कलिंग (ओडिया) लिपि : ओरिसातील (प्राचीन नाव कलिंग देश) कलिंगनगरच्या गंगराजाचे ताम्रपट कलिंग लिपीमध्ये लिहिलेले आढळून येतात. सातव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत या लिपीमध्ये लिहिलेली दानपत्रेही आढळून येतात. गांगेय संवत ३९ च्या जिरजिंगी येथे सापडलेल्या ताम्रपटात ही लिपी प्रथम आढळून येते. हे दानपत्र गंगराजा पहिला इंद्रवर्मन्‌ याचे आहे. गांगेय संवताचा आरंभकाळ आता चैत्र शुक्ल प्रतिपदा शके ४२० (इ. स. पू. १४ मार्च ४९८) असा निश्चित झाला आहे. कलिंग लिपीवर निरनिराळ्या लिपींचा प्रभाव पडलेला आहे. जिरजिंगी ताम्रपटातील अक्षरे भरीव पेटिकाशीर्षक पद्धतीची आहेत. या लेखातील काही अक्षरांचे मध्य हिंदुस्थानातील अक्षरवाटिकेशी साम्य आहे. गांगेय संवत १४८ च्या चिकॅकोल येथील आज्ञापत्रात वरील सर्व वैशिष्ट्ये प्रगट झाली असून, ‘आ’, ‘ग’, ‘श’ इ. अक्षरे प्राचीन ⇨ ग्रंथ लिपीप्रमाणे आहेत. गांगेय संवत १८३ मधील चिकॅकोल येथील आणखी एका दानपत्रातील अक्षरांचेही मध्य हिंदुस्थानातील अक्षरवाटिकेशी साम्य असून त्यातील ‘न’ हे अक्षर नागरीप्रमाणे आहे.

कलिंग लिपीमध्ये झालेल्या अक्षरवाटिकांचे मिश्रण हा विद्वानांचा चर्चेचा विषय आहे. कीलहोर्न यांनी त्याची कारणमीमांसा केली आहे : पहिले कारण म्हणजे ओरिसाची भौगोलिक रचना. या भौगोलिक रचनेमुळे ओरिसा प्रांतावर निरनिराळ्या भूभागांतील राजांनी वेळोवेळी स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या केवळ राजकीय घटनाच ठरल्या नाहीत, तर त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. ओरिसाचा भूप्रदेश दक्षिणेस तेलुगू व कन्नडभाषिक प्रदेशाला लागून आहे, तर उत्तरेला पेटिकाशीर्षक व नागरी लिपीचे वर्चस्व असलेला प्रदेश आहे. पूर्वेला बंगालची भूमी आहे. त्यामुळे कलिंग लिपीवर आजूबाजूच्या निरनिराळ्या लिपींचा प्रभाव पडणे क्रमप्राप्तच होते. दुसरे कारण म्हणजे राजदरबारामध्ये असणारे कोरके आपले लेखनकौशल्य दाखविण्यासाठी आपल्याला येत असलेल्या सर्व अक्षरवाटिकांचे मिश्रण आपल्या लेखनात करीत असत.

प्रचलित ओडिया (उडिया) लिपीवर बंगाली लिपीची विशेष छाप आढळून येते. बाराव्या शतकानंतर जे लेख ओरिसात सापडले, त्यांमधील लिपीला ब्यूलर यांनी ‘प्राक्‌बंगाली लिपी’ असे नाव दिले आहे. या लिपीमध्ये बंगाली अक्षरांप्रमाणे अक्षरांवर शिरोरेषा आहेत. प्रचलित ओडिया लिपीमध्ये ह्या शिरोरेषांना गोलाई प्राप्त झाली आहे. ह्या लिपीतील ‘अ’, ‘आ’, ‘ह’, ‘ष’, ‘क्ष’ या अक्षरांचे नागरी अक्षरांशी साम्य आहे तसेच ‘ए’, ‘ऐ’, ‘ओ’ आणि ‘औ’ ही अक्षरे बंगाली लिपीतील अक्षरांप्रमाणे आहेत. एकंदर अक्षरांचे वळण गोल असून अक्षरांचा झोक उजवीकडे वळलेला आहे. या लिपीचे दोन प्रकार आढळून येतात. एक छापण्याची आणि दुसरी हस्तलिखितांची. हस्तलिखितांसाठी वापरलेल्या ओडिया लिपीला ‘करणी’ हे नाव आहे.

पहा : ओडिया भाषा.

संदर्भ : 1. Buhler, G. Indian Paleography, Calcutta, 1962.

२. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपीमाला, दिल्ली, १९५९.

गोखले, शोभना ल.