औषधिकोश : औषधिद्रव्यांचे गुणधर्म, शक्ती, विशुद्धी व त्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती देणाऱ्या, सामान्यतः शासनामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथाला औषधिकोश असे म्हणतात. औषधी प्रत्यक्ष व्यवहारात काही काळ वापरल्यानंतरच त्यांचा समावेश या अधिकृत ग्रंथात करण्यात येतो. या ग्रंथात निर्देशित केलेले गुणधर्म, शक्ती व विशुद्धी असलेली औषधेच तयार करण्याचे बंधन औषधनिर्मात्यांवर कायद्याने घातलेले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या ग्रंथाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

या ग्रंथात वर्णन केलेल्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधे वापरू नयेत असे नाही. पण त्यात दिलेल्या औषधांचे उत्पादन करावयाचे असेल किंवा ती वापरावयाची असतील, तर ती या ग्रंथात दिलेल्या कसोटीस उतरली पाहिजेत असा दंडक आहे. म्हणून या ग्रंथातील औषधांना ‘अधिकृत’ असे नाव आहे.

असे औषधिकोश तयार करण्याची कल्पना अती प्राचीन कालापासून अस्तित्वात असून अशा स्वरूपाचा पुरावा देणारा इ.स.पू. सतराव्या शतकामधील एक शिलालेख बॅबिलन येथे सापडला आहे. भारतात इ.स. दहाव्या शतकापूर्वीपासूनच असे औषधिकोश तयार करण्यात येत होते, असे आढळून आले आहे. त्यांना ‘निघंटु’ असे नाव असून ते ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. त्यांत औषधी द्रव्यांच्या गुणधर्मांचे वर्णन केलेले आहे. आयुर्वेदीय पद्धतीने वैद्यकव्यवसाय करणारे आजही हे ग्रंथ वापरीत आहेत.

युरोपात असा प्रयत्‍न १४९८ मध्ये इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. १७७२ मध्ये डेन्मार्क देशामध्ये जो औषधिकोश प्रसिद्ध झाला त्याची अखंडित परंपरा आजही चालू आहे. असे औषधिकोश अनेक देशांच्या शासनांनी प्रसिद्ध केले असून त्या त्या देशात ते अधिकृत समजण्यात येतात.

ब्रिटन व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे औषधिकोश दर पाच-दहा वर्षांनी सुधारणा करून प्रसिद्ध करण्यात येतात. त्याकरिता वैद्यक, औषधी, रसायन वगैरे अनेक शास्त्रांतील तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीमार्फत या ग्रंथांची फेरतपासणी सतत चालू असते. १९४४ मध्ये भारतीय औषधिकोश तयार करण्याचा प्रयत्‍न सुरू झाला व १९५५ मध्ये पहिला भारतीय औषधिकोश प्रसिद्ध झाला. या ग्रंथात शक्य त्या ठिकाणी औषधांची हिंदी नावे देण्यात आलेली आहेत. त्यापूर्वी भारतात ब्रिटिश औषधिकोश व त्याच्या पुरवण्या याच अधिकृत मानल्या जात.

राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय औषधिकोश तयार करण्याचा १९२५ मध्ये प्रयत्‍न झाला. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेमार्फत पहिला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय असलेला औषधिकोश १९५१ मध्ये प्रसिद्ध झाला. आंतरराष्ट्रीय औषधिकोशाची दुसरी आवृत्ती १९५५ मध्ये व पुरवणी १९५८ मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक देशांनी हा औषधिकोश अधिकृत म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे.

वैद्यकशास्त्र प्रगतिशील असल्यामुळे औषधिकोश वारंवार सुधारण्याची आवश्यकता असते. दैनंदिन व्यवहारात वापर न होणारी औषधे वगळून उपयुक्त ठरलेली नवीन औषधे नव्या आवृत्तीत समाविष्ट केली जातात.

औषधिकोशात घालून दिलेल्या कसोटीस उतरणारी औषधेच तयार करण्यात येतात की नाही, हे पहाण्यासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा असून त्या यंत्रणेमार्फत जरूर ते कायदेशीर उपाय योजण्यात येतात [→ औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम]. अशा अधिकृत औषधाच्या बाटल्यांवर व खोक्यांवर भारतात I.P. (इंडियन फार्माकोपिया) अशीअक्षरे असल्यामुळे ती अधिकृत कसोट्यांस उतरणारी आहेत, असे निःशंकपणे मानण्यास हरकत नाही.

ढमढेरे, वा. रा.