कलासंस्था : कलाविषयक कार्य करणाऱ्या आणि बहुधा कलावंत व रसिक सहभागी असलेल्या संस्था. कलाक्षेत्रात सहकार्याने व संघटितपणे काम करणाऱ्या अशा संस्थांचे स्वरूप विविध प्रकारचे संभवते. कलावस्तूंचा विक्रय करणाऱ्या व इतर तत्सम व्यापारी संस्था, कारागिरांच्या कर्मशाळा, कलावंतांची कलागारे, कलाशिक्षणाच्या शाळा व अकादमी, रसिकांची मंडळे, कलाविषयक पुरातत्त्वीय व ऐतिहासिक अभ्यास व संशोधन करणाऱ्या संस्था, कलावीथी, कलावस्तुसंग्रहालये व प्रदर्शने, कलाकृतींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी स्थापन झालेल्या संस्था इ. प्रकार म्हणजे कलासंस्थांचीच विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट हेतूने व विशिष्ट कार्यापुरतीच उदयास आलेली विभिन्न रूपे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता ही गोष्ट स्पष्ट होते. मध्ययुगीन कालखंडापर्यंत कलासंस्थांचे कार्य प्राधान्याने व्यावहारिक स्वरूपाचे होते. त्या त्या कालखंडातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांनुरूप त्यांचे कार्य चालत असे. प्राचीन कलापरंपरा जतन करण्याचे श्रेय या संस्थांना द्यावे लागते. पश्चिमी प्रबोधनकाळानंतर, विशेषतः सोळाव्या शतकानंतर यूरोपात कारागिरांच्या मंडळांबरोबर (गिल्ड्स) कलांच्या अकादमीही स्थापन करण्यात आल्या. त्यांस राज्यकर्त्यांचे पाठबळही मिळाले. या अकादमींतून आदर्श कलाविषयक नियमावली तयार करण्याचे आणि कलाविचार प्रगत करण्याचे कार्य झाले. गेल्या दोन शतकांत आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने कलाक्षेत्रातील कार्याचेही व्यवच्छेदन झाले आणि कलाविषयक विशिष्ट कार्य करणार्‍या आधुनिक स्वरूपाच्या कलावंतांच्या संस्था, कलानिकेतने, कलाविषयक सांस्कृतिक संस्था वगैरेंचा उदय झाला. थोडक्यात, कलासंस्था या संज्ञेने कलाक्षेत्रातील सहकार्य आणि संघटित प्रयत्‍न दिग्दर्शित करणार्‍या, परंतु विशिष्ट कलाक्षेत्रापुरते विशिष्ट हेतूने कार्य करणार्‍या अनेक संस्थांचा निर्देश केला जातो.

सांस्कृतिक स्वरूपाच्या कलासंस्था:(अ) सांस्कृतिक स्वरूपाच्या कलासंस्थांचे कार्य कलाशिक्षणसंस्थांच्या कार्याला पूरक असते. कलाप्रदर्शनांच्या द्वारे सर्वसामान्य जनतेची कलाभिरुची विकसित करण्याचे कार्य या संस्था करीत असतात. १७५४ मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेल्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌स’ या संस्थेचा मूळ उद्देश उद्योग, व्यापार आणि कला यांच्या क्षेत्रांत परस्परसहकार्य साधून ब्रिटिश कला व औद्योगिक उत्पादन समृद्ध करणे, हाच होता. तरीही परिणामी तिचे कार्य सामान्यांच्या कलाशिक्षणाला उपकारक ठरले.  

पौर्वात्य देशांपैकी केवळ चीनमध्येच कलावंतांच्या संस्था फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. बाराव्या-तेराव्या शतकांत दक्षिण सुंग घराण्याच्या अमदानीत ‘Hua-yuan’ ही दरबारी चित्रकारांची संघटना असल्याचा उल्लेख मिळतो. ‘Han-lin’ अकादमीचा एक भाग म्हणून ती ६१८-९०६ या कालखंडात अस्तित्वात होती, असेही एक मत आहे. चित्रकलाशिक्षण व स्पर्धांचे आयोजन ही तिची कार्ये होती व प्रख्यात चिनी अभिजात शैली विकसित करण्याचे श्रेय तिला आहे. १९४९ पासून ’युनियन ऑफ चायनीज आर्टिस्ट्स’ व ‘ऑल चायना फेडरेशन ऑफ लिटररी अँड आर्ट सर्कल्स’ या संस्थाही त्याच स्वरूपाचे कार्य करीत आहेत.

(आ) कला अकादमीकडे पूर्वी असलेली कित्येक कार्ये आता कलासंग्रहालये व विद्यापीठीय कलाशाखा करीत असतात. या बाबतीत अमेरिकन कलासंस्था अग्रेसर आहेत. ‘क्लीव्हलँड म्यूझीयम ऑफ आर्ट’ (१८८२) ही खाजगी संस्था मुले व प्रौढ यांकरिता निरनिराळे मोफत अभ्यासक्रम विश्वविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने चालविते. रिचमंड येथील ‘व्हर्जिनिया म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्‌स’ या कलासंग्रहालयाने १९५३ मध्ये ‘आर्ट मोबाइल’ हे फिरते प्रदर्शन प्रथमतः सुरू केले व आता यूरोप-अमेरिकेत हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ‘कॉलेज आर्ट असोसिएशन ऑफ अमेरिका’ ही संस्था गेली पंचवीस वर्षे महाविद्यालयीन कलाविभागांच्या कार्याचे एकसूत्रीकरण व परस्परसंबंध प्रस्थापित करण्याचे कार्य करीत आहे आणि त्यासाठी आर्ट बुलेटिन आणि कॉलेज आर्ट जर्नल ही महत्त्वाची नियतकालिके प्रसिद्ध करीत आहे.

(इ) औद्योगिक कलांच्या व कामगारांच्या कलाभिरुचीच्या विकासासाठी अनेक कलासंस्था निर्माण झाल्या. लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌स’ या संस्थेची स्थापना यासाठीच झाली. १८५१ मध्ये लंडन येथे भरलेल्या प्रदर्शनातील वस्तूंचा कायम स्वरूपाचा संग्रह करण्यासाठी ‘साउथ केंझिंग्टन म्यूझीयम’ ची स्थापना झाली व त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत म्यूनिक, बर्लिन, व्हिएन्ना, बूडापेस्ट, मॉस्को, सेंट पीटर्झबर्ग येथे, तसेच फ्रान्स आणि इटली मधील अनेक शहरांतून, औद्योगिक कलाशिक्षण देणार्‍या शेकडो संस्था व संग्रहालये निर्माण झाली. विसाव्या शतकात अशा बहुतेक संस्था तद्देशीय शासनाच्या नियंत्रणाखाली गेल्या. म्यूनिकच्या ‘Deutscher Werkbund’ (१९०७) या संस्थेने कलापूर्ण उत्पादनाचा दर्जा वाढविण्याच्या उद्देशाने प्रकाशने, प्रत्यक्ष शिक्षण व प्रदर्शने या उपायांचा अवलंब करून कलावंत, कारागीर व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती यांना एकत्र आणण्याचे कार्य केले. ‘ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल डिझाइन’, लंडन (१९१९), वायमार (जर्मनी) येथील वॉल्टर ग्रोपिअस याने स्थापन केलेली बौआउस (१९१९), लंडनची ‘ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल आर्ट’ ही सरकारी संस्था, तसेच ‘डिझाइन अँड इंडस्ट्रीज असोसिएशन’ (१९१५) व ‘इंडस्ट्रियल आर्ट कमिटी ऑफ द फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडस्ट्रीज’ (१९२१) या खाजगी कलासंस्था, स्वीडनमधील ‘स्वीडिश सोसायटी फॉर इंडस्ट्रियल डिझाइन’, तसेच ‘सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल आर्टिस्ट्स’, लंडन (१९३०). संस्था हेच कार्य करीत आहेत. नाझी जर्मनीत बौहाउस ही शिक्षणसंस्था १९३३ मध्ये बंद करण्यात आली. लंडनची ‘सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल आर्टिस्ट्स’ ही संस्था प्रदर्शने आणि अनेक प्रकाशने या कार्याबरोबरच स्टुडिओ  हे सुप्रसिद्ध नियतकालिक प्रसिद्ध करते.

(ई) कलासंस्थांचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे पुरातत्त्वीय संशोधनाशी निगडित असलेल्या संस्थांचा होय. यांपैकी बर्‍याच संस्था विद्यापीठांशी संलग्न असून काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत. कलेच्या इतिहासाचे आणि पुरातत्त्वीय स्वरूपाचे संशोधन व प्रकाशने ही त्यांची कार्ये आहेत. लंडन येथील ‘वॉरबर्ग इन्स्टिट्यूट’ (१९०५) व ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल स्टडीज’, रोम व पॅरिस येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी अँड हिस्टरी ऑफ आर्ट’ या अशा प्रकारच्या प्रमुख संस्था आहेत. चीनमधील ‘नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (ॲकेडेमिया सिनिका) हीसंस्था वैज्ञानिक व सांस्कृतिक संशोधन कार्याबरोबरच पुरातत्त्वीय उत्खनन व संशोधन करते. १९५५नंतर तिची पुनर्रचना होऊन ती सध्या वैज्ञानिक संशोधनसंस्था बनली आहे. ‘Chung-Kuo K’o-hsueh Yuan’ (१९४९) ही पीकिंगमध्ये स्थापन झालेली संस्था तिच्या इतर अनेक शाखांबरोबरच पुरातत्त्वीय संशोधन कार्यही करते.

(उ) कलावीथी, कलावस्तुसंग्रहालये, कलावस्तुसंरक्षण व संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्याशी निगडित असणार्‍या काही कलासंस्था असतात. चालू शतकात कलेच्या सर्वच क्षेत्रांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची प्रदर्शने भरविण्याकडे विशेष कल दिसून येतो. त्यामुळे देशोदेशी कलावीथी स्थापन झाल्या आहेत व त्यात सामूहिक किंवा कलावंतांची वैयक्तिक प्रदर्शने भरविण्यात येतात. एकट्या इंग्लंडमध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्स’ (१७६८), ‘रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश आर्टिस्ट्स’, ‘सोसायटी ऑफ ग्रॅफिक आर्टिस्ट्स’ (१९२०), ‘नॅशनल सोसायटी ऑफ पेंटर्स, स्कल्प्टर्सअँड एन्‌ग्रेव्हर्स’ (१९३०), ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पेंटर्स’ (१८८३), ‘रॉयल सोसायटी ऑफपेंटर्स इन वॉटर कलर्स’ (१८०४), ‘द पेस्टल सोसायटी’ (१८९८), ‘रॉयल स्कॉटिश अकॅडमी’ (१८२६) इ. अनेक संस्था नियमितपणे वार्षिक प्रदर्शने भरवितात व काही प्रकाशनेही प्रसिद्ध करतात.

कलावस्तु संरक्षणाच्या कार्याशी निगडित असलेल्या काही संस्था इंग्लंड, फ्रान्स व इटलीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द काँझर्व्हेशन ऑफ हिस्टॉरिक अँड आर्टिस्टिक वर्क्स’, लंडन व ‘Ustituto Central del Restauro’, रोम या संस्था या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. अद्ययावत प्रयोगशाळा व शास्त्रीय पद्धती यांमुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेआहे. फ्रान्समधील ‘Archives Photographiques’ ही संस्था पुरातन वास्तू व कलाकृती यांसंबंधी उपलब्ध साहित्याचे छायाचित्रीकरण करून त्यांचा संग्रह करते. इटली व फ्रान्समधील अनेक संग्रहालये संघटना करून एकत्रितपणे शिक्षणकार्य व सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जपण्याचे कार्य करतात. त्यामुळे दुर्मिळ ऐतिहासिक व कलाविषयक अवशेषांच्या जंत्र्या छापून प्रसिद्ध झाल्या आहेत. याकार्यासाठी रोममधील ‘Union International des Instituts d’Archeologie, d’Histoire, et d’Histoire de I’Art’ (१९४५) ही संस्था प्रसिद्ध आहे.


(ऊ) संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या यूनेस्को शाखेतर्फे विविध देशांतील लहान लहान कलासंस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणण्याकरिता व ते अधिक प्रभावी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक कलासंस्था देशोदेशी स्थापन झाल्या आहेत. त्यांपैकी काहींचा उल्लेख वर आलाच आहे. रोम येथील ‘Associazone Internazionale d’Archeologia Classica’ (१९४५) व ‘Centro Internazionale di Studi…’ (१९५९) या संस्था या प्रकारात मोडतात. ‘Comite International d’Histoire de I’Art’, पॅरिस (१९३०) ही संस्था २१ देशांतील कलेतिहास तज्ञांच्या बैठकी घेणे, त्रैवार्षिक काँग्रेस भरविणे, प्रकाशने करणे इ. कार्ये करते. यूनेस्कोमार्फत स्थापन झालेली ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ क्लासिक स्टडीज’,पॅरिस (१९४८) ही संस्था पुरातत्त्व संशोधन, परिषदा भरविणे, तसेच कोश व जंत्र्या यांचे प्रकाशन वगैरे कामे करते. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक आर्ट्स’, पॅरिस (१९५४) व ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीयम्स’, पॅरिस (१९४६) या संस्था यूनेस्कोतर्फेच स्थापन करण्यात आल्या आहेत.‘Union Academique Internatinale’, ब्रुसेल्स, ‘Union Unternationale des Architects’ पॅरिस (१९४८), यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संस्था निरनिराळ्या देशांत आहेत.‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’, लंडन ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ डाएस्चेअकॅडमी’, म्यूनिक ‘द सोसायटी एशियातिका इतालियाना’, रोम ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ दयुनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो’ वगैरे पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासासाठी निर्माण झालेल्या संस्थांप्रमाणेच रोम, अथेन्स, स्पेन व काही पौर्वात्य देश यांमधील पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी अनेकसंस्था फ्लॉरेन्स, रोम, व्हेनिस, अथेन्स, बैरूत इ. शहरांत कार्य करीत असतात.

(ए) भारतात याच स्वरूपाच्या अनेक संस्था आहेत. ‘एशियाटिक सोसायटी’, कलकत्ता (१७८४), ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’ (१९०७), ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, पुणे (१९१०), ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट’, बडोदा (१९१५), ‘आंध्र हिस्टॉरिकल रिसर्च सोसायटी’ (१९२२) या संस्था मुख्यत्वे ऐतिहासिक स्वरूपाचे संशोधन करतात व अनुषंगाने प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करतात.या सर्वांची नियतकालिके प्रसिद्ध होतात. ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’, दिल्ली (१९०२) या सरकारी खात्यामार्फत पुरातत्त्वीय संशोधन, माहितीचे एकत्रीकरण व अनेक प्रकाशने प्रसिद्ध करण्यात येतात. बनारस, दिल्ली, बडोदा इ. ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये कलाविषयक शिक्षण आणि संशोधन करणारे विभाग आहेत. ‘म्यूझीयम्स ॲसोसिएशन ऑफ इंडिया’, मुंबई (१९४३) ही संस्था भारतातील कलासंग्रहालयांच्या प्रश्नांचा विचार करते.

भारतातील ⇨ललित कला अकादमी (१९५४) ही सरकारी संस्था असून तिच्या राज्यवार शाखा आहेत. याशिवाय कलाप्रदर्शने भरविणाऱ्या अनेक खाजगी संस्था भारतात उदयास आल्या आहेत. सामूहिक प्रदर्शनांबरोबरच कलावंतांच्या वैयक्तिक प्रदर्शनांची सोयही अशा संस्थांकडून केली जाते. मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता वगैरे शहरांत हे कार्य करणाऱ्या कलावीथी आहेत. यांपैकी काही व्यापारी स्वरूपाच्या, कमिशन घेऊन प्रदर्शनाची व कलावस्तुविक्रयाची सोय करणाऱ्या आहेत. मद्रास येथे दृश्यकलांच्या कलावंतांनी संघटित केलेले ⇨चोलमंडळही आज उमेदीने कार्य करीत आहे. एकट्या मुंबईतच ⇨बाँबे आर्ट सोसायटी (१८८८), ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘आर्टिस्टस सेंटर’, ‘एस्थेटिक सोसायटी’ या संस्था शिवाय जहांगीर, ताज, ओॲसिस, पुंडोल, केमोल्ड, चेतन इ. कलावीथी असून त्या कलाप्रदर्शनांच्या आणि चर्चासत्रांच्या सोयी उपलब्ध करून देतात. यांपैकी सर्वांत जुन्या ‘बाँबे आर्टसोसायटी’तर्फे दरवर्षी कलाप्रदर्शन भरते. कोणत्याही भारतीय कलावंताला नाममात्र प्रवेशमूल्य देऊन प्रदर्शनात भाग घेता येतो. प्रदर्शनात पदके आणि अन्य पुरस्कार देण्यात येतात. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ ही विश्वस्त संस्था प्रदर्शने आयोजित करण्यासाठी ‘बाँबे आर्ट सोसायटी’च्या हवाली करण्यात आली आहे. तिचे एक अद्ययावत ग्रंथालय असून सदस्यांना त्याचा फायदा मिळतो. काही कलाविषयक पुस्तके सोसायटीने प्रसिद्ध केली आहेत व मधूनमधून चर्चा, परिसंवाद वगैरेंचे आयोजन केले जाते.

शहाणे, श्री. ह.