करवत : घन वस्तूची मोडतोड न करता तिचे तुकडे करावयाचे साधन किंवा हत्यार. करवतीचे पाते उत्तम जातीच्या पोलादी पत्र्याचे बनविलेले असते. त्याच्या एका कडेवर तीक्ष्ण दात पाडलेले असतात. दात पाडलेला भाग नंतर औष्णिक उपचाराने (पाणी देऊन) कडक करतात व बाकीचा भाग पूर्वीप्रमाणेच नरम राहू देतात. असे केल्याने वस्तू कापण्याचे काम चांगले होते व कापताना करवतीचे पाते तुटत नाही. कापावयाच्या वस्तूंनुसार करवतींचे अनेक प्रकार असतात. लाकूड कापण्याच्या लहान हात करवतीला एकाच बाजूकडे लाकडी मूठ बसवतात. अशा करवतीचे पाते मुठीकडे रुंद असते व पुढच्या टोकाकडे अरुंद होत जाते. लाकूड कापण्याच्या दोन माणसांनी चालवावयाच्या मोठ्या करवतीला पात्याच्या दोन्ही टोकांवर मुठी बसवतात.

लाकूड कापण्याच्या हात करवतीची लांबी १० सेंमी. पासून ६० सेंमी. पर्यंत असते. धातू कापण्याच्या हात करवतीचे पाते साधारणतः २५ सेंमी. लांब व १.५ सेंमी. रुंद असते. हे पाते नीट ताणून धरण्यासाठी धातूची चौकट असते.

आ. १. धातुकामाच्या हात करवतीचे दात : (अ) नाजुक कामासाठी, (आ) सर्वसाधारण कामासाठी.

करवतीच्या एका टोकावर चौकट धरण्याची मूठअसते. यंत्राने चालणार्‍या धातू कापण्याच्या साध्या करवतीचे पाते ३० ते ४० सेंमी. लांब व ३ ते ४ सेंमी. रुंद असते. साध्या करवतीचे पाते कापावयाच्या वस्तूवर ठेवून व पुढे-मागे सरकवून कापण्याचे काम केले जाते. धातुकामाच्या हात करवतीच्या दातांचे काही प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. धातू कापण्याचे साध्या करवतीचे यंत्र आ. २ मध्ये दाखविले आहे.

लाकूड किंवा धातू कापण्यासाठी साध्या करवतीऐवजी पट्ट्यासारखी सतत एकाच दिशेने सरकणारी पोलादी करवत वापरता येते. ही करवत यांत्रिक शक्तीने फिरवावी लागते. या प्रकारची करवत आ. ३ मध्ये दाखविली आहे. पट्टा करवतीच्या दातांचे काही प्रकार आ. ४ मध्ये दाखविले आहेत.

लाकूड कापण्याच्या करवतीचे दात बरेच मोठे असतात. ते झिजले म्हणजे घासून तीक्ष्ण करता येतात. धातू कापण्याच्या करवतीचे दात बारीक असतात. ते झिजले म्हणजे करवतीचे पाते बदलावे लागते. करवतीचे दात आलटून पालटून दोन्ही बाजूंकडे थोडे झुकवलेले (आ. ४ इ) असतात. त्यामुळे करवतीने कापलेली खाच तिच्या पात्याच्या जाडीपेक्षा रुंद होते व करवत सरकत असताना कापलेल्या जागेत ती अडकत नाही.

आ. २. धातू कापण्याचे साध्या करवतीचे यंत्र

साध्या धातूच्या करवतीच्या यंत्रामध्ये कापावयाची वस्तू यंत्रातील शेगड्यामध्ये घट्ट धरून ठेवलेली असते व करवतीचे पाते यांत्रिक शक्तीने कापावयाच्या वस्तूवरून मागे-पुढे सरकत जाते. हे पाते यंत्रातील सरकणार्‍या चौकटीत ताणून धरलेले असते. चौकटीच्या वजनामुळे कापण्याचे काम आपोआप सुरळीत चालते. या करवतीची पाती टंगस्टन किंवा मॉलिब्डेनममिश्रित पोलादाची असतात व त्यांच्यावर जरूर ते औष्णिक उपचार केलेले असतात. ही पाती पुष्कळ दिवस चांगले काम देतात.

हाताने लाकूड कापण्याच्या करवतीचा वेग ६० मी./मि. पर्यंत ठेवता येतो. धातू कापण्याच्या हात करवतीचा किंवा साध्या करवत यंत्राचा वेग ३० मी./मि. असतो.

धातू कापण्याच्या करवत यंत्रात घर्षणाने बरीच उष्णता उत्पन्न होते, त्यामुळे करवतीच्या पात्याची धार कमी होत जाते. याकरिता करवत चालू असताना कापावयाच्या जागेवर तेलमिश्रित थंड पाण्याची संततधार पडण्याची व्यवस्था केलेली असते.


आ. ३. पट्ट्याची करवत

पट्टा करवतीचा वेग कापावयाच्या पदार्थावर अवलंबून असतो. लाकूडकामासाठी हा वेग १,२०० मी./मि. पर्यंत ठेवतात. नरम धातू (तांबे, पितळ इ.) कापण्यासाठी हा वेग ५०० मी./मि. पर्यंत व बीड कापण्यासाठी ३० मी./मि. ठेवतात.

लाकूड कापण्याची करवत गोल तबकडीसारखी करता येते.

आ. ४. पट्टा करवतीच्या दातांचे काही प्रकार : (अ) सर्वसाधारण धातुकामासाठी, (आ)लाकूड कामासाठी, (इ) दात झुकविण्याची पद्धत.

अशा करवतीचे पाते पोलादी पत्र्याचे असते व त्याच्या परिघावर दात पाडलेले असतात. अशा करवतीचे तबकडी-पाते यांत्रिक शक्तीने फिरणाऱ्या दंडावर साध्या कप्पीप्रमाणे घट्ट बसवलेले असते.

या करवत यंत्रात करवत फिरवणारा दंड टेबलाच्या पृष्ठभागाखाली आडवा ठेवलेला असतो. त्यामुळे फिरणार्‍या करवतीचा थोडासाच भाग एका फटीतून टेबलाच्या पृष्ठभागाच्या वर आलेला असतो. कापावयाची वस्तू टेबलाच्या पृष्ठभागावरून मार्गदर्शक ठोकळ्यांच्या साहाय्याने फिरणार्‍या करवतीच्या पात्याने जसजशी कापली जाईल तसतशी नेट देऊन हळूहळू पुढे सरकत न्यावी लागते.

याच पद्धतीची लहान करवत यंत्रे विजेच्या मोटारीने चालविली जातात. ही थोड्या वजनाची व सुवाह्य (उचलून नेण्याजोगी) असल्याने कापावयाची अवजड वस्तू सरकवावी लागत नाही.पहा : हत्यारे (कर्मशालेतील).

  

वैद्य, ज. शि.