फार प्रगत समजण्याची कारणे अशी : फुलांची संरचना, त्यांची फुलोऱ्यावरील आकर्षक मांडणी, साधलेला श्रमविभाग, कीटकांकडून करविलेले परपरागण व ते न जमल्यास स्वपरागणाची सोय [→ परागण सूर्यफूल] फुलांचे आकार व संख्या यांत साधलेली काटकसर व अत्यंत मोठा बीजप्रसार. या कुलातील काही वनस्पती शोभेकरिता (शेवंती, झेंडू, डेलिया, सूर्यफूल इ.), तेलाकरिता (कारळे, करडई, सूर्यफूल इ.) औषधाकरिता (माका, अक्कलकारा, कडू जिरे इ.) रंगाकरिता (कुसुंबा) इत्यादींकरिता उपयुक्त आहेत. पडीत जागी अनेक रानटी जाती उगवतात (उदा., पाथरी, एकदांडी इ.). चिकोरी, किरमाणी ओवा, सालीट ह्यांचा याच कुलात अंतर्भाव होतो.
केळकर, शकुंतला.