काचसर्प : सरीसृपांच्या (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) अँग्विडी कुलातील ऑफिसॉरस वंशाच्या सरड्याची ही एक जाती आहे. शरीर सापासारखे लांब असून पायांच्या जोड्या नसल्यामुळे हा साप आहे अशी पूर्वी समजूत होती. काचेचे जसे तुकडे होतात तसेच याच्या शरीराचेही तुकडे पडतात अशी देखील समजूत होती. यामुळेच या प्राण्याला ‘काचसर्प’ (ग्लास स्‍नेक) हे नाव मिळाले.

काचसर्प

काचसर्पाच्या एकूण पाच जाती आहेत. त्यांपैकी तीन विशेष माहितीच्या आहेत. ऑफिसॉरस ॲपोडस ही जाती आग्नेय यूरोप, नैर्ऋत्य आशिया व उत्तर आफ्रिकेत सापडते; ऑफिसॉरस व्हेंट्रॅलिस ही अमेरिका व मेक्सिकोत आढळते आणि ऑफिसॉरस ग्रॅसिलिस ही हिमालयाच्या पूर्व भागात व ब्रह्मदेशात राहणारी आहे. येथे दिलेले वर्णन जरी ॲपोडस या जातीचे असले, तरी ते इतर जातींनाही बव्हंशी लागू पडणार आहे.

काचसर्प दाट झुडपांत राहणारा आहे. झुडपांच्या खाली पडलेल्या पालापाचोळ्यात तो लपून बसतो. याला झाडावर चढता येत नाही. आणि पाण्यात तो केव्हाही जात नाही. याच्या हालचाली सापासारख्या असल्या तरी शरीरावरील ताठ चिलखतामुळे त्या सापाच्या इतक्या डौलदार नसतात. शरीर सापासारखे असून लांबी १२० सेंमी. पर्यंत असते; शरीराच्या जाड भागाचा व्यास सु. ५ सेंमी. असतो; शरीरावर चौकोनी अस्थिमय तकटे असतात; पाठीचा रंग तपकिरी व खालची बाजू फिक्कट असते; शरीराच्या दोन्ही बाजूंवर मानेपासून शेपटीकडे गेलेली त्वचेची एकेक खोल घडी असते. शेपटी शरीराच्या दोन तृतियांश असते; डोके स्पष्ट व मोठे असून जबडे मजबूत असतात; डोळे पिवळे व लुकलुकणारे असून दृष्टी तीक्ष्ण असते.

गोगलगाई आणि उंदीर हे जरी यांचे मुख्य भक्ष्य असले तरी किडे, कृमी, लहान सरडे, पक्ष्यांची पिल्ले इ. हे खातात. भक्ष्य पकडल्यावर तो त्याला वेगाने गरगर फिरवतो किंवा जोरजोराने हालवितो; यामुळे भक्ष्य बेशुद्ध होते; नंतर चावून चावून त्याचे तुकडे करून तो ते गिळतो. याला शेपटीने पकडला तर तो ती एक हिसडा देऊन तोडून टाकतो व निसटतो. तुटलेले शेपूट बराच वेळ वळवळत असते. याला पकडल्यावर हा चावत नाही, पण हाताभोवती शरीराचे विळखे घालून अतिशय दुर्गंधी येणारी आपली विष्ठा पकडणाऱ्याच्या हाताला चोपडतो. हे प्राणी गरीब आणि बुद्धिमान आहेत.

मादी उन्हाळ्याच्या सुमारास पाचोळ्याच्या खाली सु.सतरा अंडी घालते व ती उबविते. पिल्ले प्रौढ होण्याकरिता कित्येक वर्षे लागतात. अमेरिकेत आढळणारी व्हेंट्रॅलिस ही जाती बरीच लहान पण देखणी असते. ती फक्त किडेच खाते.

कुलकर्णी, स. वि.