कापटाइन, याकोबसकॉर्नेलिस : (१९ जानेवारी १८५१-१८ जून १९२२). डच ज्योतिर्विद. छायाचित्रणाचा ज्योतिष शास्त्रात उपयोग करून व ताऱ्याच्या सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) अभ्यासावरून त्यांनी आकाशगंगेच्या संरचनेविषयी अनुसंधान केले, हे त्यांचे महत्वाचे कार्य आहे. त्यांचा जन्म बार्नव्हेल्ट (हॉलंड) येथे झाला व शिक्षण यूत्रेक्त विद्यापीठात झाले. तेथेच त्यांना मौलिक अन्वेषणाची गोडी लागली. १८७५ साली पदवीधर झाल्यावर त्यांची लायडन येथील वेध शाळेत निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १८७८ साली ग्रोनिंगेन (नेदर्लंड्स) येथे त्यांची ज्योतिषशास्त्र व सैद्धांतिक यामिकी (वस्तूंवर होणारी प्रेरणांची क्रिया व त्यातून निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांच्या अध्यासनासाठी निवड झाली व ते प्राध्यापक झाले.
ज्योतिषशास्त्राच्या सैद्धांतिक व सांख्यिकीय अनुसंधानासाठी आणि छायाचित्रीय मापनांसाठी त्यांनी ग्रोनिंगेन येथे एक ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा स्थापन केली. १८९६ ते १९०० या दरम्यान त्यांनी तारकीय परांचनांची (ताऱ्यांच्या वलनाक्षांच्या काल्पनिक अक्षाभोवती शंक्वाकार फिरण्याची) व त्यावरून अंतरांची कित्येक मापने घेऊन डेव्हिड गिल यांच्या साहाय्याने दक्षिण खगोलार्धातील ४,५४,८७५ ताऱ्यांच्या स्थानांविषयी माहिती देणारी यादी प्रसिद्ध केली. वरील वेधशाळेत आकाशगंगेतील ताऱ्यांच्या गती व विभागणी यांच्यासंबंधी अनुसंधान करीत असताना त्यांनी १९०४ साली ‘ताऱ्यांचे प्रवाह’ ही कल्पना प्रसृत केली. ताऱ्यांच्या ठराविक गती वाटेल तशा नसून तारे आकाशगंगेच्या प्रतलात (पातळीत) दोन विरूद्ध दिशांनी पण एकमेकांतून मृग व फलक तारकासमूहांकडे वाहताना दिसतात. या नव्या कल्पनेमुळे अव्यवस्थ (संकुल किंवा अव्यवस्थित) विश्व ही कल्पना मागे पडली. या प्रवाहांचा नंतर आकाशगंगेच्या परिभ्रमणाशी संबंध जोडण्यात आलेला आहे.
छायाचित्रणाचा ज्योतिषशास्त्रात उपयोग करून घेणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ नसले, तरी त्यांचा विशाल शास्त्रीय दृष्टिकोन व मोठमोठ्या शास्त्रीय योजना आखून त्या यशस्वी करण्याची क्षमता यांच्यामुळे छायाचित्रीय ज्योतिषशास्त्रात त्यांना श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. १९०६ साली त्यांनी एक भव्य सहकारी योजना आखली. तीनुसार आकाशातील निरनिराळ्या विभागांतील २०६ लहान क्षेत्रे निवडण्यात आली व त्यांचे छायाचित्रीय निरीक्षण करून त्यांच्यातील ताऱ्यांची अंतरे, गती, स्थाने, वर्णपटीय प्रकार इत्यदींसंबंधी अध्ययन करण्याची जगातील वेधशाळांना विनंती करण्यात आली. सतरा वेधशाळांनी या खास निरीक्षणास संमती दिली. यामुळे सर्व जगातील मोठमोठ्या उपकरणांद्वारा घेतलेल्या छायाचित्रांवर प्रत्यक्ष मापने घेणे शक्य झाले. या योजनेत आकाशगंगेतील ताऱ्यांची गती, संख्या, ⇨प्रत, विभागणी इत्यादींसंबंधी माहिती मिळाल्याने आकाशगंगेच्या संरचनेबद्दलच्या आपल्या ज्ञानात पुष्कळ भर पडली. या माहितीच्या आधारे त्यांनी १९२२ साली आकाशगंगेच्या संरचनेची पुढील ढोबळ कल्पना मांडली. आकाशगंगा ही ताऱ्यांचा प्रचंड गुच्छ असून तिचा आकार बर्हिगोल भिंगासारखा आहे आणि तिचा वयास तिच्या जाडीच्या पाचपट आहे. तिच्या मध्यभागी ताऱ्यांची दाटी असून मध्यापासून दूर जाताना ते विरळ होत जातात. तिच्या सीमा स्पष्ट नाहीत, मध्याशी सूर्य असून तिच्यामध्ये ४,७०० कोटी तारे आहेत. परंतु आधुनिक सिद्धांतांनुसार सूर्य आकाशगंगेच्या मध्याशी नाही व तिच्यातील ताऱ्यांची संख्या कापटाइन यांच्या संख्येच्या चौपट आहे. अशा प्रकारे ही कल्पना अचूक नसली, तरी निरीक्षणात्मक पुराव्यांवरून आकाशगंगेच्या संरचनेचे विश्लेषण करणारा हा पहिलाच प्रयत्न असल्याने महत्वाचा आहे. आकाशगंगेतील ताऱ्यांची संख्या ठरविण्यासाठी त्यांनी वापरलेल्या पद्धतीला कापटाइन पद्धती व तेरा प्रकाशवर्षे दूर असलेल्या नऊ प्रतीच्या एका ताऱ्यास कापटाइन तारा अशी नावे त्यांच्यावरून देण्यात आलेली आहेत. ते ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे फेलो व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते. ते ॲमस्टरडॅम येथे मृत्यू वापले.
ठाकूर, अ. ना.