औषधिक्रियाविज्ञान : अन्नद्रव्याखेरीज इतर बाह्य पदार्थ शरीरात दिले गेल्यास त्यांच्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास आणि विवेचन करणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या विभागाला औषधिक्रियाविज्ञान असे म्हणतात. अशा बाह्य पदार्थांना औषधी असे म्हणतात. परंतु व्यवहारात मानव व इतर प्राणी यांच्या रोगांचा प्रतिबंध, निदान, उपशम आणि उपचार यांकरिता वापरण्यात येणाऱ्या पदार्थांनाच औषधी (औषध) ही संज्ञा वापरतात.

या व्याख्येप्रमाणे अन्नद्रव्यांचा अभ्यास या शास्त्रात होत नाही तसेच, शरीरातच उत्पन्न होणाऱ्या प्राकृत (सर्वसामान्य) अथवा विकृत पदार्थांचा अभ्यासही या शास्त्रात होत नाही. उदा., इन्शुलीन, थायरॉक्सिन वगैरे पदार्थ शरीरातच उत्पन्न होतात व त्यांचे प्रमाण अनेक रोगांत कमीजास्त होऊ शकते. त्यांच्या संबंधीचा विचार शरीरक्रियाविज्ञान (प्राणिशरीरात घडणाऱ्या क्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान) आणि विकृतिविज्ञान (रोगाचा उद्‌गम, स्वरूप व प्रसार यांच्या अभ्यासाचे विज्ञान) या वैद्यकशास्त्र विभागांत होतो.

वैद्यकशास्त्राच्या इतरही अनेक विभागांचा औषधिक्रियाविज्ञानाशी निकटचा संबंध आहे. जीवरसायनशास्त्र, शरीरशास्त्र वगैरे शास्त्रांप्रमाणेच भौतिकी आणि रसायनशास्त्र यांचाही या विज्ञानाशी संबंध येतो किंबहुना औषधिक्रियाविज्ञान हे जीवशास्त्राचेच एक अंग आहे.

या शास्त्रात शरीरातील घटकद्रव्ये आणि औषधिद्रव्ये यांच्या एकमेकांवर होणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास व विचार केला जातो. या दोहोंचा एकमेकांवर परिणाम झाल्यामुळे घटकद्रव्याप्रमाणेच औषधिद्रव्यामध्येही बदल होत असतो. पुष्कळ वेळा औषधींची क्रिया, त्यांचे परिणाम आणि फल यांमध्ये भेद करता येत नाही.

औषधिक्रियाविज्ञानाचे दोन मुख्य विभाग कल्पिले आहेत: (१)सामान्य औषधिक्रियाविज्ञान आणि (२)विशिष्ट औषधिक्रियाविज्ञान. विशिष्ट औषधांचा शरीरातील विविध तंत्रांवर (संस्थांवर) होणाऱ्या परिणामाचे वर्णन विशिष्ट औषधिक्रियाविज्ञान या विभागात करण्यात येते.

सामान्य औषधिक्रियाविज्ञान

इतिहास : औषधिक्रियाविज्ञान हे मानवाइतकेच जुने आहे. अगदी आरंभापासून मानवाला अनेक आपत्तींशी झगडावे लागले त्यांतच रोगांची गणना होते. रोगांवरील उपायांचा शोधही तेव्हापासूनच सुरू झाला. काही पदार्थ, विशेषतः वनस्पती, शरीरपोषणास उपयुक्त आहेत असे आढळले त्यांचा अन्नात अंतर्भाव झाला. काही पदार्थ विपरित परिणाम करणारे आढळले त्यांचा विषात अंतर्भाव झाला तर काहींमध्ये रोगनिवारणाचे गुण आढळले. अशा पदार्थांची संख्या हळूहळू वाढत गेली व त्यांत खनिज आणि प्राणिज पदार्थांची  भर पडत गेली. हे पदार्थ वापरणारांचा पुढे एक वर्ग उत्पन्न झाला. पुढे लेखनकला अवगत झाल्यानंतर अशा औषधिद्रव्यांच्या याद्या तयार होऊ लागल्या. अशा याद्या आणि शिलालेख बॅबिलन देशात विटांवर लिहिलेले सापडलेले आहेत. ईजिप्त देशात अतिप्राचीन अशा पपायरसातही (पपायरस नावाच्या वनस्पतीपासून तयार केलेल्या विशिष्ट पदार्थांवर केलेल्या लिखाणातही) अशा याद्या आढळतात. इसवी सनापूर्वीलिहिलेल्या भारतातील चरक-सुश्रुतादींच्या प्राचीन ग्रंथांतही अशा द्रव्यांचे वर्णन आढळते.इ.स. चवथ्या शतकातील वाग्भटांच्या अष्टांगहृदय या ग्रंथातही अनेक औषधिद्रव्यांची नावे, स्वरूप, आणि क्रिया यांचे वर्णन आढळते. त्यानंतरच्या काळात औषधिद्रव्यांच्या याद्या देणारे अनेक ‘निघंटु’ या नावाने लिहिलेले ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. सुश्रुतसंहितेत सु. ७०० औषधांची नावे दिली आहेत, तर वाग्भटांनी सु. ४०० वनौषधींचा उल्लेख केला आहे. इ. स. पू. सु. ३,००० वर्षे चीनमध्येही एक औषधिसंग्रह रचिला गेला. त्यातील सु. १०० औषधांपैकी कापूर, एफेड्रा, रुबार्ब ही औषधे आजही प्रचारात आहेत. इ. स. पू. सु. ४६० या वर्षी जन्मलेल्या हिपॉक्राटीझ या प्रख्यात ग्रीक वैद्यांनी व त्यांच्या शिष्यांनी सु. २३६ औषधांचा उल्लेख केलेला आहे. इ. स. पहिल्या शतकातील डायस्कॉरिडीझ यांनी आपल्या ग्रंथात सु. ५०० औषधांचे वर्णन केलेले आहे. हाच ग्रंथ युरोपात १,०००–१,२०० वर्षे आधारभूत मानला जाई. ग्रीक व रोमन साम्राज्ये नष्ट झाल्यावर तेथील विद्वान मंडळी अनेक देशांत विखुरली. त्यांपैकी कित्येक इस्तंबूल, बगदाद व इराण येथे जाऊन तेथे त्यांनी ग्रीक ग्रंथ नेलेव त्यांचे अरबी भाषेत भाषांतर केले. अरबांचे व्यापारी दळणवळण चीन, हिंदुस्थान वगैरे देशांशी असल्यामुळे त्या त्या देशातील बऱ्याच औषधांची त्यांना माहिती मिळाली, इतकेच नव्हे तर चरक-सुश्रुतादी ग्रंथांची त्यांनी अरबी भाषेत भाषांतरेही केली. या सर्व ग्रंथसंपत्तीतील ज्ञानाचा आणि स्वानुभावाचा परिपाक म्हणून अनेकांनी ग्रंथ लिहिले. त्यात इब्‍न सीना (ॲव्हिसेना) यांचा अल-कानून हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध असून त्याचे लॅटिन भाषांतर अनेक शतके पाठ्यपुस्तक म्हणून युरोपात वापरले जाई.

  

पंधराव्या शतकात व त्यानंतर युरोपात नवजागृती होऊन प्राचीन विद्येचे पुनरुज्‍जीवन झाले तेव्हा या प्राचीन ग्रंथांचा फार उपयोग झाला. त्यांतील पुष्कळ ग्रंथांची लॅटिन भाषेत भाषांतरे होऊन ते सर्वांना उपलब्ध होऊ शकले. डायस्कॉरिडीझ यांच्या औषधिसंग्रहात पूर्वेकडील या अरबी ग्रंथांतील अनेक औषधांची भर पडली त्यातच अमेरिकेचा शोध लागल्यानंतर तेथील पुष्कळ औषधे उपलब्ध झाली. अशा अनेक मार्गांनी औषधांची संख्या वाढत गेली. त्या काळात बाह्यौषधी योजकांच्या पाठात एकाच वेळी ४०-५० किंवा त्यांहूनही अधिक औषधे वापरली जात व त्यांचे मिश्रण करण्याची एक कलाच निर्माण झाली तिलाच ⇨ औषधनिर्माणशास्त्र  असे म्हणतात. 

अशा रीतीने उत्पन्न झालेल्या परंपरेला आणि समजुतींना पॅरासेल्सस (१४९३-१५४१)यांनी प्रथमच मोठा धक्का दिला. त्यांनी औषधांविषयीच्या ज्ञानात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि त्यावेळी प्रचलित असलेल्या द्रववादावर आधारलेल्या चिकित्सापद्धतीवर टीका करून ग्रंथाप्रामाण्याच्या ऐवजी स्वानुभवावर जोर दिला. त्यांचे मत असे की, प्रयोग व अनुभव यांच्या कसोटीवरच औषधयोजना असावी. एकाच वेळी अनेक औषधांचे मिश्रण करण्याची पद्धत त्यांनी अमान्य केली. प्रत्येक औषधिद्रव्यामध्ये एखादे विशिष्ट सत्त्व  असते, ते शोधून वापरावे असे त्यांनी प्रतिपादिले. उपदंशावर पारदाचा उपयोग त्यांनी चालू केला. या दृष्टीने पॅरासेल्सस यांना औषधिक्रियाविज्ञानात विशेष स्थान आहे. 


समचिकित्सेचे (होमिओपॅथीचे) संस्थापक हानेमान (१७५५ — १८४३)हे पारंपरिक उपचार पद्धतीच्या विरुद्ध बंड करणारे हे दुसरे वैद्य. त्यांनी पारंपरिक वैद्यकाला ॲलोपॅथी हे नाव देऊन स्वतःच्या पद्धतीला ⇨ होमिओपॅथी हे नाव दिले. त्यांच्या काळातील ॲलोपॅथीमध्ये नीलेमधून आणि जळवा व तुंबड्या लावून त्वचेतून रक्त काढणे, रेचन, वमन इ. अनेक उपचारपद्धती रूढ होत्या व त्या पद्धतींतील आत्यंतिक (अघोरी) मार्गांमुळे कित्येक वेळा रोगी मरत. हानेमान यांनी एकावेळी एकच औषध व तेही सूक्ष्म प्रमाणात देण्याची पद्धत पुरस्कारिली. 

हानेमान यांच्या समचिकित्सेवर जरी वैद्यवर्गाचा नितांत विश्वास बसला नसला, तरी तिच्यामुळे औषधिक्रियांसंबंधीच्या विचारसरणीवर गाढ परिणाम झाला. याच सुमारास मृत्यूनंतर शवाची उत्तरीय परीक्षा होऊ लागली. अशा परीक्षेत शरीरात विकृतद्रव न सापडता अनेक अंतस्त्यांत (पोट व छातीतील इंद्रियांत) विकृती दिसून येऊ लागली. त्यामुळे द्रववादावरील विश्वास उडू लागून निसर्गाची प्रवृत्ती रोगनाशाकडेच असते आणि औषधे फक्त निसर्गाला मदत करू शकतात, असा विश्वास निर्माण झाला. व्हिएन्ना येथील स्कोडा (१८०५ — ८१) यांनी रक्तमोक्षादी उपाय न करताही रोग बरे होतात हे आकडेवारीने सिद्ध केले. 

वापरण्यात येणाऱ्या औषधांची संख्या अमर्याद वाढली. शिवाय उपलब्ध औषधे निर्भेळ असतच असे नाही. त्यामुळे औषधिद्रव्यांचे वर्णन व ते निर्भेळ असल्याच्या कसोट्या देणाऱ्या ग्रंथांची जरुरी भासू लागली. असा पहिला ग्रंथ १४९८ मध्ये फ्लॉरेन्स येथे प्रसिद्ध झाला. पुढे अधिकृत असा पहिला निघंटु १५४६ मध्ये न्यूरेंबर्ग येथील नगरशासनाने प्रसिद्ध केला. त्यानंतर निरनिराळ्या शहरांनी असेच अधिकृत निघंटु प्रसिद्ध केले. १६१८ मध्ये लंडन शहराचा अधिकृत निघंटु प्रसिद्ध झाला. या निघंटूत कोणत्या औषधांचा समावेश असावा हे ठरविण्यासाठी औषधांचे परीक्षण होऊ लागून वेळोवेळी जुन्या आवृत्तीतील काही औषधे काढून टाकण्यात आली व नवीन औषधे समाविष्ट करण्यात आली. अनेक देशांनी असे निघंटु काढले असून आता जागतिक आरोग्य संस्थेने असा एक अधिकृत निघंटु प्रसिद्ध केला आहे [→ औषधिकोश].

फोंताना नावाच्या शास्त्रज्ञांनी अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास प्राण्यांच्या शरीरांवर विषांचे कसे परिणाम होतात ते सप्रयोग दाखविले. १७६७ मध्ये त्यांनी असे सिद्ध केले की, सर्व विषांची एकच क्रिया होत नसून विविध विषांची भिन्नभिन्न क्रिया होते. त्यांनी केलेल्या प्रयोगांची पद्धतच पुढे औषधांच्या संशोधनाकरिता वापरण्यात येऊ लागली. 

रसायनशास्त्राच्या प्रगतीमुळे अनेक औषधिद्रव्यांचे अर्क तयार करून त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास होऊ लागला. १८०४ मध्ये सेरट्यूर्नर या शास्त्रज्ञांनी अफूमधील ‘मॉर्फीन’ या द्रव्याचा शोध लावून त्याच्या गुणधर्माचा कुत्र्यावर आणि स्वतःवर प्रयोग करून अभ्यास केला. माझँडी (१७८३—१८५५) यांनी कुचल्याच्या बियांचे सत्त्व  काढून त्याची क्रिया मेरुदंडावर (पाठीच्या कण्यावर) होते असे दाखविले. शरीरातील विशिष्ट स्थानांवरचऔषधांचा परिणाम होतो,  हे त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले. क्लॉड बर्नार्ड यांनी क्यूरेर या विषाची क्रिया स्‍नायुतंतूतील तंत्रिकाग्रांवर (मज्‍जातंतूंच्या अग्रांवर) होते असे दाखवून दिले. औषधिद्रव्यांची सत्त्वे अथवा अर्क शोधून काढून अशा शुद्ध द्रव्यांचा उपयोग चिकित्सेत होऊ लागला. 

अठराव्या शतकात शरीरक्रियाविज्ञानातही पुष्कळ प्रगती होऊन नव्यानव्या प्रयोग पद्धती उपलब्ध झाल्या. १८४६ मध्ये बुखाइम या जर्मन वैद्यांची औषधिसंग्रह या विषयाच्या प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांनी आपल्या राहत्या घराच्या तळघरातच औषधांच्या प्रायोगिक संशोधनाकरिता एक प्रयोगशाळा काढून तेथे प्रत्येक औषधाची क्रिया शरीरातील कोणत्या ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांवर) होते, याचा अभ्यास केला. त्यांना असे आढळून आले की, प्रचारात असलेली अनेक औषधे निरुपयोगी आहेत. नंतर बुखाइम यांना विद्यापीठाने सुसज्‍ज अशी प्रयोगशाळा बांधून दिली. औषधिक्रियाविज्ञानाचा जन्म यावेळी झाला असे मानतात. श्मिटबर्ग (१८३८ — १९२१)यांनी पुढे या विषयाची विशेष जोपासना व वाढ केली. त्यांच्या हाताखाली देशोदेशीचे विद्यार्थी तयार होऊन त्यांनी आपापल्या देशात औषधिक्रियाविज्ञान शिकविण्यासाठी विद्यासने प्रस्थापित केली. श्मिटबर्ग यांना आधुनिक औषधिक्रियाविज्ञानाचे जनक मानतात. अमेरिका, जपान वगैरे देशांत अशा रीतीने या विषयाच्या स्वतंत्र अभ्यासास सुरुवात झाली. लंडनमध्ये पहिले विद्यासन १९०५ मध्ये स्थापन झाले. पुढे प्रत्येक विद्यापीठात या विषयाला वाहिलेले विद्यासन स्थापन होऊन या विषयाला योग्य असे स्थान मिळाले. 

 सु. १९२० पर्यंत या शास्त्राचे कार्य मुख्यतः विध्वंसक झाले म्हणजे प्रचारात असलेली कित्येक औषधे प्रयोगान्ती निरुपयोगी असल्याचे दाखविण्यात आले  त्यामुळे अधिकृत निघंटूंतील औषधांची संख्या कमी होत गेली. १९२० पासून पुढे मात्र या शास्त्राने विधायक कार्य सुरू केले असे म्हणता येईल. त्या वर्षानंतर औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक संस्था स्थापन केल्या जाऊन त्यांच्या कारखान्यांतून सुसज्‍ज  अशा प्रयोगशाळा स्थापन झाल्या. या कारखान्यांतून नवीन नवीन रासायनिक संयुगे तयार होऊ लागली व त्यांच्या क्रियेचा पद्धतीने शास्त्रीय अभ्यास करून उपयुक्त अशा संयुगांचा औषधे म्हणून वापर होऊ लागला. १९५८ मध्ये १,१४,६०० नवीन संयुगे तयार करण्यात आली व त्यांपैकी अवघी ४४ सर्व कसोट्यांस उतरून प्रत्यक्ष वापरण्यात आली. अशी औषधे नेहमीच उपयुक्त होतात असे नाही. काही काळ वापरल्यानंतर त्यांचे दोष उघडकीला येऊन त्यांचा वापर बंद होतो अथवा त्यांच्यापासून नवीन संयुगे तयार करण्यात येतात. या कारखान्यांतून आता अनेक खात्रीशीर औषधे किंवा प्रतिबंधक द्रव्ये निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस अशा औषधांचे प्रमाण वाढत असून त्यांच्यामुळे अनेक रोगांवर खात्रीलायक इलाज मिळवण्यात आलेले आहेत. मात्र काही वेळा अशा चांगल्या औषधांचा दुरुपयोगही केला जात असल्याचे दिसून आले आहे.

भारतात आयुर्वेदीय औषधांच्या संशोधनासाठी सरकारने कलकत्त्यास व मुंबईस दोन प्रयोगशाळा काढल्या. त्यानंतर लखनौ व दिल्ली येथेही अशा प्रयोगशाळा काढण्यात आल्या असून तेथे शास्त्रीय पद्धतीने औषधांच्या क्रियेचा अभ्यास केला जात आहे. या संशोधन-प्रयोगशाळांतून आजपर्यंत सु. २०० — २५० देशी औषधांचे शास्त्रीय दृष्टीने परीक्षण झाले असून काही औषधे फारशी उपयुक्त नसल्याचे आढळून आले आहे. 


भारतातील या विषयाचे पहिले विद्यासन मुंबईच्या गोवर्धनदास सुंदरदास वैद्यक महाविद्यालयात १९२५ साली स्थापन झाले. आता सर्व वैद्यक महाविद्यालयांत या विषयाची विद्यासने स्थापन होऊन  औषधिक्रियाविज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. 

औषधिक्रियाविज्ञानाच्या प्रगतीत पुढील चार टप्पे दिसून येतात: (१) खनिज, वनस्पतिज आणि प्राणिज पदार्थांचा मूळ स्वरूपात औषधी म्हणून वापर करणे. (२) अशा नैसर्गिक पदार्थांवर काही प्रक्रिया करून त्यांचा औषधी म्हणून वापर करणे. (३)अनेक द्रव्ये एकत्र करून त्यांच्यावर विविध संस्कार करून त्या मिश्रणाचा औषधी म्हणून वापर करणे. (४)उपलब्ध द्रव्यांवर रासायनिक प्रक्रिया करुन त्यांपासून नवीनच पदार्थ बनवून त्याचा औषधी म्हणून वापर करणे. 

औषधे देण्याचे मार्ग : औषधांची क्रिया शरीरावर होण्यासाठी त्यांचा शरीरातील ऊतकांशी प्रत्यक्ष संबंध आला पाहिजे. शरीरात औषधे देण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत: 

(१) त्वचा: त्वचेवर लावून अथवा चोळून औषधे त्वक्‌रंध्रांतून (त्वचेच्या सूक्ष्म छिद्रांतून) शरीरात प्रवेश करू शकतात. पाणी आणि जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी ) औषधे त्वचेच्या मार्गाने शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यासाठी वसा आणि वसाविद्राव्य म्हणजे तेलकट पदार्थात विरघळणारी औषधे वापरतात. उदा., कॉड माशाचे तेल त्वचेवर मालीश करून चोळले असता काही प्रमाणात ते शरीरात शोषिले जाते. त्वचेचा बाह्य थर निर्जीव असल्यामुळे या मार्गाने औषधे स्थानिक क्रियेसाठीच मुख्यतः वापरली जातात. 

(२) श्लेष्मल स्तर: शरीरातील विविध इंद्रियांच्या आतल्या थरावर जो श्लेष्मल (बुळबुळीत) स्तर असतो त्यातून औषधे शरीरात रक्ताद्वारे शोषिली जातात. पचन तंत्राचे मुख्य कार्य अन्नादी बाह्य द्रव्ये शरीरात शोषण्याचे असल्यामुळे हाच मार्ग सर्वांत अधिक प्रमाणात औषधे देण्यासाठी उपयोगात आणला जातो. शरीरातील सर्व श्लेष्मल स्तर सारख्याच प्रमाणात शोषणक्रिया करू शकतात असे नाही. पचन तंत्र सर्वांत अधिक प्रमाणात बाह्य द्रव्ये शोषून घेऊ शकते. तर श्वसन तंत्रातील श्लेष्मल स्तर फक्त वायुरूप द्रव्येच शोषून घेऊ शकतात. मूत्र तंत्रातील श्लेष्मल स्तरातून काहीच शोषण केले जात नाही. तोंडातील व जिभेखालच्या श्लेष्मल स्तरातून औषधे शोषिली जात असल्यामुळे नायट्राइटासारखी औषधे जिभेखाली ठेवण्यात येतात. जठरातून औषधे शोषिली जात नाहीत, परंतु अल्कोहॉलासारखी काही औषधे तेथून रक्तात प्रवेश करू शकतात. औषध पोटात घेतल्यापासून त्याची क्रिया प्रत्यक्ष दिसू लागेपर्यंत काही काळ जावा लागतो. आंत्रातून (आतड्यातून) औषधे शोषिले गेल्यावर ते प्रथम रक्तामार्गे यकृतात जाते व तेथे त्याच्यावर रासायनिक संस्कार झाल्यावरच ते सर्वसाधारण रक्तपरिवहनात प्रवेश करू शकते. आंत्रमार्गाच्या शेवटच्या भागातून म्हणजे गुदांत्रातून काही प्रमाणात औषधे शोषिली जात असल्यामुळे कधीकधी या मार्गाचाही उपयोग करण्यात येतो.

(३) अंत:क्षेपण : (इंजेक्शन). औषधांची क्रिया त्वरित होण्यासाठी ते सुईवाटे शरीरात टोचून देता येते. त्वचेत, त्वचेखाली, स्‍नायूमध्ये किंवा नीलेमध्ये टोचून औषधे शरीरात प्रविष्ट करता येतात. त्वचेखाली एक ते दोन  मिली. एवढे औषध देता येते, तर स्‍नायूमध्ये १० ते १५ मिली. इतके औषध द्रवरूपाने देता येते. नीलेवाटे एका वेळी २०० मिली. किंवा त्याहूनही अधिक द्रव एकावेळी देता येतो. संवेदनाहरणासाठी (बधिर करण्यासाठी) मेरुदंडाच्या बाहेरच्या विवरात औषधे देऊन संवेदनाहरण करणे शक्य होते.

औषधे देताना त्यांचे कार्य कोठे, केव्हा व किती त्वरेने होणे जरूर आहे त्यानुसार हे मार्ग वापरता येतात. औषध कोणत्याही मार्गाने दिले तरी ते रक्तामार्गेच सर्व शरीरातील ऊतकांपर्यत पोहोचते परंतु सर्व ऊतकांवर त्याचा सारखाच परिणाम होतो असे नाही. काही ऊतकांमध्ये विशिष्ट औषधे अधिक प्रमाणात साठून राहतात व त्या ऊतकांवर त्यांचा परिणाम अधिक दिसून येतो. विशिष्ट ऊतकांमध्ये  विशिष्ट औषधांसंबंधी विशेष आकर्षण असल्यामुळे ती औषधे त्या त्या ऊतकांमध्ये अधिक प्रमाणात साठविली जाऊन परिणामकारी होतात. उदा., आयोडीन हे औषध ⇨ अवटू ग्रंथीत, डिजिटॅलीस हे हृद्‌स्‍नायूंत अधिक प्रमाणात साठविले जाते व त्यामुळे त्या त्या स्थळी त्या औषधांचे कार्य अधिक दिसून येते. म्हणून कोणते औषध कोठे साठून राहते व त्याचे कार्य कोठे होते व व्हावयास पाहिजे त्याचा विचार करूनच औषधे देण्यात येतात.

रक्तामार्गे औषधे ऊतकांपर्यत पोहोचून ऊतकांतील कोशिकाकलेशी (पेशीच्या बाह्य आवरणाशी) त्यांचा संबंध आला म्हणजे त्यांची क्रिया सुरू होते. कोशिकांमधील कांही विशिष्ट भागांशी औषधांचा संयोग होतो असे मानण्यात येते त्या विशिष्ट भागाला ‘ग्राहक’ असे नाव असून औषध-ग्राहक-संयोग किती प्रमाणात व किती त्वरेने होतो, त्यावर औषधांची क्रिया अवलंबून असते. विशिष्ट ऊतकांत विशिष्ट औषधांचे ग्राहक अधिक प्रमाणात असल्यामुळे या औषधांचे कार्य त्या ऊतकांत अधिक दिसून येते. या क्रियेला ‘विवेचक क्रिया’ म्हणतात.

औषधांच्या क्रियेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी : औषधांचा क्रियास्थानी होणारा परिणाम अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. उदा., (१) औषधाची संहती (एकक घनफळातील प्रमाण), (२) औषधाची मात्रा, (३) औषध शोषिले जाण्याचा वेग, (४) औषध शोषिले गेल्यानंतर शरीरभर पसरण्याचा वेग, (५) विशिष्ट ऊतकांत औषधे बद्ध होण्याची क्रिया, (६) औषधांचा शरीरात होणारा नाश किंवा रूपांतर, (७) औषधाच्या उत्सर्जनाचा वेग, (८) औषधाचे स्वरूप.

(१) संहती : शरीरात औषध गेल्यावर त्याची क्रिया लगेच होते असे नाही. त्या क्रियेचा प्रकार आणि तीव्रता ही औषधाच्या क्रियास्थानी असलेल्या संहतीवर अवलंबून असतात. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा औषधाचे क्रियास्थानी असलेले प्रमाण कमी असेल तर त्याची क्रिया होत नाही. विशिष्ट मर्यादेपर्यत संहती पोहोचल्यावरच क्रिया सुरू होते. त्या मर्यादेला ‘देहली संहती’ असे म्हणतात. संहतीचे प्रमाण तसेच वाढत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत क्रियेचे प्रमाण वाढत जाते. त्या मर्यादेला ‘वितान संहती’ असे नाव असून त्यापेक्षा ही संहती जरी वाढली तरी क्रिया वाढत नाही. म्हणून वितान संहती सतत टिकून राहील एवढे औषध शरीरात राहील, असे प्रमाण देणे जरूर असते.

(२) मात्रा : क्रियास्थानी औषधाचा परिणाम होण्यासाठी औषधाची विशिष्ट मात्रा देणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ज्या मात्रेमुळे देहली संहतीइतकेच औषध रक्तात मिसळते त्या  मात्रेला ‘किमान सक्रिय मात्रा’ असे म्हणतात, तसेच वितान संहतीइतके औषध दिल्यास त्या मात्रेला ‘कमाल सक्रिय मात्रा’ असे नाव आहे. त्यापेक्षा अधिक मात्रा दिल्यास औषधाचा विपरीत परिणाम होतो. म्हणून औषधाचा वापर करताना परिणामकारक मात्रा तर मिळावी परंतु हानिकारक परिणाम तर होऊ नये, या दृष्टीने औषधाची मात्रा ठरवावी लागते. त्यासाठी एक सूत्र वापरण्यात येते. हे सूत्र प्राण्यांवर प्रयोग करून ठरविण्यात आलेले आहे. प्रयोगांतील शेकडा पन्नास प्राण्यांना मारक ठरलेल्या मात्रेला मारक मात्रा ‘मा. मा. ५०’ असे म्हणतात आणि प्रयोगांतील शेकडा पन्नास प्राण्यांच्या शरीरावर परिणाम करणाऱ्या मात्रेला परिणामी मात्रा ‘प.मा.५०’ असे म्हणतात. मा. मा. ५० ला प. मा. ५० ने भागिले असता जो आकडा येतो, त्याला ‘चिकित्सा निर्देशांक’ असे नाव असून त्या प्रमाणात औषधाची मात्रा बिनधोक देता येते. हे सूत्र पुढीलप्रमाणे मांडतात :


मा. मा. ५०

=चिकित्सा निर्देशांक.

प. मा. ५०

हा चिकित्सा निर्देशांक एकापेक्षा अधिक असला पाहिजे हे स्पष्ट आहे, कारण परिणामकारक मात्रा जर मारक मात्रेपेक्षा अधिक असेल, तर हा निर्देशांक एकापेक्षा कमी होईल म्हणजेच परिणामकारक मात्राच मारक होईल. अशाप्रकारे चिकित्सा निर्देशांक ठरविल्यानंतरच कोणतेही औषध प्रथम प्राण्यांवर व नंतर मनुष्यावर वापरण्यात येते. सर्व निघंटूंमध्ये औषधांची किमान व कमाल मात्रा दिलेली असते. त्या मर्यादेतच औषधांची योजना केली जाते.

औषधिमात्रा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यांपैकी रोग्याचे वजन ही गोष्ट विशेष महत्त्वाची असते. जितके वजन जास्त तितक्या प्रमाणात अधिक औषध द्यावे लागते. स्त्रिया व मुले यांत औषधिमात्रा कमी करावी लागते. साधारणपणे १२ वर्षांच्या आतील व्यक्तीस निम्म्या प्रमाणात औषध देतात.

औषधिमात्रा ठरविताना विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट औषधासंबंधीची संवेदनक्षमताही लक्षात घ्यावी लागते. काही माणसांना काही विशिष्ट औषधे अगदी थोड्या प्रमाणात दिली असताही सोसत नाहीत. याकरिता रोग्याची संवेदनक्षमता ही मात्रा ठरविताना पहावी लागते. वय, वंश, जाती वगैरे अनेक गोष्टींमुळेही मात्रेत बदल करावा लागतो.

(३) औषध शोषिले जाण्याचा वेग : अल्कोहॉलासारखी औषधे फार त्वरित शोषिली जातात, तर इतर औषधे शोषिली जाण्याचे प्रमाण कमीजास्त असते. त्यामुळे त्यांचा परिणाम होण्यास कमीजास्त वेळ लागतो. ही गोष्ट विचारात घेऊन आणि औषधांचा गुण किती त्वरेने होणे जरूर आहे, ते ठरवून औषधे देण्याचा मार्ग ठरवावा लागतो.

(४) औषधांचा शरीरातील प्रसाराचा वेग : औषधे शोषिली गेल्यानंतर ती शरीरात पसरण्याच्या वेगाने फारसे महत्त्व नाही. एकदा औषध रक्तमार्गे शरीरभर पसरले म्हणजे विविध ऊतकांवर त्यांची क्रिया घडू लागते. काही औषधे विशिष्ट ऊतकांवरच क्रिया करीत असल्यामुळे त्यांची क्रिया त्या ऊतकांवरच दिसून येते.

(५) ऊतकात औषध बद्व होण्याची क्रिया : काही औषधांसंबंधी विशिष्ट ऊतकांना आर्कषण असल्यामुळे ती त्या त्या ऊतकांतच साठून राहतात. ऊतकांतील प्रथिनांशी संयोग करून ती राहिल्यामुळे त्यांची क्रिया तेथेच कमीजास्त होऊ शकते. अशा औषधांना बद्ध औषधे असे म्हणतात.

(६) औषधांचा शरीरातील नाश वा रूपांतर : औषधिद्रव्ये आंत्रातून अथवा अन्य मार्गाने शोषिली गेल्यावर यकृतातील कोशिकांमुळे यांच्यात रासायनिक फरक होतो. त्यांचे रूपांतर आणि नाशही यकृत कोशिकांतच होतो. म्हणून औषधांचा परिणामही या क्रियेवर अवलंबून असतो.

(७) औषध उत्सर्जनाचा वेग : बहुधा सर्व औषधे मूत्रमार्गाने बाहेर टाकली जातात. काही आंत्रमार्गाने तर अगदी थोडी श्वसनमार्गाने शरीरातून उत्सर्जित होत असतात. या उत्सर्जनक्रियेच्या वेगावरच औषधांची ऊतकांतील संहती अवलंबून असते. म्हणून पहिली मात्रा उत्सर्जित होण्याच्या सुमारास दुसरी मात्रा देऊन रक्तातील औषधाचे प्रमाण कायम  ठेवण्याचा प्रयत्‍न केला जातो. औषधे दिवसातून तीन वेळा अथवा काही ठराविक मुदतीनंतर पुन्हा देण्यात येतात, त्याचे हेच कारण आहे.

(८) औषधांचे स्वरूप: औषध कोणत्या स्वरूपात दिले जाते यावरच त्याची मात्रा व परिणाम अवलंबून असतो. ज्या  स्वरुपात औषध त्वरित शोषिले जाते व जे स्वरूप यकृतक्रियेमुळे बदलत नाही अशा स्वरूपात ते दिल्यास अधिक परिणामकारी ठरते.

औषधिक्रियेचे प्रकार : शरीरात औषधाची क्रिया झाल्यानंतर ती व्यक्त झाली म्हणजेच आपणाला ती तिच्या परिणामाच्या रूपाने दिसून येते. ज्या इंद्रियावर अथवा ऊतकावर ही क्रिया होते त्या ऊतकाचे जे स्वाभाविक कार्य असते तेच कार्य औषधामुळे वाढते अथवा कमी होते म्हणजे त्या कार्याच्या परिमाणात बदल होतो परंतु कार्यप्रकारात काही बदल होत नाही अथवा त्या ऊतकात एखादे नवीन प्रकारचे कार्य सुरू होत नाही. जेव्हा ऊतकाचे कार्य औषधामुळे वाढते तेव्हा त्या स्थितील ‘उत्तेजन’ असे नाव दिले असून कार्य जेव्हा कमी होते तेव्हा त्याला ‘निस्तेजन’ असे नाव दिले आहे. कार्य तात्पुरते थांबल्यास त्याला ‘स्तंभन’ असे म्हणतात. औषधाची क्रिया संपल्यावर ते पुन्हा पूर्ववत चालू होते.

केव्हा केव्हा औषधाची क्रिया झाली तरी ती स्पष्टपणे दिसून येत नाही. विशेषत: विजातीय असे थोडे प्रथिनमय पदार्थ शरीरात टोचले असता त्याची ऊतकांवर क्रिया होते, परंतु ती त्यावेळी व्यक्त होत नाही शरीर त्या विशिष्ट प्रथिनासंबंधी संवेद्य होते आणि १०—१२ दिवसांनी तेच प्रथिन पुन्हा दिले गेल्यास त्याची गंभीर प्रतिक्रिया दिसून येते. या क्रियेला अत्यधिहर्षण (अतिशय संवेद्यता) असे नाव आहे.

बहुतेक सर्व औषधे क्रियास्थानी कायम रहात नाहीत. कालांतराने त्यांचे रासायनिक अपघटन होऊन (मूळ रेणूचे तुकडे पडून त्याचे लहान रेणू होऊन) ती शरीरातून उत्सर्जित होतात. जलविद्राव्य औषधे मूत्राद्वारे शरीराबाहेर पडतात. तर काही औषधे आंत्रमार्गे अथवा श्वासमार्गे बाहेर पडतात, अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांच्या दुधातूनही काही औषधे बाहेर पडत असल्यामुळे बालकावर त्या औषधांचा परिणाम होऊ शकतो.

औषधे बराच काळपर्यंत घेत राहिल्यास काहींचा परिणाम कमी होत जातो व त्यामुळे मात्रा हळूहळू वाढवावी लागते. काही औषधे अधिक काळ घेतली असता त्यांपासून त्या औषधांची सवय किंवा व्यसन लागण्याचा संभव असतो. अशा औषधांपैकी अफू व तिच्यापासून काढलेले विविध अर्क महत्त्वाचे आहेत.


काही औषधे बराच काळ घेत राहिल्यास त्यांचा शरीरात संचय होतो व त्यामुळे चिरकारी (कायम स्वरूपाची ) बिषबाधा होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिजिटॅलीस हे औषध. हृद्‌स्‍नायु -विकारावर हे औषध उत्तम गुणकारी आहे. परंतु हे सतत देत राहिल्यास शरीरात साठून राहून त्याचा हृद्‌स्‍नायूंवर विपरीत परिणाम होतो. औषधे उत्सर्जित होण्याचा वेग कमी झाला असता अशीच चिरकारी विषबाधा ते औषध संचित होऊन होऊ शकते. वृक्क (मूत्रपिंड) विकारांमध्ये उत्सर्जन कमी होऊ लागले तर अशी चिरकारी बिषबाधा होऊ शकते.

औषधे शरीरातून बाहेर पडताना मूळ स्वरूपात बहुधा बाहेर पडत नाहीत. त्यांचा ऑक्सिजनाशी संयोग होऊन अथवा त्या औषधाच्या घटकांतील  ऑक्सिजन नाहीसा होऊन जे नवे संयुग निर्माण होते, त्या स्वरूपात ते उत्सर्जित होते. याशिवाय औषधाचे घटक भंगणे, युगलीभवन होणे (घटक एकत्र होणे), संश्लेषण होणे (घटक रेणू एकत्र येऊन नवीन पदार्थ तयार होणे) वगैरे अनेक प्रकारांनी त्याच्या घटनेत फरक पडल्यानंतर ते उत्सर्जित होते.

औषधिक्रियेचे स्वरूप : औषधांचे ऊतकांवर अथवा त्यांतील कोशिकांवर होणाऱ्या परिणामाचे अनेक प्रकार आहेत :

(१) कोशिकांच्या प्राकृत चयापचयामध्ये (शरीरात होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींमध्ये ) जे रासायनिक पदार्थ उत्पन्न होतात त्यांच्याशी समरूप असलेले पदार्थ औषधे म्हणून वापरल्यास त्यांचा कोशिकांवर परिणाम होतो. त्याला जैव प्रतिक्रिया असे म्हणतात.

(२) काही पदार्थांचाअसा  गुणधर्म असतो की, त्यांच्यामुळे दुसरी औषधे, विशेषत: धातुजन्य औषधे, अधिक प्रमाणात ओढली जाऊन कोशिकांशी विशेष संयोग पावू शकतात. या पदार्थांचा उपयोग केल्यास ती दुसरी औषधे अधिक परिणामकारी ठरतात. त्या पदार्थाना ‘ग्राभी’ पदार्थ असे म्हणतात. लोह देताना याचा उपयोग केला जातो.

(३) काही पदार्थांचे शरीरात विभाजन होऊन त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या रासायनिक संयुगांची क्रिया कोशिकांवर होत असते. असे पदार्थ बहुधा कोशिकांच्या चयापचय क्रियेमध्ये अडथळा आणतात व त्यामुळे कोशिकाकार्य निस्तेजित होते.

(४) काही औषधिपदार्थांमुळे शरीरातील उत्प्रेरण क्रियेस (विक्रियेत भाग न घेणाऱ्या पदार्थाच्या साहाय्याने विक्रियेची गती वाढविण्याच्या क्रियेस) आवश्यक असा बदल पदार्थात घडवून आणला जातो व त्यामुळेही कोशिकाकार्य निस्तेजित होऊ शकते.

(५) औषधे कोशिकेमध्ये प्रविष्ट झाल्यानंतरच त्यांची क्रिया होत असते. कोशिकेच्या भोवती असलेल्या कलेतून (आवरणातून) किती त्वरेने औषध आत शिरू शकते त्यावर औषधिक्रिया अवलंबून असते.

औषधिक्रियाविज्ञानाच्या सीमा : औषधे, ती तयार करण्याचे प्रकार, त्यांचे गुणधर्म, मात्रा आणि स्वरूप यांचा विचार ओषधिक्रियाविज्ञानात होतो. त्याकरिता खालच्या वर्गातील प्राण्यांवर प्रयोग करून पाहणे ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. असे प्रयोग या शास्त्राच्या कक्षेतच येतात. हे प्रयोग शरीरक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि विकृतिविज्ञान या शास्त्रांतील प्रयोगांप्रमाणेच असून ती सर्व शास्त्रे एकमेकांशी इतकी निगडित आहेत की, एकाची सीमा कोठे संपते व दुसऱ्याची कोठे सुरू होते हे कित्येक वेळा समजून येणे दुरापास्त असते. औषधिक्रियाविज्ञानाचा व विषविज्ञानाचा तर इतका निकटचा संबंध आहे की, विषविज्ञान ही औषधिक्रियाविज्ञानाचीच प्रगत  शाखा मानली जाते.

इ. स. १९५० नंतरच्या काळात औषधनिर्मितीच्या पद्वतीत खूपच प्रगती झाली असून जगातील सर्व देशांतून रोज नवीनवी औषधे तयार होत आहेत. वनस्पती आणि प्राणी यांवर अवलंबून न राहता कृत्रिम तऱ्हेने नवीन औषध तयार करण्याची प्रवृत्ती अधिकाधिक वाढत असून विशिष्ट ऊतकांवर विशिष्ट क्रिया करणारी औषधे तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्‍न सुरू आहे. अशा तऱ्हेने दरवर्षी लाखो नवीन औषधे तयार होत असून त्यांचा उपयोग करण्यापूर्वी खालच्या वर्गातील प्राण्यांच्या शरीरावर त्यांचा परिणाम काय व कसा होतो हे पाहण्यात येते. अशा तऱ्हेने प्राण्यांवर प्रयोग करून सुरक्षित ठरलेली औषधे प्रथम स्वयंसेवकांवर वापरली जातात व त्या कसोटीतून ती पार पडल्यासच त्यांचा सर्वसाधारण उपयोग करण्यात येतो. औषधांचा उपयोग सर्रास करण्यापूर्वी अतिशय काळजी घेण्यात येत असली, तरी कित्येक वेळा घाईने व पुरेशा दीर्घ कसोट्या न लावता औषधे वापरली तर भयंकर दुष्परिणाम झाल्याची उदाहरणेही क्वचित घडली आहेत. उदा., गरोदरपणीच्या पहिल्या २-३ महिन्यांत मळमळ, उलट्या वगैरे होतात. त्यांवर थॅलिडोमाइड हे औषध गुणकारी ठरल्याबरोबर त्या औषधाचा सर्रास वापर सुरू झाला. नंतर असे लक्षात आले की, हे औषध घेतलेल्या गरोदर स्त्रियांपैकी कित्येकींना हातपाय नसलेली अथवा इतर व्यंगे असलेली मुले झाली. अर्थात त्यानंतर ते औषध  वापरण्याचे बंद झाले. या उदाहरणावरून औषधाचा सर्रास वापर होण्यापूर्वी किती कटाक्षाने त्याचे प्रयोग करावे लागतात हे सिद्ध होते. तसेच अणुयुगामध्ये नवीन उपलब्ध झालेल्या ज्ञानाचा उपयोग करून औषधांचा ऊतकांवर कसा व काय परिणाम होतो याचा अभ्यासही चालू आहे. समस्थानिके [अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार, → समस्थानिक] वापरून ती शरीरातील कोणत्या ऊतकात अधिक प्रमाणात जातात व तेथे परिणाम करतात त्याबद्दलचे प्रयोगही चालू आहेत. विवक्षित परिणाम घडवीत असताना इतर काही विपरीत परिणाम घडवून आणणार नाहीत अशी औषधे उत्पन्न करण्याची शास्त्रज्ञांची खटपट आहे. त्यामुळे रोगनिदान झाले म्हणजे नेमके त्या रोगकारणाचा नायनाट करणारे औषध मिळविणे शक्य होईल असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

औषधिद्रव्यांचा परिणाम शरीरावर कसा होतो हे पाहताना एका गोष्टीची विशेष प्रमाणात दखल घेतली जाते. रोग्याच्या आणि औषध देणाऱ्या वैद्याच्या मनाचा परिणाम औषधिक्रियेवर होतो असे आढळून आले आहे. उदा., अगदी काहीही औषधिक्रिया न करणारा साखरेसारखा पदार्थ रोग्याला दिला, तर त्याच्या मनावर परिणाम झाल्यामुळेही लक्षणांत फरक पडलेला दिसून येतो. म्हणून खुद्द औषधाचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी एकाच रोगाच्या दोन वा अधिक रोग्यांना असा साखरेसारखा पदार्थ आणि औषध देण्यात येते व त्यांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येतो. खुद्द वैद्याच्या मन:स्थितीचा परिणाम होऊ नये म्हणून अशा तऱ्हेचा प्रयोग वैद्यालाही न कळता करण्यात येतो. या निष्क्रिय पदार्थाला तोषक (प्‍लॅसीबो) असे नाव असून एकपरोक्ष (वैद्य व रोगी यांपैकी कोणातरी एकाला औषधाची माहिती असताना करण्याची) आणि द्विपरोक्ष (वैद्य व रोगी या दोघांनाही औषधाची माहिती नसताना करण्याची) परीक्षा करूनच औषधांची परिणामकता ठरविण्यात येते. अशा तऱ्हेने प्रथम खालच्या प्राण्यांवर व नंतर मनुष्यावर एकपरोक्ष अथवा द्विपरोक्ष पद्वतीने तपासून उपयुक्त ठरलेली औषधेच प्रत्यक्ष व्यवहारात वापरली जातात.

विसाव्या शतकात अनेक विभागांत झालेल्या रासायनिक तंत्रविद्येच्या प्रगतीमुळे व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांमुळे नवीन उपयुक्त औषधांचे पृथक्करण, शुद्धीकरण व रासायनिक संरचना ओळखणे ही कार्ये सुलभतेने होऊ लागलेली आहेत. असंख्य प्रयोगांमुळे मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण व सांख्यिकीय पृथक्करण संगणकामुळे (गणितकृत्य करणाऱ्या यंत्रामुळे) अतिजलद होऊ शकते. औषधिक्रियाविज्ञानात झालेल्या प्रगतीवरून अधिकाधिक परिणामकारक आणि कमी धोक्याची औषधे शोधण्यात येतील असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.


औषधिक्रियाविज्ञानाचे स्थूलमानाने पुढील पोटभेद मानलेले आहेत: (१) रासायनी चिकित्सा : जंतू व त्यांच्या विषांविरुद्ध क्रिया करणारी औषधे, (२) औषधिचिकित्सा : ऊतकांची क्रिया प्राकृतावस्थेप्रमाणे करणारी औषधे, (३) औषधिगतिकी : औषधांची क्रिया कशी होते त्या तंत्राचा अभ्यास यात यांत्रिक, विद्युत् वगैरे साधनांचा उपयोग करतात, (४) विषविज्ञान, (५) मानसिक औषधिचिकित्सा, (६) जीवरासायनी औषधिचिकित्सा, (७) औषधांच्या चयापचयाचा अभ्यास.

पहा : औषधिचिकित्सा रासायनी चिकित्सा विषविज्ञान.

विशिष्ट औषधिक्रियाविज्ञान

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रावर परिणाम करणारी औषधे : या औषधांचे पुढील प्रकार आहेत : (अ) शुद्धिहारके, (आ) शामके, (इ) शायके, (ई) शांतके, (उ) वेदनाहारके, (ऊ) ज्वरशामके, (ए) स्थानिक संवेदनाहारके, (ऐ) कंपवात व अपस्मार यांवरील औषधे आणि (ओ) मनोविकारांवरील औषधे.

(अ) शुद्धिहारके : काही वायुरूप आणि शीघ्र बाष्पीभवन होणाऱ्या द्रव-औषधी हुंगावयास दिल्या असता तंत्रिका तंत्रातील (मज्जासंस्थेतील) उच्च केंद्रांचे दमन होऊन शुद्धी हरपते. अशा स्थितीत संवेदनांची जाणीव होत नाही. त्यामुळे ही औषधे वापरून शस्त्रक्रिया सुलभतेने करता येते. उदा., नायट्रस ऑक्साइड, सायक्लोप्रोपेन, एथिलीन यांसारखे वायुरूप पदार्थ ईथर (डायएथिल ईथर), व्हिनिल ईथर, मिथिल एथिल ईथर, क्लोरोफॉर्म, एथिल क्लोराइड, ट्रायक्लोर एथिलीन, हलोथेन, मिथॉक्सिफ्ल्युओरेन यांसारखे शीघ्र बाष्पनशील द्रव.

काही बार्बिच्युरेटांचे विद्राव नीलेवाटे दिले असता शुद्धिहरण करता येते उदा., थायोपेंटेन सोडियम (पेंटोथॉल).

वरील सर्व शुद्धिहारकांची अतिमात्रा दिली गेल्यास श्वसनकेंद्राचे आणि हृदकेंद्राचे दमन होऊन त्यांचे कार्य बंद पडू शकते. काही औषधांमुळे हृदस्पंदन अनियमित होण्याचा संभव असतो. रक्तदाब कमी होतो. बार्बिच्युरेट या औषधांमुळे स्वरयंत्राचा संकोच होण्याचा धोका असतो. शुद्धिहारकांची कार्यपद्धती अजून निश्चितपणे समजलेली नाही.

(आ आणि इ) शामके आणि शायके : तंत्रिका तंत्राचे दमन आवश्यक प्रमाणात झाल्यास रोग्याला शांतता मिळून नैसर्गिक झोप लागू शकते. या प्रकाराच्या औषधांना शामके असे म्हणतात. ही औषधे अधिक प्रमाणात दिल्यास झोप अनिवार्य होते म्हणून त्यांना या परिस्थितीत शायके असे नाव देतात. उदा., बार्बिच्युरेटे, क्लोरल हायड्रेट, ग्‍लुटेथिमाइड, एथिनामाइड, ब्रोमाइडे वगैरे.

या औषधांचा उपयोग केल्यास झोप संपल्यानंतर काही वेळ गुंगल्यासारखे वाटते. त्याला शेष परिणाम असे म्हणतात.

(ई) शांतके : क्षुल्लक कारणामुळे अथवा अनाठायी वाटणारी चिंता आणि रोगांसंबंधी वाटणारी भीती यांचे निवारण करण्यासाठी या औषधांचा उपयोग होतो. या औषधामुळे  तंत्रिका तंत्राचे अविशिष्ट दमन न होता चिंता कमी होते त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी न होता थोडीबहुत वाढतेच. अनैसर्गिक काळजी दूर झाल्यामुळे शांत झोप येते. उदा., मेप्रोबामेट क्लोरडायझेपॉक्साइड, ऑक्साझेपाम, डायझेपाम हायड्रॉक्सिझीन इत्यादी.

(उ आणि ऊ) वेदनाहारके आणि ज्वरशामके : वेदनाहारके दोन प्रकारची असतात : (१) मादक आणि (२) अमादक.

(१) मादक वेदनाहारके प्रभावी असतात. परंतु त्यांचे परिणाम मादक असतात. वेदनाहरणाबरोबरच या प्रकाराच्या औषधाच्या आनुषंगिक परिणामामुळे गुंगी येते या औषधांची क्रिया तंत्रिका तंत्रातील उच्च केंद्रावर होते. त्यामुळे संवेदनानाश होत नाही, परंतु संवेदनांची जाणीव कमी होते. रोग्याला वेदना समजल्या तरी तो त्याकडे दुलर्क्ष करू शकतो म्हणजेच त्याची वेदनाविषयक प्रतिक्रिया बदलते. हात, पाय, सांधे वगैरे ठिकाणच्या वेदनांपेक्षा शरीरातील अंतस्त्यांत उत्पन्न होणाऱ्या वेदना या मादक वेदनाहारकांमुळे कमी करता येतात. ही औषधे सतत वापरल्यास त्यांचे व्यसन जडण्याचा संभव असल्यामुळे त्यांचा उपयोग काही मर्यादित कालापर्यंतच केला जातो (उदा., हृद्‌जन्य अथवा कर्कजन्य वेदना). या प्रकारची उत्तम  औषधे म्हणजे अफूपासून तयार केलेले मॉर्फीन, पेथिडीन, मिथॅडोन वगैरे अर्क. मॉर्फिनाची मात्रा अधिक झाल्यास श्वसनकेंद्राचे क्रमश: दमन झाल्यामुळे श्वसन क्रिया बंद होण्याची भीती असते.


(२) अमादक वेदनाहारकांमुळे गुंगी येत नाही. त्यांची क्रिया सौम्य असून ती संवेदनावाहक तंत्रिका तंतूंवर होते. स्‍नायू, सांधे वगैरे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या वेदना संवेदना अभिवाही (वर मेंदूकडे जाणाऱ्या) मस्तिष्क केंद्रातच थांबविल्या जातात व त्यामुळे मस्तिष्कातील उच्च केंद्रातून त्यांची जाणीव होऊ शकत नाही. या औषधांची क्रिया अभिवाही मस्तिष्क केंद्राच्या तळाशी असलेल्या तापमान नियंत्रक केंद्रावर होत असल्यामुळे तापमान कमी होते म्हणून त्यांचा ज्वरशामके म्हणूनही उपयोग करतात. मात्र नेहमी वापर केल्यास या प्रकारातील काही औषधांचा अस्थिमज्जेवर (हाडांतील पोकळ्यांत असणाऱ्या मऊ पदार्थावर) गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. उदा., ॲस्पिरीन, फेनॅसिटीन, पॅरॅसेटॅमॉल, अमायडोपायरीन, फिनिल ब्युटाझोन वगैरे.

(ए) स्थानिक संवेदनाहारके : यांचा उपयोग एखाद्या विशिष्ट भागातील संवेदना कमी करून तो भाग बधिर करण्यासाठी करतात. या प्रकाराच्या औषधांची क्रिया तंत्रिका तंतूमधून तंत्रिका संवहनाला विरोध करण्याची असल्यामुळे स्थानिक शस्त्रक्रियेसाठी ही औषधे वापरतात. ही औषधे तीन मार्गांनी वापरता येतात : (१) त्वचा, मुख, नेत्र वगैरे श्लेष्मल स्तरावर बाहेरुन लावून. उदा., कोकेन, (२) त्वचेखाली वा श्लेष्मल स्तराखाली टोचून. उदा., नोव्हेकेन आणि (३) कटिभागातील दोन मणक्यांमधील जागेतून अंत:क्षेपण करून अथवा तंत्रिका तंतूभोवती टोचून मेरुरज्‍जू वा तंत्रिका यांच्यामधून होणाऱ्या तंत्रिका संवेदनावहनात व्यत्यय उत्पन्न करून. यालाच मेरुरज्‍जू अथवा तंत्रिका-संवहन व्यत्यय प्रकार असे म्हणतात.

(ऐ) कंपवात आणि अपस्मार यांवर वापरण्यात येणारी औषधे : कंपवातात शरीरात कंप होणे, स्‍नायु कठीण होणे वगैरे लक्षणे दिसतात. त्या विकारावर अट्रोपीन व तत्सम बेन्झोट्रोपीन, पासिटेन वगैरे औषधे वापरतात. तसेच हिस्टामिनविरोधी औषधे व एलडोपा हे औषधही या विकारात वापरतात. काही औषधांच्या उपयोगानंतर कंपवाताची लक्षणे दिसतात. उदा., रेसर्पिन, क्लोरप्रोमॅझीन, प्रोक्लोरपेरॅझीन वगैरे.

अपस्माराचे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांत शुद्धी नाहीशी होते. झटके व बेशुद्धी असल्यास त्या प्रकाराला बृहत्-अपस्मार आणि अगदी क्षणभर बेशुद्धी असते त्या प्रकाराला लघु-अपस्मार  असे म्हणतात. बृहत्-अपस्मारात डायलँटिन, फिनोबार्बिटोन आणि लघु-अपस्मारात ट्रायडिओन, झरोन्टिन, फिनिल ॲसिटल यूरिया ही औषधे वापरतात.

या दोन्ही विकारांवरील औषधांचा उपयोग केवळ लक्षणे कमी अथवा नाहीशी करण्यासाठीच होतो. वेळीच दिल्यास लक्षणांचा प्रतिबंधही होऊ शकतो. परंतु त्यामुळे रोगाचे मूळ कारण नाहीसे होत नाही. ही औषधे चालू असताना गुंगी, झोप येणे, शरीराचा तोल जाणे वगैरे विपरीत लक्षणे होऊ शकतात [→ कंपवात अपस्मार].

(ओ) मनोविकारावरील औषधे : मनोविकारअसलेल्या रोग्यांमध्ये असंबद्ध बडबड, वाचाळता, मनाची अस्थिरता, शरीराच्या अनावश्यक व निरुपयोगी हालचाली, भावनांचा उद्रेक वगैरे लक्षणे दिसतात. त्यामुळे या रुग्णांची शुश्रूषा आणि उपचार करणे फार कठीण होते. अशा वेळी या औषधांचा उपयोग होतो. त्यांच्यामुळे रुग्णांशी विचारविनिमय करून मानसोपचार आणि त्यांचे जीवनातील पुनर्वसन करणे सुलभ होते.

या सर्व औषधांचे त्यांच्या रासायनिक घटनेनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतात.

(१) फिनोथायाझीन गट : क्लोरप्रोमॅझीन, ट्रायफ्‍लूपेरॅझीन, प्रोक्लोरपेरॅझीन,थायोरिडॅझीन,प्रोमेझीन, ट्रायफ्‍लूप्रोमॅझीन वगैरे. यांची क्रिया खुद्द तंत्रिका कोशिकांवर होऊन निरनिराळ्या तंत्रिका केंद्रांतील तंत्रिकासंवहन बंद पडल्यामुळे मनोविकाराचे स्वरूप सौम्य होते.

(२) रेसर्पिन गट : सर्पगंधा या भारतीय वनस्पतीच्या मुळांपासून रेसर्पिन, रिसेनामीन, डी-सर्पिडीन ही संयुगे मिळतात. या वनस्पतीचा उपयोग प्राचीन भारतीय वैद्यकात केला जात असे. या वनस्पतीला ‘पागलका दवा’ म्हणत. आधुनिक वैद्यकात या वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने रक्तदाबाधिक्यावर करतात. आ. श्री. परांजपे आणि रुस्तुमजाल वकील या शास्रज्ञांनी या औषधीचा परिचय पाश्चात्त्य वैद्यकाला करून दिला. या औषधीमुळे अभिवाही मस्तिष्ककेंद्राच्या तळाशी असलेल्या काही तंत्रिका तंतूंमधील मोनोअमाइनांचे (नॉरॲड्रेनॅलीन, ॲड्रेनॅलीन, सिरोटोनीन यांचे) प्रमाण कमी होते. म्हणून या  वनस्पतीचा मनोविकारांतही उपयोग होतो.

या औषधामुळे क्वचित नाक चोंदणे, झोप वा  गुंगी येणे, पचनज व्रण (अम्‍लीय पाचकरसांमुळे अन्ननलिका, उदर वा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होणारी जखम), जठरशोथ (जठराची दाहयुक्त सूज), कंप वगैरे लक्षणे होऊ शकतात.

(३) ब्युटिरोफिनोन गट : या गटात हॅलीपेरिडॉल, ट्रायपेरिडॉल वगैरे औषधे येतात. त्यांचा उपयोग व विपरीत परिणाम फिनोथायाझीन सारखेच असतात.

विषष्णता या मनोविकारातील रोगी निष्क्रिय असतात. त्यांना खाण्यापिण्याची व इतर दैनंदिन कार्यांचीही आठवण रहात नाही. आपल्या भोवतीच्या परिस्थितीसंबंधीही ते उदासीन असतात. मनात आत्महत्येचे विचार येत असतात आणि मुद्रा अगदी निर्विकार असते.


या रोगाकरिता दोन प्रकारांची औषधे उपलब्ध आहेत : (१) एंझाइमांचे (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांचे) कार्य मंदावणारी औषधे : मोनोअमाइन-ऑक्सिडेज या एंझाइमाचे कार्य मंदावणारी नियालमाइडे, आयसोकार‌्बॉक्सिझीड.

ही औषधे वापरली असता नॉरॲड्रेनॅलीन, ॲड्रेनॅलीन, डोपमीन वगैरे एक अमाइन गट असणाऱ्या संयुगांचे प्रमाण वाढून रोग्यात सुधारणा होऊ शकते परंतु या औषधांमुळे यकृतावर विपरीत  परिणाम होऊन कावीळ वगैरे लक्षणे आणि रक्तदाब वाढणे हे प्रकार दिसतात. म्हणून विषष्णताविरोधाकरिता खालील दुसऱ्या प्रकाराची औषधे अधिक प्रमाणात वापरतात.

(२) त्रिवलयी रसायन गट असलेली औषधे : ही औषधे तंत्रिका कोशिकांतील जीवद्रव्यातील कणांमध्ये न शिरता जीवद्रव्यातच मुक्त स्वरूपात असतात. उदा., इमिप्रामीन, ॲमिट्रीप्टीलीन. ही औषधे वरील औषधांबरोबर वापरल्यास फार गंभीर परिणाम होत असल्यामुळे ती एकत्र वापरीत नाहीत.

स्वायत्त तंत्रिका तंत्रावर परिणाम करणारी औषधे : शरीरात चालू असलेल्या इच्छानुवर्ती नसलेल्या घडामोडींचे नियंत्रण ज्या तंत्रामुळे होते त्याला स्वायत्त तंत्रिका तंत्र म्हणतात. हे कार्य दोन घटकांद्वारे चालते : (अ) अनुकंपी आणि (२) परानुकंपी.

(१) अनुकंपी तंत्रिका तंत्र : याच्या कार्यामुळे शरीराभोवतीच्या घडामोडीस व संभाव्य धोक्यास तोंड देण्याचे व शरीराचे संरक्षण करण्याचे काम होत असते. हृदयाच्या स्‍नायूंची आकुंचनशक्ती वाढल्यामुळे हृद्‌स्पंदन आणि हृद्‌वेग वाढतो. रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तदाब वाढतो. यकृतातील मधुजनाचे (ग्‍लायकोजेनाचे) द्राक्षशर्करेत (ग्‍लुकोजात) रूपांतर होण्याचा वेग वाढतो. या सर्वांमुळे शरीर अधिक संरक्षणक्षम बनते म्हणून या तंत्राला संरक्षक तंत्र असे नावही देण्यात येते. औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने या तंत्राला ॲड्रिनोत्पादक म्हणजे ⇨ अधिवृक्क ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या ॲड्रेनॅलीन या पदार्थाचे अधिक उत्पादन करणारे तंत्र असे म्हणतात. या तंत्रावर कार्य करणाऱ्या बहुतेक सर्व औषधांनी भूक कमी होत असल्यामुळे वजन कमी करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधांत या प्रकाराची औषधे अंतर्भूत असतात.

(अ) अनुकंपी तंत्राचे उत्तेजन करणारे पदार्थ : (१) श्वासनलिकांचे प्रसरण करणारी औषधे : ॲड्रेनॅलीन, एफेड्रीन, आयसोप्रिनॅलीन, ऑर्सिप्रिनॅलीन वगैरे. या औषधांचा दम्याच्या विकारात उपयोग होतो.

(२) रक्तवाहिन्यांचा संकोच करून रक्तदाब वाढविणारी औषधे : ॲड्रेनॅलीन, नॉरअड्रेनॅलीन, मिथीड्रीन, मेफेंटरमाइन, मिथाक्समीन वगैरे.

(३) हृद्‍‍‌स्पंदनाचे उत्तेजन करणारी औषधे : ॲड्रेनॅलीन, आयसोप्रिनॅलीन.

(४) मध्यवर्ती तंत्रिका तंत्रांचे उत्तेजन करणारी आणि भूक कमी करणारी औषधे : ॲम्फेटामीन, डेक्स्ट्रो-ॲम्फेटामीन, मिथिड्रीन.

या सर्व औषधांमुळे छातीत धडधड, अतिरक्तदाब इ. विकार होणे शक्य असल्यामुळे रक्तदाबाच्या अणि हृद्‌विकाराच्या रोग्यांमध्ये त्यांचा वापर फार काळजीने करावा लागतो.

(आ) अनुकंपी तंत्राचे अवरोधन करणारे पदार्थ : ॲड्रेनॅलिनाचे कार्य ऊतकातील ग्राहकांशी त्या पदार्थाचा संयोग झाल्याने होते. ॲड्रेनॅलिनसदृश रासायनिक पदार्थ ऊतकांच्या ग्राहकस्थानी आधीच येऊन संयुक्त झाले असतील, तर ॲड्रेनॅलीन त्या ग्राहकस्थानांशी संयुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे ॲड्रेनॅलिनाच्या कार्याला रोध होतो. अशा पदार्थांना अनुकंपी-अवरोधके असे म्हणतात. या अवरोधकांचे दोन मुख्य प्रकार कल्पिलेले आहेत. त्यांना अनुक्रमे आल्फा आणि बीटा अवरोधके असे म्हणतात. ग्राहकांमध्ये आढळणाऱ्या आल्फा व बीटा अशा दोन प्रकारांवरून ही नावे पडली आहेत.

आल्फा अवरोधके : अरगटामीन, प्रिस्कोलीन, फेंटोलामीन, डायबेनामीन आणि डायबेझीलीज वगैरे. यांचा उपयोग हातापायांतील रक्तवाहिन्यांचे प्रसरण करण्याकरिता करतात.

बीटा अवरोधके : डी. सी. आय., प्रोपेनॉलॉल वगैरे. यांचा उपयोग हृदस्पंदने कमी करण्यासाठी आणि हृद्‌कार्य लयबद्व होण्यासाठी करतात.


(२) परानुकंपी तंत्रिका तंत्र : याच्या कार्यामुळे शरीरामध्ये बाह्य पदार्थांचे अवशोषण व साठा करण्याच्या कामाचे नियंत्रण होत असते. म्हणून या तंत्राला संग्राहक तंत्र असे म्हणतात. या तंत्राची क्रिया ॲसिटिलकोलीन या पदार्थाच्या द्वारे होत असल्यामुळे औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने या तंत्राला कोलिनोत्पादक तंत्र असे म्हणतात. ॲसिटिलकोलीन या पदार्थाची उत्तेजक क्रिया भिन्नभिन्न स्थानी होते. (अ) तंत्रिका गुच्छिकांवर (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांच्या समूहांवर), (आ) परानुकंपी तंत्राच्या गुच्छिकोत्तर तंतूंच्या टोकांशी असलेल्या इच्छानुवर्ती नसलेल्या अंतस्त्यांवर, (इ) इच्छानुवर्ती स्‍नायू व त्यांचे तंतू यांच्या संधिस्थानावर.

(अ) तंत्रिका गुच्छिका : परानुकंपी तंत्रातील गुच्छिकांचे उत्तेजन झाल्यामुळे गुच्छिकोत्तर तंत्रिका तंतूंवर पुढील परिणाम दिसतो. अनैच्छिक स्‍नायूंचे आकुंचन होते श्वासनलिका आकुंचन पावतात बाहुल्या संकुचित होतात हृदयाच्या स्पंदनाचा जोर आणि वेग कमी होतो रक्तदाब कमी होतो पचन तंत्रातील स्‍नायूंचे आकुंचन झाल्यामुळे गुदांत्रातून मल बाहेर टाकला जातो मूत्राशयाच्या आकुंचनामुळे मूत्रविसर्जन होते सर्व ग्रंथींचे स्राव वाढतात लाळ जास्त येते घाम येतो जठरात अम्‍ल आणि पाचकरसांचा स्त्राव अधिक होतो अग्‍निपिंडातून पाचक रस ग्रहणीमध्ये (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये) अधिक प्रमाणात उतरतो.

(आ) गुच्छिकोत्तर तंतूंच्या टोकांशी असलेल्या अनैच्छिक अंतस्त्यांतील ऊतकांवर ॲसिटिलकोलिनाच्या प्रत्यक्ष क्रियेमुळे वरीलप्रमाणेच परिणाम दिसतात. तंत्रिका तंतूंमध्ये मुक्त झालेले ॲसिटिलकोलीन कोलीनएस्टरेज या एंझाइमामुळे नाश पावते व त्यामुळे त्याची क्रिया मर्यादित केली जाते.

(इ) इच्छानुवर्ती स्‍नायूंच्या तंतूंकडे जाणाऱ्या तंत्रिका तंतूंच्या ग्राहकातून ॲसिटिलकोलीन मुक्त झाले म्हणजे स्‍नायूंचे आकुंचन होते.

ॲसिटिलकोलीन व तत्सम पदार्थ तीन प्रकारांचे असतात : (१) ॲसिटिलकोलीन व तत्सम एस्टरे : कार्बाकॉल मिथॅकोलीन (२) प्रतिकोलीन एस्टरेज रसायने : फायसोस्टिग्मीन, प्रोस्टिग्मीन, ऑर्‌गॅनोफॉस्फरस कीटकनाशके (३) नैसर्गिक पदार्थ (क्षाराभ) : पायलोकार्पीन.

या पदार्थांचा शस्त्रक्रियेनंतर मूत्राशयात मूत्रसंचय झाल्यास, इच्छानुवर्ती स्‍नायूंची शक्ती कमी झाल्यास, गंभीर स्‍नायुविकलता या विकारांत स्‍नायूंची शक्ती परत येण्याकरिता, काचबिंदू या विकारात नेत्रजलदाब कमी करण्याकरिता उपयोग होतो.

या औषधांचा परिणाम एकाच वेळी सर्व तंत्रांवर होत असल्यामुळे कित्येक वेळा ती उपद्रवी होतात. आंत्रांची हालचाल, घाम येणे, श्वासनलिकांचे आकुंचन या क्रिया होत असल्यामुळे दम्याचा विकार असलेल्या रोग्यांत या औषधांचा उपयोग फार काळजीपूर्वक करावा लागतो.

ॲसिटिलकोलिनाचे अवरोधन करणारे पदार्थ : ॲसिटिलकोलिनाचे कार्य ज्या स्थानांवर होते त्या स्थानांचे रोधन करणारे पुढील भिन्न पदार्थ उपलब्ध आहेत :

(क) गुच्छिकांतील तंत्रिकावहन बंद करणाऱ्या औषधांना गुच्छिकाअवरोधक असे म्हणतात. अनुकंपी (संरक्षक) तंत्रातील गुच्छिकांच्या कार्यात रोध उत्पन्न झाल्याने रक्तदाब कमी होतो म्हणून त्या विकारावर या औषधांचा उपयोग होतो.

(ख) परानुकंपी (संग्राहक) तंत्रातील तंत्रिकाग्रांवर असलेल्या ग्राहकांवर ॲट्रोपीन व तत्सम औषधांच्या क्रियेमुळे अनैच्छिक स्‍नायूंचा ताण कमी होतो. लाला ग्रंथी, जठर ग्रंथी, आंत्र ग्रंथी, अग्‍निपिंड, घर्म ग्रंथी वगैरे सर्व ग्रंथींचे स्त्राव कमी होतात. डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात आणि नेत्रजलदाब वाढतो.

या अवरोधक पदार्थांचा आंत्राच्या स्‍नायूंच्या आकुंचनामुळे होणारा शूल (तीव्र वेदना) कमी करण्यासाठी, पचनज व्रणाच्या रोग्यामध्ये जठराम्‍ल कमी करण्यासाठी, कीटकनाशकांपैकी ऑर्‌गॅनोफॉस्फरस या पदार्थाविरुद्व प्रतिकारी म्हणून आणि नेत्रपरीक्षेसाठी डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या करण्यासाठी उपयोग होतो. या पदार्थांचा उपयोग केल्यामुळे बद्धकोष्ट, मूत्रसंचय, नेत्रजलदाब वाढणे हे विपरीत परिणाम होतात.

मोटार लागणे इ. गतिविकारांमध्ये होणारी मळमळ व ओकाऱ्या यांचा प्रतिबंध करण्यासाठी व कंपवातातील कंप कमी करण्यासाठीही ॲट्रोपीन व तत्सदृश पदार्थांचा उपयोग होतो.


रक्तपरिवहन तंत्रावर परिणाम करणारी औषधे : या औषधांमध्ये दोन प्रकार आहेत : (अ) हृदयावर परिणाम करणारी औषधे आणि (आ) रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे.

(अ) हृदयावर क्रिया करणारी औषधे : यांचे तीन उपप्रकार आहेत : (१) हृद्‌यस्‍नायूंचे उत्तेजन करणारी औषधे, (२) हृद्‌कार्य लयबद्ध करणारी औषधे व (३) हृद्‌रोहिण्यांचे प्रसरण करणारी औषधे.

(१) हृद्‌स्‍नायु -उत्तेजक औषधे : काही विकारांमध्ये हृद्‌स्‍नायु कमकुवत होतात त्यामुळे हृदक्रिया नीट न झाल्यामुळे रक्तपरिवहन मंदावते. परिवहनाच्या नीलाभांगामध्ये रक्त साचून राहते.

डिजिटॅलीस आणि ॲड्रेनॅलीन या दोन प्रकारांच्या औषधांमुळे हृद्‌स्‍नायूंचे उत्तेजन होते. त्यांपैकी डिजिटॅलीस या औषधामुळे हृदस्‍नायूंमधील ऑक्सिजनाचा वापर वाढत नाही. ऑक्सिजनाचा आणि कार्यशक्तीचा पूर्वीइतकाच वापर करून डिजिटॅलिसामुळे हृद्‌स्‍नायूंची कार्यक्षमता वाढते. याउलट ॲड्रेनॅलिनामुळे हृदयाच्या उत्तेजनाबरोबरच अधिक ऑक्सिजन आणि कार्यशक्ती यांचा वापर होतो. म्हणून ॲड्रेनॅलिनाचा उपयोग निरोगी ह्र्दयाच्या कार्याच्या उत्तेजनासाठी आणि डिजिटॅलिसाचा उपयोग विकृत ह्र्दय कार्यक्षम करण्यासाठी होतो. डिजिटॅलीस या वनस्पतिज औषधाचा शोध विल्यम विदरिंग यांनी १८७५ मध्ये लावला. डिजिटॅलीस वनस्पतीच्या डिजिटॅलीस पुर्पुरिया आणि डिजिटॅलीस लॅनाटा या दोन जाती आहेत. या वनस्पतीच्या पानांपासून डिजॉक्सिन, डिजिटॉक्सिन ही औषधिद्रव्ये मिळतात. स्‍क्किल आणि पिवळी कण्हेर (थेवेशिया) या वनस्पतींपासूनही याच प्रकारची औषधिद्रव्ये मिळतात. स्‍क्विलपासून सिलारीन आणि पिवळ्या कण्हेरीपासून पेरुव्होर्साइड या नावाची औषधिद्रव्ये शुद्ध स्वरूपात मिळविण्यात आली आहेत.

या सर्व औषधांची क्रिया हृद्‌स्नायूंवर होते. शरीरातील इतर तंत्रांवर काहीही क्रिया होत नाही. हृद्‌स्नायुंकोशिकांच्या आवरणातून कॅल्शियमाचे भारित आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) आत शिरतात अथवा हृद्‌स्नायूंतील बद्ध आयन मुक्त होऊन त्यांच्यामुळे स्‍नायुकोशिकांमधील ॲक्टिन व मायोसीन ही प्रथिने एकत्र येऊन स्‍नायूंचे आकुंचन होते. त्यामुळे थुलथुलीत व विस्तारलेले स्‍नायू घट्ट आणि संकुचित होतात. हृदय कार्यक्षम होते व त्यामुळे सर्व परिवहन तंत्राचे कार्य जलद आणि पूर्णत्वाने होऊ लागते. नीलांमध्ये साचलेले रक्त पुनश्च वाहू लागून सर्व इंद्रियांतील रक्तप्रवाह सुधारतो. वृक्काचे कार्य सुधारल्यामुळे शरीरात साठलेले पाणी मूत्रावाटे उत्सर्जित होते. त्यामुळे परिवहन तंत्रावरचा ताण कमी होतो.

ही औषधे फार काळ दिली गेल्यास अथवा अधिक मात्रेने दिल्यास, मळमळ, वांत्या, हृदयाचे अनियमित स्पंदन इ. लक्षणे होतात.

(२) हृद्‌कार्य लयबद्ध करणारी औषधे : हृद्‌स्‍नायूंतील विद्युत् वहन तंत्र आणि हृद्‌स्‍नायुकार्य यांत विकृती झाल्यास हृद्‍‍‌स्पंदन अनियमित होते. अलिंदाच्या (हृदयाच्या वरच्या कप्प्यांच्या) मुळापाशी असलेल्या प्रेरक कोशिकासमूहांत विद्युत् तरंगांचा उगम होतो. त्या स्थानाला पदक्रमजनक (गतिजनक) असे म्हणतात. या स्थानापासून आकुंचन तरंग सर्व हृदयभर पसरतात.  हे तरंग लयबद्ध असतात व त्यांची क्रिया नियमित आणि चक्रीय पद्धीतीने होते [® हृदय] . आकुंचन तंरंगांमध्ये विकृती उत्पन्न झाल्यास अथवा त्यांच्या वहन-वेगात बदल झाल्यास हृदयाचे विविध भाग अनियमितपणे आकुंचन-प्रसरण पावू लागून हृद्‌यकार्याची लयबद्धता नाहीशी होते. अशी नष्ट झालेली लयबद्धता पूर्ववत करणाऱ्या औषधांना हृदस्पंदननियामके म्हणतात. या औषधांचे पाच प्रकार आहेत : (क) क्विनीडीन व तत्सम क्लोरोक्वीन, ॲमोडोयाक्वीन (ख) स्थानीय संवेदनाहारके : प्रोकेनामाइड, लिग्‍नोकेन (ग) हिस्टामीन प्रतिरोधके : ॲन्टझोलीन, डायफेनहायड्रामीन (घ) स्वायत्त तंत्रिका तंत्रावर कार्य करणारी औषधे : आयसोप्रिनॅलीन, प्रोपेनॉलॉल (च) शांतके : क्लोरप्रोमाझीन, हायड्रॉक्सिझीन, अपस्मार प्रतिबंधके.

(३) हृद्‌रोहिण्यांचे प्रसरण करणारी औषधे : वाहिनीक्लथन म्हणजे रक्तप्रवाहात बाह्य पदार्थ जाऊन अडकल्यामुळे हृदरोहिणी वा तिच्या शाखा बंद पडतात. तसेच हृद्‌रोहिणीचे आकुंचन झाल्यास हृदयाच्या रक्तपुरवठ्यात कमतरता उत्पन्न होऊन _ उर:शूल होतो. अशावेळी हृद्‌रोहिण्यांचे प्रसरण करणाऱ्या औषधांचा उपयोग होतो. ही औषधे दोन प्रकारांची आहेत : (प) नायट्राइटे : ग्‍लिसरीन ट्रायनायट्रेट, पेन्टॅइरिथ्रिटॉल ट्रेटानायट्रेट (फ) इतर : पॅपॅव्हरीन, अल्कोहॉल ॲमिनोफायलीन.

या औषधांमुळे हृद्‌रोहिणीचे प्रसरण होऊन हृद्‌स्‍नायूंना अधिक रक्तपुरवठा होऊ लागतो.

(आ) रक्त्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे : रक्तवाहिन्यांच्या भित्तीतील स्‍नायूंचे आकुंचन-प्रसरण करणारी औषधे उपलब्ध आहेत. आकुंचन करणाऱ्या औषधांचा उपयोग कमी झालेला रक्तदाब वाढविण्याकडे होतो. उदा., (१) अनुकंपी अनुकारक औषधे : ॲड्रेनॅलीन, नॉरॲड्रेनॅलीन, मिथिड्रीन, मेंफेटरमीन, एफेड्रीन वगैरे (२) इतर : पोष ग्रंथीच्या पश्चभागाचा अर्क : (पिट्रेसीन), अँजिओटेन्सीन, अरगटामाइन इत्यादी.

रक्तदाब कमी करणारी औषधे : काही अज्ञात कारणामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन झाल्याने रक्तदाब वाढतो. मूळ कारण अजून अज्ञात असल्यामुळे अतिरिक्त रक्तदाबावर लक्षणानुवर्ती उपचार करावे लागतात. त्याकरिता रक्तवाहिन्यांचे दीर्घ काळ प्रसरण करणाऱ्या औषधांचा उपयोग होतो. त्या औषधांचे क्रियास्थानानुसार वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

(१) मस्तिष्क आणि उच्च केंद्रे : या ठिकाणी कार्य करणाऱ्या औषधांमुळे मानसिक ताण कमी होऊन शांत झोप लागते तसेच अभिवाही मस्तिष्ककेंद्राच्या तळाशी असलेल्या अध:केंद्रातील विविध कोशिकांवर परिणाम झाल्यामुळे लंबमज्‍जेतील (मेंदूच्या मागच्या भागातील) रक्तवाहिनी नियंत्रक केंद्रावर प्रेरणा येऊन रक्तदाब कमी होतो. उदा., फिनोबार्बिटोन, रेसरपीन.


(२) रक्तवाहिनी-नियंत्रक केंद्र : या केंद्रावर  प्रत्यक्ष क्रिया करणारी औषधे (उदा., ॲप्रेसोलीन) अथवा हृदयाकडून येणाऱ्या आवेगामुळे कार्य करणारी औषधे. उदा., व्हेराट्रीन.

(३) गुच्छिका : अनुकंपी (आणि काही प्रमाणात परानुकंपी) तंत्रातील गुच्छिकांच्या निरोधनामुळे केंद्राकडून येणाऱ्या प्रेरणा रक्तवाहिन्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे रक्तदाब उतरतो. उदा., हेक्झॅमिथोनियम, पेंटोलिनियम, मेकॉमिलामीन, पेम्पीडीन वगैरे. या औषधांना गुच्छिकानिरोधक औषधे असे म्हणतात.

(४) ॲड्रिनोत्पादक तंत्रिका तंतूंचे निरोधक : या विशिष्ट तंत्रिकातंतूंच्या अग्रापासून नॉरॲड्रेनॅलीन मुक्त होते व त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. या निरोधकांच्या क्रियेमुळे तंत्रिकाग्रांचे दमन झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो. उदा ., रेसर्पिन, ग्वानोथिडीन, ब्रेटिलियम.

(५) आल्फा निरोधके : स्‍नायूंमधील आल्फा ग्राहकस्थानावरील क्रियेस निरोध करणाऱ्या औषधांमुळे रक्तवाहिन्यांचे प्रसरण होते या प्रकाराच्या औषधांचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी करीत नाहीत. उदा., फेंटोलमीन, टोलॅझोलीन, डायबेंझीलीन .

(६) रक्तवाहिन्यांच्या स्‍नायूंवर क्रिया करणारी औषधे : थायझाइड व तत्सम मूत्रले (मूत्राचे प्रमाण वाढविणारी) आणि नायट्रोप्रुसाइडासारख्या लवणांची क्रिया स्‍नायूवर होऊन स्‍नायू शिथिल झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचे प्रसरण होऊन रक्तदाब उतरतो.

रक्तघटकांवर परिणाम करणारी औषधे : (अ) पांडुरोगावरील औषधे : (१) आहारातून लोह कमी गेल्यास अल्पलोही पांडुरोग (ॲनिमिया) अथवा लोहन्यूनताजन्य पांडुरोग होतो. त्यासाठी लोहाची विविध अकार्बनी (सल्फेट, फ्यूमारेट, ग्‍लुकोनेट इ.) व कार्बनी (ग्राभी संयुगे, अमोनियम सायट्रेट इ.) संयुगे वापरण्यात येतात.

ही सर्व औषधे पोटात देता येतात. ती न सोसल्यास अंत:क्षेपणाने आयर्न डेक्स्ट्रॉन आणि आयर्न सॅर्बिट्रॉल ही संयुगे वापरतात.

लोहसंयुगे पोटात दिल्यास जठरशोथ (जठराची दाहयुक्त सूज) आणि पचन तंत्रावर अन्य विपरीत परिणाम होणे शक्य असते म्हणून ही संयुगे जेवणाबरोबरच देणे इष्ट असते.

(२) ब१२ जीवनसत्त्व आणि फॉलिक अम्‍ल यांची आहारात कमतरता असल्यास त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या पांडुरोगाला बृहत्-कोशिकी पांडुरोग असे म्हणतात. या प्रकारात रक्तकोशिकांचा आकार मोठा होतो आणि ब१२ जीवनसत्त्वन्यूनतेमुळे तंत्रिका तंत्राच्या चयापचयावरही विपरीत परिणाम होतो [→ पांडुरोग].

१२ जीवनसत्त्व दोन प्रकारच्या रासायनिक स्वरूपांत मिळते : सायनोकोबालामीन आणि हायड्रॉक्सिकोबालामीन. यांचे लाल रंगाचे स्फटिक असतात.

नैसर्गिक ब१२ जीवनसत्त्व (सायनोकोबालामीन) हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्ये, यकृत वगैरेंमध्ये असते. कृत्रिम पद्धतीने ते स्ट्रेप्टोमायसीन या प्रतिजैव औषधाचे उत्पादन करणाऱ्या कवकांपासून तयार करतात. ब१२ जीवनसत्त्व गोळ्या आणि द्रव स्वरूपात मिळते. अंत:क्षेपणाकरिता त्याचा विद्राव वापरतात.

फॉलिक अम्‍ल हे ब जीवनसत्त्व गटातील आहे. हेही यकृत आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये असते. रक्तकोशिकांची पूर्ण वाढ होण्यासाठी त्यांचा आणि ब१२ जीवनसत्त्वाचा उपयोग होतो.

रक्तकोशिकांची निर्मिती आणि पूर्ण वाढहोण्यासाठी बव क ही जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म प्रमाणात तांबे यांची जरुरी असते.

(आ) श्वेतकोशिकांच्या विकृतीवरील औषधे : श्वेतकोशिकांच्या (पांढऱ्या पेशींच्या) विकृती मुख्यत: दोन प्रकारांच्या आहेत : श्वेतकोशिकान्यूनता आणि श्वेतकोशिकाधिक्य.

काही आनुवंशिक प्रवृत्तीमुळे आणि काही रसायनांच्या परिणामामुळे श्वेतकोशिकांची निर्मिती कमी होते. ॲनिलीन व तत्सम रसायने, फेनॅसिटीन, क्लोरॅँफिनिकॉल, आयडोपायरीन, फिनिलब्युटाझोन, सल्फाऔषधे, फिनोथायाझीन गटातील औषधे व इतर अनेक प्रकारांच्या रासायनिक पदार्थांमुळे, तसेच क्ष-किरण प्रारणामुळे अस्थिमज्जेवर विपरीत परिणाम होऊन श्वेतकोशिकांची निर्मिती कमी अथवा पूर्णपणे बंद होते. म्हणून या औषधांचा उपयोग फार जपून करावा लागतो. रक्तपरीक्षण वारंवार करावे लागते. या विकारावर अजून विशेष औषध उपलब्ध नसल्यामुळे श्वेतकोशिकांची संख्या घटू लागल्याचे दिसल्याबरोबर ही औषधे वापरणे बंद केले पाहिजे [→ श्वेतकोशिकान्यूनता श्वेतकोशिकाधिक्य].


रक्ताच्या एक प्रकाराच्या कर्करोगात रक्तातील श्वेतकोशिकांचे प्रमाण अमर्याद वाढते. त्याला ⇨ श्वेतकोशिकार्बुद असे म्हणतात. या विकारात कॉर्टिकोस्टेरॉइडे, ६-मरकॅप्टोप्यूरीन आणि मिथोट्रेक्सेट या औषधांचा उपयोग करतात. श्वेतकोशिकार्बुदांच्या दीर्घकालिक प्रकारात बुसल्फान, डेमेकोलसीन, क्ष-किरण, किरणोत्सर्गी ( कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणारा) फॉस्फरस, नायट्रोजन मस्टर्ड वगैरे औषधांचाही उपयोग होतो.

(इ) क्लथनप्रतिरोधी औषधे : रक्तक्लथनाची (रक्त गोठण्याची) क्रिया फार क्लिष्ट आहे [→ रक्तक्लथन]. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तक्लथन झाल्यास तेथील रक्तप्रवाह बंद पडून त्या इंद्रियाला रक्त न मिळाल्यामुळे अनेक विकृती होतात. म्हणून क्लथनप्रतिरोधी औषधांना फार महत्त्व आहे. हृदरोहिणी, मस्तिष्करोहिणी वगैरे महत्त्वाच्या इंद्रियांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये वाहिनीक्लथन झाल्यास फार गंभीर परिणाम होतात म्हणून रक्तक्लथनक्रिया जरी नैसर्गिक व संरक्षक असली तरी विशिष्ट रोगांमध्ये क्लथनाला प्रतिबंध करणे जरुरीचे असते. क्लथनप्रतिरोधी औषधांचे दोन प्रकार आहेत : (१) अंत:क्षेपण मार्गाने देता येणारी आणि (२) पोटात देता येणारी.

 (१) हेपारीन हा पदार्थ नैसर्गिक असून प्राकृतावस्थेत रक्तक्लथनाला तो प्रतिबंध करीत असतो. हा पदार्थ रक्तातील आणि संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकांतील विशिष्ट प्रकाराच्या श्वेतकोशिकांपासून तयार होतो. या श्वेतकोशिकांना स्‍नेहकोशिका असे म्हणतात. हेपारीन यकृत, फुप्फुस वगैरे इंद्रियांपासून आणि जळवांच्या शरीरांतून मिळवता येतो. हेपारीन नीलेवाटे अंत:क्षेपण करून देतात. त्याचा परिणाम तात्काळ होतो परंतु तो फार वेळ टिकत नसल्यामुळे वारंवार टोचावे लागते. या पदार्थामुळे रक्तबिंबाणू (रक्ताची गुठळी होण्यात भाग घेणारे रक्तातील चकतीसारखे घटक) एकमेकांस चिकटू शकत नसल्याने क्लथनक्रिया मंद होते. रक्तातील वसेचे प्रमाण कमी होते. त्वचेखाली रक्तक्लथन झाले असल्यास मलमाच्या स्वरूपात या पदार्थाचा उपयोग होतो.

(२) पोटात देता येणारी क्लथनप्रतिरोधी औषधे : स्वीट क्लोव्हर ही वनस्पती खाऊन रक्तस्राव झाल्यामुळे जनावरे मृत्यू पावल्याचे आढळले व त्यामुळे या वनस्पतीतील क्युमारीन या क्लथनप्रतिरोधी औषधाचा शोध लागला. क्युमारीन हे औषधे के जीवनसत्त्वाशी स्पर्धक असल्यामुळे यकृतातील कोशिकांमधील के जीवनसत्त्व कमी पडल्यामुळे रक्तक्लथनाला प्रतिरोध होतो. कारण के जीवनसत्त्व हे प्रक्लथी (रक्तक्लथनासाठी आवश्यक असणारे एक द्रव्य) उत्पन्न होण्याला जरुर असते.

या प्रकाराच्या क्लथनप्रतिरोधी औषधांत बिसडायहायड्रॉक्सिक्युमारीन, वारफेरीन, असेनक्युमारॉल, फिनिन्डायोन इत्यादीचा समावेश होतो. या औषधांच्या अतिमात्रेमुळे वा फार काल वापर केल्यामुळे रक्तस्राव, त्वक्‌शोथ (त्वचेचा दाह), उलट्या, अतिसार, केस गळणे वगैरे विपरीत परिणाम दिसतात.

श्वसन तंत्रावर परिणाम करणारी औषधे : (अ) श्वसनकेंद्रोत्तेजके : अनेक कारणांनी श्वसनकेंद्राचे दमन होते. उदा., नवजात अर्भकात श्वसनकेंद्र नीट कार्य करू लागलेले नसते तेव्हा, पाण्यात बुडाल्यामुळे अथवा शुद्धिहारक आणि शायक औषधांची अधिक मात्रा दिली गेल्यामुळे श्वसन केंद्राचे दमन होते. अशा वेळी निकेथामाइड (कोरामीन), लोबेलीन, मिथिलफेनिडेट व लेप्टॅझॉल या औषधांचा उपयोग होतो.

(आ) कफोत्सारके : या औषधांमुळे    श्वासनलिकांच्या श्लेष्मल स्तरातील ग्रंथींचा स्राव पातळ होतो व त्यामुळे कफ सुटणे सोपे होऊन कफ व त्याबरोबर जंतूही विसर्जित होतात. उदा., पोटॅशियम आयोडाइड, अमोनियम क्लोराइड, पोटॅशियम अँटिमनीटार्टेट, इपेकॅक, क्रिओसोट, ग्वायकॉल इत्यादी.

(आ) खोकल्याची प्रतिक्षेप-क्रिया थांबविणाऱ्या औषधी : (प्रतिक्षेप-क्रिया म्हणजे आपोआप होणारी अनैच्छिक क्रिया). या औषधांची क्रिया स्थानिक म्हणजे श्लेष्मल स्तरावर आणि नियंत्रण केंद्रावर होते. पहिल्या प्रकारात खडीसाखर, साखरेचा पाक, मध, स्थानिक निस्संवेदके (बधिर करणारी औषधे) वगैरे, तर दुसऱ्या प्रकारात अफू आणि अफूपासून बनविलेल्या कोडीन वगैरे औषधांचा समावेश होतो.

(इ) दम्यावरील औषधी : दम्याच्या विकारामध्ये श्वासनलिकांच्या भित्तीतील स्‍नायू आकुंचित झाल्यामुळे श्वसनक्रियेला अडथळा उत्पन्न होऊन दमा होतो. या विकाराचे कारण अद्यापि अज्ञात आहे. काही बाह्यपदार्थांविषयी अधिहर्षता (ॲलर्जी) असल्यास दमा होतो. असे पदार्थ ज्ञात असल्यास व ते टाळता आल्यास दमा होत नाही. परंतु ही गोष्ट पुष्कळ वेळा शक्य नसते. अशा वेळी उपाय म्हणून श्वासनलिका विस्तारक औषधींचा उपयोग होतो. अनुकंपी तंत्रिकांवर क्रिया करणारी अमाइने आणि तत्सम औषधे त्यासाठी वापरतात. ॲड्रेनॅलिनाचा पाण्यातील अथवा तेलातील विद्राव दिल्यास दमा तात्पुरता बरा होतो. तैलविद्रावाचा परिणाम बराच वेळ टिकतो.

आयसोप्रोपिल हे औषध जिभेच्या खाली अथवा घशात फवारा मारून वापरतात. तसेच अस्मानिया (एफेड्रा व्हल्गॅरिस) या चिनी वनस्पतीपासून तयार केलेल्या एफेड्रीन या औषधाचाही उपयोग होतो, मात्र एफेड्रिनामुळे झोप कमी होत असल्यामुळे त्याच्याबरोबर फिनोबार्बिटोनासारखी शायक औषधे द्यावी लागतात. ॲमिनोफायलीन, पॅपॅव्हरीन वगैरे औषधांमुळे अनैच्छिक स्‍नायू शिथिल होतात म्हणून त्यांचाही उपयोग होतो. अलीकडे कॉर्टिकोस्टेरॉइडांचाही उपयोग करतात. गंभीर स्वरूपाच्या दम्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

(ई) वायू आणि वायुरूप रसायने : ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, शुद्धिहारके वगैरे औषधांचा उपयोग श्वसन तंत्राच्या मार्गाने शरीरावर होऊ शकतो. रक्तातील रक्तारुणाला (हीमोग्‍लोबिनाला) पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अशा वेळी (उदा., फुप्फुसशोथ) नळीवाटे वा पॉलिथिनाचे आवरण रोग्याभोवती पसरून ऑक्सिजन देता येतो.


विशिष्ट प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड दिल्यास श्वसनक्रिया उद्दीपित होते. सोडावॉटरसारख्या पेयांमध्ये हा वायू असतो तसेच फ्रूट सॉल्ट, सोडा व लिंबू यांचे मिश्रण यांमध्येही हाच वायू असतो. त्याचा औषधिदृष्ट्या फारसा उपयोग नसला तरी पोट फुगणे वगैरे उपाधीसाठी त्याचा उपयोग करतात. हाच वायू घन स्वरूपात त्वचेवरील चामखीळ वगैरे काढण्यासाठी वापरतात.

वृक्क व मूत्रावर परिणाम करणारी औषधे : वृक्कामध्ये उत्पन्न होणाऱ्या मूत्रामुळे शरीरातील जल, विद्युत् भारित अणू आणि अम्‍लक्षारक (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारा पदार्थ) यांचा समतोल राखला जातो.

मूत्राचे परिणाम वाढविणाऱ्या औषधांना मूत्रल औषधे असे म्हणतात. यांचे अनेक प्रकार आहेत : (१) तर्षणी, (२) अम्‍लकारक, (३) क्षारकारक, (४) एंझाइम-दमनी, (५) ॲल्डोस्टेरॉन विरोधक, (६) इतर.

(१) तर्षणी मूत्रले : या गटात शर्करा, मॅनिटॉल, यूरिया इ. अभारित आणि सोडियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट वगैरे भारित औषधांचा समावेश होतो. या पदार्थांमुळे पाण्याचे अणू आकर्षित होत असल्यामुळे सूक्ष्म मूत्रनलिकांमधून पाणी परत शोषिले जात नाही व त्यामुळे मूत्रात पाण्याचे प्रमाण अधिक होते.

(२) अम्‍लकारक : अमोनियम क्लोराइड इ. संयुगांमुळे अम्‍लाणूंचे प्रमाण वाढून रक्तातील अम्‍ल-क्षारक समतोल बिघडतो. अम्‍लाणूंचे प्रमाण पूर्ववत होण्यासाठी वृक्कातून सोडियमाचे अणू अम्‍लाबरोबर उत्सर्जित होतात. हे सोडियम अणू बरोबर अधिक  जल घेऊन विसर्जित होत असल्यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते आणि शरीरातील संचित जल कमी होते.

(३) क्षारककारक : पोटॅशियम सायट्रेटासारख्या लवणांमुळे मूत्र क्षारीय होऊन पोटॅशियमाबरोबर अधिक जल मूत्रमार्गे बाहेर पडल्यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते.

(४) एंझाइम-दमनी : (अ) वृक्कातीलसूक्ष्मनलिकांच्या कोशिकांमध्ये गंधक-हायड्रोजन-समूह असलेले एक एंझाइम असते. पाऱ्याच्या काही संयुगांच्या विक्रियेमुळे हे एंझाइम निष्क्रिय बनल्यामुळे मूत्रनलिकांतून क्लोराइड हा ऋण भारित पदार्थ परत शोषिला जात नाही. हाक्लोराइड पदार्थ बाहेर पडताना बरोबर सोडियम हा धन भारित अणू घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे मूत्रोत्सर्ग वाढतो. शरीरातील क्लोराइडाचे अणू कमी असल्यास या पाऱ्याच्या संयुगांचा उपयोग होत नाही. मरसालिल, मरकॅप्टोमेरीन, मर्क्युरोफायलीन वगैरे औषधे या प्रकारात मोडतात. ही औषधे अंत:क्षेपणाने देतात. या संयुगांतील पाऱ्याचा हृद्‌स्‍नायू, वृक्क, अस्थिमज्जा वगैरे अंतस्त्यांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे त्यांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो.

(आ) कार्बनी अनॅहायड्रेज या एंझाइमांच्या क्रियेमुळे कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाणी यांपासून हायड्रोजन आणि बायकार्बोनेट हे आयन उत्पन्न होतात. वृक्कातील सूक्ष्मनलिकांतील कोशिकांमध्ये तयार झालेले हायड्रोजन अणू आणि त्या नलिकांमध्ये असलेले सोडियम अणू यांची देवाणघेवाण होऊन सोडियम अणू पुन:शोषित होतात. या विशिष्ट एंझाइमाचे दमन झाल्यामुळे हायड्रोजन अणूंची निर्मिती होत नाही व त्यामुळे सोडियम आयनांचे पुन:शोषण होत नाही म्हणून सोडियम आयन आणि पाणी हे मूत्रावाटे अधिक प्रमाणात विसर्जित होतात व त्यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते. ॲसिटाझोलामाइड, डायक्लोरफेनामाइड वगैरे औषधे या प्रकाराची असून ती पोटात देता येतात. डोळे आणि तंत्रिका तंत्रातील कोशिकांवर या दमकाचे कार्य होत असल्यामुळे काचबिंदू आणि लघु-अपस्मारावरही ही औषधे उपयुक्त आहेत.

या औषधांमध्ये गंधक अणू असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. मूत्रामधून बायकार्बोनेट अणू अधिक प्रमाणात उत्सर्जित होत असल्यामुळे रक्तातील अम्‍ल गटाचे प्रमाण वाढते.

(इ) बेंझोथायाझॉइड या गटातील औषधांमुळे सूक्ष्मवृक्कनलिकांतून सोडियम व क्लोराइड यांचे पुन:शोषण होत नाही व त्यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते. या गटातील औषधांमुळे रक्तवाहिन्यांच्या भित्तीतील स्‍नायू प्रसरण पावतात त्यामुळे रक्तदाब कमी करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.

या औषधांचा विपरीत परिणाम म्हणजे रक्तशर्करा वाढून सुप्त मधुमेह, रक्तातील यूरिक अम्‍लाचे प्रमाण वाढणे आणि यकृतावरील विपरीत परिणामही होऊ शकतात.

(५) ॲल्डोस्टेरॉन विरोधके : ॲल्ड्रोस्टेरॉन हे प्राकृतावस्थेत अधिकृक्क ग्रंथीच्या स्रावामध्ये असते त्यामुळे सोडियमाचे पुन:शोषण आणि पोटॅशियमाचे उत्सर्जन होते. या स्रावाच्या विरोधी औषधांमुळे सोडियम शोषिले न जाता उत्सर्जित होते, पोटॅशियम शोषिले जाते व मूत्राचे प्रमाण वाढते. स्पायरोनोलॅक्टोन हे या प्रकाराचे उदाहरण आहे.

(६) इतर : पूर्वीपासून झँथीन हे अल्कलॉइड  मूत्रल म्हणून प्रचारात होते. थिओब्रोमीन, कॅफीन वगैरे औषधांमुळे वृक्कातील रक्तप्रवाह वाढून मूत्रोत्पती वाढते. चहा, कॉफी वगैरे पेयांमध्ये हे पदार्थ असतात. क्लोरथॅलिडोन गट, फुरोसेमाइड, एथाक्रिनिक अम्‍ल आणि ट्रायामटेरीन ही सर्व औषधे मूत्रल आहेत. ही औषधे अलीकडच्या काळातच शोधिली गेली आहेत.

मूत्र जंतुनाशके : मूत्र तंत्रातीलविविध भागांत जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर वापरण्यात येणाऱ्या औषधांना मूत्र जंतुनाशके असे म्हणतात. ही औषधे मूत्रामधून उत्सर्जित होतात. त्यांची मूत्रातील संहती (प्रमाण) रक्तातील संहतीपेक्षा अधिक असल्यामुळे मूत्रातील जंतूचा नाश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. सल्फा व प्रतिजैव औषधे या प्रकाराच्या औषधांचा या कामी उपयोग होतो [→ सल्फा औषधे प्रतिजैव पदार्थ]. यांशिवाय मिथेनामीन आणि मँडेलिक  अम्‍ल यांचा व त्यांच्या संयुगांचा उपयोगही करता येतो.


पचन तंत्रावर परिणाम करणारी औषधे : पचन तंत्रावर परिणाम करणारी औषधे मुख्यत: चार प्रकारांची आहेत : (अ) अम्‍लप्रतिकारके, (आ) पाचके, (इ) रेचके व (ई) वायुहर औषधे.

(अ) अम्‍ल-प्रतिकारके : प्राकृतावस्थेत जठरामध्ये अम्‍ल तयार होत असते त्याचे प्रमाण वाढल्यास अम्‍लपित्तविकार होतात. जठरशोथ आणि पचनज व्रण या कारणांनीही जठराम्‍लाचे प्रमाण वाढते. अम्‍लस्राव कमी व्हावा आणि जठराच्या व ग्रहणीच्या स्‍नायूंचे आकुंचन कमी व्हावे यासाठी ॲट्रोपीन व तत्सम औषधांचा उपयोग होतो.

उत्पन्न झालेल्या अम्‍लाचे उदासिनीकरण व्हावे (अम्‍लता हा गुणधर्म नाहीसा व्हावा) म्हणून क्षारकीय रासायनिक पदार्थ वापरतात. सोडियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) हे या प्रकाराच्या पदार्थाचे उदाहरण आहे. सोडा पोटात घेतल्यास जठरातील अम्‍लाचे उदासिनीकरण होते आणि कार्बन डाय-ऑक्साइड तयार होतो. त्यामुळे अम्‍लपित्ताची लक्षणे नाहीशी होतात परंतु या प्रकाराच्या औषधांमध्ये एक मोठा दोष संभवतो तो म्हणजे हे क्षारकीय पदार्थ शोषिले गेल्यामुळे रक्तातील अम्‍ल-क्षारक समतोल बिघडतो. अशा पदार्थाना तांत्रिक अम्‍ल-प्रतिकारके असे म्हणतात.

दुसऱ्या प्रकाराची अम्‍ल-प्रतिकारके शोषिली जात नसल्यामुळे रक्तातील अम्‍ल-क्षारक समतोल बिघडत नाही म्हणून ही प्रतिकारके वापरणे अधिक इष्ट होय. त्यांना अतांत्रिक अम्‍ल-प्रतिकारके असे म्हणतात. अशी अनेक प्रतिकारके उपलब्ध आहेत. त्यांपैकी काहीचे वर्णन खाली केले आहे.

कॅल्शियम कार्बोनेट: हा पदार्थ खनिज चॉकमध्ये असतो. तो शुद्ध करून औषध म्हणून वापरतात. सोडियम बायकार्बोनेटाप्रमाणेच याच्यापासून जठरात कार्बन डाय-ऑक्साइड वायू तयार होतो परंतु त्याचा परिणाम खाण्याच्या सोड्याप्रमाणे त्रासदायक होत नाही. हा पदार्थ स्वस्त आणि परिणामकारक असा अम्‍ल-प्रतिकारक आहे.

मॅग्‍नेशियम ट्रायसिलिकेट : मॅग्‍नेशियम आणि सिलिका यांचे हे संयुग आहे. या पदार्थाचा थर जठराच्या श्लेष्मल स्तराला चिकटून राहतो त्यामुळे पचनज व्रणाचे संरक्षण होऊन शिवाय अम्‍ल-प्रतिकारक गुणही येतो. त्यातील मॅग्‍नेशियमाचा थोडाबहुत सारक परिणाम होण्याची शक्यता असते.

मॅग्‍नेशियम हायड्रॉक्साइड : मिल्क ऑफ मॅग्‍नेशिया या औषधात मॅग्‍नेशियम हायड्रॉक्साइड हेअम्‍ल-प्रतिकारक असते. त्याचा परिणाम काही वेळाने होतो आणि त्याचाही सारक परिणाम होऊ शकतो.

ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड : हे अम्‍ल-प्रतिकारक फार मोठ्या प्रमाणात वापरतात. हा पदार्थ द्रवरूपात अधिक गुणकारी असतो. आंत्रामधील फॉस्फेट गटाबरोबर ह्याचे संयुग होऊन अविद्राव्य ॲल्युमिनियम फॉस्फेट तयार होते व ते अम्‍ल-प्रतिकारक असते. या औषधाचा परिणाम मूत्रातील फॉस्फेट कमी करण्याकडे होत असल्यामुळे त्या विकारातही हे औषध वापरतात. या औषधामुळे बद्धकोष्ठ होण्याचा संभव असतो.

वर दिलेल्या अनेक अम्‍ल-प्रतिकारकांची कमीअधिक प्रमाणाची मिश्रणे वापरली जातात. यांशिवाय मॅग्‍नेशियम कार्बोनेट, डायहायड्रॉक्सी ॲल्युमिनियम-ॲमिनो ॲसिटेट, ॲल्युमिनियम फॉस्फेट, ऋण भारित अणूंचा विनिमय करणारे राळेसारखे पदार्थ आणि मिथिल सेल्युलोज या पदार्थांचाही उपयोग अम्‍ल-प्रतिकारक म्हणून करण्यात येतो.

(आ) पाचके : अन्नाचे पचन करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांना पाचके असे म्हणतात. पचन तंत्रातील प्राकृतावस्थेमध्ये उत्पन्न होणाऱ्या एखाद्या पाचक घटकाचा अभाव अथवा न्यूनत्व असल्यास या औषधांचा उपयोग होतो. पाचके म्हणून खालील औषधे वापरतात.

हायड्रोक्लोरिक अम्‍ल : जठररसामधील हे अम्‍ल पचनासाठी आवश्यक असते. त्याचा अभाव अथवा न्यूनत्व असल्यास त्याचा उपयोग होतो. हे अम्‍ल पाण्यात घालून सौम्य करून द्यावे लागते.

पेप्सीन : डुकराच्या जठरातील ग्रंथीपासून हे एंझाइम तयार करतात. प्रथिनांचे पचन करण्यास याचा उपयोग होतो.

अग्‍निपिंड-अर्क : डुकराच्या अग्‍निपिंडापासून हा अर्क तयार करतात. ह्यामध्ये प्रथिन, पिष्टमय पदार्थ आणि वसामय पदार्थ यांचे पचन करणारी अनेकउत्प्रेरके  असल्यामुळे पचनविकारांत त्याचा फार उपयोग होतो.


पित्तरस : पित्तरसामध्ये पित्ताम्‍ले आणि पित्तक्षारक असून त्यांच्यामुळे अन्नातील वसेचा पृष्ठीय ताण कमी होऊन त्याचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) होण्यास मदत होते. पायस होणे ही वसापचनाची पहिली पायरी आहे. रोधयुक्त कामलेमध्ये (काविळीत) नैसर्गिक पित्तरस आंत्रात उतरत नाही अशा वेळी या औषधांचा उपयोग होतो. पित्ताम्‍ले व पित्तक्षारक नैसर्गिक वा कृत्रिम मिळतात.

(इ) रेचके : मलोत्सर्गास मदत करणाऱ्या औषधांना रेचके असे म्हणतात. बद्धकोष्ठ हा अनेक विकारांचे मूळ आहे असा समज असल्यामुळे ही औषधे फार मोठ्या प्रमाणात वापरली जातात परंतु ही औषधे वारंवार वापरली असता त्यांची सवय जडून मलोत्सर्ग अनियमित होतो. ही औषधे नेहमी घेण्याचे टाळणे इष्ट असते. आहारात योग्य तो बदल केल्यास ही औषधे घेण्याची जरुरी पडणार नाही.

काही प्रसंगी रेचकांचा वापर करणे अवश्य असते. शस्त्रक्रियेपूर्वी आंत्रशुद्धी करण्यासाठी, मुळव्याधीच्या विकारात, कृमिनाशकांच्या उपयोगानंतर आणि बाह्यविषारी पदार्थ उत्सर्जित होण्यासाठी रेचकांचा उपयोग होतो. रेचकक्रियेच्या तीव्रतेनुसार रेचकांचे सारके, रेचके आणि अतिसारके असे प्रकार मानतात [→ रेचके].

(ई) वायुहर औषधे : जठरातील वायू ढेकररूपाने बाहेर पडणे सुलभ व्हावे अशी क्रिया करणाऱ्या औषधांना वायुहर औषधे असे म्हणतात. या औषधांमध्ये बहुधा बाष्पनशील तेल असते व त्याला बहुधा सुगंध असतो. त्यामुळे ही औषधे घेण्यास सुखकर आणि पोटफुगी त्वरित दूर करणारी असतात. या औषधांमुळे जठराच्या श्लेष्मल स्तराचा थोडा क्षोभ होऊन जठराला अधिक रक्त पुरवठा होतो. जठराचे वरचे तोंड उघडून जठरातील वायू ढेकरेवाटे बाहेर पडून पोटफुगी कमी होते. या औषधांमध्ये मुख्य औषध म्हणजे शोपा हे असून शिवाय पेपरमिंट तेल, मेंथॉल, जिरे, लवंग, वेलदोडा आणि आले (सुंठ) या सर्व पदार्थांचा वायुहर म्हणून उपयोग होतो.

जंतुनाशके : जंतूंचा शोध लागण्यापूर्वी जखमा, शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी हत्यारे वगैरे धुण्यासाठी शिर्का, अल्कोहॉल वगैरे पदार्थ वापरीत. १८७० च्या सुमारास लॉर्ड लिस्टर यांनी शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व अन्य वस्तू निर्जंतूक करणे, जखमा धुताना कार्‌बॉलिक अम्‍लाचा उपयोग करणे वगैरे शोध लावले. तेव्हापासून जंतुनाशकांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला. अनेक जंतूंद्वारे विविध प्रकारचे रोग फैलावत असल्यामुळे त्यांचा नाश करणे व त्यांच्या वाढीस प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे व याकरिता फिनॉल, क्रिओसोट, बोरिक अम्‍ल, परमँगॅनेटे, आयोडीन इ. विविध रासायनिक पदार्थ जंतुनाशक म्हणून वापरण्यात येतात [→ जंतुनाशके].

रोगप्रतिबंधक जैव पदार्थ : मानवामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती दोन प्रकारांनी वाढविता येते. प्रतिजन (ज्या पदार्थांचा शरीरात प्रवेश झाल्यामुळे त्यांना रोध करणारी प्रतिपिंडे तयार होतात असे) पदार्थ वाढत्या मात्रेने शरीरात टोचून रक्तामधील प्रतिपिंडे (प्रतिजनांच्या प्रक्षेपणामुळे रक्तरसात तयार होणारे विशिष्ट पदार्थ) वाढविल्यामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढविता येते. तिला स्वार्जित प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) असे म्हणतात. मानवेतर प्राण्यांमध्ये प्रतिजनांचे अंत:क्षेपण केल्यानंतर त्या प्राण्यांच्या रक्तात उत्पन्न होणारी प्रतिपिंडे काढून घेऊन माणसाच्या शरीरात टोचली असता जी प्रतिरक्षा उत्पन्न होते तिला परार्जित प्रतिरक्षा असे म्हणतात. ही प्रतिरक्षा त्वरित उत्पन्न होत असली तरी फार वेळ टिकू शकत नाही [→ रोगप्रतिकारक्षमता].

स्वार्जित प्रतिरक्षा उत्पन्न करण्यासाठी त्या त्या रोगाच्या जंतूंची मृत शरीरे अथवा हतबल केलेल्या जिवंत जंतूंचा उपयोग करतात. अशा रीतीने जे पदार्थ मानवी शरीरात टोचले जातात त्यांना लस असे म्हणतात [→ लस]. क्षयरोगप्रतिबंधासाठी बीसीजी लस वापरतात. देवी प्रतिबंधासाठी देवीची लस वापरतात. ती हतबल जिवंत जंतूंपासून केलेली असते. आंत्रज्वर (टायफॉइड), कॉलरा, डांग्याखोकला वगैरे रोगांच्या प्रतिबंधासाठी मृत जंतूंची शरीरे प्रतिजन म्हणून वापरतात. धनुर्वात व घटसर्प या रोगांपासून प्रतिबंध होण्यासाठी त्या रोगांच्या जंतूंपासून उत्पन्न होणारी बाह्यविषे वापरतात.

परार्जित प्रतिरक्षा उत्पन्न करण्यासाठी प्रतिरक्षित प्राण्याच्या रक्तातील द्रव पदार्थ वेगळा काढून तो वापरण्यात येतो. त्याला रक्तरस असे नाव आहे. बहुधा त्यासाठी प्रतिरक्षित घोड्याचे रक्त काढून घेऊन त्यातील रक्तरस तेवढाच वापरतात. या रक्तरसापासून काही वेळा मानवी शरीरात अधिहर्षता उत्पन्न होत असल्यामुळे त्याचा वापर मर्यादित प्रमाणातच करतात. स्ट्रेप्टोकॉकस जंतूंचा संसर्ग, घटसर्प, धनुर्वात या रोगांसाठी रक्तरस वापरण्याचा प्रघात असे. अलीकडे त्या रक्तरसातील गॅमा-ग्‍लोब्युलिने (विशिष्ट प्रकारचे प्रथिन पदार्थ) वेगळी काढून तीच वापरतात. या गॅमा-ग्‍लोब्युलिनांमध्येच रोगप्रतिबंधक गुण असतो. अशा प्रकारची गॅमा-ग्‍लोब्युलिने मानवी रक्तापासूनही तयार करतात.

कृमिनाशके : कृमिनाशकांचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारात कृमी मरून उत्सर्जित होतात, तर दुसऱ्यात ते हतबल होऊन बाहेत पडतात. त्यांना अनुक्रमे कृमिघ्‍न आणि कृमिउत्सर्जक अशी नावे आहेत.

कृमींचे अनेक प्रकार असून प्रत्येक प्रकाराचा नाश करण्यासाठी अनेक औषधे वापरली जातात.

पट्टकृमी : या कृमीसाठी एका प्रकाराच्या नेच्याच्या मुळाच्या गड्ड्याचा अर्क, डाळिंबाच्या सालीचा अर्क वगैरे औषधे वापरीत. अलीकडे क्विनॅक्रीन या नावाचे औषध विशेष गुणकारी आढळून आले आहे [→ पट्टकृमि].

गोलकृमी : जंतासाठी पूर्वी सँटोनीन फार प्रमाणात वापरीत. अलीकडे पिपरेझीन सायट्रेट (अँटिपार) हे औषध अधिक गुणकारी आणि कमी विषारी असल्याचे आढळून आल्यामुळे तेच वापरात आहे. हेक्झिल रिसॉर्सिनॉल हे औषधही चांगले गुणकारी आहे [→ जंत].

अंकुशकृमी : यासाठी पूर्वी थायमॉल व कार्बन टेट्राक्लोराइड ही औषधे वापरीत. त्यांपैकी कार्बन टेट्राक्लोराइड हे विशेष गुणकारी आहे. टेट्राक्लोरएथिलीन हे संयुग अलीकडे जास्त प्रमाणात वापरतात कारण त्याच्यापासून विपरीत परिणाम क्वचितच दिसतात. यांशिवाय हायड्रॉक्झिनॅफ्थोएट बेफेनियम हे औषधही अंकुशकृमीवर उपलब्ध आहे [→ अंकुशकृमि रोग].


प्रतोदकृमी आणि सूत्रकृमी : या कृमींवर निश्चित औषध म्हणजे पिपरेझीन सायट्रेट हे आहे. तसेच पायर्व्हिनियम पामोएट नावाच्या रंजकद्रव्याचा या कृमींवर उपयोग करतात.

हिस्टामीनविरोधी औषधे : हिस्टामीन हा पदार्थ शरीरामधील बहुतेक सर्व ऊतकांमध्ये असतो. हिस्टिडीन या ॲमिनो अम्‍लापासून तो उत्पन्न होत असून तो प्रथिनाशी संयुक्त असतो. या पदार्थाचे शरीरात काय कार्य असते ते अजून अज्ञात आहे. मात्र त्या पदार्थाची लहानशी मात्रा जरी मुक्त स्थितीमध्ये शरीरात गेली तरी तीपासून अनेक घातुक परिणाम दिसतात. रक्तपरिवहन तंत्रातील रोहिणिका विस्तार पावतात व त्यामुळे रक्तदाब कमी होतो. कोशिकांतून रक्तातील द्रवपदार्थ बाहेर पडल्यामुळे तो ऊतकांत साठतो. अधिहर्षता प्रक्रियांमध्ये होणाऱ्या प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेचे अनिष्ट परिणाम होऊन त्वचेवर पित्त उठणे, खाज सुटणे, दम कोंडणे वगैरे लक्षणे दिसतात [→ हिस्टामीन]. या सर्व प्रकारांविरुद्ध क्रिया करणाऱ्या औषधांना हिस्टामीनविरोधी औषधे असे म्हणतात.

ॲड्रेनॅलीन हा शरीरातील पदार्थ नैसर्गिक हिस्टामीनविरोधी आहे. औषधशास्त्राच्या आणि रसायनशास्त्राच्या संयुक्त प्रयत्नाने अनेक कृत्रिम हिस्टामीनविरोधी औषधे उपलब्ध झालेली आहेत. रासायनिक साधर्म्यामुळे ही औषधे हिस्टामिनाची कोशिकांतील ग्राहकस्थाने आधी व्यापतात. त्यामुळे हिस्टामीन हा पदार्थ ऊतकापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्वचेवरील पित्त उठणे, सूज, खाज इ. लक्षणे कमी होतात परंतु दम्यावर त्यांचा फारसा परिणाम होत नाही. या हिस्टामीनविरोधकांच्या आणखी अनेक क्रिया दिसून येतात. तंत्रिका तंत्राचे दमन झाल्याने झोप येते, गतिजन्य विकार कमी होतात, कंपवातातील स्‍नायूंचा ताण कमी पडतो.

या हिस्टामीनविरोधकांपैकी काहींच्या फक्त नावांचा निर्देश खाली केला आहे : डायफिनिलहायड्रामीन, ब्रोमडायफिनिलहायड्रामीन, ॲन्टझोलीन, ट्रिपेलेनामीन, पायरिलामीन, फिनिरामीन, क्लोरफिनिरामीन, ट्रायप्रोलिडीन, प्रोमेथाझीन, मिथडायलेझीन, सायक्लिझीन, क्लोरसायक्लिझीन, मेक्झिलीन, हॅलोपायरॅमीन इत्यादी.

कर्कविरोधके : कर्क रोगाचे मूळ कारण अद्याप अज्ञात आहे. त्यात ऊतकांतील कोशिकांचे अनिर्बंध, अनियमित आणि विफल असे सारखे प्रजनन (वाढ) होत राहते, एवढे निश्चित माहीत आहे. कोशिकांच्या केंद्रातील रंगसूत्रांचा (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांचा) आणि प्रजननाचा अगदी निकटचा संबंध आहे म्हणून या रंगसूत्रांसंबंधी विशेष अभ्यास सर्वत्र चालू आहे. ही रंगसूत्रे दोन प्रकारांच्या रासायनिक संयुगांची असून त्यांना अनुक्रमे डीएनए आणि आरएनए [→ न्यूक्लिइक अम्‍ले] अशी नावे आहेत. या दोन संयुगांच्या परस्परपरिणामामुळे रंगसूत्रांचे विभाजन प्रथम होते व नंतर कोशिकाकेंद्र आणि पुढे सर्व कोशिकेचे विभाजन होऊन एका कोशिकेपासून दोन कोशिका उत्पन्न होतात. हे रंगसूत्रांचे विभाजन विकृत झाल्यास कोशिकांचे अनिर्बंध प्रजनन होऊन कर्करोग होतो असे मानण्यात येते म्हणून रंगसूत्र विभाजनावर परिणाम करणाऱ्या औषधांचा कर्कविरोधक म्हणून उपयोग करता येईल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे व त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्‍न चालू आहेत.

कर्कविरोधकांपैकी एका गटाला अल्किलीकारके असे म्हणतात. या पदार्थांमुळे रंगसूत्रातील डीएनए हा पदार्थ क्रियाहीन वा विकृत बनतो त्यामुळे डीएनएपासून उत्पन्न होणारी एंझाइमे तयार होत नाहीत आणि कोशिकांचे प्रजनन थांबते.

अशी अल्किलीकारके अनेक आहेत. त्यांचा परिणाम कोशिकांवर दिसतो, परंतु त्यांपैकी पुष्कळ पदार्थ सर्व शरीरावरच विपरीत परिणाम घडवीत असल्याने ते फार जपून वापरण्यात येत आहेत. अजून त्यांच्यासंबंधीचे संशोधन अपूर्ण आहे. या कारकांपैकी काही कारकांची नावे : मस्टार्गेन (मेक्लोरइथामाइन हायड्रोक्लोराइड), टेम (ट्रायएथिलीन मेलामाइड), थिओ-टेपा, ल्युकेरान (क्लोरांब्युसिल), मायलेरान (ब्यूसल्फान), डेगॅनॉल (मॅनिटॉल मस्टर्ड).

कर्कविरोधकांपैकी दुसऱ्या गटातील औषधांमुळे ऊतकातील चयापचयक्रियेला विरोध होतो म्हणून त्यांना चयापचयविरोधी असे म्हणतात. या पदार्थांमुळे कोशिकेतील प्राकृत चयापचयाला अडथळा उत्पन्न झाल्यामुळे कोशिकांचे प्रजनन बंद पडते.या गटातील पदार्थ सर्वच ऊतकांच्या चयापचयाला विरोध करीत असल्यामुळे प्राकृत ऊतक आणि कर्क-ऊतक या दोहोंवर विपरीत परिणाम होतो त्यांचा अनिष्ट परिणाम निरोगी ऊतकांवरही होतो. अजून तरी या गटातील औषधांपैकी फक्त कर्ककोशिकांवर कार्य करणारी औषधे विशेषत्वाने उपलब्ध झालेली नाहीत. मिथोट्रेक्सेट (ॲमेथोप्‍टेरीन) आणि मरकॅप्टोप्यूरीन (प्यूरिनेथॉल) ही दोन औषधे या गटात मोडतात.

कर्कविरोधकांपैकी तिसऱ्या प्रकाराचा गट म्हणजे प्राकृत शरीरात उत्पन्न होणारी काही प्रवर्तके (अंत:स्रावी ग्रंथीपासून स्रवणारे उत्तेजक स्राव, हॉर्मोने). अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकात उत्पन्न होणाऱ्या कॉर्टिकोस्टेरॉइडांचा अभ्यास करताना असे दिसून आले की, त्यांच्यापैकी काहींचा लसीका कोशिकांवर [एका प्रकारच्या श्वेत कोशिकांवर, → लसीका तंत्र] विपरीत परिणाम होतो. त्यावरून या जातीच्या औषधांवर सध्या प्रयोग चालू आहेत. स्तनकर्कामध्येही कॉर्टिकोस्टेरॉइडे दिली असता काही काळ तरी कर्क रोग कमी प्रभावी होतो. अष्ठीला ग्रंथीच्या [→ अष्ठीला ग्रंथि] कर्कात स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) या प्रवर्तकाचा चांगला उपयोग होतो. तसेच वृषणात (पुरुषांच्या लिंगग्रंथींत) उत्पन्न होणाऱ्या टेस्टोस्टेरोन या कॉर्टिकोस्टेरोनाचाही उपयोग स्तनकर्कात होतो.

यांशिवाय यूरेथान (एथिल कार्बामेट) आणि कोल्सेमिड (डेसासिटिल मिथिल कॉल्चिसीन) ही औषधेही कर्कविरोधक म्हणून वापरण्यात येतात.

अंतःस्रावी ग्रंथींपासून मिळणारी औषधे : अंतःस्रावी ग्रंथींपासून उत्पन्न होणाऱ्या काही प्रवर्तकांचा औषधे म्हणून उपयोग करण्यात येतो. त्यांचा फक्त नामोल्लेख येथे केला आहे. [→ अंतःस्रावी ग्रंथि].

(अ) पोष ग्रंथी : पोष ग्रंथीच्या पश्च भागापासून उत्पन्न होणारे पुढील दोन पदार्थ औषधे म्हणून वापरण्यात येतात : (१) पिट्रेसीन : यामुळे रोहिणिकांचे आकुंचन होऊन रक्तदाब वाढतो. (२) पायटोसीन : यामुळे प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाचे स्‍नायू विशेषत्वाने आकुंचन पावतात.


(आ) अवटू ग्रंथी : अवटू ग्रंथीचा स्राव कमी पडला तर बालपणी अवटू जडवामनता (अवटू ग्रंथीच्या स्रावाच्या अभावामुळे बुद्धी व शरीर यांची वाढ खुंटते) येते प्रौढपणी हा स्राव कमी पडला तर श्लेष्मशोफ (चेहरा आणि हात यांना सूज येणे ही लक्षणे असलेला रोग) हा रोग होतो. या रोगात अवटू ग्रंथीचा अर्क चांगला गुणकारी आहे. अवटू ग्रंथीमुळे शरीरातील चयापचय वाढतो म्हणून वजन कमी करण्यासाठीही त्याच्या अर्काचा उपयोग करतात परंतु त्या अर्काचे हृदयावर दुष्परिणाम होत असल्यामुळे तो फार जपून वापरावा लागतो.

(इ) अग्‍निपिंड : या अंतःस्रावी ग्रंथीपासून मधुमेहावरील इन्शुलीन हे प्रवर्तक मिळते [→ इन्शुलीन मधुमेह].

(ई) अधिवृक्क ग्रंथी : या ग्रंथीचे बाह्यक आणि मध्यक असे दोन भाग असून बाह्यकापासून ॲड्रेनॅलीन हे औषध तयार करतात. त्यामुळे रक्तवाहिन्याचे आकुंचन होऊन रक्तदाब वाढतो आणि श्वासनलिकांचे प्रसरण होऊन दमा बरा होतो. तसेच अवसादावरही (शॉकवरही) या औषधाचा चांगला गुण येतो. मध्यकापासून कॉर्टिकोस्टेरॉइडे उत्पन्न होतात [→ अधिवृक्क ग्रंथि कॉर्टिसॉन].

(उ) अंडाशय ग्रंथी : या ग्रंथीपासून स्त्रीमदजन आणि प्रगर्भरक्षी (प्रोजेस्टेरॉन) अशी दोन प्रवर्तके उत्पन्न होतात. स्त्रीमदजनाचा उपयोग ऋतुनिवृत्तीच्या वेळी करतात, तसेच मासिक ऋतुचक्रात बदल घडवून आणणे हाही त्याचा उपयोग होतो. स्त्रीमदजनासारखी अनेक संश्लेषित औषधे आता उपलब्ध झालेली असून त्यांच्या गोळ्या पोटात घेतल्यास संततिप्रतिबंधासाठीही त्यांचा उपयोग होतो. प्रगर्भरक्षी प्रवर्तकाचा उपयोग ऋतुस्रावाच्या नियमनासाठी होतो. 

(ऊ) वृषण ग्रंथी : या ग्रंथीपासून पौरुषजन (अँड्रोजेन) हे प्रवर्तक उत्पन्न होते. त्याचा उपयोग वृद्धावस्थेमध्ये होणारी अष्ठीला ग्रंथीची वाढ थांबविण्यास, तसेच स्तनकर्कावर होतो.

प्रतिजैव औषधे : गेल्या काही वर्षांत पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन इ. अनेक प्रतिजैव औषधे उपलब्ध झालेली आहेत. या औषधांचा अनेक रोगांच्या जंतूंचा नाश व प्रतिरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे [→ प्रतिजैव पदार्थ].

जीवनसत्त्वे : शरीराच्या स्वाभाविक वाढीसाठी निरनिराळ्या जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. नेहमीच्या आहारात त्यांची न्यूनता असल्यास निरनिराळे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळा निरनिराळी जीवनसत्त्वे रोगप्रतिबंधासाठी रोग्याला द्यावी लागतात [→ जीवनसत्त्वे].

मधुमेहावरील औषधे : मधुमेहावर इन्शुलीन हे प्रवर्तक देतात. त्याशिवाय अनेक नवी औषधेही तयार करण्यात आली असून त्यांच्या गोळ्या पोटात दिल्या असता काही मधुमेही रुग्णांना गुण येतो. ही औषधे दोन प्रकारची आहेत : (१) सल्फॉनिल यूरिया : यात टॉलब्युटामाइड, क्लोरप्रोपॅमाइड, ॲसिटोहेक्झामाइड वगैरे औषधांचा अंतर्भाव आहे. या औषधांमुळे अग्‍निपिंडातील इन्शुलीन मुक्त होऊन अधिक प्रमाणात रक्तात मिसळते. अर्थात अग्‍निपिंडातील इन्शुलीनस्रावी कोशिका पुरेशा प्रमाणात असल्यासच या औषधांचा उपयोग होतो. (२) बायग्वानाइड या औषधामुळे कोशिकेतील शर्करेचा चयापचय पूर्ण होण्यास मदत होते म्हणून तरुण आणि प्रौढ वयांतील मधुमेहातही ते उपयोगी पडते [→ मधुमेह].

संदर्भ : 1. Beckman, H. Pharmacology : The Nature, Action and Uses of Drugs, Philadelphia, 1961.

    2. Grollman, A. Pharmacology and Therapeutics : A Textbook for Students and Practitioners of Medicine, Philadelphia, 1962.

    3. Laurence, D. R. Bacharach, A. L. Evalution of Drug Activities Pharmacometrics, 2 Vols., New York, 1964.

    4. Lewis, J. J. An Introduction to Pharmacology, Baltimore, 1964.

परांजपे, आ. श्री. करंदीकर, श. म. गायतोंडे, भि. व.